Friday, March 13, 2020

दि‘शाहीनबागे’तला चकवा

Image result for shaheenbaug

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या शाहीनबाग येथे पेटलेले आंदोलन सरकारने इतके कशाला तापू दिले, हे अनेक विश्लेषकांना न सुटलेले कोडे होते व आहे. ज्या गृहमंत्री अमित शहांनी मोठ्या कुशलतेने संसदेत ३७० कलम हटवण्याचा प्रस्ताव आणला आणि दोन दिवसात तो उरकून घेताना काश्मिरात एक साधी दगडफ़ेक होऊ दिली नव्हती, त्यांच्याकडून हा गाफ़ीलपणा झालेला होता काय? की दिल्ली विधानसभेच्या निकालावर डोळा ठेवून जाणिवपुर्वक शाहीनबागमध्ये मोकाट रान देण्यात आलेले होते? त्यानंतर इशान्य दिल्लीत उसळलेली दंगल सरकार गाफ़ील असल्याची साक्ष देत असली, तरी वास्तवात सत्ताधारी पक्ष त्यात काही प्रमाणात आपले राजकारण खेळत होता. हे नाकारता येणार नाही. दंगल अपेक्षित नव्हती. पण शाहीनबाग मात्र कात्रजचा घाट नक्कीच होता. कारण तिथे सरकारने मुस्लिम बुरखेधारी महिलांच्या जमावासमोर हात टेकलेले पाहून भाजपा विरोधकांना जोर चढला होता. त्यामुळेच देशाच्या अन्य महानगरात व राज्यात नवनव्या शाहीनबागा पेटवण्याची भाषा चालली होती. त्यात लहानसहान पक्ष व संघटनांनी भरकटत जाणे समजू शकते. पण देशात पन्नास वर्षाहून अधिक काळ हुकूमत गाजवणार्‍या कॉग्रेस पक्षाने भरकटणे नवलाचे होते. बाकी सर्व गोष्टी सोडून कॉग्रेस़चे तमाम नेते सरळ शाहीनबागेत जाऊन त्या अडवणूकीचे समर्थन करीत होते आणि आपली सगळी शक्ती तिथेच लावून बसले होते. बाकी देशात अन्य काही समस्याच नसाव्यात, इतके कॉग्रेसने आपले बळ व लक्ष शाहीनबागेत केंद्रीत केलेले होते. अन्यथा त्या शतायुषी पक्षाला इतक्या गाफ़िलपणे मध्यप्रदेश सारखे मोठे राज्य गमावण्यापर्यंतची वेळ कशाला आली असती? अन्यथा मध्यप्रदेशचे सिंहासन डळमळू लागताच कॉग्रेसला शाहीनबागेचा विसर कशाला पडला असता? हे अनेक संदर्भ जोडले, तर अमित शहांनी जाणिवपुर्वक शाहीनबागेत कॉग्रेसने आपले सर्वस्व पणाला लावावे यासाठीच योजलेला तो कात्रजचा घाट असावा काय? निदान तशी शंका येते.

