Saturday, March 14, 2020

महाराष्ट्रातचा मध्यप्रदेश होईल?

Image result for pawar uddhav

महाराष्ट्रात महायुती मोडून उद्धव ठाकरे यांनी कॉग्रेस आघाडीच्या सोबत जायचा निर्णय घेतला, तेव्हा अनेकांना ती आघाडी व सरकार किती काळ टिकणार याची शंका होती. कारण भिन्न विचारसरणीचे तीन पक्ष त्यात एकत्र आले होते. पण त्या सरकारने अलिकडेच शंभरी पुर्ण केली असून, त्यानंतर मध्यप्रदेशात धुमाकुळ सुरू झाला. त्यामुळेच मग महाराष्ट्रातही तसेच काही होणार किंवा कसे, अशा आशंका घेतल्या गेल्यास नवल नाही. पण मध्यप्रदेश व महाराष्ट्र यांच्या आकडेवारीत मोठी तफ़ावत असल्याने तशी काही उलथापालथ इथे महाराष्ट्रात घडण्याची शक्यता कमीच आहे. राजकारणाचा अभ्यास करणार्‍यांना त्याची जाणिव आहे. पण मध्यप्रदेशातही असे काही घडण्याची गरज नव्हती, की कारण नव्हते. तिथे तर यापेक्षाही सुरक्षित सरकार सत्तेत होते. ते तीन पायाचे सरकार नाही व नव्हते. पण तरीही त्याला ग्रहण लागले. त्यावर आता ऑपरेशन कमल असा शिक्का मारणे सोपे असले, तरी त्यात तथ्य अजिबात नाही. ती स्थिती भाजपाने निर्माण केलेली नाही. तर निर्माण झालेल्या परिस्थितीचा भाजपाने लाभ उठवला आहे. त्यामुळे मध्यप्रदेश सारखे काही इथे महाराष्ट्रात घडवणे भाजपाच्या हाती बिलकुल नाही. कारण भाजपा तिथे किंवा इथे तशी परिस्थिती निर्माण करण्याच्या अवस्थेतच नव्हता व नाही. म्हणूनच इथे तसे काही होण्याची शक्यता नसल्याचे शिवसेना प्रवक्ते किंवा शरद पवारांनी म्हटल्यास वावगे अजिबात नाही. पण तशी परिस्थिती भाजपाला निर्माण करायची सोय नसली, तरी तसे काही घडू लागल्यास राजकीय लाभ उठवणे भाजपाच्या हातात नक्कीच आहे. सहाजिकच तशी परिस्थिती निर्माण करणार्‍यांवर महाराष्ट्रात मध्यप्रदेश घडण्याची बाब अवलंबून आहे. शिवसेना वा उद्धव ठाकरे तशी आपल्या पायावर कुर्‍हाड मारून घेणेही जवळपास अशक्य आहे. मग उरले दोन पक्ष. एक राष्ट्रवादी व दुसरा कॉग्रेस पक्ष. इथे तशी स्थिती तेच निर्माण करू शकतात ना? ते कितपत शक्य आहे?

