तेरा वर्षापुर्वी राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून वेगळी चुल थाटली, तेव्हा त्यांना मिळालेल्या यशाने सगळेच राजकीय अभ्यासक भारावले होते. पहिल्या दोनतीन वर्षातल्या यशस्वी वाटचाली नंतर राज यांच्या कौतुकात एक शब्द सातत्याने ऐकायला मिळायचा. टायमिंग! राज ठाकरे टायमिंग बघूनच कुठलाही निर्णय घेतात, असे पत्रकारांना वाटायचे. पण असल्या शब्दांनी भारावून जाण्यापेक्षाही आपले भवितव्य किंवा पक्षाचे भविष्य ओळखून राजकीय नेत्याने वाटचाल करणे अगत्याचे असते. त्यापेक्षा तो स्तुती वा कौतुकामध्ये रमला, मग त्याच स्तुतीसुमनांनी त्याची शोकांतिकाही साजरी करायला अशीच मंडळी आघाडीवर असतात. तितक्या मागेही जाण्याचे कारण नाही. वर्षभरापुर्वी राज ठाकरे यांनी मोदी वा भाजपाच्या विरोधात धमाल उडवून दिली, तेव्हाही असेच त्यांचे गुणगान सुरू झालेले होते. मात्र निकालानंतर विधानसभा लढवण्यापर्यंत घसरगुंडी झाल्यावर कुणालाच राज यांच्याकडे वळून बघावेसे वाटले नाही. आता तर राज यांच्या टायमिंग विषयी अनेकांना शंका येऊ लागल्या आहेत. मात्र पुन्हा एकदा राज यांना टायमिंग गवसले आहे, असे वाटते. कारण त्यांनी योग्यवेळी आपला पवित्रा बदलला आहे. मात्र राजकारण खेळताना नुसते टायमिंग उपयोगाचे नसते, तर त्यातून मिळणारे फ़ायदेही उठवण्याची तत्परता असावी लागते. लोकसभा वा विधानसभा या दरम्यान राजना ती चतुराई दाखवता आली नाही आणि त्यांचा इतरांनी छानपैकी वापर करून घेतला. याहीवेळी तसेच होणार, की राज आपल्या मरगळल्या पक्षाला नवी संजिवनी देण्यात यशस्वी होणार, इतकाच प्रश्न त्यांच्या महत्वाकांक्षी मोर्चाच्या निमीत्ताने विचारणे भाग आहे. कारण मोर्चाचे निमीत्त, टायमिंग व आशय योग्य आहे. पण त्याच्या पुढे काय? त्यासाठी कुठला आराखडा त्यांनी सज्ज ठेवला आहे काय? नसेल तर चहाच्या पेल्यातील वादळ म्हणतात, तसाच हा मोर्चा ऐतिहासिक ठरेल आणि इतिहासजमा होऊन जाईल.
