तुमच्या हातात कुठले चांगले पत्ते आहेत त्यामुळे तुम्ही डाव जिंकू शकत असता हे खरेच आहे. पण हातातले पत्ते योग्य वेळी खेळण्याची चलाख बुद्धी व प्रसंगावधानही तुमच्यापाशी असावे लागते. अन्यथा तुमचे महत्वपुर्ण पत्तेच तुम्हाला अडचणीत आणू शकतात. मागल्या पाचसहा वर्षामध्ये म्हणजे राहुल गांधींना कॉग्रेस पक्षात महत्वाच्या पदावर आणल्यापासून त्यांच्या अपयशाने खचलेल्या बहुतांश कॉग्रेसजनांना व नेत्यांना राहुलची भगिनी प्रियंका गांधी वाड्रा यांच्याविषयी मोठ्या आशा होत्या. कारण त्या इंदिराजींसारख्या दिसतात आणि किमान राहुलप्रमाणे बेताल बोलून कामाचा चुथडा करीत नसल्याने त्याच कॉग्रेसची बुडती नौका पार लावू शकतील. हा आशावाद चुकीचा मानता येणारा नव्हता. पण प्रियंकासह एकूण कॉग्रेसजनांचे दुर्दैव असे, की प्रियंका कितीही हुशार असल्या तरी त्याही राहुलच्याच हातातील एक महत्वाचा पत्ता होता. म्हणूनच जितक्या प्रसंगी त्यांच्या राजकारणातील प्रवेश वा कृतीशील होण्याचा विषय आला, तेव्हा त्यांचे वर्णन ट्र्म्पकार्ड म्हणून झालेले होते. ट्रम्पकार्ड म्हणजे खेळातला हुकूमाचा पत्ता असतो. मात्र जेव्हा जेव्हा तशी वेळ किंवा प्रसंग आला, तेव्हा राहुलनी चुकीच्या वेळीच प्रियंकाचा पत्ता वापरला आणि आता जवळपास निकामी करून टाकला आहे. त्यामुळे आपली राजकारणातली पत शिल्लक ठेवण्यासाठी खुद्द प्रियंका यांनाच कसरती कराव्या लागत आहेत. आपल्या मराठी भाषेत उक्ती आहे, झाकली मूठ सव्वा लाखाची; तशीच प्रियंकाची अवस्था झालेली आहे. कारण मागल्या अडीच वर्षात क्रमाक्रमाने राहुलनी आपल्या या भगिनीची मूठ उघडून ती मातीमोल करून टाकलेली आहे. सहाजिकच आता थेट क्रियाशील राजकीय आखाड्यात उतरण्यासाठी प्रियंका उतावळ्या झाल्या आहेत. तर त्यांचे काय करावे, हा सवाल मातोश्री सोनिया व भाऊ राहुल यांना सतावू लागला आहे. कारण प्रियंकाला राज्यसभेत यायचे आहे आणि ते गांधी कुटुंबियांनाच मान्य नसावे, अशी एकूण स्थिती आहे.
महिनाभरापुर्वी राज्यसभा निवडणुकीची चर्चा चालू झाली आणि अचानक त्यात प्रियंकाचे नाव पुढे आले. राहुलच्या खुळेपणाला कंटाळलेले पक्षातले अनेकजण तात्काळ खुश झाले. कारण प्रियंका पक्षाला जीवदान देऊ शकेल अशी त्यांची अपेक्षा आहे. किंबहूना त्यासाठीच गेल्या लोकसभेपुर्वी प्रियंकांना मैदानात आणले गेले होते. राहुल तेव्हा कॉग्रेस अध्यक्ष होते आणि त्यांनी प्रियंकाला पुर्व उत्तरप्रदेशची जबाबदारी सोपवली होती. प्रथमच प्रियंकावर पक्षातली एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. ज्योतिरादित्य शिंदे आणि प्रियंका यांना उत्तरप्रदेश संयुक्तपणे सोपवण्यात आला. त्याचा खुप गाजावाजा झालेला होता. आता भाजपाची उत्तरप्रदेशातून सद्दी संपली, असा निष्कर्ष अनेक विश्लेषकांनी तेव्हा काढला होता. कारण तात्काळ प्रियंका लखनौला रवाना झाल्या व त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. पण कार्यकर्ते व पदाधिकारी असायला मुळात पक्षाची संघटना असावी लागते. तिथेच प्रियंकांना वासत्वाची जाणिव झाली आणि त्यांनी संघटना उभारण्यापेक्षाही खळबळजनक वक्तव्ये करण्याचे काम हाती घेतले. त्यातूनच मग राहुल गांधींच्याही पुढले एक पाऊल टाकले होते. कोणीतरी विचारले त्या लोकसभा लढवणार काय? तर त्यांनीही मोठ्या आत्मविश्वासाने वाराणशीत लढू काय; हा प्रतिसवाल केला होता. त्याचा खुप गाजावाजा झाला आणि सगळे प्रियंका मोदी विरोधात लढणार म्हणून डंका पिटू लागले. काहींनी मोदींसाठी वाराणशी अवघड जागा झाल्याचेही निष्कर्ष काढून टाकले. मग प्रियंकाने धुर्तपणे आपली भूमिका बदलली. वाराणशीत उभे रहाणार काय, ह्या प्रश्नाचे उत्तर देण्यापेक्षा त्या प्रश्न टाळू लागल्या आणि राहुलना विचारा असे उत्तर देऊ लागल्या. राहूलही पत्रकारांशी आट्यापाट्या खेळत बसले आणि इतक्यात त्यातले रहस्य कशाला संपवू, म्हणत गंमत करीत राहिले. मात्र प्रत्यक्ष निवडणूक जवळ आली, तेव्हा राहुलनाच अमेठीची शाश्वती उरलेली नव्हती आणि ती जबाबदारी प्रियंकावर सोपवून त्यांनी वायनाडला पळ काढला.
