Saturday, March 7, 2020

माफ़ कर आई



तुला जाऊन रविवारी रात्री सात वर्षे पुर्ण होतील. तो जागतिक महिलादिन होता. त्याही वर्षी मी आपल्या कामात गर्क असताना कधीतरी तू या जगाचा निरोप घेतलास. जग महिलादिन साजरा करत होते आणि उपचार म्हणून इथे सोशल माध्यमात बहुतांश लोक त्या दिवसाच्या शुभेच्छा एकमेकांना देण्यात गढलेले होते. मला मात्र त्यात रस नव्हता. पण मी कुणालाच कधी शुभेच्छा वगैरे देत नाही. कारण तू मला शुभेच्छा जगायला शिकवलेस. आज इतक्या वर्षांनी तसे जगताना वागताना एक शंका मनात आलीय. आपण शुभेच्छा जगलो म्हणून जग खरेच बदलते का? कधीतरी हे मानवी जग माणूसकीच्या दिखावू मुखवट्यातून बाहेर पडेल, अशी शक्यता आहे काय? अन्य प्राणिमात्रापेक्षा आपण वेगळे असल्याचे सिद्ध करण्याचे हे मानवी नाटक कधी संपणार आहे काय? आजही प्रत्येकजण एकमेकांना तशाच महिलादिनाच्या शुभेच्छा देतोय, पण कोणाला तरी निर्भयाने भोगलेल्या मरणयातना जाणवल्या तरी आहेत काय? तिची आई जीवंतपणे ज्या नरकयातना अनुभवते आहे, त्याची साधी मानवी संवेदना तरी कोणाला जाणवली आहे काय? तुझ्या जाण्यापुर्वी साधारण तीन महिन्यांची गोष्ट असेल. म्हणून तुझ्या हयातीतली घटना आहे. अजून तिला न्याय मिळालेला नाही आणि तिचे मारेकरी बलात्कारी उजळमाथ्याने त्याच कायद्याला व न्यायालाही वाकुल्या दाखवित आहेत. पण कोणाला फ़िकीर आहे? आम्ही सगळे एकमेकांना शुभेच्छा देऊन आपल्या नाकर्तेपणावर पांघरूण घालण्यात रमलेलो आहोत. अशा शुभेच्छा गुन्हे थांबवित नाहीत वा कोणा महिलेला प्रतिष्ठीतही करीत नाहीत. मग आमच्या अपयशावर किंवा नंपुसकत्वावर चादर घालण्यासाठी असले सोहळे अगत्याने साजरे करावे लागतात. खोटे अश्रू ढाळण्यात आता मानव समाज कमालीचा वाकबगार झालेला आहे आणि जितका अधिक कुशल होत चालला आहे, तितके सोहळे व महिलांची विटंबना हातात हात घालून वाढतच चालली आहे. म्हणून तुझ्या शुभेच्छा जगण्याचा आग्रह शंकास्पद वाटू लागलाय.

ती निर्भया जाऊनही आता सात वर्षाचा कालखंड उलटून गेलाय. अर्थात तीच अशा विटंबनेची पहिली बळी नव्हती. तिच्या आधी शेकड्यांनी हजारांनी मुली महिला अमानुष मानवी वासनेच्या शिकार झालेल्या आहेत. ज्यांची नावेही कोणी घेत नाही. त्यांची नोंद फ़क्त आकड्यात होत असते. महिलांवरचे अन्याय अत्याचार ठरणारे गुन्हे अमूक वर्षी इतके होते आणि आता त्यात घट वा वाढ झाल्याची उत्तरे देऊन आपली पाठ थोपटून घेतली जाते. त्यापेक्षाही भयंकर म्हणजे आता महिला कुठल्या जातीची वा धर्माची आहे, त्यानुसार शोकसोहळे साजरे होतात. नोंदी होतात, आवाज उठवला जात असतो. कालपरवा कोणीतरी टिव्ही मालिकांमध्ये एका जातीच्याच महिलांचा भरणा कशाला, असला प्रश्न उपस्थित केला. ह्याला आम्ही कलाकारी म्हणतो. जिथे अविष्कार, अभिनय, सृजनशीलताही जातीधर्मामध्ये विभागली गेली आहे. कोणी एक महिला एस्टी डेपोमध्ये हजारो लोकांच्या साक्षीने पेट्रोल ओतून पेटवली जाते. पण आम्ही मात्र आज शुभेच्छांचा रतीब घालणार आहोत. त्या महिलेने कितीही प्रगती करो, विक्रम पराक्रम करो, आमच्या लेखी ती फ़क्त मादी आहे. नराच्या पाशवी लालसेची सुविधा, यापेक्षा तिला अजून पुढला पल्ला गाठता आलेला नाही. कलाक्षेत्रातली असो किंवा पोलिस सैनिकी गणवेशातील असो, तिला उपभोग्य वस्तु म्हणून बघणे आमच्या रक्तामध्ये घट्ट बसलेले आहे. पण तिला मानवी समाजात मादी इतकीही प्रतिष्ठा वा सन्मान आम्ही देऊ शकलेलो नाही. उलट पशूतल्या मादीला मिळणारे स्वातंत्र्य वा अधिकारही सभ्य मानवी समाजाने नाकारले आहेत. ते पाप लपवायला आम्ही ‘पाशवी’ बलात्कार अशी लबाडी करतो. बलात्कार कधी पाशवी झाला? ही संकल्पनाच पशूंमध्ये नाही. ती फ़क्त मानवी कल्पना व व्यवस्था झालेली आहे. निर्भया त्याची बळी होती आणि अशी प्रत्येक पिडीता त्याचीच शिकार झालेली आहे. मग ते सत्य लपवायला आम्ही आमच्या पापकर्माची तुलना पाशवी ठरवून आपले हात झटकून नामानिराळे होतो. अन्यथा निर्भयाचे गुन्हेगार इतके उजळमाथ्याने कशाला फ़ाशीच्या दोराशी खेळत बसले असते?