राज यांनी घुसखोरांना देशाबाहेर हाकलून लावण्याची भूमिका घेतलेली आहे. पण तो विषय एकटी मुंबई किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. तो देशव्यापी विषय आहे आणि योगायोगाने केंद्राच्या नव्या काही निर्णयामुळे कळीचा झालेला मुद्दा आहे. त्यातून देशभर एक मंथन सुरू झालेले आहे. एका बाजूला पुरोगाम्यांनी मुस्लिमांच्या अतिरेकी भूमिकेचे समर्थन केलेले असून, दुसरीकडे भाजपा त्याला समर्थपणे उत्तर देऊ शकलेला नाही. अशावेळी मुंबईपुरते का होईना, तितके आक्रमक प्रत्युत्तर मनसे देऊ शकली, तर महाराष्ट्राच्या बाहेरील राष्ट्रवादी लोकानाही राज ठाकरे भावणार आहेत. पण त्याचा राजकीय लाभ कोणता असेल? उदाहरणार्थ राज यांनी रझा अकादमीच्या मुंबईतील धुमाकुळ व हिंसाचारावर मोर्चा काढला आणि पोलिसांचा नकार झुगारून काढला; तेव्हा त्यांच्याविषयी कमालीची उत्सुकता देशभर निर्माण झालेली होती. ज्या आसामी भारतीयांना मुस्लिम दाट वस्तीतून धमकावले जात होते, त्यांना तेव्हा मनसेचा आधार वाटला होता. म्हणून तर त्या मोर्चाच्या आसामी वर्तमानपत्रात हेडलाईन्स झाल्या होत्या. कोणी विसरला नसेल, तर त्या मोर्चानंतरच्या भाषणामध्ये एक सामान्य पोलिस शिपाई व्यासपीठावर जाऊन राजना गुलाबाचे फ़ुल देतानाचे छायाचित्र गाजले होते. त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली. पण त्याने पर्वा केलेली नव्हती. त्यातून जी उर्जा निर्माण झाली, तिचा उपयोग राज यांनी पक्षाच्या भवितव्यासाठी कितीसा केला होता? जेव्हा अशा गदारोळातून पक्षाकडे लोकांचे लक्ष वेधले जाते, तेव्हा त्यातून पक्षाचा विस्तार करण्याची सज्जताही राखावी लागते. ती नसेल तर इव्हेन्ट वा प्रासंगिक समारंभ, असे त्याचे स्वरूप होऊन जाते. मागल्या सहासात वर्षात मनसेची कहाणी तशीच झालेली आहे. त्यामध्ये सातत्य सहसा आढळून आलेले नाही. म्हणूनच विषय व टायमिंग उत्तम असले तरी पक्षाच्या विस्ताराला पोषक स्थिती असूनही मनसे हा पक्ष बलदंड झाला नाही.
अलिकडल्या कालखंडातील घटनाक्रम तपासला तर राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची तुलना करता येईल. दोघेही निवडणूकीच्या कालखंडात कमालीचे सक्रीय होतात आणि नंतर कुठल्या कुठे गायब होतात. अर्थात आंबेडकर अधूनमधून तरी काही चळवळ नावाचे कार्यक्रम योजतात. त्यातून काहीही निष्पन्न होत नसले तरीही निदान त्यांच्या पाठीराख्यांना सरावाचा खेळ करता येत असतो. लोकसभा विधानसभांच्या निवडणूकीत अपेक्षीत अपयश आल्यावर आंबेडकरांनी अलिकडेच एक बंदचे आयोजन केलेले होते. राज यांनी महाअधिवेशन व मोर्चाची घोषणा वगळता काहीच केलेले दिसले नाही. भायखळा ते आझाद मैदान हा त्यांच्या मोर्चाचा मार्ग बदलण्याची सक्ती झाली, ती त्यांनी मान्य केली आणि त्यावरून रान उठवले नाही. रझा अकादमीच्या मोर्चाला उत्तर देताना त्यांनी मोर्चाला प्रतिबंध असूनही झुगारला होता. तो आवेश नसला तरी आग्रही भूमिकेचा अभाव जाणवतो आहे. ‘लावरे तो व्हिडीओ’ किंवा विधानसभेच्या वेळी महायुतीच्या विरोधतली आक्रमकता काहीशी थंडावलेली दिसते. म्हणूनच शंका येते, की मोर्चानंतर काय? त्याची ‘ब्लु प्रिन्ट’ तयार आहे काय? कारण जो विषय मनसेने हाती घेतला आहे, तो फ़क्त झेंड्याचा रंग वा हिंदूत्व इतकाच मर्यादित नाही. त्यांना राज्याच्या राजकारणात निर्माण झालेल्या पोकळीत आपले स्थान पक्के करण्याची संधी आहे. युतीतली शिवसेना कॉग्रेस आघाडीत गेली आहे आणि म्हणून भाजपाशी जुळणार नाही, असा बराच हिंदूत्ववादी कार्यकर्ता नेतृत्वहीन झाला आहे. दोन्ही कॉग्रेसशी सलगी मान्य नसलेला एक वर्ग आहे. त्याला हवा असलेला पर्याय कोण देणार, ही बाब दुरगामी आहे. मोर्चा रान उठवण्यासाठी असतो. पण त्यातून निर्माण झालेली हवा आपल्या शिडात भरून घेण्याची योजना वेगळी सज्ज असावी लागते. लोकपाल आंदोलनाचे राजकीय पक्ष व चळवळीत रुपांतर करून केजरीवाल यांनी त्याचा धडा घालून दिला आहे.