थोडक्यात राहुलचे हे ट्रम्पकार्ड खेळण्यापुर्वीच मातीमोल होऊन गेले होते. त्यामुळे पराभवाची आशंका आलेल्या राहुलनी भगिनीला २०२२ मध्ये उत्तरप्रदेशात कॉग्रेसची सत्ता आणण्याचे काम सोपवल्याचे सांगून पळ काढला होता. अखेर अमेठीतही राहुल पराभूत झाल्यावर प्रियंका नामक भ्रमाचा भोपळा फ़ुटला आणि तो विषय मागे पडला. फ़ार कशाला लोकसभेचे निकाल लागले आणि राहुल यांनीच राजकारणातून पळ काढला. त्यांनी निवडणूकांच्या निकालाचे आत्मपरिक्षण करण्यासाठी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली आणि त्यात अध्यक्षपदाचाच राजिनामा देऊन टाकला. तेवढ्यावर न थांबता कॉग्रेसच्या अध्यक्षपदी आता कोणी गांधी कुटुंबीय नको असेही सांगून टाकले. तेव्हापासून पक्षाला अध्यक्ष लाभलेला नाही. महिनाभर अध्यक्षाशिवाय कॉग्रेस कशीबशी चालली आणि अखेरीस निवृत्त सोनिया गांधींना हंगामी अध्यक्ष घोषित करून पक्षाचा गाडा चालवावा लागतो आहे. त्यालाही आता नऊ महिन्यांच्या कालावधी उलटून गेला आहे. दरम्यान पक्षाचे निर्णय कधी राहुल तर कधी सोनिया घेत असतात. तर नवा अध्यक्ष निवडण्य़ाचा विषय अडगळीत पडलेला आहे. इथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे. पक्षाध्यक्ष म्हणून राहुलनी घेतलेला अखेरचा निर्णय फ़ेटाळून लावण्याचा महत्वाचा निर्णय प्रियंकाचाच होता. यापुढे कॉग्रेस अध्यक्ष गांधी कुटुंबातला नसावा, हा राहुलचा निर्णय कार्यकारिणीत फ़ेटाळून लावण्याची कोणाही श्रेष्ठीची हिंमत झालेली नव्हती, त्याला नकार देणार्या प्रियंकाच होत्या आणि सोनियांनी त्याला अनुमोदन दिल्यावर कार्यकारिणीने त्यावर शिक्कामोर्तब केलेले आहे. याचा अर्थ इतकाच, की राहुलचा निर्णय फ़िरवून प्रियंकांनी आपल्याला भविष्यात त्याच पदावर बसण्यासाठी जागा करून ठेवलेली आहे. पण त्यासाठी त्यांना पुर्णवेळ कृतीशील राजकारणात येण्याची गरज आहे आणि त्यासाठी सोपा मार्ग म्हणजे संसदेत येऊन आपली चमक दाखवणे. त्यासाठीच बहुधा प्रियंकानी राज्यसभेसाठी प्रयत्न चालविले असावेत.