एका बाजूला मध्यप्रदेशात कॉग्रेसला सत्ता मिळाली, तरी त्याच्यापाशी निर्विवाद बहूमत नव्हते आणि तरीही पक्षातच बेदिली माजलेली होती. त्यात सत्तेवर विळखा घालून बसलेल्या दिग्विजय सिंग व मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या विरोधात आघाडी उघडलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी एकामागून एक मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयांचे स्वागत करण्याचा सपाटा लावला होता. त्यांचा बदलणारा कल साफ़ दिसत होता. पण त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न राज्यातल्या नेतृत्वाने केला नाही आणि दिल्लीचे श्रेष्ठी शाहीनबागेत बिर्यानी खाण्यात रममाण झालेले होते. सहाजिकच त्याचा लाभ उठवण्याची सर्व रणनिती योजून अमित शहा कामाला लागलेले होते. त्यांनी पटकथा लिहील्याप्रमाणे एक एक प्रसंग कथानकात घडवण्याला आरंभ केला, तेव्हा कॉग्रेसला जाग येऊ लागली. पण त्यातही दिग्विजय सिंग यांच्याकडेच सुत्रे रहावित इतका खेळ सोपा दाखवण्यात आला. आरंभी मुठभर म्हणजे सहाआठ आमदार फ़ुटल्याच्या बातम्या आल्या आणि त्यापैकी अनेकांना सिंग व त्यांच्या मुलाने हरयाणातून परत माघारी आणल्याचा डंका पिटला गेला. नेहमीप्रमाणे ‘ऑपरेशन कमल’ असाही शिक्का मारून झाला. परतलेल्या आमदारांनी भाजपावर यथेच्छ आरोप केले आणि दिग्विजय यांनीही भाजपाचा डाव उधळल्याची छाती फ़ुगवून घेतली. हे योगायोगाने घडलेले होते, की दिल्लीकर कॉग्रेसश्रेष्ठींना अधिक गाफ़ील करण्याची खेळी होती? कारण त्या पळापळी मागे दिग्विजय असल्याच्याच आवया पिकल्या होत्या. पण ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव कुठेही नव्हते. मग अकस्मात गेल्या आठवड्याच्या आरंभी चांगले अठरा आमदार बंगलोरला गेल्याचे व त्यांच्याशी संपर्क होत नसल्याच्या बातम्या झळकू लागल्या. त्यात नुसते आमदार नव्हते आणि चांगले अर्धा डझन मंत्री असल्याचे उघड झाले. तेही बहुतेक शिंदे यांचे एकनिष्ठ असल्याची पहिलीवहिली बातमी आली.

अगदी नेमके सांगायचे तर हे अठरा आमदार मंत्री बंगलोरला दडी मारून बसल्याचे उघड होईपर्यंत त्यात कुठेही शिंदे यांच्या नावाचा उल्लेख आलेला नव्हता. पण एकदा तो आल्यानंतर वेगाने हालचाली सुरू झाल्या. होळीचा मुहूर्त शोधून त्याच दिवशी अमित शहा शिंदे यांच्यासह नरेंद्र मोदींना भेटायला गेले आणि दुसर्‍या दिवशी त्यांनी आपल्या कॉग्रेस सदस्यत्वाचा राजिनामा हंगामी पक्षाध्यक्षा सोनियांकडे पाठवून दिला. मग तिसर्‍या दिवशी शिंदे यांचा रितसर भाजपात प्रवेश झाला. भाजपाच्या मुख्यालयात शिंदे दाखल झाले व त्यांनी भाजपात दाखल होत असल्याचे पत्रकार परिषदेतच घोषित करून टाकले. तोपर्यंत कॉग्रेसला जाग येऊ लागली होती आणि शाहीनबाग विसरून सोनियांनी तातडीने शिंदे यांची पक्षातून हाकालपट्टी केली. मुद्दा इतकाच, की आपला एक उमदा नेता पक्ष सोडून अन्य पक्षात गेल्यावर त्वरेने कार्यरत झालेल्या सोनियांना आधीचा आठवडाभर मध्यप्रदेश सरकार धोक्यात असल्याचा सुगावा कशाला लागला नव्हता? त्यांचे लोकसभेतील खासदार दिल्लीच्या दंगलीवर संसदेत चर्चा व्हावी म्हणून धुमाकुळ घालत होते. पण त्यापैकी एकालाही मध्यप्रदेशात काही गंभीर गोष्टी घडत असताना त्यात लक्ष घालण्याची गरजही वाटलेली नव्हती. ते काम दिग्विजय संभाळतील आणि कमलनाथ हाताळतील, म्हणून दिल्लीचे श्रेष्ठी शांत झोपा काढत होते. अर्ध्यांना शाहीनबाग शांत होण्याची चिंता सतावत होती, तर अर्ध्यांना दिल्लीची दंगल शमण्याचे दु:ख अनावर झालेले होते. त्यात कुणाला मध्यप्रदेशाची सत्ता गमावण्याची फ़िकीर होती? म्हणून सगळा मामला सापळ्यासारखा वाटतो. अमित शहांनी जाणिवपुर्वक मागल्या दोन महिन्यात म्हणजे नागरिकत्व कायदा संमत केल्यापासूनच मध्यप्रदेशात उलथापालथ करण्याचे काम हाती घेतलेले असावे. त्यांच्या हालचालीकडे कॉग्रेस नेत्यांचे दुर्लक्ष व्हावे म्हणून शाहीनबागेला मोकळीक दिली असावी काय? देशाच्या अन्य भागात तसेच आंदोलन पेटवण्याच्या धमक्यांकडे शहांनी गृहमंत्री असूनही मुद्दाम दुर्लक्ष केले असेल काय?

