Sunday, February 16, 2020

वाढदिवस आणि काढ-दिवस

Image result for paid news

‘खींचो न कमान न तलवार निकालो,
जब तोप मुकाबिल हो तो अख़बार निकालो’

१९६० सालात बाळासाहेब ठाकरे व श्रीकांत ठाकरे या दोन भावांनी मराठीतले पहिले व्यंगचित्र साप्ताहिक प्रकाशित करायला सुरूवात केली. त्याचे ब्रीदवाक्य म्हणून हा उर्दू शेर छापला जायचा. कारण त्यातून पत्रकारितेची ताकद व्यक्त व्हावी अशीच अपेक्षा होती. शाळकरी वयात ते साप्ताहिक वाचताना हाताळताना किंवा पुढे शिवसेना स्थापन झाल्यानंतरही एका गोष्टीचे कुतूहल होते. मराठीचा आग्रह धरणार्‍या ‘मार्मिक’ साप्ताहिकाचे ब्रीदवाक्य म्हणून उर्दू शेर कशाला हवा? पुढे १९८५ च्या उत्तरार्धात मीच त्या साप्ताहिकाचा कार्यकारी संपादक म्हणून रुजू झालो आणि त्यातले रहस्य उलगडले. श्रीकांत ठाकरे व्यंगचित्रकार तितकेच संगीतकारही होते. ते उर्दू भाषेचे चांगले जाणकार होते. एकादा भेट झाली तेव्हा मी त्यांच्याकडे त्या शेरविषयी चौकशी केल्यावर त्यांनी शेरोशायरी व उर्दू भाषेची नजाकत मनापासून समजावली. तो अकबर इलाहाबादी यांचा शेर होता आणि त्यात पत्रकारितेचे सामर्थ्य व व्याप्ती नेमकी व्यक्त होत असल्यानेच त्याला ब्रीदवाक्य केले असे त्यांनी समजावले. आजच्या इतके तेव्हा अविष्कार स्वातंत्र्याने नाटक चालू झाले नव्हते, की असे स्वातंत्र्य भिकेसारखे मागण्याची अवस्था आलेली नव्हती. असो. पण त्या मोजक्या शब्दातून पत्रकारितेचा हेतू स्वच्छ होतो. प्रस्थापिताला आव्हान द्यायचे असेल तर हातात हत्यार घेऊन रणांगणात उतरण्याची गरज नाही. तोफ़ेपेक्षाही प्रभावी भेदक ठरू शकेल असे वर्तमानपत्र काढावे. हा अकबर इलाहाबादी सुद्धा अविष्कार स्वातंत्र्याच्या भिक्षेकर्‍यांच्या युगातला नाही व नव्हता. शिवाय त्याने हा शेर लिहीला तेव्हाही भारतात घटना वा कायद्याने दानधर्म केलेले अविष्कार स्वातंत्र्य आलेले नव्हते. त्यामुळे तर त्या काव्यपंक्तीची महत्ता अधिक आहे. कारण उठसुट राज्यघटनेचा हवा देऊन आपल्या अधिकार हक्काचे रडगाणे गायच्या जमान्यात त्याला अशा काव्यपंक्ती सुचल्या नव्हत्या.