कॉग्रेस व भाजपा यांच्यात वाटल्या गेलेल्या दिल्लीच्या राजकारणात तिसरा पर्याय उभा करताना केजरीवाल मुख्य पक्ष होऊन बसले. तितके महाराष्ट्रात घडणे शक्य नसले तरी तीन विरुद्ध एक, अशा राजकीय स्पर्धेत राज ठाकरे यांना आपली जागा निर्माण करण्याची संधी आहे. त्यात मोर्चाने हवा निर्माण होईल. पण त्यातून उत्तेजित झालेल्या तरूणांना व लोकांना आपल्या तंबूत सामील करून घेण्यासाठी स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रम व हालचाली कराव्या लागत असतात. त्यातून अन्य पक्षातले असंतुष्ट आत्मे आपल्या पक्षात आणले जात असतात. पक्षांतर्गत नाराजी वा स्थानिक हेवेदावे, यातून स्थानिक नेतृत्व नव्या पक्षात आश्रयाला येत असते. त्यांना सामावून घेतानाच दुय्यम पातळीवरचे नेतृत्व उभारावे लागत असते आणि त्यातून पक्षाला आकार येत असतो, शक्ती मिळत असते. असे लोक येत जात असतात. पण पक्षाचा पाया मात्र त्यांच्यामुळे भक्कम होऊन जात असतो. त्यासाठी संघटना उभारणीचे काम करणारी वेगळी यंत्रणा सज्ज असावी लागते. अशी यंत्रणा व त्यातले हुशार नेते पडद्यामागे राहून महत्वाची कामगिरी बजावत असतात. सहसा नजरेत भरत नाहीत. मनसेपाशी तशी कुठली यंत्रणा असल्याचे अजून तरी दिसलेले नाही. म्हणूनच प्रश्न पडतो, की मोर्चा ही आणखी एक इव्हेन्ट करून राज ठाकरे विश्रांतीला निघून जाणार आहेत काय? नसेल तर मोर्चामुळे मिळणार्या प्रतिसादाला सामावून घेण्यासाठी कुठली सज्जता आहे? सामान्य लोकांच्या नित्यजीवनात भेडसावणार्या विविध प्रश्न समस्यांच्या सोडवणूकीसाठी मदतीला जाणारे कार्यकर्ते, ही संघटना असते आणि त्यातून पक्षाचा पाया भक्कम होत असतो. यशस्वी मोर्चा वा आंदोलनातून तोच पाया विस्तारत असतो. शिवाय नागरिकांच्या अपेक्षांना प्रतिसाद देण्यातून पक्षाचा पसारा वाढत जात असतो. त्याची काही सज्जता कितपत झाली आहे?