आई तुला माहित आहे? आम्हाला कसलीही लाज वाटते. पण आपण मानवी समाजातील नर असूनही इथे आपल्या वंशातल्या मादीला साधा पाशवी सन्मान वा हक्क अजून मिळालेला नाही, याची कोणाला शरम वाटत नाही. बेटी बचाव वगैरे योजनांची राजकीय टिंगल करण्यात आम्ही धन्यता मानतो. पशूतली मादी सुद्धा जितकी प्रतिष्ठीत व स्वतंत्र आहे, तितकेही स्वातंत्र्य अधिकार मानव म्हणून आमच्यातल्या माद्यांना आम्ही नाकारलेत. पण त्याची कुठे फ़िकीर शरम दिसते? प्रत्येक सजीवाला निसर्गानेच बहाल केलेले स्वातंत्र्य व अधिकारही मानवी समाजात मादी म्हणून जन्म घेणार्‍यांना नाकारले गेले आहे. सभ्य मानल्या गेलेल्या मानव समाजातला नर सतत शिकार शोधावी, तसा मादीवर पाळत ठेवून वागतो, जगतो. त्याची लाज आजच्या दिवशीही कोणाला वाटलेली नाही. म्हणून आई, शुभेच्छा जगण्याचा तुझा सिद्धांत शंकास्पद वाटू लागलाय. कारण सभ्यता ही जशी मानवी संकल्पना आहे, तसाच महिलेला उपभोग्य वस्तू समजणेही मानवी संकल्पना आहे. आपल्या पौरूषाच्या देखाव्यासाठी हा खेळ चालतो. ते पशूही नागडेउघडे जगतात. पण त्यांच्यात कधी मादीच्या अधिकाराला बाधा येत नाही. तिच्या देहाला उपभोग्य समजण्याचा उन्माद जागा होत नाही. कारण ती मानवी बुद्धीची उपज आहे. त्या बुद्धीतूनच महिलांच्या मानसिक स्थितीला एक दिशा व स्वभाव बहाल करण्यात आला. तिला सहनशील, सोशिक, करुणामय बनवण्यात आले. तिच्या रौद्ररुपाला जितके म्हणून निष्प्रभ करता येईल, असे तिच्यात बदल करण्यात आले. तिला अबला ठरवून मनानेच खच्ची करण्यात आले. आजची पुढारलेली महिला ही समजते, त्यापेक्षा ती अधिक गुलाम असहाय होऊन गेलेली आहे. त्याला आरक्षण वगैरेतून अधिक खतपाणी घातले जात राहिले.

