Tuesday, March 10, 2020

भोपाळी शिमग्याची सोंगे

Image result for jyiraditya schindia
मध्यप्रदेश कॉग्रेसमध्ये उभी राहिलेली समस्या पक्षाने आमंत्रण देऊन बोलावलेली आहे. कारण त्याची कुणकुण खुप आधीपासून लागलेली होती. पंधरा वर्षानंतर तिथली सत्ता कॉग्रेसला मिळाली, तेव्हाच त्याची बीजे रुजवली गेली होती. आपण इतका दिर्घकाळ सत्तेबाहेर कशाला बसलो, त्याचा साधा विचारही त्या पक्षाच्या नेत्यांना कधी करता आला नाही, म्हणून ते इतका काळ सत्तेबाहेर बसले होते. अन्यथा शेजारच्या राजस्थानात किंवा उत्तरेकडे हिमाचल प्रदेशात आलटून पालटून कॉग्रेस भाजपा यांच्यात सत्तांतर होत राहिले. पण मध्यप्रदेश व त्याचाच पुर्वी एक भाग असलेले छत्तीसगड राज्य, पंधरा वर्षे भाजपाच्या हातात राहिले, त्याचे मुख्य कारण कॉग्रेस पक्षात चालू असलेली किंवा न संपलेली सुंदोपसुंदी इतकेच होते. तरीही २०१८ च्या अखेरीस भाजपाला त्याच आजाराची बाधा झाली म्हणून त्यांच्या हातून बहूमत निसटले आणि सत्ताही किरकोळ संख्येने गेली. ती कॉग्रेसला आपले बस्तान पक्के करण्याची सुवर्णसंधी होती. पण आत्मघाती बेबनाव हा कॉग्रेसनेत्यांमध्ये उपजत असतो वा असावा लागतो. म्हणूनच लॉटरीसारखी सत्ता हाती येताच त्यांच्यातली भांडणे उफ़ाळून आली आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना खड्यासारखे बाजूला ठेवण्याचे डाव खेळले गेले. तिथून ह्या संकटाचे ढग कमलनाथ सरकारला झाकोळू लागले होते. त्यात हस्तक्षेप करण्यासाठी पक्षश्रेष्ठी नावाची माणसे असतात. पण श्रेष्ठींना मंत्रीपद वा मुख्यमंत्री नेमण्यातून आपल्या तिजोरीत काय येणार, इतक्यापुरता रस असल्यावर यापेक्षा वेगळे काय व्हायचे? ज्योतिरादित्य शिंदे यांची राज्यात गळचेपी होत असेल तर त्यांचे पुनर्वसन कुठेतरी व्हायला हवे होते आणि त्यांची तितकीच अपेक्षा होती. ती पुर्ण होण्याची शक्यता नसल्याची खात्री पटल्यावर पुढला घटनाक्रम अपरिहार्य होता. त्याचे खापर भाजपाच्या माथी फ़ोडल्याने कॉग्रेसचे कल्याण शक्य नव्हते, की कमलनाथ सरकार बचावण्याची बिलकुल शक्यता नव्हती. पण हे राहुल व प्रियंका अशा वारशाने नेता झालेल्यांच्या डोक्यात कसे शिरावे?

