सलग नऊ वर्षाहून अधिक काळ भारतचे पंतप्रधानपद भूषवण्याचा विक्रम करणार्या डॉ. मनमोहन सिंग यांची हल्ली कुठेही मौनीबाबा म्हणून टवळी सर्रास चालते. त्यांनीही कधी महत्वाच्या घटना वा प्रसंगी बोलून देशाला विश्वासात घेण्याचा वा धीर देण्याचा प्रयत्न केला नाही. उलट ‘मेरी खामोशीया’ शेकडो उत्तरांपेक्षा अधिक बोलकी आहेत, असे विधान त्यांनी एकदा केले होते. अण्णांचे उपोषण, त्यानिमित्ताने लोकपाल आंदोलनाचा धुमाकुळ वा दिल्लीत झालेल्या सामुहिक बलात्कारानंतर उसळलेला प्रक्षोभ, सीमेवर दोघा भारतीय जवानांची मुंडकी कापली जाणे किंवा पाच जवानांचे हत्याकांड; अशा कुठल्याही प्रसंगात पंतप्रधानांनी जणू तोंडाला कुलूप लावून ठेवलेले होते. असे पंतप्रधान दोन शब्द चुकून कुठे बोलले, तरी मग लोकांना त्याचे अप्रुप वाटणे स्वाभाविकच आहे. अशा पंतप्रधानांनी गोकुळष्टमीच्या मुहूर्तावर आपले मौन सोडले आणि संसदेत चालू असलेल्या एकूणच आर्थिक अवस्थेबद्दल आपले मतप्रदर्शन केले. गेले दोन आठवडे भारतीय चलन, रुपयाची आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत अखंड घसरण चालू आहे. त्यामुळे अवधे व्यापारी जगत आणि उद्योगधंदे भयभीत होऊन गेले आहेत. अनेक मोकळीक व सवलती देऊनही कोणी परदेशी भांडवलदार भारतात गुंतवणूक करायला तयार नाही आता रतन टाटा सारखा मोठा उद्योगपती सरकारने व्यापार जगताचा विश्वास गमावला असे म्हणतो, तरी मनमोहन सिंग अवाक्षर बोलायला पुढे आले नाहीत. मग त्यांना मौनीबाबा संबोधले गेल्यास नवल ते काय? देशाचे नेतृत्व करणार्याने अशा गंभीर प्रसंगात समोर येऊन लोकांना धीर दिला पाहिजे; याचेच विस्मरण झालेल्या पंतप्रधानाला लोक काय म्हणणार? पण त्याबद्दल काही सांगण्यापेक्षा पंतप्रधानांनी आपल्याला चोर म्हटले जाते, अशी तक्रार केली.
स्वातंत्र्योत्तर काळातील हा एक असा पंतप्रधान आहे, की ज्याच्या कारकिर्दीत घोटाळे व भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली गेली आहे. पण त्याच्यावर मात्र कोणी अफ़रातफ़रीचा आरोप करू शकणार नाही. ज्याच्या हाती देशाचा कारभार सोपवला आहे, तोच राजरोस चाललेली लूटमार थोपवणार नसेल, तर लोकांनी त्याचा अर्थ काय घ्यावा? रखवालदार चोरी रोखण्यापेक्षा तिकडे काणाडोळा करीत असेल, तर तोही चोरांना सामील आहे, असाच अर्थ लावला जाणार ना? मग आपल्याला चोर म्हणतात, अशी तक्रार मनमोहन सिंग यांनी कशाला करावी? आणि त्यासाठी दिवस व मुहूर्त तरी कुठला निवडावा? गोकुळष्टमीचा? योगायोग असा, की देशाची राजधानी दिल्ली यमुना नदीच्या किनारी वसलेली आहे आणि त्याच यमुनेबद्दल पुराण काळापासूनच्या आख्यायिका व भाकडकथा आहेत. त्यात यमुना