कमलनाथ किती मुरब्बी आहेत आणि अनुभवी आहेत, हे पवारांनी पत्रकारांना समजावण्याची गरज नाही. त्यापेक्षा इतके मुरब्बी असून त्यांनी भाजपाला पोषक परिस्थिती का निर्माण केली, त्याचे स्पष्टीकरण पवारांनी दिले असते तर अधिक सुटसुटीत झाले असते. की अतिशय मुरब्बी असल्याने व जगाला आपला धुर्तपणा सादर करण्याच्या उतावळेपणातून कमलनाथ यांनी अशी पेचप्रसंगाची परिस्थिती निर्माण केली; असे पवारांना म्हणायचे आहे? पवार मध्यप्रदेशच्या लटकलेल्या मुख्यमंत्र्यांना कशासाठी व कसले प्रमाणपत्र देत आहेत? १०७ विरुद्ध १२१ इतके भक्कम संख्याबळ असताना कमलनाथ ज्या गोत्यात सापडलेले आहेत, त्याला मुरब्बी म्हणायचे असेल; तर पवार यांच्या राजकीय अनुभवाची वर्षे नव्याने मोजावी लागतील. कारण जे काही संकट आलेले आहे, ते भाजपाने आणले नसून कमलनाथ यांनी आमंत्रण देऊन बोलावलेले आहे. तेच कर्नाटकातही झालेले होते. भाजपाला बहूमत मिळाले नाही आणि दोन पक्षांना एकत्र घेऊन बहूमताचा आकडा दाखवित कुमारस्वामी सरकार स्थापन केलेले होते. त्या मुख्यमंत्र्याना कुठल्याही जाहिरसभा समारंभात नित्यनेमाने अश्रू ढाळून आपण कसे नामधारी बाहुले मुख्यमंत्री आहोत, असे सांगायची वेळ सिद्धरामय्यांनी आणलेली होती. त्यातून पुढला घटनाक्रम उलगडत गेलेला होता. मग पवारांच्या आकलनानुसार तिथे पाडापाडी फ़ोडाफ़ोडी करून भाजपाला पुन्हा सत्तेत आणून बसवणारे सिद्धरामय्या महान मुरब्बी राजकारणी मानावे लागतील. पण पवारांनी तसे कधी म्हटलेले नाही. मग कमलनाथांचे गुणगान कशासाठी? त्यात तथ्य असेल, तर मग महाराष्ट्राचा मध्यप्रदेश व्हायला हरकत नाही. कारण कमलनाथ यांचे गुणगान करताना पवारांकडूनच महाराष्ट्रात भाजपाला लाभदायक परिस्थिती निर्माण करण्याची हमी देता येईल. तसा विचार पवारांच्या मनात घोळतो आहे काय? कारण काही प्रसंग व हट्ट त्याकडे अंगुलीनिर्देश करतात.

आपल्या पत्रकारांमध्ये पवारांना मुरब्बी धुर्त राजकारणी संबोधण्याची फ़ॅशन आहे. अशा पवारांना कमलनाथ यांनी करून ठेवलेला सावळागोंधळ मुरब्बी राजकारण वाटत असेल, तर एव्हापासूनच उद्धव ठाकरे यांनी सावध होणे अगत्याचे ठरेल. याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे भाजपाला पोषक परिस्थिती निर्माण करणे पवारांना मुरब्बी राजकारण वाटते. दुसरा त्याहून अधिक महत्वाचा मुद्दा म्हणजे, या निमीत्ताने पवारांनी महाराष्ट्रातले सरकार पुर्ण पाच वर्षे टिकवण्याची हमी दिलेली आहे. पवारांची हमी म्हणजे नजिकच्या काळात सरकार गडगडण्याचीच खात्री असते. त्यांनी विरोधी पक्षात बसायचा निकालापासून लकडा लावलेला होता आणि ते सरकारमध्ये जाऊन बसले. निवडणूकीच्या राजकारणातून बाजुला होण्याचा निर्धार केल्यापासून दुसर्‍यांदा राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरल्यावर पवार पत्रकारांशी बोलत होते. म्हणजेच जे होणे नाही वा होण्याची शक्यता नाही, त्याचेच भाकित पवार वर्तवित असतात. सहाजिकच त्यांनी उद्धव सरकार पाच वर्षे टिकण्याची हमी दिलेली असेल, तर त्यांच्याही मनात काही वेगळे उलटे शिजत असल्याचा तो संकेत असू शकतो. असे काही बोलण्यापुर्वी पवारांनी निदान सचिन पायलट यासारख्या अननुभवी नेत्याचे शब्द तरी ऐकण्यापर्यंत संयम बाळगायला हवा होता. राजस्थानचे उपमुख्यमंत्री व ज्योतिरादित्य शिंदे यांच्याप्रमाणे तिथेही नाराजी पदोपदी व्यक्त करणारे म्हणून पायलट ओळखले जातात. त्यांनी जे काही घडले त्यासाठी कमलनाथ यांचे गुणगान केलेले नाही. किंबहूना आपल्या पक्षाच्या चुकांवर पांघरूणही घातलेले नाही. घडले ते दुर्दैवी आणि पक्षाच्या अंतर्गत सामंजस्याने सोडवणे शक्य असलेली समस्या, असे मतप्रदर्शन केलेले आहे. मात्र तोच कमलनाथी मुर्खपणा पवारांना मुरब्बी राजकारण वाटते आहे. म्हणून मग यावेळी पवारांच्या मनात काय विचार वा योजना घिरट्या घालत आहेत, त्याच्या शंका येऊ लागतात.