नोव्हेंबर महिन्यात शिंदे यांनी आपल्या भूमिकेत आमुलाग्र बदल होत असल्याचे इशारे वेळोवेळी दिलेले आहेत. आधी त्यांनी ३७० हटवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत करून पक्षश्रेष्ठींना इशारा दिला होता. पण तो समजून घेण्यापेक्षा वा नाराजांना चुचकारण्यापेक्षा डिवचण्यालाच श्रेष्ठी समजले जात असेल, तर ह्या घटनाक्रमातून सुटका नव्हती. महिन्याभरापुर्वी शिंदे यांनी कमलनाथ सरकारला इशारे दिलेले होते. कर्जमाफ़ी वा निवडणूकीतली आश्वासने पुर्ण केली जात नाही. त्यामुळे पक्षाच्याच सरकार विरोधात रस्त्यावर उतरावे लागेल. हा इशारा सोनिया गांधींना कळत नाही, की राहुल प्रियंकांच्या डोक्यात शिरणारा नाही? हातातले एक मोठे राज्य व तिथले सरकार जाण्याचा तो इशारा होता. पण तिथे डगडुजी करण्यापेक्षा शाहीनबाग किंवा तत्सम गोष्टींवर पोरखेळ करण्यात कॉग्रेसश्रेष्ठी रमलेले होते. त्यांना तिथेच खेळवून ठेवताना अमित शहा यांच्यासारखा पाताळयंत्री भाजपानेता मध्यप्रदेशात कॉग्रेसची कबर खोदत होता. कारण ते सरकार उलथून टाकणे सर्वात सोपे काम होते. जवळपास कर्नाटक व मध्यप्रदेशचे आकडे सारखेच होते. त्यातच शिंदे यांच्या पाठीराख्यांची संख्याही त्यासाठी भरपूर होती. शिंदे नाराज म्हणजे कॉग्रेसमधूल ३०-३५ आमदार नाराज असा अर्थ होता. त्यापैकी डझनभर आमदारांनी आपले राजिनामे दिले तरी मध्यप्रदेशात कर्नाटक व्हायला वेळ लागणार नव्हता. त्याची सुरूवातही कर्नाटकसारखी झाली. आधी चारसहा आमदार गायब झाले आणि त्यांना परत बोलावून भाजपावर डाव उलटवण्याचे नाटक सुरू झाले. पण परत आलेल्यांनी कॉग्रेसला मजबूत करण्यापेक्षा आणखी अनेक आमदारांसह पलायन केले. तोपर्यंत सोनिया वा कमलनाथ यांना जागही आली नाही. मग शिमग्याचा मुहूर्त शोधून होळी पेटवण्यात आली. सोनियांना त्याचे गांभिर्य समजण्यापर्यंत खेळ हाताबाहेर गेला होता. शाहीनबागेत बागडायला जाण्यापेक्षा आपल्या पक्षातल्या असल्या बेबनावाकडे पुरेसे लक्ष दिले असते तर?

इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. सोमवारी हे नाट्य रंगू लागल्यावर ज्योतिरादित्य शिंदे यांना रात्री सोनियांनीच आमंत्रण पाठवले. त्याकडे शिंदे यांनी पाठ फ़िरवली, तिथेच कमलनाथ सरकारचे दिवस भरलेले होते. मंगळवारी शिंदे यांनी अमित शहा यांच्यासोबत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि तोपर्यंत त्यांच्याशी निष्ठावंत असलेल्या १९ आमदारांनी बंगलूरू येथे आश्रय घेतला होता. पण त्याकडे बघायला श्रेष्ठींना सवड कुठे होती? सर्व कॉग्रेस पक्ष व त्याचे एकाहून एक महान लोक, येस बॅन्केच्या दिवाळखोरीचे खापर भाजपाच्या डोक्यावर फ़ोडण्यात गर्क होते. त्यात इडीने लक्ष घातल्यावर प्रियंका गांधीच त्यात फ़सल्याचे दिसू लागले. मग कॉग्रेस नेत्यांचे पहिले कर्तव्य गांधी कुटुंबाला वाचवणे आणि त्यासाठी पक्षालाही मुठमाती देणे असे असते ना? म्हणून इथे पक्षाचे आमदार गायब व बंगलूरूला पळून जात असताना, कॉग्रेसचे चाणक्य प्रियंका गांधींना निर्दोष ठरवण्यात रममाण झालेले होते. आधी ह्या फ़ाटाफ़ुटीच्या कारस्थानाची तयारी चालू असताना सगळेच शाहीनबागेत पर्यटन करायला गेले होते आणि नंतर समस्या समोर आल्यावर प्रियंकाचा बचाव महत्वाचा झाला होता. परिणामी मध्यप्रदेशाच्या पक्ष व सरकारच्या आघाडीवर फ़क्त दिग्विजयसिंग व कमलनाथ एकटेच पडलेले होते. म्हणून तर इतक्या टोकाला गोष्टी गेल्या असतानाही सोनिया पुर्णपणे गाफ़ील होत्या. त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना भेटीला येण्याचे आमंत्रण दिले. रांगत गुडघे टेकत शिंदे १० जनपथला येतील, असा आत्मविश्वास नसता तर सोनियांनी हे आमंत्रण कशाला दिले असते? त्यातून त्यांचा गाफ़ीलपणा लक्षात येऊ शकतो. रात्री साडे नऊची वेळ दिलेली असताना आणि दारात तमाम माध्यमांचे पत्रकार प्रतिक्षा करीत बसले असूनही, शिंदे तिकडे फ़िरकलेच नाही. तिथेच चित्र स्पष्ट झाले होते. पण ते सत्य मानायचे कोणी? ना कॉग्रेसला सत्य बघायची हिंमत उरली आहे ना त्यांच्या बुद्धीवादी समर्थकांना सत्य समजण्याची बुद्धी उरली आहे. म्हणून अमित शहांना होळीचा मुहूर्त साधता आला.

