भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे नाव वाराणशीतले पक्षाचे उमेदवार म्हणून घोषित झाले. तेव्हा आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल कर्नाटकाच्या दौर्यावर होते. त्याच्याही आधी त्यांनी गुजरातमध्ये जाऊन मोदींच्या विकास मॉडेलवर तोफ़ा डागलेल्या होत्या. अनेक आरोपही मोदींवर केलेले होते. पण मोदींनी त्यांच्याकडे वळून बघितले नाही, की कुठले उत्तर दिले नाही. मग आधी मुंबईत ‘रोडशो’ करून दोन दिवसांनी केजरीवाल बंगलोरला गेले होते. मात्र गुजरातनंतर त्यांनी सगळीकडे मोदींनाच आपले लक्ष्य बनवले. सहाजिकच त्यांच्या कुणा सहकार्याने केजरीवाल मोदींच्या विरुद्ध निवडणूक लढवण्याची परस्पर घोषणा करून टाकली. मग बंगलोरच्या सभेत बोलणार्या केजरीवाल यांच्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता. मोदींच्या नावाची घोषणा होताच वाराणशीत जाणे त्यांना भाग होते. त्यांनीही वाराणशीच्या जनतेला विचारून आपण निर्णय घेऊ असे जाहिर केले. मग त्यांच्या पक्षाची तयारी सुरू झाली. दिल्लीतून बसेस भरून वाराणशीत गर्दी नेण्याची सज्जता झाल्यावर केजरीवाल रेलगाडीने तिथे पोहोचले. गंगेत स्नान करण्यापासून मंदिरे देवदर्शन इत्यादी सोपस्कार उरकल्यावर त्यांनी रोडशो केला. अंगावर शाई फ़ेकून घेतली आणि अखेरीस जनतेचा कौल घेतला. सभेला पुरेशी गर्दी नव्हती आणि वाराणशी बाहेरून लोक जमवल्याचा गवगवा झालाच होता. पण तरीही सभेचे मैदान पुरेसे भरले नाही. मात्र जनमत घेण्याचा सोहळा पुर्ण होऊन त्यांनी उमेदवारीची घोषणा केली. तेवढ्यावर केजरीवाल थांबले नाहीत. आपण आता वाराणशीतच मुक्काम ठोकून बसणार, असेही त्यांनी जाहिर करून टाकले. पण तिथेच नेता अडकून पडला तर बाकीच्या पक्षाने करायचे काय?
मागल्या दीड महिन्यात बघितले तर जिथे जिथे म्हणून केजरीवाल जात आहेत, तिथे धमाल उडवून देत आहेत. पण तिथे तिथे त्यांना विरोधकांच्या काळ्या झेंड्याचे तोंड पहावे लागते आहे. त्याच्याच घाईगर्दीने व नुसत्या मिसकॉलवर संघटित केलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची नाराजी सोसावी लागते आहे. अनेक शहरात व मतदारसंघात जुने कार्यकर्ते राजिनामे तोंडावर फ़ेकून बाहेर पडत आहेत. शिवाय ज्या दिल्लीत या पक्षाला साडेतीन महिन्यापुर्वी नेत्रदिपक यश मिळाले; तिथेच त्यांच्या उमेदवारांना मतदार प्रश्न विचारून भंडावून सोडतो आहे. चाचण्या व माध्यमांचे अंदाज खरे मानायचे, तर अवघ्या दोन महिन्यात आम आदमी पक्षाची शिगेला पोहोचलेली लोकप्रियता ओहोटीस लागलेली आहे. थोडक्यात जग जिंकायला निघायचे आणि माघारी वळून बघायचे, तर आपला बालेकिल्लाच हातून निसटण्याचा प्रसंग आलेला असावा. तशी केजरीवाल यांची स्थिती झालेली आहे. मोठ्या आवेशात त्यांनी दिल्लीच्या सातही जागा सहज जिंकणार म्हणून उमेदवार घोषित करून टाकलेत. पण त्यांचे अर्ज भरायला आणि प्रचार फ़ेर्यांसाठी लागणार्या कार्यकर्त्यांचा पत्ता नाही. त्यापैकी एकाने कार्यकर्ते पैसे मागतात, म्हणून आखाड्यातून माघार घेतली आणि बाकीच्यांना सोबत फ़िरायला कार्यकर्तेच नाहीत. शिवाय केजरीवाल नसतील, तिथे वाहिन्या प्रसिद्धीही देत नाहीत. केवळ माध्यमे आणि वाहिन्यांच्या गाजावाज्यातून दोन महिन्यात देशव्यापी झालेल्या या पक्षाला माध्यमात स्थान नसले, तर जागा जिंकायच्या कशा अशी भ्रांत पडली आहे. त्यामुळेच मग केजरीवाल यांना वाराणशीची मोहिम अर्धवट सोडून माघारी दिल्लीला परतावे लागले आहे. दिल्लीत सर्वात आधी म्हणजे येत्या १० एप्रिल रोजी मतदान व्हायचे आहे. तर वाराणशीत पुढे महिनाभराने मतदान व्हायचे आहे. तेवढ्यासाठी केजरीवाल दिल्लीच्या प्रचारात जान ओतायला माघारी आले आहेत. तोपर्यंत आता वाराणशीची लढाई तहकुब राहिल.