या शायराने त्या ओळी लिहील्या, तेव्हा भारतात स्वातंत्र्य चळवळीची बीजे रुजवायला सुरूवात झाली होती. इथे ब्रिटीश सत्ता घट्ट पाय रोवून उभी राहिलेली होती आणि तलवारी तोफ़ा वा इतर सर्व हत्यारे भारतीयांसाठी पांगळी ठरलेली होती. त्या परक्या सत्तेशी दोन हात करण्याची हिंमत व इच्छा भारतीय पुरूषार्थ गमावून बसला होता. तेव्हा शायराने कुठले हत्यार आगामी काळात प्रभावी ठरू शकते, त्याची केलेली ती भविष्यवाणी होती. इलाहाबादीचा काळ कॉग्रेसपुर्व आहे. म्हणजे कॉग्रेसची स्थापना झाली, तेव्हा हा शायर चाळीशीत होता आणि भारतात नव्यानेच पत्रकारिता वा वर्तमानपत्रे रांगत वगैरे होती. अशा काळात त्याने त्या बाळाचे पाय पाळण्यात पाहून त्याच्या सामर्थ्याचे भविष्य कथन केलेले होते. त्याचे भविष्य पुर्णपणे खरे ठरले, तसेच त्याने पत्रकारितेच्या र्‍हासाचे भाकित करून ठेवलेले होते. तेही तितकेच खरे ठरले आहे. योगायोग असा, की यावर्षीच अकबर इलाहाबादीने जगाचा निरोप घेतल्याला शंभर वर्षे पुर्ण होत आहेत. गांधीजी भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत उतरण्याच्या सुमारास त्याने जगाचा निरोप घेतला होता. पण जाण्यापुर्वी त्याने पत्रकारिता दिवाळखोर होण्याचे भाकित करून ठेवले, ते स्वातंत्र्योत्तर वा विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत भारतीय पत्रकार संपादक बुद्धीमंतांनी तंतोतंत खरे कररून दाखवले आहे. कधीकाळी आपल्या त्या काव्यपंक्तीतून लेखणीची वा पत्रकारितेची भेदकता कथन करणार्‍या इलाहाबादीचा अल्पावधीतच म्हणजे विसावे शतक सुरू होताना पुर्ण भ्रमनिरास झालेला होता. म्हणूनच तो आपल्या शैलीत म्हणजे शेर लिहून म्हणतो,

‘मियां को मरे हुए हफ्ते गुजर गए, कहते हैं
अख़बार मगर, अब हाले मरीज अच्छा है’

माध्यमे वा पत्रकार आपल्या हाती लेखणीची सत्ता आल्यावर समाजाची किती भीषण दिशाभूल करू शकतात. त्याची ग्वाही त्याच अकबर इलाहाबादीने दिलेली आहे. यजमान मरून कित्येक आठवडे लोटलेत, पण वर्तमानपत्रे मात्र त्याची प्रकृती ठिकठाक असल्याची बातमी देत आहेत. अशा आशयाच्या काव्यपंक्ती इलाहाबादीने १९२० पुर्वी लिहून ठेवाव्यात? इतकी माध्यमे त्या काळात सर्वव्यापी झालेली नव्हती. छपाईच्या यंत्रणाही आधुनिक नव्हत्या व वर्तमानपत्रे नियतकालिकांचा व्यापारही झालेला नव्हता. देशातील एक टक्काही सामान्य जनता वाचक वगैरे झाली नव्हती, किंवा साक्षर सुबुद्ध नागरिक झालेली नव्हती. तेव्हाची ही गोष्ट आहे. आजच्या प्रमाणे लाखो साप्ताहिके गल्लीबोळातून प्रसिद्ध होत नव्हती, की पत्रकारांची ‘लोकसंख्या’ लक्षावधीत पोहोचली नव्हती. कर्तव्य किंव व्रतस्थ वृत्तीने पदरमोड करून मुठभर शहाणे लोक नियतकालिके चालवित होते आणि त्यांना लाखभर खप किंवा वाचक मिळवण्याचे स्वप्न बघायचीही हिंमत झालेली नव्हती. कुणा भांडवलदार धनिकाला मीडिया हाऊस कंपनी स्थापन करून लाखो रुपयेही त्यात गुंतवण्याची बुद्धी झालेली नव्हती.  त्या काळातच इलाहाबादीचा इतका भ्रमनिरास झालेला होता. पत्रकार म्हणून नोकरी वा पेशा वगैरे कल्पना आपल्या देशात रुजण्यापुर्वीच त्याचा भ्रमनिरास झाला असेल, तर आजचे चित्र बघून त्याने आत्महत्याच केली असती ना? माध्यमे पत्रकार लेखणी हातात आल्यावर किती धडधडीत खोटेपणा करू शकतात आणि सामान्य वाचकाची दिशाभूल करू शकतात, हे त्या शायराने शतकापुर्वी नमूद करून ठेवले आहे. त्यातला आशय इतकाच आहे, की वर्तमानपत्र वा पत्रकारिता एक भेदक हत्यार आहे. म्हणून ते लढाईसारखे समाजाला वापरता येते. पण तेच हत्यार चुकीच्या हातात पडले तर तेच समाजासाठी अत्यंत घातक संकट होऊन जाते.