 हे १८ आमदार बंगलूरूला रवाना झाल्याच्या बातम्या आल्या, तेव्हाच अकस्मात मध्यप्रदेश भाजपाच्या आमदारांचे नवे नेते म्हणून शिवराजसिंग चौहान यांची निवड होणार असल्याच्याही बातम्या झळकू लागल्या. त्याचा एकत्रित अर्थ कुठल्याही सामान्य पत्रकारालाही काढता आला असता. पण डावपेचात भाजपाची सरशी होताना बघण्याचे धैर्य पत्रकारही गमावून बसले असतील, तर त्यांचीही दिशाभूल होण्याला पर्याय उरत नाही. कमलनाथ आपल्याशी निष्ठ असलेल्या तमाम मंत्र्यांची बैठक घेऊन त्यांचे राजिनामे घेतात आणि भाजपा माजी मुख्यमंत्र्याची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी नव्याने निवड करायच्या हालचाली करतो, हे सत्तांतराचे समिकरण असते. शेंबड्या पोरालाही कळू शकते. पण बघायचे वा समजून घ्यायचेच नसेल तर काय? ह्या सर्व हालचाली होत असताना त्यात कर्नाटक सत्तांतराचे प्रतिबिंब पडलेले आहे. पण एक मोठा फ़रक लक्षात घेतला पाहिजे. त्या घटनाक्रमामध्ये विधानसभेच्या सभापतींनी खुप कसरती केल्या होत्या आणि त्यामुळे सत्तांतराला विलंब झाला होता. त्यापासून अमित शहा वा भाजपा धडा शिकलेला दिसतो. इथे जशीच्या तशी कर्नाटकाची पुनरावृत्ती होताना दिसत नाही. आमदारांनी आपले राजिनामे व्यक्तीगत रितीने सभापतींना दिले पाहिजेत, असे सांगून कर्नाटकात पोरखेळ झाला होता. तशी वेळ येऊ नये म्हणून मध्यप्रदेशात वेगळी खेळी झाली आहे. बंगलुरूला गेलेल्या वा बंडखोरी करणार्‍या कॉग्रेस आमदारांनी आपले राजिनामे सभापतींकडे देण्यापेक्षा वेगळा मार्ग चोखाळला आहे. आपले राजिनामे त्यांनी थेट राज्यपालांकडे देण्याचा पवित्रा घेतलेला आहे. म्हणजेच त्यांचे राजिनामे राज्यपालांनी सभापतीकडे पाठवावे, असा खेळ होऊ घातला आहे. त्यात कॉग्रेस नेते किंवा त्याच पक्षाशी बांधिल असलेल्या सभापतींना वेळकाढूपणा करता येऊ नये, म्हणून काढलेली ही पळवाट असू शकते. कदाचित त्यासाठी कुणा घटनातज्ञ वकीलाचाही सल्ला घेतलेला असू शकतो. सांगायचा मुद्दा इतकाच, की अनुभवातून भाजपा शिकतो आहे आणि अनुभवातून शिकायची कॉग्रेस पक्षाची अजिबात तयारी नाही.