गांधी कुटुंबाची इच्छा शिरसावंद्य मानणे, हे प्रत्येक कॉग्रेसजनाचे परम कर्तव्य असल्याने तात्काळ अनेक मुख्यमंत्री व नेत्यांनी प्रियंकांना आपल्या राज्यातून राज्यसभेत जाण्याचा आग्रह धरला तर नवल नाही. पण अखेरचा निर्णय कुटुंबानेच करायचा असतो आणि तो सोनियांच्या हाती होता. पण त्यांनाच प्रियंका मुख्य भूमिकेत नको असल्यास मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधावी ही खरी समस्या आहे. राजस्थान, मध्यप्रदेश वा छत्तीसगड अशा राज्यांचे मुख्यमंत्री प्रियंकांना निवडून आणायला सज्ज आहेत. पण पक्षश्रेष्ठी म्हणजे सोनियांचा हिरवा कंदिल मिळायला हवा ना? सगळे घोडे तिथेच अडलेले आहे. जी आई आपल्या खुळेपणा करणार्या पुत्राला इतकी मोकाट संधी देते, तीच आपल्या लाडक्या कन्येला एक किरकोळ संधी कशाला नाकारत असेल? राहुलना दोन लोकसभेत कॉग्रेसचे नाक कापण्यापर्यंत मोकळीक सोनियांनी दिली होती. मग प्रियंकाला राज्यसभेत येऊन आपली राजकीय चतुराई सिद्ध करण्याची संधी का नाकारली जात असावी? की मुलासारखीच मुलगीही अब्रु धुळीस मिळवेल, अशा चिंतेने आईला ग्रासले आहे? तशी बिलकुल शक्यता नाही. राहुल यांच्यापेक्षा आपल्या वर्तनात व बोलण्यात प्रियंका खुप सावध असतात आणि सहसा त्या कुठल्या वादग्रस्त विधानामुळे कचाट्यात तरी सापडलेल्या नाहीत. पण तीच तर खरी समस्या आहे. राज्यसभा वा संसदेत आल्यावर त्यांच्या खर्या राजकीय कौशल्याचे प्रदर्शन जाहिरपणे होऊ लागेल आणि आपोआप भावाशी त्यांच्या गुणवत्तेची तुलनाही व्हायला पर्याय उरत नाही. प्रियंकाने किरकोळ चतुराई दाखवली वा तिची गुणवता लोकांच्या नजरेत भरू लागली; तर कॉग्रेसमधील अस्वस्थ आत्मे तात्काळ राहुलविरोधी बंडापर्यंत मजल मारू शकतील. त्यांना आवरणेही सोनियांच्या हाती उरणार नाही. ही खरी समस्या आहे. त्यापेक्षा दोन भावंडांच्या गुणवत्तेविषयीची मुठ झाकलेली असण्यातच कुटुंबाची एकता व इभ्रत शाबूत रहाते ना?
दिल्लीच्या अनेक बातमीदारांनी गेल्या आठवड्यात कॉग्रेसमधील या समस्येचा उहापोह केलेला आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवायचा तर प्रियंकानेच आपल्या राज्यसभा लढण्याच्या बातम्या सोडलेल्या होत्या आणि त्यामार्गाने आपल्या आईवर राजकीय दबाव आणण्याचा प्रयास केला होता. पक्षातूनच मागणी आल्यावर सोनियाही शरण येऊन आपल्याला उमेदवारी देतील, असा कयास असावा. पण त्याऐवजी वेगळाच घटनाक्रम घडला. प्रियंकासाठी राज्यसभा देऊ केलेल्या वा तशी मागणी उचलून धरणार्या नेत्यांना हंगामी पक्षाध्यक्षांनीच दटावले आणि विषय मागे पडला आहे. त्याचे कारण सोपे आहे. प्रियंकांना राज्यसभेत निवडून आणण्यात अडचण नसली तरी भावाशी तिची तुलना आईला अजिबात नको आहे. तसे झाल्यास पुन्हा राहुलना अध्यक्षपदी बसवणे अशक्य होऊन जाईल. कारण त्याच्यापेक्षा संसदेतील प्रियंका पक्ष कार्यकर्ते नेत्यांना अधिक प्रभावित करून जाईल. सोनियांना नेमकी तीच गोष्ट नको आहे. त्यामुळे ट्रम्पकार्ड राहुल व सोनियांच्या हातात असले, तरी त्यांनी ते चुकीच्या प्रसंगी वापरून झालेले आहे. तशी संधी पुन्हा आलेली असली तरी त्यांना ते वापरण्याचीच भिती वाटते आहे. प्रियंकापाशी मोदींच्या लोकप्रियतेला पराभूत करण्याची कुवत नसली, तरी टक्कर देण्याची क्षमता नक्कीच आहे. तेवढ्यानेही नव्याने कॉग्रेसला उभारी देण्याची प्रक्रीया सुरू होऊ शकते. ते लाभदायक असले तरी मातेच्या पुत्रप्रेमाने भेदभाव निर्माण केलेला आहे. शिवाय प्रियंका आजीसारखी दिसण्याने फ़ारसा लाभ होऊ शकणार नसला तरी आपल्या बुद्धीने काही ठाम निर्णय घेण्याइतकी समज त्यांनी यापुर्वी दाखवली आहे. त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे संयम वा प्रसंगावधान ह्या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. पण कौटुंबिक जिव्हाळा त्यांच्या वाटचालीच्या आड आलेला आहे. मात्र दरम्यान आई आणि भावाला मात्र प्रियंकाचे करावे काय हा प्रश्न भेडसावतो आहे.