वास्तव काहीही असू शकते. पण व्यवहारात घटनाक्रम तपासला, तर शाहीनबागेत कॉग्रेसला गुरफ़टून टाकायलाच काही वेंधळेपणा केलेला असू शकतो. वैफ़ल्यग्रस्त कॉग्रेसला निवडणुकातला पराभव आणि ३७० नंतरची मरगळ यातून बाहेर पडायचा उतावळेपणा सतावत होता. त्यातच बाकी प्रयत्न थकले असताना शाहीनबागेतला भडका लाभदायक वाटला. तिथे शशी थरूर यांच्यापासून चिदंबरम यांच्यापर्यंत नेत्यांची फ़ौज कॉग्रेसने तैनात केली. त्या भागातल्या बुरखेधारी मुस्लिम महिला वृद्धांना थरूर वा चिदंबरम यांच्या उच्चभ्रू भाषणातल्या चार ओळीही समजू शकत नाहीत. पण तरीही त्यांनी तिथे जाऊन किल्ला लढवला होता. त्यातून कॉग्रेस या काळात निर्णायक लढाई म्हणून कशी शाहीनबागेत गुरफ़टत गेली, ते लक्षात येऊ शकेल. दिल्ली विधानसभेत मुस्लिमांची भरघोस मते मिळावीत, अशीही आशा होतीच. पण व्यवहारात तो सापळा होता आणि त्यात कॉग्रेसचे दिग्गज अडल्याने मध्यप्रदेशात चाललेल्या आक्रमक हालचाली दुर्लक्षित रहाणार होत्या. तसे झाले म्हणून तर इतक्या सहजगत्या शिंदे व अन्य कॉग्रेस आमदार मंत्र्यांना फ़ोडणे भाजपाला शक्य झाले. ते कधी भोपाळहून गायब झाले आणि बंगलोरला पोहोचले, त्याचाही थांगपत्ता श्रेष्ठींना लागला नाही. त्यामागे शिंदे यांची प्रेरणा होती, त्याचा सुगावाही पत्रकारांना लागू शकला नाही. कारण अशा सर्वांनाच शाहीनबागेत अमित शहांनी जणू भेळ खायला बसवलेले होते. उरलेल्यांना ट्रम्प यांच्या वरातीमध्ये नाचायला पाठवलेले होते. व्यवहारात मध्यप्रदेशातील कॉग्रेस सरकारला सुरूंग लावण्याची पुर्ण सज्जता उरकून घेण्यात आलेली होती. त्यामुळेच दंगल होऊन कॉग्रेसने संसदेत धुमाकुळ घातला; तेव्हा त्यांना  येऊ घातलेल्या मध्यप्रदेशी वादळाची चाहूलही लागली नव्हती. शाहीनबागेचा कात्रज घाट झाला होता आणि हाती किती आमदार उरलेत, त्यांची नावेही मुख्यमंत्री कमलनाथ यांना सांगता येत नव्हती. तसे बघायला गेल्यास ३७० कलमाचा प्रस्ताव संमत झाल्यापासूनच ह्या हालचाली सुरू झाल्या असाव्यात.अखेरचा टप्पा येण्यासाठी दि‘शाहीनबागे’चा आडोसा अमित शहांना घ्यावा लागला असावा.

11 comments:

  1. Maharashtrat operation kamal zalech pahije. Nahitar Maharashtra chi waat lagel.

    ReplyDelete
  2. So b j p was saying that, We are ready to discuss shahinbag after Holi

    ReplyDelete
  3. भाऊ याचा पुढील अंक महाराष्ट्रात घडू शकतो,56 जागा असलेल्या सेनेच्या वाट्याला राज्यसभेची एक जागा तर 54 जागा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला दोन जागा मिळाल्या आहेत याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडीचा सर्वाधिक फायदा पवार घेत आहेत तर सर्वाधिक नुकसान शिवसेना सोसत आहे हळूहळू हा असंतोष सेनेत वाढत जाईल सध्या हा असंतोष सामना मधून भाजपला अर्वाच्य शिवीगाळ करून दडपून टाकला जात आहे मात्र यालाही मर्यादा आहे, एक दिवस मध्य प्रदेशातील पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार आहे मात्र त्याला अजुन काही दिवस हे सरकार चालू द्यावे लागणार आहे