चौदा महिन्यापुर्वी कॉग्रेसला भाजपाच्या मुर्खपणामुळे सत्ता मिळाली, तर त्यांनी केलेले महत्वाचे कार्य कोणते होते? स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांची विटंबना करणारी पुस्तिका काढली. छिंदवाडा येथील शिवरायांचा पुतळा शासकीय बळ वापरून उखडून काढला. सत्तेची इतकी मस्ती कोणाला सत्तेत टिकू देणारी असते? शेतकर्‍यांच्या आत्महत्या, कर्जमाफ़ी असे विषय घेऊन निवडणूका लढल्या होत्या. त्याचा विसर कॉग्रेसला पडला, म्हणून अशा मार्गाने पक्ष भरकटत गेला. मतदाराला खुश करण्यापेक्षा भाजपाला किंवा त्याच्या हिंदूत्वाला डिवचण्याचा एकलकमी कार्यक्रम चालू राहिला. त्यातून ही दुर्दशा झालेली आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नविन पटनाईक यांनी तिथल्या मतदाराच्या घरावर सोन्याची कौले घातलेली नाहीत. तिथली जनता सुखवस्तू जीवन जगते, असे कोणी म्हणू शकणार नाही. पण आपल्या कारकिर्दीत कुठलेही चमकदार काम करण्यापेक्षा त्यांनी सामान्य जनतेला अधिकाधिक सुसह्य जगता यावे, इतकीच काळजी घेतली आहे. त्याकडे पाठ फ़िरवून त्यांनी पुरोगामी प्रतिगामी किंवा हिंदू मुस्लिम अशा कुठल्याही नाटकात भाग घ्यायचे साफ़ नाकारले आहे. राज्य आणि केंद्र सरकारचा वाद उकरून काढून पोरखेळ केलेला नाही. कुठल्याही राजकीय गटात वा गोटात जायचे टाळले, तरी मतदाराने त्यांचा पाचव्यांदा बहूमताने सत्ता बहाल केली आहे. मोदींची लोकप्रियता वा भाजपाची संघटनात्मक शक्ती पटनाईकांना पराभूत करू शकली नाही. मग कमलनाथ वा कुमारस्वामी यांनी त्यांचाच धडा गिरवायला काय अडचण होती? तितके सुसह्य जीवन देण्याचे प्रयासही कमलनाथ यांना सत्तेत कायम ठेवू शकले असते. त्यात ज्योतिरादित्य शिंदे किंवा भाजपा बाधा घालू शकला नसता. पण सत्तेची मस्तीच अशी और असते, की तिथे आरुढ झाल्यावर अकारण खोड्या करण्याचे मोह आवरत नाहीत आणि कपाळमोक्ष ओढवून आणला जातो. मध्यप्रदेश हे त्याचे ताजे उदाहरण आहे. होळीच्या दिवशी घरात बसून ही भोपाळी शिमग्याची सोंगे लोक म्हणूनच बघत आहेत.

16 comments:

  1. चला एकदा भाऊंचे विवेचन हाती पडले की पुढच्या खेळाचा अन्वयार्थ लागणे सोपे होते. बहुतेक उद्या पर्यंत काना मागे रंग देखील शिल्लक उरणार नाही असे दिसते.

    ReplyDelete
  2. शाहीनबागेत बागडायला😂😂😂 डोळ्यासमोर अवतरला तो प्रसंग😝😝😝 खूपच जबरदस्त
    -एक नियमित वाचक कृष्णा देशमुख

    ReplyDelete
  3. आता नंबर राजस्थानचा भाजपच्या हातातून गेलेली सगळी राज्य परत येतील महाराष्टाचे सरकार हे सुद्धा स्वघोषित चाणक्य शरद पवारच पाडतील कारण ते प्रत्येक वेळेस सांगतात की हे सरकार पाच वर्षे टिकेल त्याचे उलट समजणे फक्त त्याचा माल जमा झाला की झाले

    ReplyDelete
  4. Sawarkarancha ani chatrapaticha apman sahan kela janar nhi.

    ReplyDelete
  5. भाऊराव,

    ज्योतिरादित्य शिंदे यांचे भाजपगमन हा काँग्रेसमुक्त भारताचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

    असं म्हणतात की माधवराव शिंद्यांच्या अकस्मात अपघाती मृत्यूचा सोनिया गांधींना सर्वात जास्त फायदा झाला. हे जर खरं असेल तर ज्योतिरादित्य शिंद्यांनी सोनिया गांधींच्या चरणांचा आश्रय घेणं अगदी स्वाभाविक मानावं लागेल.