पत्रकारिता वा माध्यमे हा धंदा नाही, तो धर्म वा व्रत आहे. जेव्हा त्यात पैसा ओतून त्याचा धंदा सुरू होतो. तेव्हा त्याचे नुसते पावित्र्य संपून जात नाही, तर त्याची धारही बोथट होऊन जाते. विसाव्या शतकाच्या अखेरीस आणि एकविसाव्या शतकाच्या आरंभ काळात हळुहळू माध्यमांचा कब्जा भांडवलशाहीने घेतला आणि त्यात पगारी लढवय्यांची भरती करून लेखणीची धार अगदीच बोथट करून टाकली. आज पत्रकारिता इतकी निरूपद्रवी व निकामी झालेली आहे, की तिचा कोणाला धाक उरलेला नाही. सत्तेला वा प्रस्थापिताला तर आजची माध्यमे पैसे फ़ेकून शय्यासोबत करणारी वेश्या वाटू लागलेली आहे. म्हणून तर एकविसाव्या शतकात जगातले अनेक सत्ताधीश माध्यमांना कवडीची किंमतही द्यायला तयार दिसत नाहीत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प, ब्रिटनचे नवे पंतप्रधान बोरीस जॉन्सन वा भारताचे दुसर्‍यांदा बहूमत मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याची मोठी उदाहरणे आहेत. त्यांना पाडायला जगभरातली वा त्यांच्या देशातली बहुतांश माध्यमे कंबर कसून लढत होती. पण त्या सर्वांना जमिनदोस्त करून या तिघांनी अफ़ाट यश संपादन केले आहे. तो त्यांचा विजय असण्यापेक्षा निष्प्रभ झालेल्या माध्यमांचा, पत्रकारितेचा किंवा त्यांच्या भामटेगिरीचा दारूण पराभव आहे. भारतात २००२ पासून नरेंद्र मोदींना लक्ष्य करायची देशव्यापी मोहिम माध्यमांनी राबवली. त्यांच्या विरोधात हजारो अग्रलेख लिहीले गेले. लाखो लेख प्रसिद्ध झाले. जगभरच्या माध्यमात कोट्यवधी बातम्या गुजरात दंगलीचे निमीत्त करून प्रसिद्ध झाल्या. पण मोदींनी सलग तीनदा विधानसभेत बहूमत मिळवून ते मुख्यमंत्री होत राहिले. बारा वर्षात त्यांनी देशाचा पंतप्रधान होण्यापर्यंत मोठी झेप घेतली. याचा अर्थ इतकाच, की आज वर्तमानपत्रे वाहिन्या वा एकूणच माध्यमांची धार बोथटली असून कोणाही राजकारण्याला पत्रकारिता वा त्याच्या भेदक लेखणीचा किंचीतही धाक उरलेला नाही. त्यांच्या टिकेला घाबरण्याचे सोडा, भीक घालण्याचीही गरज नेत्यांना वाटेनाशी झाली आहे. ही पत्रकारितेची दुर्दशा आहे ना?

प्रसार माध्यमांचा व पत्रकारितेचा पसारा आज अफ़ाट पसरला आहे. त्यासाठीची साधने व साहित्यही आधुनिक होऊन गेले आहे. नवनवी तंत्रे आलेली आहेत. पण इतक्या आयुधांनी सज्ज असलेल्या पत्रकारितेला धार उरलेली नाही. तिच्या टिकेला कोणी वचकत नाही की दाद देत नसेल, तर लेखणीच बोथटली मानावे लागेल. उलट काही प्रसंगी पत्रकारांना मारहाण होते, हल्ले होतात आणि धमक्या तर सरसकट दिल्या जात असतात. ती धमकावणार्‍या कुणाची हिंमत नसते, तर पत्रकारिता लुळीपांगळी व आश्रित झाल्याचा परिणाम असतो. ट्रम्प, मोदी यांना जगभर पसरलेल्या माध्यमे व पत्रकारांच्या हल्ल्याने पराभवाची भिती वाटली नसेल, तर भाऊ तोरसेकर नावाचा निवृत्त पत्रकार ब्लॉगर आणि पुण्यातून एक क्षुल्लक मासिक काढणारा घनशाम पाटील; सहा दशके राजकारण करणार्‍या पवारांना संपवू शकतात काय? अशी भिती कशाला वाटावी? तसे वाटले नसते तर पवारभक्त वा समर्थकांनी तशाच स्वरूपाची तक्रार पोलिसात कशाला दिली असती? त्यापैकी कोणी व्हिडीओ बनवून आमचे हातपाय तोडण्याच्या धमक्या कशाला दिल्या असत्या? त्यांना तशी भिती वाटली असेल वा शंका आलेली असेल, तरी तो अकबर इलाहाबादीच्या त्या पहिल्या ‘मार्मिक’ काव्यपंक्तीचा मोठा विजय आहे. अजून पत्रकारितेची व लेखणीची भेदकता शिल्लक असल्याची ती साक्ष आहे. त्यासाठी शरद पवार यांचे आभार मानले पाहिजेत. कारण त्यांच्याच राष्ट्रवादी पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकार्‍याने तंगडी तोडण्याची धमकी देताना, माझे लेख वा व्हिडीओ पवारांना संपवण्यासाठीच केले आहेत, असा दावा केलेला आहे. इतका ज्येष्ठ पदाधिकारी पवार भयभीत झाले नसताना अशा धमक्या देऊ शकला नसता. त्यामुळेच त्या धमकीची भिती वाटण्यापेक्षाही पवारांच्या एकूण राजकीय वाटचाली व अनुभवाची कींव करावी असेच वाटले. मोदी वा ट्रम्प यांचे अफ़ाट यश सुपारी पत्रकारितेचा अभूतपुर्व पराभव समोर दिसत असतानाही पवार दोन किरकोळ पत्रकारांच्या लेखन विवेचनाने आपण संपतोय असे मानत असतील, तर ती अत्यंत लज्जास्पद घटना आहे.

