त्याला आता सात महिने होऊन गेलेत. ऐन पावसाळा सुरू होता आणि हळुहळू विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले होते. अशावेळी अकस्मात काही लोकांच्या छातीत दुखू लागलेले होते. जगात कुठेही कोरोनाचा उदभव झाला नसतानाही त्यांच्या फ़ुफ़्फ़ूसात घुसमट सुरू झालेली होती. कारण त्यांचे फ़ुफ़्फ़ूस त्यांच्या शरीरात नव्हतेच, तर मुंबई उपनगरात आरे कॉलनीच्या २७०० झाडांमध्ये सामावलेले होते. तीच झाडे मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी तोडली जाऊ लागताच अशा तमाम लोकांचा जीव घुसमटला होता आणि त्यांनी हातात फ़लक घेऊन भर पावसातही त्या परिसरात धुमाकुळ सुरू केला होता. आज अवघ्या जगाच्या प्रत्येक नागरीकाचे फ़ुफ़्फ़ूस घोक्यात आलेले असतानाही त्या पर्यावरणवादी लोकांचा श्वास घुसमटलेला नाही. ते सगळे आपापल्या घरात सुरक्षित श्वास घेत आहेत. कोरोना नावाच्या ज्या व्हायरसने जगाला भयभीत केले आहे आणि तीस हजाराहून अधिक नागरिक जगभर नुसत्या श्वास कोंडल्याने मृत्यूमुखी पडलेले आहेत. तेव्हा हे आरे कॉलनीतले फ़ुफ़्फ़ूसवादी कुठल्या कुठे गायब झालेले आहेत. हा सगळा प्रकार काय आहे? ज्यांचा जीव आरे कॉलनीतली २७०० झाडे तोडल्याने घुसमटला होता, त्यांचाही एवढ्यात जीव जायला हवा होता ना? कारण हा आजार फ़ुफ़्फ़ूसाचा आहे. मग ते सगळे सुखरूप कशाला राहू शकले आहेत? बहुधा त्यांच्या शरीरात फ़ुफ़्फ़ूस नावाचा अवयवच नसल्याने त्यांना कोरोनापासून कुठलाही धोका नसावा आणि त्यांना जगाला भेडसावणारी चिंताही सतावत नसावी. फ़क्त फ़ुफ़्फ़ूसाचाच विषय असेल तर त्यांनी आज तितक्याच आवेशात कोरोनाविषयक सामाजिक प्रबोधन करायला पुढे यायला हवे होते आणि २१ दिवसांच्या कर्फ़्यूविषयी लोकांचे जनजागरण करायला हवे होते. पण सगळे बेपत्ता आहेत. ही काय भानगड आहे? तर हे सगळे त्या लांडगा आलारे आला गोष्टीतली उनाड पोरे आहेत. त्यांना लोकांची तारांबळ उडवण्याची गंमत करायची असते आणि खरोखरचा लांडगा आल्यावर मेंढरासारखी माणसे मारली जातानाची विकृत गंमत बघण्याचा आनंद लुटायचा असतो.
लांडगा आलारे ही गोष्ट काय आहे? उगाच अफ़वा पसरवून लोकांना धावपळ करायला लावायचा खट्य़ाळपणा तो मुलगा करीत असतो आणि हळुहळू अशा इशार्याकडे लोक दुर्लक्ष करू लागतात. थोडक्यात त्याच्या गंमतीमुळे लांडग्याविषयी लोक पुरते गाफ़ील होऊन जातात. त्यामुळेच खरोखरच लांडगा येतो, तेव्हा गाफ़ील होऊन मेंढरांचा फ़डशा पाडण्याचा मार्ग मोकळा होत असतो. आज भारतात जो कोरोनाचा धोका पसरला आहे व फ़ैलावत चालला आहे, त्याला परदेशी प्रवासी किंवा चीन दोषी नाही, इतके असे भंपक समाजसेवक पर्यवरणवादी लोक जबाबदार आहेत. कारण मागल्या दोन दशकात अशा भामट्यांनी विविध प्रकारे समाज जीवनात जनतेला व नागरिकांना बेकायदा जगण्याचे प्रोत्साहन दिलेले आहे. सरकारी आदेश धाब्यावर बसवणे, जनजीवनात व्यत्यय आणण्याला स्वातंत्र्य व अधिकाराचे नाव देऊन एकूण सार्वजनिक जीवनात अराजक माजवण्यास पोषक स्थिती निर्माण करून ठेवली आहे. तसे नसते तर कर्फ़्यु लागू झाल्यानंतर पोलिसांचा फ़ौजफ़ाटा आणून सक्तीने दिल्लीची शाहीनबाग रिकामी करावी लागली नसती. दिल्लीच्या केजरीवाल सरकारने कोरोनाला रोखण्य़ासाठी जमावबंदी लागू केली व एकावेळी २० पेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमण्यालाही प्रतिबंध लावला होता. तरी शाहीनबागचा तमाशा चालू राहिला नसता. पोलिस खुप आधीच तो थांबवू शकले असते. पण रोगराईच्या परिस्थितीतही जमाव करून फ़ैलावाला कारण होणारे धरणे चालू राहिले. त्याचे प्रायोजक कोण होते? कॉग्रेसचे नेते आणि पुरोगामी बुरखा पांघरलेले तीस्ता सेटलवाड यांच्यासारखे मायावी राक्षसच नव्हते का? जेव्हा खरोखर तिथे रोगबाधा सुरू झाली, तेव्हा त्यातला कोणीतरी मागे थांबला होता काय? अशा धरणी वा निदर्शनांचे समर्थन करणारे सगळेच मोठे पुरोगामी सर्वात आधी अशा जागा सोडून फ़रारी झाले होते आणि त्यांनी करून ठेवलेली घाण कोणी साफ़ करायची?