आई, गेल्या काही वर्षापासून शेतकरी आत्महत्यांचा विषय गाजतो आहे. त्यात अमूक राज्यात जिल्ह्यात तालुक्यात किती शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, त्याचे आकडे रंगवले जातात. पण या आकड्यात किती महिला आहेत? त्याही शेतकरी नाहीत का? ज्यांनी आत्महत्या केल्या, त्यांची मुलेबाळे हिंमतीने वाढवणारा कुटुंबप्रमुख नंतरच्या काळात वैधव्य नशिबी आलेल्या महिलाच होत्या ना? त्या महिलांना अबला संबोधणे हाच अवमान किंवा विटंबना नाही काय? अशा किती प्रश्नांनी आज डोके चालेनासे झाले आहे. कारण बालपणापासून विपरीत परिस्थितीत आम्हा भावंडांचे पालनपोषण तू केलेस आणि कधीही हिंमत सोडून हताश झालेली नव्हतीस. म्हणून महिलेकडे बघण्याचा दृष्टीकोन तयार झाला. तो दृष्टीकोन समाजात रुजला, तर कुठल्याही कठोर कायद्याची गरज नाही. कुठल्या संरक्षणाची महिलेला गरज उरणार नाही. महिलेकडे फ़क्त एक माणूस म्हणून बघितले वा वागवले; तरी खुप मोठा फ़रक पडू शकतो. आपल्या मुलांना सहकार्‍यांना त्यासाठी आम्ही प्रवृत्त करू शकलो, तरी प्रत्येक दिवस महिलादिनच असेल. प्रत्येक  मानवाच्या जीवनातला प्रत्येक दिवसच महिलेच्या कर्तबगारीचा असतो आणि पुरूष त्याचा फ़क्त लाभार्थी असतो. हे डोळसपण बघता आले, तरी आपण पशू इतके सभ्य होऊ शकू. कारण पशूंमध्ये मादीला कोणी गुलामासारखे वागवित नाही. तिच्या इच्छेविरुद्ध कुठला नर बळजबरी करू शकत नाही. तिचा जननी म्हणून सन्मान राखला जातो. माणसाने पशूपेक्षा वेगळे होण्यासाठी जी बुद्धी पणाला लावली, त्यातून आलेली विकृती म्हणून अशा पुरूषार्थाकडे आम्ही नैसर्गिक दृष्टीने बघू शकलो, तरी महिलादिनाचे सोहळे करावे लागणार नाहीत. महिलामुक्ती वगैरे नाटके करण्याची वेळ येणार नाही. महिला हा आकर्षक शिल्पासारखा असला तरी सजीव देह असून, त्यातही एक संवेदनशील मन असल्याचे आम्हाला समजू शकेल. मग या शुभेच्छांची गरज उरणार नाही.

आई, तू आयुष्यभर ज्या शुभेच्छा जगायला शिकवत राहिलीस, त्या शुभेच्छा आम्ही जगण्यातून अंमलात आणायला लागलेले असू. कधीतरी तुझी इच्छा पुर्ण होईल आणि मानव समाज शुभेच्छामुक्त होऊन शुभेच्छायुक्त होईल्. इतकीच अपेक्षा तुझ्या सातव्या स्मृतीदिनी व्यक्त करतो. आई, माझी इतकी निराशा व वैफ़क्यग्रस्तता बघायला आज तू हयात नाहीस, हेच बरे ना?

- भाऊ तोरसेकर

13 comments:

  1. अतिशय उत्तम लेख. सद्य परिस्थितीचे तंतोतंत चित्र उभे करणारा लेख आहे.तुमच्या आईच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून या महिला दिनानिमित्त समाजाच्या मानसिकतेचे उत्तम विश्लेषण केले आहे.आपले सर्वच लेखन उत्कृष्ट असते.

    ReplyDelete
  2. धन्यवाद भाऊ!

    ReplyDelete
  3. विनम्र अभिवादन

    ReplyDelete
  4. भाऊ अतिशय सुंदर लेख.

    ReplyDelete
  5. धगधगते,दाहक सत्य! सर्व संवेदनशील मनाच्या व्यक्तीं मनातील आक्रंद अतिशय प्रखररीत्या व्यक्त झालाय कारण तो हृदयातून निघालेला आहे.अजून काही लिहिणे केवळ अशक्य झाले आहे.

    ReplyDelete
  6. ���� भाऊ ����
    खूप आतून लिहिलं आहे तुम्ही हे सगळं म्हणून ते माझ्याही आतपर्यंत पोहोचलं. मी आपल्या, आपल्या स्फटिकवत विचारांचा सदैव ऋणी राहीन !!!

    ReplyDelete
  7. Very good article. Factual. Nirbhaya case is shamefully affair.

    ReplyDelete
  8. सद्य स्तिथीचे अचूक वर्णन करणारा लेख.. खरं तर प्रत्येक माणसाने आपण पशु पासून वेगळे सिद्ध करून नेमके काय मिळवले हयचा विचार करण्याची वेळ आता आली आहे... प्रत्येक पुरुषी अहंकार जोपासणाऱ्या माणसाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख.. प्रत्येकाला विचार करायला भाग पडणारा आणि डोळ्यावरील झापडं उघडणारा लेख.. धन्यवाद

    ReplyDelete
  9. Khup chaan, mazyasathi suddha mazya aaine agdi hech shikwle aani mi shubheccha CH jagat aaloy, pranam.

    ReplyDelete
  10. अत्यंत परखड व विचार करावयाला लावणारा लेख.👌👌

    ReplyDelete