Friday, March 20, 2020

मोदीतला गांधी

Image result for modi gandhi

गुरूवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून भाषण केले, त्यात भाषणापेक्षाही आवाहन अधिक होते. त्यांनी कोरोना व्हायरसचे आव्हान स्विकारताना सरकार काय करते आहे वा सरकारने काय केले, त्याची टिमकी वाजवण्यापेक्षाही सामान्य जनता काय करू शकते, त्याला चालना देण्याचा पवित्रा घेतला. त्यासाठी सावधानतेचे उपाय कोणते आणि त्यात जनतेच्या सहभागाचे महत्व प्रतिपादन केले. हे संकट विश्वव्यापी असल्याने आणि त्यात नुसती व्यवस्था कामाची नसून, जनतेचा सहभाग मोलाचा आहे. कारण ज्या जनतेच्या आरोग्याला यातून संभाळावे लागणार आहे, तिच्यावर सक्ती करणे कुठल्याही व्यवस्थेला शक्य नाही. उदाहरणार्थ दिल्लीच्या शाहीनबागेत सुरू असलेल्या आंदोलनाला सक्तीने व कायद्याचा बडगा उगारूनही आवरता आले असते. पण मोदी सरकारने तसा बळाचा वापर केलेला नाही. त्याचे दोन विपरीत परिणाम संभवतात. एक म्हणजे सरकार बळाचा वापर करायला गेल्यास संतप्त प्रतिक्रीया उमटते आणि त्यासाठी अधिक मानवी बळाची गरज असते. ते मानवी बळ सरकारपाशी आज तरी उपलब्ध नाही. कारण कोरोनाने आणिबाणीची परिस्थिती निर्माण केलेली आहे. शिवाय बळाचा वापर म्हणजे जमावाशी जमावाची टक्कर असते. जिथे माणसांच्या थेट संपर्कातून ह्या विषाणूचा फ़ैलाव होत असल्याचा धोका आहे, तिथे बळाचा वापर म्हणजे पोलिस वा सैनिकांना रोगाच्या जबड्यात ढकलणेच होय. सहाजिकच त्यात लोकांचे सहकार्य अधिक मोलाचे आहे आणि त्यासाठीच जनतेची मानसिकता तयार करण्याची ही मोहिम आहे. मग त्यातले पहिले पाऊल म्हणून मोदींनी रविवारी अवघ्या देशाच्या जनतेलाच चौदा तासासाठी स्वत:च स्वत:वर प्रतिबंध लादून घेण्याचे आवाहन केले आहे. त्यातला ‘गांधी’ कायम गांधीनामाचा जप करणार्‍यांनाच दिसू नये, ही गांधीवादाची भयंकर शोकांतिका आहे. वाचणार्‍यांना विचीत्र वाटेल, पण जनता कर्फ़्यु ही कल्पनाच गांधीवाद आहे.

गेले काही महिने दिल्लीच्या शाहीनबाग येथे महिलांचे आंदोलन किंवा धरणे चालू आहे आणि त्याला गांधीवादी सत्याग्रह असे नाव देण्यात आलेले आहे. पण गांधींचा सत्याग्रह किंवा कुठलेही आंदोलन अन्य नागरिकांच्या जगण्यात व्यत्यय आणणारे नसायचे. त्यात कोणाची कोणावर सक्ती नसायची किंवा अतिक्रमण नसायचे. आजकाल सामान्य जनतेच्या जगण्यात व्यत्यय आणण्यालाच गांधीवाद संबोधले जाऊ लागले आहे. थोडक्यात त्यातूनच गांधीची खुप विटंबना होत असते. मग अशा नामधारी गांधीवाद्यांना गांधी कसा कळावा? त्यांना मोदींच्या जनता कर्फ़्यु या कल्पनेत सामावलेला गांधी दिसणार तरी कसा? भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महात्माजींचा समावेश होण्य़ापर्यंत तो लढा केवळ अभिजन वर्गापुरता मर्यादित होता. पण गांधीजींनी सत्याग्रहाचा मार्ग अनुसरला, त्यात त्यांनी जनतेला मोठी भूमिका दिलेली होती. आपापल्या जागी बसून वा काम करूनही स्वातंत्र्यासाठी कार्य करता येईल, अशा कल्पना महात्माजींनी पुढे आणल्या. त्यातून स्वातंत्र्यलढा तळागाळापर्यंत जाऊन पोहोचला. त्या काळातही त्या गांधीवादाची तात्कालीन शहाण्यांनी बुद्धीमंतांनी हेटाळणी केली होती आणि आज जनता कर्फ़्यु संकल्पनेचीही टवाळी झाली आहे. त्यात नवे काहीच नाही. कारण अशा लोकांना गांधीविचाराशी कर्तव्य नसून, त्यांना ब्रॅन्ड गांधी आपला व्यापार वा धंदा चालवण्यासाठी हवा असतो. म्हणून त्यांना एक दिवसाची किंवा चौदा तासाची जनता कर्फ़्यु कोरोनाला कसे रोखणार, असा प्रश्न पडतो. तेव्हाही नेहरू वा तत्सम नेत्यांना मीठाचा सत्याग्रह वा दांडीयात्रा हास्यास्पदच वाटलेली होती. त्यांचेच वारस त्यापेक्षा वेगळा विचार कसा करू शकतील? पण आजही गांधीविचार व भूमिका किती प्रभावी असू शकते, त्याचा साक्षात्कार मोदी घडवू पहात आहेत आणि त्याचा सुगावाही गांधीवादी मंडळींना नसावा, यापेक्षा गांधीविचारांची अन्य कुठली विटंबना असू शकते?