काठीच्या श्रीकृष्णाच्या कृष्णलिला शेकडो पिढ्या ऐकत आल्या. त्या्पैकीच एक कथा आहे की कृष्णजन्माची. ज्याचा उत्सव देशभर मोठ्या प्रमाणात जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. त्यात मग गोपाळकाला वा दहीहंडीचे खेळ चालतात. तरूण मंडळी दहीहंडी फ़ोडण्याचा खेळ खेळतात आणि त्या कृष्णाचा उल्लेख तो देव असूनही दहीचोर वा माखनचोर असा अगत्याचे केला जातो. त्यामुळे गोकुळष्टमीच्या दिवशी माखनचोर किंवा चोर संबोधले जाते ते आदरार्थी असते, हे अवघ्या भारतीयांना पक्के ठाऊक आहे. मग त्याच यमुनातीरी मनमोहन सिंग यांनी आपल्याला चोर म्हणतात म्हणून तक्रार करावी काय? आणखी एक योगायोग असा, की खुद्द पंतप्रधानांचे नावच कृष्णाचेच एक नाव आहे. आणि त्यानेच जन्माष्टमीच्या मुहूर्तावर बोलावे काय तर ‘चोर’ या शब्दाबद्दल तक्रार करावी? किती विचित्र विरोधाभास आहे ना?
अर्थात, ज्यांनी संसदेत पंतप्रधानांच्या बाबतीत चोर अशा घोषा केला त्यांना तो शब्द सन्मानाने वापरायचा नव्हताच. त्यांना मनमोहन सिंग यांच्या काळात सरकार व देशाची प्रचंड लूट चालू आहे, त्यासाठीच तिला आवर न घालणार्या पंतप्रधानाला चोर म्हणायचे होते. कदाचित संयमी भाषा व आवाहन करून ज्याला जाग येत नाही; त्याला शिव्याशाप देऊन जागवण्याचा त्यामागे हेतू असेल. अशावेळी आपल्यावरचे आरोप खोडून काढण्याची संधी सिंग यांनी घ्यायला हवी होती. पण तसे आपले दामन स्वच्छ नाही, याची पक्की खात्री असल्यानेच सिंग आपल्या सन्माननीय पदाच्या प्रतिष्ठेआड लपले. जगातल्या कुठल्या देशात व संसदेत आपल्याच पंतप्रधानाला चोर संबोधले जाते काय; असा सवाल त्यांनी केला. ही बाब प्रत्येक भारतीयासाठी खरोखरच खेदजनक अशी आहे. पण खुद्द पंतप्रधानांना ती बोचली आहे काय? असेल तर त्यांनी अशा चोर्या राजरोस चालू आहेत, त्याला पायबंद घालून दाखवला पाहिजे होता. अनेक प्रकरणे तर त्यांच्याच कार्यालयातून घडलेली आहेत. कोळसा खाण घोटाळा ते मंत्रालय त्यांच्याकडे असताना झाला आहे. त्यासंबंधी कोर्टाकडून तपास चालू असताना त्यांच्याच कार्यालयातून कोर्टाला सादर व्हायच्या अहवालामध्ये हेराफ़ेरी झालेली आहे. आता त्याच फ़ायली गायब झाल्या, त्यालाही पंतप्रधान कार्यालयच जबाबदार असल्याचे संदर्भ पुढे येत आहेत. मग त्या सर्व सावळ्यागोंधळाच्या बाबतीत मनमोहन सिंग यांना अभिमान वाटतो काय? त्यांच्या अशा कारभाराची लक्तरे नित्यनेमाने जगाच्या वेशीवर टांगली जात आहेत, त्याबद्दल त्यांनी कधी एका शब्दाने खेद व्यक्त केला आहे काय? नसेल तर एकूण भारतीयांना लाज वाटली तर समजू शकते. पण चोर शब्दाचा राग मनमोहन सिंग यांना कशाला यावा; हे रहस्यच आहे.