भाऊ, बुडत्याचा पाय खोलात, इकडे आड तिकडे विहीर या सर्व म्हणी कॉंग्रेसला किंवा सोनिया गांधीच्या सध्याच्या अवस्थेला लागू पडताहेत. भाऊ आपले विश्लेषण योग्यच आहे आणि असते.
ReplyDeleteशेवटी काय तर पुत्र प्रेम सगळीकडे आहे. त्याला कुणी ही अपवाद नाही.
ReplyDelete<> मला वाटतं ही फुकटचा सरकारी बंगला वाचवण्याची धडपड असावी.
ReplyDeleteप्रियाका वर आली की वड्राची ताकद वाढणार
ReplyDeleteSir, she is also, superior copy of her brother.
ReplyDeleteयोग्य विश्लेषण
ReplyDelete"प्रियांकामध्ये मोदींना टक्कर देण्याची आणि काॅन्ग्रेसला उभारी देण्याची क्षमता आहे" हे काही तितकेसे पटत नाही.
ReplyDeleteहा काॅन्ग्रेसच्या बावळटांना उचकवण्याचा तर प्रकार नाही ना?
कारण बेताल आरोप करण्यात प्रियांका राहुलची सख्खी बहीण शोभते.
भाऊ, हे जरा मागून सुरु असलेले नाटक आपण सर्वांच्या नजरेला आणून दिलेत त्याबद्दल धन्यवाद. एकाच प्रश्न राहून राहून पडतो तो म्हणजे सोनियांचे हे प्रेम म्हणजे चक्क लिंगभेद आहे - आणि आजच्या काळात, गांधींसारख्या तथाकथित पुढारलेल्या कुटुंबात हा आपपरभाव दाखवला जातो हे आश्चर्यच म्हणावे नाही का? की याला आणखीही दुसरी गणिते आहेत? त्यावर जरा प्रकाश टाकल्यास बरे होईल.
ReplyDeleteभाऊ आपण परखड अन् निर्भिड विश्लेषण करता.त्यात ऐतिहासिक संदर्भ असल्याने वास्तवाची जाणीव होते.आपणही दलित पॅंथर संघटना संस्थापका सोबत ब-याच आंदोलनात आपला सहभाग असल्याचे सांगून त्या फळीतील नेत्यांपैकी एक आहात,असा उल्लेख आपल्या लेखनातून आलेला आहे.मग आम्हा सारख्या नवयुवकांना आंबेडकरी चळवळीतील रिपब्लिकन नेतृत्वाच्या नाकर्तेपणामुळे,पुढा-यांच्या स्वार्थांधातून पॅंथर जन्मली असं सांगितलं जातं.त्यावेळचे आपण एक नेते , त्यापुढे जाऊन आपण एक जाणकार पत्रकार झालात .तेव्हाँ आजघडीला आंबेडकरी चळवळीचं केंद्र,नेतृत्व अन् भूमिका याबद्दल लिहावं असं आम्हाला मनापासून वाटतं. आपल्या प्रतिक्षेत. आपल्या ऋषितुल्य पत्रकार व्यक्तीमत्वाचा चाहता.
ReplyDeleteEkdum correct eka zunjar ani ladhvaaya chalvaliche vishleshan vachayla nakki avdel
DeleteLIFE IS GAME OF BRIDGE,SOME PEOPLE GET BAD CARDS MAKE GAME OUT OF IT!SOME PEOPLE GET GOOD CARDS AND MAKE MESS OF IT!
ReplyDeleteपुत्रप्रेमामुळे रामाला 14 वर्ष वनवास भोगावा लागला.. आणि पुत्र प्रेमामुळे सध्या काँग्रेस वनवास भोगत आहे.. राहुलचे पक्षातील स्थान धोक्यात येउ नये म्हणून आईने केलेला प्रयत्न आहे..
ReplyDeleteप्रियांका बद्दल आईला वाटत पण बिचाऱ्या मुलाची काळजी वाटते . आता पोरग 50 ला आलं त्याच सगळं होणं गरजेचं आहे . चुकून माकून लागला चान्स झाला pm तर सगळं होऊन जाईल म्हणून सगळी धडपड .
ReplyDelete