शरद पवार स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेतात. पण त्याबद्दल विचारले, मग मात्र आपण कोणाला तसे सांगितले नाही असेही म्हणतात. नसेल तर त्या चुकीच्या उल्लेखासाठी आपल्याच सवंगडी वा पाठीराख्यांचे कान कशाला उपटत नाहीत? कारण त्यातून त्यांच्या होणार्‍या गुणगौरवाच्या गुदगुल्याही हव्या असतात. म्हणूनच त्यातला उद्देश लपून रहात नाही. जो पाठीराखा जाणता राजा म्हणून पवारांना सुखावण्यासाठी धडपडतो, तसाच दुसरा पाठीराखा तोरसेकर पाटलांना तंगडी तोडायची धमकी जाहिरपणे देऊन पक्षाध्यक्ष पवारांना प्रसन्न करून घ्यायला धडपडत असतो. ती पवारांचीच इच्छा मानवी लागतेच. पण कींव इतक्यासाठी येते की दोन पत्रकारांच्या लिखाणाने त्यांना पवार संपतील असेही वाटते. अशा भयातून वा धमकीतून पवार किती तकलादू राजकारणी आहेत, त्याचीच साक्षही ते देतात ना? किंबहूना जगात कुठलाही पत्रकार वा त्याची टिका राजकारण्याचा बाल बाका करू शकत नसल्याचा दोन दशकातला इतिहासही पवारांना समजू शकला नाही. असाच निष्कर्ष काढावा लागतो. मग साठ वर्षात पवार राजकारण म्हणून काय शिकले? आसपासच्या राजकीय घडामोडीत निरूपद्रवी निकामी झालेल्या पत्रकारीतेचेही भान पवारांना नसेल, तर त्यांचा अनुभव वा राजकीय जाण चुलीत घालायची काय? कधीकाळी वा अगदी कालपरवापर्यंत मला पवारांच्या दिर्घकालीन राजकारणाचा आदर होता. पण ह्या मधल्या घटनाक्रमाने तोही गळून पडला. सहा दशके व त्यातला अनुभव त्यांनी मातीमोल करून टाकला असेच वाटले. त्यांना वा राष्ट्रवादीच्या सहकार्‍यांना त्याची लाज नसेल, पण मला एक मराठी माणुस व पत्रकार म्हणून असा माणूस इतकी वर्षे राज्यात एक प्रमुख नेता असल्याची शरम नक्की वाटली. त्यांच्या अनुयायी व भक्तांना खुले आवाहन आहे. सत्तरी ओलांडून गेलेल्या माझ्या आयुष्यात पंतप्रधान काय साधा नगरसेवक होण्याचीही महत्वाकांक्षा नाही. कधीही यावे हातपाय तोडावेत किंवा प्राणही घ्यायला हरकत नाही. कारण आता वाढदिवस करायचीही पवारांसारखी हौस मला उरलेली नाही. या वयात जगणे म्हणजे काढ दिवस असतात.