वास्तविक महाराष्ट्रापेक्षाही मध्यप्रदेशात स्थिती उत्तम होती. एकाच पक्षाचे सरकार होते आणि त्याला अपक्षांसह अन्य दोन किरकोळ पक्षांचा ठाम पाठींबा होता. कॉग्रेसचे २२ आमदार् फ़ुटलेले असतानाही हे पक्षाबाहेरचे सात आमदार कमलनाथ यांच्या सोबत अजून टिकलेले आहेत. मग पक्षातलेच कशाला फ़ुटले असा प्रश्न येतो. तर त्यांना फ़ुटायला कमलनाथ यांनी कडेलोटावर नेवून ठेवले होते. त्यांचा नेता असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांना कोंडीत पकडून पदोपदी डिवचण्यातून मध्यप्रदेशात फ़ाटाफ़ुटीची अपरिहार्यता निर्माण करण्यात आली. तो आकडा पुरेसा उपयुक्त होण्यापर्यंत भाजपाने कळ काढली आणि त्याचा माध्यमातून गवगवा चालू असतानाही कमलनाथ ‘मुरब्बी’ असल्याची शेखी मिरवत होते. त्यापेक्षा त्यांनी पक्षातलेच एक नेता शिंदे यांची नाराजी दुर करून समन्वय साधला असता, तर भाजपाला हात चोळत बसावे लागले असते. जे कोणी राजिनामे देऊन कर्नाटकला पळाले त्यामध्ये सहा मंत्र्यांचाही समावेश आहे. त्यांना तर मंत्रीपदेही मिळालेली होती. भाजपा त्यापेक्षा मोठे काही आमिष दाखवू शकेल असे नाही. आमदार फ़ुटणे समजू शकते. पण मंत्र्यांनी पदावर लाथ मारून आमदारकीचे राजिनामे देण्याला छोटी गोष्ट मानता येत नाही. काहीतरी गंभीर पराकोटीचे मतभेदच राजकारण्यांना अशा टोकाला घेऊन जात असतात. असलेल्या पदानेही आपल्याला भवितव्य नाही असे वाटल्याशिवाय कोणी असे वागत नाही. मुरब्बी कमलनाथांना इतकेही कळत नसेल, तर त्याला भाजपा जबाबदार असू शकत नाही. साध्या मराठी भाषेत आपण म्हणतो, तुटेपर्यंत ताणायचे नसते. त्यापेक्षा मध्यप्रदेशचा घटनाक्रम वेगळा नाही. शिंदे व त्यांच्या अनुयायांना थेट बंडाला प्रवृत्त होण्याखेरीज कुठलाच मार्ग कमलनाथ व दिग्विजयसिंग यांनी ठेवला नसेल; तर त्यासाठी जबाबदार तेच असतात. कारण तिथले सरकार एकाच पक्षाचे असले तरी काठावरच्या बहूमताने तिथली सत्ता साध्य झालेली होती.