शाहीनबागची घाण साफ़ करण्याची जबाबदारी पोलिसांच्या व सरकारच्या माथी मारलेली होती ना? अशा वागण्याचा बौद्धिक नव्हेतर व्यवहारी अर्थ असा, की आम्ही रोगराई फ़ैलावणार आणि सरकारने त्याचा प्रतिबंध केला पाहिजे. थोडक्यात आम्ही समस्या निर्माण करू आणि त्या समस्येचा निचरा निवारण मात्र सरकारी यंत्रणेने केले पाहिजे. अशी चुकीची धोकादायक शिकवण लोकांना कोणी दिलेली आहे? आरे कॉलनीतली २७०० झाडे मेली वा तोडली म्हणून मुंबईकरांचा जीव धोक्यात आला नसता व आलेला नाही. पण आज कायदा झुगारण्यातून कर्फ़्यू मोडण्यातून कोरोनाची बाधा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचते आहे. ती सरकारी आदेश मोडण्यातून. दिडदोन कोटी मुंबईकरांच्या फ़ुफ़्फ़ूसाला कोरोनाची बाधा होण्याचा सर्वात मोठा धोका आलेला आहे, तो नियम कायदे मोडून बेताल वागणार्या मुठभर लोकांपासून. कायदा मोडायला प्रवृत्त करणारे महान पर्यावरणवादी किंवा नागरी हक्काच्या अधिकारातली जबाबदारी विसरायला प्रोत्साहन देणार्यांनी हा भयंकर धोका लाखो मुंबईकरांना निर्माण केला आहे. कारण कोरोना आणि असे भंपक पुरोगामी पर्यावरणवादी यांच्यातले तेच भयानक साम्य आहे. कोरोना आपण होऊन कुणाला जीवानिशी मारत नाही. तो माणसाच्या शरीरात आधीपासून दबा धरून बसलेल्या अन्य घातक आजारांना प्रोत्साहन देऊन बेताल करतो. त्यामुळे रुग्णाला मृत्यूच्या दारात नेवून सोडत असतो. आज मुंबई वा जगभरच्या कोरोनाबाधीत रुग्णांना अशाच बेताल लोकांनी ठार मारले, हे निखळ सत्य आहे. त्यांनी दुबळी रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या नागरिकांपर्यंत कोरोनाला आणून सोडले आणि पुढे त्या विषाणूने रुग्णाच्या देहातील असाध्य आजारांना बेताल करून मृत्यूचा मार्ग सुकर केलेला आहे. त्यातला खरा गुन्हेगार कोरोना आहे, तितकाच त्याला रुग्णापर्यंत आणून सोडणारा प्रसारकही आहे.
शाहीनबागचा तमाशा ऐन रंगात आलेला असताना आणि त्यांची समजूत घालायला सुप्रिम कोर्टाने मध्यस्थ पाठवले असताना धरणे सोडणार नाही; अशी शिकवणी देताना तीस्ता सेटलवाड आपण वाहिन्यांवर बघितल्या आहेत. पण जेव्हा ही बाधा देशात फ़ैलावू लागली, तेव्हा त्याच निरागस मुर्ख शाहीनबागी महिलांना जीवाचा धोका असल्याचे कोणी समजावून सांगायला हवे होते? अधिकार जबाबदारीचे ओझे घेऊन येतो, हे ज्यांनी सांगितले समजावले नाही, त्यांनीच मग अशा गर्दीला प्रोत्साहन देऊन कोरोनाचा मार्ग सुकर केला. त्यांनीच नसलेल्या समस्येसाठी लढायला ह्या निष्पाप मुस्लिम नागरिकांना गर्दी करण्याचा हक्क सांगून गर्दीतूनच रोगराई पसरवली. तेव्हा गर्दी टाळण्याविषयी पुर्ण अंधारात ठेवले. त्यातून ही भयंकर परिस्थिती उदभवली आहे. पोलिस यंत्रणा शाहीनबागच्या धरणेकर्यांना हाकलून लावण्यात तोकडी पडली, म्हणून मग तबलिगी जमात निझामुद्दीन दर्ग्यामध्ये दिड हजार लोकांना गोळा करून कोरोनाला प्रोत्साहन देऊ शकली. तिथले आयोजक कायदा आदेश झुगारण्याची हिंमत कशामुळे करू शकले? कारण शाहीनबागेतील अराजकाने त्यांना प्रोत्साहन मिळालेले होते. जे पोलिस प्रशासन शाहीनबागची गर्दी हटवू शकत नाही, ते प्रशासन आपल्याला दर्ग्याच्या गर्दीतून उठवू शकत नाही; हा आत्मविश्वास त्यातूनच आलेला आहे. म्हणून मग २० हून अधिक लोकांनी एकत्र जमू नये, हा दिल्लीच्या केजरीवाल सरकारचा हुकूम मोडून मर्कझ नावाचा समारंभ होऊ शकला. त्याचे आयोजक भले अनभिज्ञ असतील. त्यांना नागरी हक्काच्या मर्यादा शिकवण्यापेक्षा त्याचा दुरूपयोग ज्यांनी शिकवला तेच यातले खरे गुन्हेगार आहेत. त्याच मर्कझ समारंभातून बाहेर पडलेल्यांनी देशाच्या कानाकोपर्यात कोरोनाला नेवून पोहोचवले आहे. त्यासाठी वरकरणी ते आयोजक वा दर्गावाले गुन्हेगार ठरतील वा भासतील. पण तेही त्यातले बळी आहेत. ज्यांनी त्यांना कायदा व नियम झुगारण्याची शिकवण प्रोत्साहन दिले, ते खरे सुत्रधार आहेत, मारेकरी आहेत.