    पण आता ज्योतिरादित्यांनी सोनिया गांधींच्या संरक्षणाखाली राहायचं नाकारून मोदींच्या गोटात जाणं पसंत केलं आहे.

    एकंदरीत, काँग्रेसची परिस्थिती झपाट्याने पालटत चालली आहे.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  6. भाऊ महाराष्ट्रात काँग्रेस तिसऱ्या दर्जाच्या भूमिकेत आहेत, त्यांच्या जागी दुसरे हुशार नेतृत्व असते तर महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी सरकारला पाठिंबा न देण्याच्या बदल्यात भाजपच्या शीर्ष नेतृत्वाशी मध्य प्रदेश सरकार वाचवण्यासाठी वाटाघाटी केल्या असत्या कारण शिवसेनेच्या सौदेबाजीमुळे भाजपची मजबुरी होती पण काँग्रेस सगळाच विवेक हरवून बसली आहे मध्य प्रदेश पाठोपाठ भाजप महाराष्ट्रात सरकार बनविण्यासाठी हालचाल करणार हे नक्की

    ReplyDelete
  7. तुमच्याच लेखाची वाट पाहत होतो भाऊ.

    मध्यप्रदेशातील कर नाटक ह्या लेखातून तुम्ही मध्यप्रदेशात काय होणार हे आधीच सांगून ठेवलं होतं.

    अगदी अचूक विश्लेषण !

    - आदित्य हमिने

    ReplyDelete
  8. मध्यप्रदेश मधल्या ह्या नाट्याचे परिणाम इतरत्र देखील होणार आहेत हे नक्की । राजस्थान आणि विशेषतः महाराष्ट्रात ते परिणाम कसे असतील याबद्दल तुमचे विश्लेषण जाणून घ्यायला आवडेल ।

    ReplyDelete
  9. 🤣🤣😂😂 अमित शहा यांच्यासारखा पाताळयंत्री भाजपानेता मध्यप्रदेशात कॉग्रेसची कबर खोदत होता😝😝😝

    ReplyDelete
  10. भाऊ, भोपाळी शिमगा, मस्तच उपमा आणि छान विश्लेषण. मध्यप्रदेश वाचवण्यापेक्षा प्रियांका वाढराला वाचवणे महत्वाचे आणि या नकली गांधी घराण्याची मस्ती एवढी की या वीस एक आमदारांच्या चुळबूळीकडे चक्क दुर्लक्ष. यांना मुस्लिम महत्वाचे. सत्ता भाजपाकडे गेली की भाजपा नालायक पण यांचा कपाळकरंटेपणा कोण उजेडात आणणार? देशातील कुबेर, रवीशकुमार यांना भाजपाविरोधापुढे हे शक्य नाही नव्हे त्यांना दिसतच नाही, पण भाऊ आपण हे करताहात हे चांगले आहे नाहीतर सत्तेसाठी भाजपा कॉंग्रेस फोडतो हे रडगाणे लोकांना खरे वाटण्याची शक्यता होती.

    ReplyDelete
  11. भाऊ साहेब
    तुमचे विश्लेषण, तुमच्या विचारांची दिशा
    आजच्या लोकसत्ताचा कुबेरांचा
    अग्रलेख नजरेखालून घालावा

    ReplyDelete
  12. महाराष्ट्र राज्य निवडणूक लढताना आधीच 50 आमदार काँग्रेसचे घेतले, त्यावेळी जे आले त्यानंतर सुद्धा आणखी येतील का? वासरू इतकं उधळले कीं आपल्याच भावंडाना शिंगावर घेतलं.... आणि मग म्हणे मी पुन्हा येईन ....

    आता कशाला????

    ReplyDelete
  13. भाऊ माधवराव शिंद्यांचा खून का व कसा झाला होता यावर एकदा सविस्तर लिहा .