कमलनाथ असोत किंवा इथले उद्धव ठाकरे असोत, त्यांची इतकी कोंडी करायची नसते, की त्यांना ‘दुसर्‍या टोकाला’ जाण्याची वेळ यावी. गेल्या अठरा महिन्यात शिंदे यांना पक्षाची सत्ता असतानाही मध्यप्रदेशात संपवून टाकण्याचेच डावपेच खेळले जात होते. त्यातून मार्ग निघावा म्हणून शिंदे खुप प्रयत्नशील होते. पण राज्यात दोन्ही ‘मुरब्बी’ नेते व दिल्लीत श्रेष्ठी शिंदे यांची दखलही घ्यायला राजी नव्हते. मग त्यांनी करायचे काय? गुपचुप बळीचा बकरा व्हायचे? जे शिंदे यांचे मागल्या अठरा महिन्यात झाले, त्यापेक्षा मागल्या तीन महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला किती वेगळे अनुभव येत आहेत? तिथे शिंदे यांना लोकसभेत पाडण्याला हातभार लावला गेला. त्यानंतर त्यांना प्रदेशाध्यक्षही बनवण्यात टाळाटाळ झाली. आता निदान राज्यसभेत वर्णी लागावी, अशी अपेक्षाही पुर्ण होत नव्हती. त्यातून आलेल्या नाराजीला भाजपाने खतपाणी घातले आणि राज्यसभाच कशाला केंद्रात मंत्रीपद देण्याचे आमिष दाखवले. बाकी काम आओपाप होऊन गेले. ते प्रदेशाध्यक्षपद किंवा राज्यसभा उमेदवारी वेळीच देण्यात आली असती, तर विषय कॉग्रेस पक्षांतर्गत संपला असता. समाधानकारक मार्ग निघाला असता. निदान भाजपाला त्यात हस्तक्षेप करायची संधीच मिळाली नसती. इथेही हळुहळू त्याच दिशेने वाटचाल सुरू नाही काय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तडजोड म्हणून शिवसेनेला कमी मंत्रीपदे घेऊन त्यातच अपक्षांनाही सामावून घेतलेले आहे. त्यातही पुन्हा महत्वाची खाती राष्ट्रवादी घेऊन गेला आहे आणि पवार तर उठताबसता सरकारची धोरणे परस्पर जाहिर करत असतात. कधीही कुठेही शासकीय अधिकार्‍यांना बोलावून आदेशही देत असतात. कितीही नामधारी मुख्यमंत्री असला तरी ठाकरे यांना ते जाचक वाटत नसेल काय? त्याचा परिपाक काय होऊ शकतो? राष्ट्रवादी वा कॉग्रेस यांची जाहिर वक्तव्ये किंवा राजकारण, शिवसेनेची अधिकाधिक कोंडी करण्याचेच नसते का? त्यातून उद्धव ठाकरेंना ज्योतिरादित्य बनवण्याचेच खेळ चाललेले नाहीत काय?

ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपात सहभागी झाल्यावर केलेले वक्तव्य काय म्हणते? निवडणूकीत शेतकरी कर्जमाफ़ीचे दिलेले आश्वासन पुर्ण झाले नाही. राहुल गांधींनी दहा दिवसात कर्जमाफ़ी सांगितली होती आणि अठरा महिने होऊन गेल्यावरही त्यात प्रगती झाली नाही. महाराष्ट्रात महायुती मोडून दोन्ही कॉग्रेस सोबतचे सरकार स्थापन करताना उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफ़ी, सातबारा कोरा आणि अवकाळी पावसात बुडालेल्या शेतीला भरपाई, अशी आश्वासने दिलेली होती. पण ती राहिली बाजूला आणि पवारांनी मध्येच भीमा कोरेगावचा तपास व एल्गार परिषदेला प्राथम्य देण्यासाठी दबाव आणलेला आहे. ती चौकशी केंद्राकडे सोपवताना ठाकरे पवार यांच्यात बेबनाव होईपर्यंत पाळी आणली गेली. त्याला समन्वय म्हणतात काय? शिवसेनेने आपल्या वचननाम्यात वीर सावरकर यांना भारतरत्न देण्यात यावे, अशी मागणी केलेली होती. पण सरकार स्थापन करताना ज्यांना मित्रपक्ष म्हणून सोबत घेतले, त्यांनी नित्यनेमाने सावरकरांची बदनामी करण्याच्या मोहिमा उघडल्या आहेत. ते शिवसेनेचा मतदार व भूमिकेला छेद देण्यासाठी नाही, असे कोणी म्हणू शकेल काय? सेनेला मुख्यमंत्री हवा असेल तर तिने आपला मतदार व अजेंडा गुंडाळून अपमानित व्हायला सज्ज असले पाहिजे; अशीच कॉग्रेसची अपेक्षा दिसत नाही काय? ह्या गोष्टी दिसायला बारीकसारीक दिसतील. पण त्यातून सेनेचा मतदार पाया खिळखिळा व्हायला मदत होत असते. ते काम भाजपा करीत नसून मित्रपक्ष राष्ट्रवादी व कॉग्रेस पक्षाकडून चालले आहे. मध्यप्रदेशात कमलनाथ व दिग्विजयसिंग जोडीने शिंदे यांची कोंडी करीत होते आणि इथे दोन्ही कॉग्रेस पक्ष जोडीने शिवसेनेला पेचात आणणार्‍या भूमिका जाहिरपणे घेत असतात. मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील हे साम्य पवारांना मुरब्बी राजकीय भूमिका वाटते काय? कारण त्याचा परिणामही मध्यप्रदेशसारखा होऊ शकतो. मध्यप्रदेशातला धुमाकुळ दिसू लागताच पवारांनी इथली भीमा कोरेगावची मागणी गुंडाळून कशाला ठेवली आहे?

इथेच गोष्ट संपत नाही. माजी मुख्यमंत्री व ठाकरे सरकारचे एक ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाण, यांनी शिवसेनेला पाठींबा देण्यासाठी आधी मुस्लिमांचा कौल घेण्यात आल्याचेही कथन केलेले आहे. थोडक्यात ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी पाकधार्जिण्या मुस्लिमांची मते आपल्याला नकोत असे ठणकावून बजावलेले होते, तीच शिवसेना आज मुस्लिमांच्या मेहरबानीने सत्तेत बसली असल्याचे चित्र कशाला निर्माण केले जात आहे? हिंदूत्व मानणार्‍या मतदारांमध्ये शिवसेनेला संपवण्याची ही खेळी नाही काय? अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्याची गरज नाही. मुद्दा आहे मध्यप्रदेशची राजकीय स्थिती इथे महाराष्ट्रात निर्माण होण्याचा. ती नसेल तर भाजपा इथे काहीही बाल बाका करू शकणार नाही. तीन पक्षांच्या सरकारपाशी भक्कम आकड्यांचे बहूमत आहे आणि तिथे खिंडार पाडण्याची कुवत भाजपाकडे नाही, हे नि:संशय. पण मित्रपक्षांनीच एकमेकांची कोंडी करायचे कमलनाथी डावपेच खेळले, तर भाजपाला शिरकाव करून काट्याचा नायटा करण्याची पोषक परिस्थिती निर्माण होऊ शकते. ती मध्यप्रदेशात कॉग्रेस पक्षांतर्गत नेत्यांनीच निर्माण केली आणि त्याला शरद पवार मुरब्बी राजकारण म्हणतात. इथे तर तेच मोठे मुरब्बी नेता आहेत. मग शंका येते, की भीमा कोरेगाव तपासाची मागणी वा अन्य परस्परविरोधी वक्तव्यातून तशी भाजपाला पोषक परिस्थिती निर्माण करण्याचे काम कोणी हाती घेतले आहे काय? नसेल तर किमान समान कार्यक्रमाच्या पलिकडे जाऊन वक्तव्ये कशाला होत असतात? मागण्या कशाला रेटल्या जात असतात? जितके राजकारण अभेद्य असते, तितके राज्य भक्कम असते. पण त्या तटबंदीमध्ये घरभेदी निर्माण होणार नाही, यावर सत्ता टिकून रहात असते. कमलनाथ यांनी घरभेदी निर्माण होण्याला हातभार लावला आणि महाराष्ट्रात आघाडीचे जनक शरद पवारच त्याला मुरब्बी राजकारण म्हणतात. मग मनातल्या मनात शंकेची पाल चुकचुकते.