सत्याग्रह म्हणजे पोलिसांनी लाठ्या मारल्यावरही सहन करायच्या, पण हात उचलायचा नाही. देशासाठी छातीवर गोळ्या झेलायच्या आणि वंदेमातरमची घोषणा द्यायची. हेच गांधींनी लाखो भारतीयांना शिकवले होते ना? त्यातून काय झाले ते जगाला दिसले आहे आणि तो इतिहासही नोंदलेला आहे. पण ते सत्य आजचे गांधीवादी बघू शकलेले नाहीत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी ती शक्ती व त्यातली किमया ओळखू शकले आहेत. म्हणून त्यांना नोटाबंदीचा धाडसी निर्णय घेता आला व राबवता आला. जीएसटी सारखा निर्णय अंमलात आणता आला. आजही अत्याधुनिक शासकीय यंत्रणा कोरोनाच्या बाबतीत मोठा पल्ला मारू शकणार नाही, अशीच स्थिती आहे. त्याची साक्ष इटाली, चीन वा अमेरिकेसारख्या देशात अनुभवास आलेली आहे. म्हणूनच शासकीय यंत्रणेला कामाला जुंपलेले असतानाच पंतप्रधानांनी गांधी मदतीला घेतला आहे. शासकीय यंत्रणा सक्ती करायला राबवण्यापेक्षाही तिच्या मदतीला कोट्यवधी सामान्य जनतेला उभे केल्यास कोरोनाला शर्यतीत हरवणे शक्य आहे. कारण सामाजिक पुरूषार्थासमोर कुठलीही मोठी शक्ती जिंकू शकत नसते. एक दिवस आणि चौदा तासासाठी १३० कोटी लोकांपैकी पन्नाससाठ कोटींनी जरी त्यात सहभाग घेतला, तरी अल्पावधीत विषयाचे व संकटाचे गांभिर्य करोडो लोकांच्या लक्षात येऊन जाते. शिवाय त्यात करोडो लोक सहभागी झाल्याने सावधानतेचा संदेश अल्पकाळातच सर्वदुर पसरतो. विविध माध्यमातून ही दृष्ये व बातम्या आणखी कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचणार आहेतच. पण त्याचा प्रभाव तिथेच संपणार नाही. स्वयंस्फ़ुर्तीने भारतातले करोडो लोक शारिरीक व सामाजिक दुरावा काटेकोर पाळल्याचे चित्रण अवघ्या जगभरच्या देशांना वा समाजांनाही प्रभावित करणारे ठरू शकते. त्याचे अनुकरण अन्य देश व समाजातही सुरू होईल आणि त्यातल्या सहभागाने या रोगराईशी संघर्ष करणारी लोकसंख्या अब्जावधीत जाऊन पोहोचणार आहे.