    ReplyDelete
  14. भाऊ सही आपण गोवा ईलेक्शन रिझल्ट नंतर पण असेच आपण विश्लेषण केले होते.. व काँग्रेसच्या चालढकल करणे वर व्यैशम्य व्यक्त केले होते... व भाजपने लगेच आपले सरकार बनवले...
    पण मिडियावाले या गोष्टी जाणुन बुजुन दुर्लक्षीत ठेवतात.. यामागे असे भासवले जाते की राहुल गांधी आळशी व ईनक्यापेबल आहेत.. म्हणुन हे होत आहे ...हे जरी काही प्रमाणात बरोबर आहेच .. पण राहुल गांधीच्या बाजुचे टोळके पण असेच मिसगाईड व मश्गुल रहाणारे आहे.. असे पण केले जात आहे/ पसरवले जात आहे...
    यामुळे केवळ राहुल गांधी मुळे असे काँग्रेसचे वाटोळे झाले आहे असा पक्का समज रुजवला जात आहे... व तसेच काँग्रेस चांगली आहे ..( यात गर्भीत असे आहे की जरी काँग्रेसने किती जरी भ्रष्टाचार व मुस्लिम लंगुचालन व राष्ट्रभेदी संविधान भेदी घराणेशाही वादी लोकशाही चे चारी स्त्थंब खिळखिळे करण्याचे कारस्थान केले असले तरी) असे दुसरे बाजुने बोलले/ भासवले जाते .. यामध्ये दुरगामी प्लॅनिंग आहे.. यामुळे एका बाजुने मोदी सरकारची दमदार व अष्टपैलु कामगिरी (खतांच्या निम कोटींग, शौचालय, गॅस व घरे वितरण, महागाईच्या वर लगाम, रस्ता नेटवर्किंग, नदी व ओढे आडवुन शेत तळे राबवुन शेतीसाठी पिण्यासाठी पाणी ऊपलब्धी, राफेल खरेदी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे खरेदी चिनुक सारखी हॅलिकॅप्टर खरेदी, अतिरेकी कारवाई चा बिमोड, भारतीय सीमा कंपाऊंड घालुन सिल करणे, पाकिस्तान चे आर्थिक व लष्करी कंबरडे मोडणे.. त्याला एकटे पाडणे.. सैन्यात जान फुंकत शत्रु विरोधी कारवाई चे स्वातंत्र्य देणे.., स्ट्रॅटॅजीक लोकेशन निर्माण करुन सैन्याची शक्ती वाढवणे.. जिएसटी रेरा एनसीएलटी सारखे कायदे आणणे 370 व 35A आर्टिकल हटवणे CAA सारखे कायदे आणणे.. करोडो बँक खाती उघडून सबसिडी डायरेक्ट ट्रान्स्फर करणे व 1.50 लाख करोड सबसिडी स्वरुपात दलाल नेते व सरकारी आधिकारी वर्ग कमवत होता ते थांबले ) ही मोठी पण सामान्य जनते साठी महत्वाची व देशाला मजबुत करणारी कामे दुर्लक्षीत केली जातात..
    यामुळे एका बाजुने मोदी कसे भारतीय अर्थव्यवस्था व संविधान लोकशाही कशी खोखला करत आहेत कसे डिव्हीजीव पाॅलीटीक्स खेळत आहेत कसे देशात अराजक माजवत आहेत (2014 नंतर गोरक्षक, घरवापसी, अखलाक इत्यादी व आता CAA वरुन समजु शकता कसे मुस्लिम समाजाला काँग्रेस धार्जीन मिडियावाले व टुकडे टुकडे गँग आवार्ड वापसी गँग कडुन खोटी भिती भडकवले गेले.... तसेच अनएम्प्लाॅयमेंट इकाॅनाॅमी वरुन अवास्तव स्थिती दाखवत जनमत पलटण्याचा प्रयत्न करत आहेत कारण भ्रष्टाचार नाॅन गव्हर्नन्स महागाई वरुन मोदी सरकार विरोधात काहीच सापडत नाही.
    आपण केलेले विश्लेषण नेहमीच्या खासीयत व सहज समजणार्या भाषेत लिहिले आहे..
    धन्यवाद...

    ReplyDelete