आज मर्कझ वा तत्सम गर्दी वा जमावातून कोरोनाचा फ़ैलाव झाल्याचे कारण दिसते आहे. पण अशा प्रसंगी कसे वागू नये, त्याची शिकवण नियम देतात, कायदे शिकवतात. प्रसंगी कायदा सक्तीही करतो. पण कायदा योग्य वेळीच सक्ती करतो, हे सत्य त्यांच्यापासून लपवले गेलेले आहे. त्यांना कायदा व सरकार अकारण सक्ती करते आणि ते आदेश झुगारण्यालाच मानवी हक्क म्हणून ज्यांनी शिकवले; ते खरे गुन्हेगार आहेत. म्हणूनच कोरोनाचे महाभयंकर संकट डोक्यावर घोंगावत असतानाही शाहीनबागचा तमाशा सुरू राहिला आणि मर्कझ हा समारंभ योजला गेला. त्यांचे खरे प्रायोजक असे छुपे पुरोगामी आहेत. त्यांनी त्या मुर्ख मुस्लिम धर्मांधांना त्या भरीला घातले आहे. देशावरचे वा सार्वत्रिक जगावरचे संकट आलेले असतानाही त्यांचा धार्मिक अधिकार अधिक मोलाचा असल्याचे वेडेपण मुस्लिमांच्या मनात ठसवणारे खरे गुन्हेगार आहेत. जवळचे किंवा तात्काळ मिळणारे लाभ माणसाला तातडीने मोहात पाडत असतात. त्यातले दुरगामी तोटे बघायची माणसाची प्रवॄत्ती नसते. सोयीचे लाभ बघून मुस्लिम समाज वा त्यातल्या धर्मवेड्यांना अशा बेताल वागण्याला प्रवृत्त करणारे म्हणुन यातले खरे आरोपी आहेत. पीएमसी बॅन्क वा येस बॅन्केत अधिकचे लाभ बघून फ़सलेल्या सामान्य खातेदारापेक्षा मर्कझ वा शाहीनबागेतले महिला दोषपात्र नाहीत. त्यांना त्यासाठी बौद्धीक प्रोत्साहन देऊन चिथावण्या देणारे खरे कोरोनाचे साथीदार आहेत. भागिदारही आहेत. कारण त्यांनी सरकार वा प्रशासन सक्ती करते तेव्हा अन्याय करते; अशी चुकीची समजूत जनमानसात रुजवून कोरोनाला देशव्यापी रोगराई महामारी होण्याचा मार्ग सोपा केलेला आहे. सरकारी कारवाई वा आदेशावर संशयाचे ढग पसरवून त्यांनीच लांडगा आलारे आला, अशी अराजकाची गाफ़ील रहाण्याची मानसिकता उभारलेली आहे. देशव्यापी कर्फ़्युला पडलेली खिंडारे वा विरोधात दिलेल्या चिथावण्या पुरोगामी अतिरेकातून आलेल्या आहेत. म्हणूनच कोरोनाने शिकवलेला मोठा धडा म्हणजे बेताल बिनबुडाच्या पुरोगामी अपप्रचारापासून अधिक सावध होणे इतकाच आहे. कारण हे भामटे तुम्हाला संकटाच्या खाईत लोटून फ़रारी होतात. आपला जीव मात्र सुरक्षित ठेवत असतात.
तात्पर्य: अशा पुरोगामी, पर्यावरणवादी वा तथाकथित उदारमतवादी भामट्यांपासून सोशल डिस्टंसिंग. त्यांच्यपासून चार हात दुर रहाणे म्हणजे आपल्याला कोरोनापासून वाचवणे आहे. फ़क्त कोरोनाच नव्हेतर कुठल्याही संकटापासून आपल्याला सुरक्षित ठेवण्याचा उपाय, म्हणजे या भामट्यांपासून कायम चार हात दुर रहाणे आरोग्यदायी आहे.