एक बाब विसरता कामा नये. हा विषय आपल्यापुरता असला, तरी त्याची व्याप्ती जागतिक आहे. भारतासारख्या अफ़ाट लोकसंख्येच्या देशात सामान्य जनतेच्या सहभागाने कोरोना इतका सहज आवरला जाताना बघून, जगाला प्रोत्साहन मिळणार आहे. जे भारताला शक्य आहे, ते आपल्याला अशक्य कशाला असेल? असे इतर देशांना इथली जनता कर्फ़्यु बघून वाटणे स्वाभाविक आहे. तो जगासाठी आदर्श असेल. जगासाठी भारताचे ते मोठेच योगदान असणार आहे. त्यातला गांधी म्हणूनच महत्वाचा आहे. ही कल्पना आज मोदी मांडत असले तरी मुळातच महात्मा गांधी यांच्या संघर्षाच्या भूमिकेतून त्याचा उदभव झाला आहे. दांडीयात्रा वा मीठाचा सत्याग्रह यातून स्वातंत्र्यलढा तळागाळापर्यंत गेला. कोरोना विरोधातली लढाई त्याच मार्गाने घेऊन जाणारे नरेंद्र मोदी; कुठला गांधीवादी नेता बघू शकला आहे काय? बघणार तरी कसा? त्यांना गोळीने मारला गेलेला गांधी माहिती असतो. पण गांधीविचार शब्दापुरता वा लेखापुरता ठाऊक असतो. त्यातला आशय कधीच कळलेला नसतो. त्याचे दु:ख करण्यातही अर्थ नाही. अशा लोकांना महात्मा हयात असताना तरी कुठे किती कळला होता? असता तर जनता कर्फ़्युची हेटाळणी कशाला झाली असती? निदान विरोध करताना मोदींनी ‘गांधी चोरला’ असे म्हणायलाही हरकत नव्हती. पण त्यासाठी तरी गांधी ओळखीचा असला पाहिजे ना? ही भारतातल्या गांधीवादी मंडळींची शोकांतिका आहे. त्यांना नथूरामचा गांधी आठवतो आणि तेवढाच ठाऊक आहे. त्यापलिकडचा जनमानस जागवणारा व समाजपुरूषाला आवाहन करणारा गांधी, त्यांच्या गावीही नसतो. कारण गांधी ही व्यक्तीसुद्धा नसते. जनता कर्फ़्यु वा महात्मा गांधींची सत्याग्रहाची कल्पनाही भारतीय मानसिकतेचा अविष्कार होता. पाश्चात्य विचारातच ज्यांना गांधी शोधावा लागतो, त्यांना अस्सल गांधी कळणार नाही की जनता कर्फ़्युची किमया बघूनही कळणार नाही. ते किंचीत शक्य असते, तर त्यांना मोदीतला गांधी कधीच बघता व ओळखता आला असता ना?

10 comments:

  1. भाऊ, भारतीय विरोधी पक्ष काय आणि नागरिक काय सगळे सारखेच. मोदींच्या आवाहनाची खिल्ली उडवण्यात बरेच पुरोगामी आघाडीवर होते, जसे काही फक्त मोदींच्या फॉलोअर्सवरच करोना हल्ला करणार आहे.
    दुसरे मुस्लिम अजूनही ऐकत नाहीत शुक्रवारी नमाजासाठी राज्यात बऱ्याच मशिदीत नेहमीप्रमाणे गर्दी होती. देव करो आणि इटलीसारखी परिस्थिती येथे न येवो, नाहीतर लाखो लोक एकावेळी आजारी पडून औषधे कमी पडतील तेंव्हा हेच लोक मोदींना शिव्या देतील की त्यांनी योग्य व्यवस्था केली नाही.
    सगळे चोर आहेत बाकी काही नाही.

    ReplyDelete
  2. Very correct sir, udya, 22/03/2020 ya diwshi Janata Carfue la support karu ya, aani sakali 7 waje pasun ratri 9 waje paryant Gharat rahu ya, aani 5 wajta, Dr. Nurse aani sewa karmacharyanna thanks dewu ya.

    ReplyDelete
  3. खरं तर हा मोदींनी गांधींत्वाच्या माध्यमातून जनमानसात केलेला प्रवेश आहे.यानंतरच्या प्रयासात जनमनात कोणतेही प्रश्न उपस्थित न करता पूर्ण समर्पण भावाने उतरेल. गांधीजींच्या जनमानसावरील पकडीचा हाच खरा मूलमंत्र होता.

    ReplyDelete
  4. भाऊ, नेहमी प्रमाणे उत्तम विवेचन

    ReplyDelete
  5. आजकाल मोदींनी काहीही केलं तरी त्यांची हेटाळणी करायला लोक टपून बसलेले असतात.. त्यांच्यातला गांधी कुठे कळणार अश्या लोकांना...

    ReplyDelete
  6. Non Co-operation is not a movement of brag, bluster or bluff. It is a test of sincerity. It requires solid and silent self-sacrifice.

    -- Mahatma Gandhi

    आजचा जनता कर्फ्यु हा कोरोना विषाणूबरोबर केलेला असहकारच आहे. अतिशय प्रामाणिकपणे लढा दिला तरच यावर मात करणं सोपं जाईल.

    ReplyDelete
  7. "मीपण ज्याचे पक्व फळापरी सहजपणे गळले हो, जीवन त्याला कळले हो-जीवन त्याला कळले हो "
    आदरणीय मोदींना भारतीय, भारतीयत्व कळले आहे, म्हणून ते भारतीयांचा हृदयावर साम्राज्य करतात.
    आदरणीय भाऊ आपले विवेचन अति योग्य आहे. झोपलेल्याला उठवता येते, झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही.

    ReplyDelete
  8. फार कमी लोकांना मोदी समजलेत हे खरे आहे काँग्रेसने गांधींची सहानुभूती घेतली पण राजकीदृष्ट्या विचार मोदींनीच घेतले ते सगळे बरोबर आहेत असे नाही पण भारतीय मानसिकतेला पर्याय पण नाही मला मोदी=इंदिरा+गांधी

    ReplyDelete
  9. छान भाऊ, नथुराम भक्तांनाही गांधीची ही महती कळो.

    ReplyDelete