    ReplyDelete
  4. १)शाहिनबाग अयोग्य आहे.पण रास्ता रोको झाले. त्याने काय साधले.२)दिल्लीत हवे तसे, समजा२० आमदारही मिळाले नाहीत ३)मप्र मध्ये प्रयत्न योग्य, पण यश कसे मिळेल ते पहायचे ४) आपण चपखल मुद्दे उपस्थित केले आहेत, याबद्दल धन्यवाद

    ReplyDelete
  5. शाहीन ते दिशाहीन
    शदालंकारचा चपखल वापर
    वाहवा

    ReplyDelete
  6. भाऊ, खरेच मोदी शहा यांचे डाव अजूनही लोकांच्या लक्षात येत नाही. म्हणजे कोणाच्याही लक्षात येत नाहीत. पण आमचा जीव टांगणीला लागतो त्याचे काय?

    ReplyDelete
  7. मध्य प्रदेश व कर्नाटकात भाजपला बहुमतासाठी फक्त ७-८ जागा कमी होत्या. त्यामुळे फोडाफोडी शक्य झाली व आयारामांना भाजपत आणून मंत्रीपदे देणे फारसे अवघड गेले नाही.

    परंतु महाराष्ट्रात भाजपला बहुमतासाठी तब्बल ४० जागा कमी आहेत. काही अपक्षांचा पाठिंबा मिळविला तरी बहुमतासाठी किमान २५-३० आमदार मिळवावे लागतील. इतक्या मोठ्या संख्येने आमदार फोडणे अत्यंत अवघड आहे. इतके आमदार फोडले तरी सर्वांना मंत्रीपद देणे अशक्य आहे व मंत्रीपद मिळत असल्याशिवाय एकही आमदार फुटणार नाही.

    त्यामुळे मध्य प्रदेश व कर्नाटकची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणे अशक्य आहे.

    शिवसेना परत भाजपशी युती करून भाजपला मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देणे सुद्धा अशक्य आहे.

    भाजपकडे फक्त २ पर्याय आहेत.

    १) हे सरकार पडून मध्यावधी निवडणुक होईल या आशेवर वाट पाहणे.

    २) बिहारप्रमाणे शिवसेनेला महाविकास आघाडीतून फोडून स्वत: शिवसेनेला पाठिंबा देणे. या परिस्थितीत नितीशकुमार प्रमाणेच मुख्यमंत्रीपद ५ वर्षे शिवसेनेकडेच राहील व भाजपला उपमुख्यमंत्रीपद व काही मंत्रीपदे मिळतील.

    भाजपकडे याव्यतिरिक्त इतर कोणताही पर्याय शिल्लक नाही.

    गरज नसताना मातोश्रीवर वारंवार हेलपाटे घालून शिवसेनेच्या अटींवर युती करण्याची किंमत फडणवीस-शहा चुकवित आहेत.

    ReplyDelete
    Replies
    1. आपले मुद्दे निश्चितच दखलपात्र आणि विचारणीय आहेत.

      Delete
  8. Everything makes sense except the deaths.
    BJP, specially Modi and Shah, seem not to be so irresponsible that for power in MP, they will allow the so many killings in streets.

    ReplyDelete
  9. भाऊ. corona बद्दल लिहा .

    ReplyDelete
  10. कॉग्रेसने आपले सर्वस्व पणाला लावावे यासाठीच योजलेला तो कात्रजचा घाट असावा काय? निदान तशी शंका येते.
    कॉंग्रेस हा आता शहानी विचारात घ्यावा एवढा मोठा किंवा प्रबळ विरोधी पक्ष राहिला आहे काय ? जागता पहाराने सुद्धा राहुल , प्रियंका किंवा कॉंग्रेस वर लिहिण्यात शब्द वाया घालवू नयेत अशी नम्र सूचना करावीशी वाटते .मेलेल्याला कशाला मारत बसायचे ?

    ReplyDelete