18 comments:

  1. शरद पवार जे राजकारण करतात त्याबद्दल पत्रकार त्यांना प्रश्न कधीच विचारात नाहीत?? राजकारणात आल्यापासून त्यांनी जितक्या भूमिका बदलल्या आहेत तितकं तर सरडा पण रंग बदलत नाही.. स्वतःला निष्पक्ष पत्रकार म्हणवून घेणारे कधीच पवारांना हे प्रश्न विचारत नाहीत.. काँग्रेस आणि राष्ट्रवादी ज्या प्रकारे शिवसेनेचे खच्चीकरण करून त्यांना आपली भूमिका बदलवायला लावत आहेत त्यामुळे पुढे भविष्यात महाराष्ट्रात मध्यप्रदेश आणि कर्नाटक सारखी स्तिथी आली तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही...

    ReplyDelete
    Replies
    1. Sarqdyachi upama ekdam chapkhal... gendyachya katadicha sarda aahe to

      Delete
  2. भाऊ तुमचे विचार बरोबर आहेत . खरोखरच जर महाआघाडी सरकार चालवायला हवं असेल तर शिवसेनेला बरोबरीची वागणूक मिळायला हवी . Cm चा मान ठेवायला हवा कारण मंत्री मंडळात सेनेचे 2 मंत्ती राज्यसभेत पण तेच जास्तीत जास्त वाटा ncp घेते आहे common minimum program नुसारच चालायला हवं . पण होतंय सगळं उलट . एक गोष्ट मात्र निश्चित साहेबाना पूर्ण माहीत आहे संपली तर सेनाच संपेल यांच्या कडे संपण्या सारख काही राहील नाही काँग्रेस त्यांचा काही प्रश्न नाही ते बिचारे लॉटरी लागली म्हणून आनंदात आहेत . Bjp हा संपणारा पक्ष नाही .
    म्हणूनच जेवढं ओरबाडून घेता येईल तेवढे घेतायत . पुढे खात्री नाही हे माहीत आहे .असो .

    ReplyDelete
    Replies
    1. औरंगजैबी विश्वासघाताचे स्वार्थी राजकारण आयुष्यभर खेळून पैसा आणि पद ओरबाडणार्या व्यक्तीला जाणता राजा म्हणणे म्हणजे काळ्या कुट्ट अंधाराला तेजस्वी सूर्य म्हणण्यासारखे आहे!केवळ स्वार्थी चापलूशी करणाऱ्यांनाच हे जमू शकते!वाघाची नखं काढण्यात पवार यशस्वी झालेत!हिंदुत्त्वाच्या दाढाही गेल्या!आता कॉंन्ग्रेसच्या ताटाखालचे मांजर बनलेल्या वारसांकडे पाहून स्वर्गात बाळासाहेबांना काय वाटतं असेल,कल्पनाच केलेली बरी!