25 comments:

  1. वा भाऊ, जबरदस्त खुले आव्हान. भाऊ, पुन्हा पवार. पवार हे संपलेले राजकारणी आहेत. फडणवीस सारखा त्यांच्या द्रुष्टीने नवखा पण आपले शंभरच्यावर आमदार निवडून आणले ते ही दोनवेळा, आणि पवार ६० वर्षे महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात आहेत पण कुबड्या घेतल्याशिवाय किंवा फोडाफोडी केल्याशिवाय महाराष्ट्रात सत्ता मिळवू शकले नाहीत आणि स्वप्ने मात्र पंतप्रधान होण्याचे. हे चाणक्य, जाणता राजा वगेरे काही नाहीत तद्दन सवंग राजकारणी आहेत.

    ReplyDelete
  2. शेवटचा परिच्छेद .... the best ...

    ReplyDelete
  3. पार म्हणजे पारच वाट लावलीय भाऊ तुम्ही जाणत्याची. निदान थोडी तरी नावाला ठेवायची. वा भाऊ वा!

    ReplyDelete
  4. हे सगळ शिर्श नेत्याच्या GOOD BOOK मध्ये रहाण्यासाठि केलेले असते.पत्रकार पण हेच करत आहेत नसता दोन दिवसात तथाकथित दारुवर त्याच्या चविवर प्राशन करुन रकाने लिहीणारे पत्रकार तुम्हाला मिळालेल्या धमकिचा साधा निषेध पण करत नाहित.आज अनंत भालेराव ग वा बेहरे यांच्या तोडिचा संपादक पत्रकार दाखवा.ब्रहनडा बरा होता.तो नंतर तरि लढला!

    ReplyDelete
  5. भाऊ, तुमच्या लेखनशैलीला सलाम.! तुमचे लेख वाचून तुमच्याबद्दल प्रचंड आदर निर्माण होत आहे. तुमचे शब्दांचे भांडार पाहून खूप थक्क व्हायला होतं. तुमच्या नवीन ब्लॉगची मी दररोज वाट पाहतो आणि वाचतो.

    ReplyDelete
  6. भाऊ असे हजारो पवार येतील आणि जातील परंतु तुम्ही आम्हाला हवे आहात . उगाच काहीबाही बोलायचं नाही

    ReplyDelete
  7. भाऊ, अगदी खास शालजोडीतले. मस्त !👌

    ReplyDelete
  8. प्रिय भाऊ
    तुम्ही आम्हाला हवे आहात. आज महाराष्ट्रात पत्रकारिता म्हणून काही बाकी असेल तर केवळ आणि केवळ तुमची लेखणी आणि ब्लॉग आहे. तुमच्या लेखणीने स्फूर्ती घेऊन एक नवा "भाऊ तोरसेकर "महाराष्ट्रात तयार व्हावा आणि जांभेकर, परांजपे, अत्रे, तोरसेकर अशी परंपरा पुढे चालू रहावी हीच सदिच्छा. धन्यवाद
    जितेंद्र वैद्य

    ReplyDelete
  9. भाऊ, या लेखाने तुमची इज्जत "वाढ"ली आणि पवारांची "काढ"ली!!!!!!!!!!

    ReplyDelete
  10. भाऊसाहेब,
    फिक्र मत करना,गरजनेवाले बादल बरसते नहीं

    ReplyDelete
  11. भाऊ,
    "पत्रकारिता वा माध्यमे हा धंदा नाही, तो धर्म वा व्रत आहे." या एकाच वाक्यात लेख संपला आहे. इतके उच्च विचार पचनी पडणे तर दूरच, वाचनी येणे देखील दुरापास्त झाले आहे. असे विचार तत्व म्हणून समोर ठेवून चालणारे संशोधनाचा विषय झाले आहेत. अश्या विचारांशी दुरान्वयानेही संबंध नसलेली लोकं पत्रकारिता, राजकारण, शिक्षण, व्यवसाय, समाजकारण, अर्थकारण, कला, इतिहास संशोधन, लेखन या क्षेत्रांत भरून राहिली आहेत. सत्य लपविण्याचा अटोकाट प्रयत्न करत, जनतेची नुसती दिशाभूल नव्हे तर त्यांच्या जीवनाची अपरिमित हानी करत ही लोकं केवळ देश नव्हे तर मानवतेला बुडवायला निघाली आहेत. कुठला नीचपणा कोळून प्यायले आहेत कळत नाही.