विधानसभा निवडणूकीत दिलेली आश्वासने, त्याची अपुर्ण राहिलेली पुर्तता आणि आपण सर्वच आश्वासने पुर्ण केल्याचा दावा, याची कसोटी आता प्रचारफ़ेरीतून लागायची आहे. त्याच कारणास्तव आम आदमी पक्षाच्या लोकसभा उमेदवाराच्या सोबत फ़िरायला कार्यकर्ते जमत नाहीत. कारण केजरीवाल पत्रकारांसमोर खोटे बोलतात आणि त्यांचे सहानुभूतीदार वाहिन्या खोटी विधाने प्रसारीत करीत असतात. पण वीजदर अर्धे करणे वा त्यावरच्या अनुदानाचे निर्णय अंमलात आलेले नाहीत. पाणीपुरवठा घटत चालला आहे. केजरीवाल म्हणतात, तसे दिल्लीकरांना सहाशे लिटर मोफ़त पाणी अजून मिळालेले नाही. त्याच जाब लोक विचारू लागले आहेत. त्यांना उत्तरे देणे सोपे नाही. स्थानिक कार्यकर्त्याला लोक भंडावून सोडतात. दुसर्या महायुद्धात हिटलरने सोवियत रशियावर हल्ला केला, तेव्हा रशियन नेता स्टालीन म्हणाला होता, माझ्यापाशी आणखी दोन सेनापती आहेत. जनरल जानेवारी आणि जनरल फ़ेब्रुवारी. त्याचा अर्थ असा होता, की त्या दोन महिन्यात अतिशीत कटीबंधात असलेल्या रशियामध्ये रक्त गोठवणारे बर्फ़ व थंडी पडते. नेमक्या त्याच मुहूर्तावर जर्मन सैन्य घुसले होते. त्यांना रशियाने खुप आत घुसू दिले. तोपर्यंत हिवाळा आला आणि मागेही जाणे अशक्य, अधिक रसद तुटलेली. त्यातच जर्मन सेना संपून गेली. दिल्लीतले मतदान एप्रिलमध्ये होते आहे आणि उन्हाळा तापू लागला आहे. त्यात पाण्याची टंचाई आणि खंडीत विजपुरवठा; अशी दयनीय अवस्था दिल्लीकरांची असणार आहे. त्यात पुन्हा वीजेचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे संतापलेल्या गरीब, मध्यमवर्ग, कष्टकरी यांना केजरीवाल यांचा जनलोकपाल कोणता दिलासा देणार आहे? कारण तोच विधानसभेत इतके यश देणारा मतदार आता लोकसभेसाठीही मतदार आहे. आणि आपण ४९ दिवसात सरकार चालवून वा मोडून त्या दिल्लीकराला काय दिले, हे तोंडी सांगून भागणार नाही. ज्याला ते पोहोचलेले नाही, त्याला दाखवून द्यावे लागणार आहे. थोडक्यात ‘जनरल’ एपिलशी व त्याच्या उन्हाळा नामक फ़ौजेशी केजरीवाल यांची लढाई आहे. तेवढ्यासाठीच वाराणशी सोडून त्यांना मागे दिल्लीत पळत यावे लागले आहे.
लोकशाहीची विटंबना चालवली आहे या लोकांनी!
ReplyDeleteधंदा करायलाही बुध्दी लागते हे नेते सोयीनुसार विसरत आहेत.
धन्यवाद.