      Delete
  3. भाऊ महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश येथील तुलना होऊ शकत नाही याचे कारण म्हणजे ठाकरे यांचे संपादक संजय राऊत, हे गृहस्थ ज्या अपमानास्पद पध्दतीने रोजच्या रोज भाजपचा अपमान करत आहेत ते पाहता भाजपची आणि सेनेची युती अशक्य वाटते, त्यापेक्षा महाविकास आघाडीत राहून जास्तीतजास्त शिवसेनेची गोची होईल अशीच भाजपची रणनिती असावी कारण मध्यप्रदेश मध्ये भाजपने 18 महीने वाट पाहिली, इथे जेमतेम 100 दिवस झाले आहेत, भाजप अजून थोडी वाट पाहू शकतो कारण जेवढी कोंडी होत राहील तेवढी शिवसेना अस्वस्थ होत राहील उद्या सेना जेंव्हा स्वतःच्या गरजेनी भाजपकडे येईल तेंव्हा भाजप पत्ते टाकील आणि सेनेला परत एकदा दुय्यम भूमिका घ्यावी लागेल किंवा असे पण होऊ शकते की सेनेत आपल्याला भविष्य नाही हे लक्षात यायला लागले की सेनेचे दोन तृतीयांश आमदार वेगळा गट करून भाजपमध्ये येऊ शकतात मात्र भाऊ याला किमान वर्ष भर जायला लागेल कारण नितीशकुमार हे लालूप्रसाद यांच्याकडे दोन वर्षे राहूनच मग भाजपकडे आले होते.

    ReplyDelete
    Replies
    1. बरोबर आहे तुमचं म्हणणं

      Delete
    2. मध्य प्रदेश व कर्नाटकात भाजपला बहुमतासाठी फक्त ७-८ जागा कमी होत्या. त्यामुळे फोडाफोडी शक्य झाली व आयारामांना भाजपत आणून मंत्रीपदे देणे फारसे अवघड गेले नाही.

      परंतु महाराष्ट्रात भाजपला बहुमतासाठी तब्बल ४० जागा कमी आहेत. काही अपक्षांचा पाठिंबा मिळविला तरी बहुमतासाठी किमान २५-३० आमदार मिळवावे लागतील. इतक्या मोठ्या संख्येने आमदार फोडणे अत्यंत अवघड आहे. इतके आमदार फोडले तरी सर्वांना मंत्रीपद देणे अशक्य आहे व मंत्रीपद मिळत असल्याशिवाय एकही आमदार फुटणार नाही.

      त्यामुळे मध्य प्रदेश व कर्नाटकची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणे अशक्य आहे.

      शिवसेना परत भाजपशी युती करून भाजपला मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देणे सुद्धा अशक्य आहे.

      भाजपकडे फक्त २ पर्याय आहेत.

      १) हे सरकार पडून मध्यावधी निवडणुक होईल या आशेवर वाट पाहणे.

      २) बिहारप्रमाणे शिवसेनेला महाविकास आघाडीतून फोडून स्वत: शिवसेनेला पाठिंबा देणे. या परिस्थितीत नितीशकुमार प्रमाणेच मुख्यमंत्रीपद ५ वर्षे शिवसेनेकडेच राहील व भाजपला उपमुख्यमंत्रीपद व काही मंत्रीपदे मिळतील.

      भाजपकडे याव्यतिरिक्त इतर कोणताही पर्याय शिल्लक नाही.

      गरज नसताना, सर्व अपमान गिळून, स्वत:कडे कमीपणा घेऊन, मातोश्रीवर वारंवार हेलपाटे घालून, शिवसेनेला त्यांच्या ताकदीच्या तुलनेत खूप जास्त जागा देऊन, शिवसेनेच्या अटींवर युती करण्याची मोठी किंमत फडणवीस-शहा चुकवित आहेत. युतीसाठी शहा फारसे उत्सुक नव्हते, परंतु युतीसाठी फडणवीस अत्यंत कासावीस झाले होते. त्यामुळेच भाजपचे नुकसान होत असूनही त्यांनी अत्यंत विश्वासघातकी शिवसेनेशी युती करून स्वत:च्याच हाताने आपल्या पायावर कु-हाड मारून घेतली.