मध्यंतरी २३ जानेवारीला राज ठाकरे यांनी महाअधिवेशनात मोर्चाची घोषणा केली आणि मनसेचा बदललेला झेंडा व चेहरामोहरा पेश केला. त्यानंतर अर्थातच मोर्चा भव्य करण्याला प्राधान्य होते. पण एका बाजूला त्याची सज्जता करतानाच त्यातून मिळणारा प्रतिसाद सामावून घेण्यासाठीची योजना आखणेही अगत्याचे होते. ती योजना कुठली वा कशा स्वरूपाची आहे, त्याचा तपशील माध्यमांना पत्रकार परिषदेतून सांगण्याची अजिबात गरज नाही. म्हणून त्याची घोषणाही अपेक्षीत नाही. पण ती असायला हवी. मुंबईतला मोर्चा दणदणित होईल. पण त्यानंतर राज्याच्या विविध जिल्ह्यात वा महानगरातही त्याचे पडसाद उमटले, तर उपयोग आहे. ते पडसाद या विषयात जनभावनांचे प्रदर्शन मांडणारे असायला हवेत. जमिया मिलीया नंतर शाहीनबाग हा उत्स्फ़ुर्त उठाव होता. पण त्याला प्रतिसाद मिळताच देशाच्या विविध राज्यात व शहरात तशीच धरणी सुरू झाली. ती कोणा एका संघटनेने केलेली नाहीत. त्यांच्या भूमिकांशी जुळणारे स्थानिक गट त्यात सहभागी होत गेले आणि त्यात उघड चेहरा दाखवायची हिंमत नसलेले मागून मदत करीत आहेत. तसाच मोठा वर्ग व लोकसंख्या शाहीनबागे विरोधात धुसफ़ुसते आहे. परंतु त्याला नेतृत्व देण्याची कुवत शिवसेना वा भाजपाने दाखवलेली नाही. सेना तर सत्तेत बसलेली आहे आणि भाजपा केंद्रात सत्तेत असल्याने त्यालाही उघडपणे मैदानात दंड थोपटून उतरणे शक्य झालेले नाही. पण त्या भूमिकेतला लाखो कोट्यवधीचा समाज अस्वस्थ आहे आणि मनसेची भूमिका त्याला भारावून टाकणारी असणार आहे. त्याला रविवारचा मोर्चा आपलासा वाटणार आहे. पण तिथेच न थांबता त्याला आपल्या गोटात दाखल करून घेण्यावरच मनसेचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. म्हणूनच मोर्चाचे यश जितके महत्वाचे आहे, त्यापेक्षाही मोर्च्या नंतरचे मनसेचे भवितव्य अधिक मोलाचे असेल. कारण नुसती नांदी उपयोगाची नसते, नंतरचे संपुर्ण तीन अंकी नाटक बघायला लोक गर्दी करत असतात.
भाऊ आपण राज ठाकरे यांना पेपरच(प्रश्न पत्रिका)सोडवून दिला आहे.किंवा परीक्षेत गाईड उघडून पेपर सोडवायला दिला आहे.आपले लेख,ब्लॉग ते नक्कीच वाचत असणार पण ते त्यापासून काही बोध घेणार असतीलतर उपयोग!ही आलेली संधी त्यांनी गमावली तर त्यांच्या सारखे दुर्दैवी तेच.
ReplyDeleteभाऊ, छान लेख पण मला राज ठाकरेचा भरवसा वाटत नाही, अत्यंत आळशी आणि धरसोड व्रुत्तीचा माणूस आहे हा.
ReplyDeleteराज ठाकरे यांना किमान आर्थीक सामाजिक धोरण बद्दल विचार आहे का, यांची शंका वाटते.भाजप कांग्रेस यांना काही तरी धोरण असल्याने ते अनेक निवडणूका मध्ये तग धरू शकतात.