    परंतु भाऊ तुमच्या सारखे कोणी भेटले की फार बरे वाटते, धीर येतो.

    - पुष्कराज पोफळीकर

    ReplyDelete
  12. भाऊ,
    डोळ्यांत पाणी आणले आज तुम्ही......

    - पुष्कराज पोफळीकर

    ReplyDelete
  13. वा भाऊ ! मानलं तुम्हाला ! खरी पत्रकारिता काय असते ते सोदाहरण दाखवून दिलत !बाकी "प्रेश्या" झालेली पत्रकारिता यातून काय बोध घेईल ते देवालाच ठाऊक ! कारण झोपलेल्याला जागे करता येते, झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही हेच खरे!

    ReplyDelete
  14. जबरदस्त भाऊ...👌👌
    ते पवार काय येत नाय...तुमी कतीबी बोंब मारा..

    ReplyDelete
  15. ही पोस्ट राजदीप, कुमार, गिरीष यांच्या वाचनात आली तरी पुष्कळ झाले. पवार वाचत नाहीत त्यामुळे अपेक्षा करण्यात अर्थ नाही

    ReplyDelete
  16. पवारांनी कधीतरी त्यांच्या वाढदिवसाला लोकांनी लिहिलेल्या प्रतिक्रिया वाचाव्यात. प्रत्येक ठिकाणी काड्या करण्याची खोड न मरताच जाईल.

    ReplyDelete
  17. भाऊ राष्ट्रवादीत एवढा दम नाही तुम्ही चिंता करू नका

    ReplyDelete
  18. भाऊसाहेब नमस्कार तुम्हाला,तुमच्या रूपाने आम्हाला खर्या—सच्च्या पत्रकाराचे दर्शन झाले. धन्य तुमची!तुमच्या पत्रकारितेला शतशत नमन.

    ReplyDelete
  19. प्रत्रकारांवर दबाव आणण्याची पवार कुटुंबीयांची ही पहिली वेळ नाही. मागेही लोकसत्तात आलेला 'गरज राष्ट्रवादीमुक्त महाराष्ट्राची' हा लेख सुप्रिया सुळेंच्या आक्षेपानंतर मागे घेतल्याचे वाचले होते. आज तो लेख लोकसत्ताच्या संकेतस्थळावर उपलब्ध नाही.

    ReplyDelete
  20. Mala ek prashna vicharaych aahe pavar sahebana....SAMARTH ramdas nishidh...mag tyani dileli janta raja hi upadhichalte kadhi??jevha lok tumhala Janata raja mhant aale ekdahi samarthanchi athvan kadhli nahi KI tumhala vayeet vatla nahi....labad kolha...

    ReplyDelete
  21. भाऊ, गेली अनेक वर्षे सकाळ सारखी वृत्तपत्रे हाताशी असल्यामुळे, आणि त्यांचा प्रभावी वापर करून आपल्याला हवे तसे समाजमन फिरवता येते हा समज झाल्यामुळे पवार आणि त्यांच्यासारखे अनेक नेते एकूणच निवांत होते. त्यांना बहुधा "सोशल मीडिया" आपले काही वाकडे करू शकेल हि जाणीवही नव्हती. पण २०१४ नंतर त्यांना "सोशल मीडिया" चा प्रभाव एकदम जाणवला असावा. तुमच्यासारखे स्वतःचे मत मांडू शकणारे पत्रकार सोशल मीडियाचा प्रभावी वापर करू शकतात आणि त्यांच्या प्रसार माध्यमांना निष्प्रभ ठरवू शकतात हे त्यांच्या लक्षात आले असावे....त्यातून तुम्ही जर जुने संदर्भ देऊन लोकांच्या स्मरणशक्तीला चालना देऊ शकत असाल - उदाहरणार्थ पवारांनी त्यांच्या उमेदीच्या काळात मारलेल्या कोलांट्या-उड्या - तर तेही त्यांच्या रागच अजून एक कारण असू शकेल....

    ReplyDelete
  22. भाऊ नामसन करतो तुमच्या पत्रकारितेला आणि स्पष्ट आणि परखड शब्दांना.....

    ReplyDelete