      Delete
  4. Shiwsenechya waghachi sheli zaleli aahe, kuthe Aadrniy BalasahebThakare, aani kuthe aatache CM, UT. kahihi samya nahi, Vichar nahi.

    ReplyDelete
  5. भाऊ, योग्य विश्लेषण. शरद पवार या माणसाला (भाऊ, माफ करा मी एकेरी उल्लेख करतोय पण कोणीही काही म्हणो याची लायकीच ती आहे) शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, युतीतील भागिदाराला फोडून सत्ता मिळवली मुख्य भागिदारापेक्षा जास्त माप पदरात पाडून घेतले, मग ज्यांच्यासाठी हा अट्टाहास केल्याचे दाखवत सत्तेवर आले ते काम आपल्या लोकांकडून करुन घेण्यापेक्षा, हिंदू-मुस्लिम, ब्राह्मण-ब्राम्हणेतर, राममंदीर-बाबरी मस्जिद हे वाद स्वतःच किंवा स्वतःच्या पिल्ल्याकरवी उकरुन काढणे, अर्बन नक्षल यांची पाठराखण करणे यातच याला जास्त आनंद मिळतो. कोंबड्यांच्या झुंजी लाऊन मजा घेणाऱ्यांच्यातील ही प्रजाती आहे. हा चाणक्य नाही तर शकूनी आहे, विकासकामापेक्षा भांडणे लावण्यात जास्त रस.

    ReplyDelete
    Replies
    1. धनंजयजी अगदी बरोबर बोललात.

      Delete
    2. Sharad pawar ha ekeri ullekh karanyachya laykichach manus aahe. Dhramadrohi, deshdrohi. Mala to sardar manapasun avadato jyane sharadla jaga dakhavali

      Delete
  6. हा माणूस म्हणजे जाणता राजा, चाणक्य, कि शकुनी? नक्कीच शकुनी।

    ReplyDelete
  7. भाऊ Maharashtra मध्ये असे होणे मुश्किल आहे. पण त्याला कारण नूसते संख्याबल नाही तर् भाजप नेत्यांचे utaawale पण् देखिल आहे. तुमचे vishleshan hi फ़ार एकाआंगि होते आहे हल्ली असे watat आहे.
    1.karjamaafi द्यदयला kadhich survaat zaali आहे हे amaanya करणे म्हंजे aandhale असणे आहे
    Pudhil काही diwasaat aankhi yojana hi yetil. केंद्र sarkar radicha daav khelat aahe GST che पैसे न devoon
    2.muslimaanchi mate ghetli mhanje tumhala ase mhanaayche aahe kaa ki te sarva Pakistan dhaarjine aahet? Tase aslyaas tumchya priya BJP che Gruhamantri aahet tyaani tyanna अटक karaavi, नाही कां?
    3.Ho savarkaraana dyawa bharat ratna ashi maagni keli असेल् Naa सेनेने pan mag BJP la koni rokhale aahe? Faaltu Pranav mukharji etc yaana Bharat ratna deta aala mag Savarkaraansaathi kay Gaaga भटच्या muhurtaachi vaat paahat aahet ka?
    4.Yuti kuni todli aani तोडायला laavli yaache chaan vishleshan Moongantiwar yaani kele vidhansabha
    5. Raahta राहिला prashna Hindutvaacha, Uddhav thakrey gele Raamjanma bhoomit he visroon chaalnaar naahi. CAA la hi jahir pathimba dila. Ankhin काय naachaave ka Bhagve vastra ghalun?
    6. Prashna rahila Pawaraani kelleya kondicha, te kondi sadhya sthitit tari vyawashthit fodli aahe UT ne ase watte.
    त्यामुळे उघडा डोळे पाहा निट् आणि मग् लिहा Vyawasthit asse saangaave se waate!

    ReplyDelete
  8. इतके सरळ सोपे विवेचनको पचनी पडेल काय

    ReplyDelete