ReplyDeleteभाऊ 1990 मध्ये भाजप गांधीवादी समाजवादाच्या भुलभुलैय्यात अडकला होता त्याचा फायदा घेत शिवसेनेने हिंदुत्वाची स्पेस व्यापली आणि तो पक्ष राज्यव्यापी झाला आणि भाजपला नाईलाजाने दुय्यम भूमिका स्वीकारून शिवसेनेशी युती करावी लागली परंतु आजचा भाजप हा सावरकरवादी अमित शहा यांचा आहे, दिल्लीत ज्या आक्रमकतेने शाहीनबाग मुद्दा अमित शहा यांनी ऐरणीवर आणला ते पाहता राज ठाकरे यांना सहजपणे सेनेची हिंदुत्वाची जागा व्यापता येईल असे वाटत नाही, मात्र भविष्यात एक गोष्ट घडू शकते ती म्हणजे भाजप आणि मनसे यांच्यात लढत झाली तर मात्र विरोधी पक्षाची जागा मनसे व्यापून टाकू शकते आणि याचा फटका काँग्रेस राष्ट्रवादी आणि सेनेला बसू शकतो जसे मुंबई महापालिका निवडणुकीत 2017 मध्ये भाजप सेना विरोधात लढले आणि बहुसंख्य जागा या दोन्ही पक्षांनी मिळवल्या, आज दिल्लीत तेच घडताना दिसते आहे, एकेकाळी सलग पंधरा वर्षे सत्तेत असणारी काँग्रेस आपले अस्तित्व संपवून बसली आहे, आजच्या एक्सिट पोल नुसार आपला पन्नास टक्क्यांवर मते दिसत आहेत तर भाजपदेखील चाळीस टक्के मते घेताना दिसत आहे काँग्रेस जेमतेम चार टक्क्यांवर आलेली दिसत आहे, भविष्यात राज ठाकरे यशस्वी ठरले तर मात्र दिल्लीतल्या काँग्रेससारखी महाराष्ट्रात शिवसेनेची वाताहात लागू शकते
ReplyDeleteराज ठाकरे यांनी ह्या नंतर शेतकरी लोकांना न्याय मिळवून दिला पाहिजे.
ReplyDeleteभाऊ तुम्ही जास्त खरे सांगता ,त्यामुळे हे लोक वैतागले दिसतात. त्यामुळे च तुमच्या वर खुनाचा आरोप लावत आहे.हयांनी याची पातळी सोडली आहे
ReplyDeleteआता महाराष्टातील विचारवंत कोठे गायब झाले. हेच जर मोदी किंवा शाह बद्दल असेत.यांनी त्या मोदींनी सळो की पळो करून सोडले असेत.भाऊ तुम्ही तुमचे विचार मांडत राहा.
ReplyDeleteयावेळी लोकमत वाहवत जाणार नाही तर सावध पवित्रा घेवून नीट पारखतील अशी आशा वाटते. कारण लोकं अपेक्षा ठेवतात आणि ठाकरे झोपा काढतात. मग लोकांची फसगत होते व कुणीही वाली न राहिल्याने अपेक्षा भंग होतो.
ReplyDelete'हिंदूत्ववादी कार्यकर्ता नेतृत्वहीन झाला आहे. दोन्ही कॉग्रेसशी सलगी मान्य नसलेला एक वर्ग आहे. त्याला हवा असलेला पर्याय कोण देणार, ही बाब दुरगामी आहे'.
ReplyDeleteहे वर्णन महाविकास आघाडी पसंत नसलेल्या शिवसैनिकांचे असावे . पण ज्या अर्थाने संघाचे स्वयंसेवक किंवा भाजपचे कार्यकर्ते हे कार्यकर्ते आहेत त्या प्रकारचे आणि प्रतीचे कार्यकर्ते हे सैनिक आहेत काय हा खरा प्रश्न आहे . सध्या हे सैनिक आघाडी कशी आणि किती टिकते ते पाहण्याच्या (wait and watch}पवित्र्यात शांत आहेत आणि राज यांच्या मागून उघडपणे जाण्याचे धाडस करतील असे वाटत नाही. या मोर्चाचा लाभ उठवण्याचे कष्ट न घेताही भाजपलाच त्याचा फायदा होईल हे नक्की आहे.म्हणून राजच्या 'लाव रे तो विडीओ ' चा प्रत्वाद करणारे आशिष शेलार स्वतःहून राज यांच्याशी जवळीक उघडपणे करताना दिसत आहेत ,
Hopeless person!
ReplyDelete