Friday, March 28, 2014

केजरीवाल यांची रणनिती

 

   वाराणशीमध्ये जाऊन आपण जिंकणार नाही, हे केजरीवाल पक्के ओळखून आहेत. पण त्यांना तरी मोदींना कुठे हरवायचे आहे? आम आदमी पक्षाची स्थापना झाली, तेव्हापासून त्यात सहभागी झालेले अभ्यासू प्राध्यापक योगेंद्र यादव यांनी तेव्हा अनेक माध्यमांना, पत्रकारांना सांगितलेले एक सुत्र त्यापैकी कोणाच्या लक्षात राहिलेले दिसत नाही. यादव यांनी निवडणूकीच्या राजकारणात आपला पक्ष मोठी बाजी मारणार, असे अजिबात सांगितलेले नव्हते. किंबहूना आपण पहिल्यांदा पराभूत होण्यासाठीच राजकारणात उडी घेतली आहे, इतके स्पष्ट शब्दात त्यांनी स्वपक्षाचे विवेचन केलेले होते. कुठला पक्ष निवडणूकीच्या आखाड्यात पराभूत होण्यासाठी उतरतो काय? शक्यच नाही. मग यादव यांनी असे कशाला म्हणावे? तर त्यासाठी त्यांचे एकूण विधान लक्षात घ्यावे लागेल. योगेंद्र यादव यांनी तेव्हा दिवंगत कांशीराम यांचा सिद्धांत पुढे केला होता. १९८० सालात बहुजन समाज पक्षाची सुरूवात केली, तेव्हा कांशीराम म्हणाले होते, आम्ही पहिली निवडणूक हरण्यासाठीच लढत आहोत. पण पुढली निवडणूक आम्ही कुणाला तरी हरवण्य़ासाठी लढू. त्यानंतर जिंकायला सुरूवात होईल. यादव यांचा तोच सिद्धांत होता. मात्र दिल्लीतली राजकीय परिस्थिती भिन्न होती. त्यामुळेच त्यांच्या पक्षाला पहिल्याच लढतीमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्यात तो पक्ष जिंकू शकला नाही, तर कॉग्रेसला हरवण्यात त्याला यश मिळाले. वास्तविक त्याच सिद्धांतानुसार त्या पक्षाची वाटचाल सुरू आहे. त्याने जबरदस्ती झाली म्हणून सरकार बनवले. ते चालवण्यासाठी बनवले नव्हते. त्यांना आपला पक्ष अखिल भारतीय विकल्प म्हणून पुढे आणायचा असून त्यात कॉग्रेस व तथाकथित सेक्युलर राजकीय पक्षांची जागा व्यापायची आहे.

   खरे तर दिल्लीच्या विजयानंतर भाजपाला रोखण्याचे खुळ कॉग्रेसने डोक्यात घेतले नसते आणि आम आदमी पक्षाने न मागितलेला पाठींबा दिला नसता; तर आजची दुर्दैवी राजकीय परिस्थिती कॉग्रेसवर आलीच नसती. कारण सरकार बनवून आपण केजरीवालना खेळवू, असा कॉग्रेसचा डाव होता. पण तो कालबाह्य जुन्या राजकारणातला डावपेच होता. इथे नव्या पक्षाला सत्तेच्या मोहात अडकायचे नव्हते, तर त्यातून मोठा डाव साधायचा होता, त्याच्याच सापळ्यात कॉग्रेस फ़सली होती. परिणामी केजरीवाल यांना पुढली नाटके करता आली आणि वारेमाप प्रसिद्धी मिळवता आली. ते साध्य होताच त्यांनी सरकार मोडून टाकले व ते मोडेल याची पुरती काळजी घेतली. त्यासाठी घटनात्मक पेच निर्माण करून भाजपा व कॉग्रेस एकमुखी विरोधात उभे रहातील असा छान देखावा निर्माण केला. खरेच जनलोकपाल विधेयक संमत करून घ्यायचा आग्रह होता; तर ते राज्यपालांकडे पाठवून घटनात्मक पेच टाळणे शक्य होते आणि जनलोकपाल संमतही झाला असता. पण मग राजिनामा फ़ेकून पळ काढायचा मार्गच शिल्लक उरला नसता. म्हणून घटनाविरोधी मार्ग चोखाळून भाजपा कॉग्रेसला पक्के विरोधात उभे करण्यास भाग पाडले गेले. पण बदमाशी पुढेच आहे. तेवढ्यासाठी तात्काळ राजिनामा द्यायचा होता, तर लगेच द्यायला हवा होता. पण विधेयक मागे घ्यावे लागल्यानंतर केजरीवाल व त्यांचे मंत्री सभागृहात बसून राहिले आणि आपल्या अनुदानाच्या मागण्या व आर्थिक प्रस्ताव नंतर मंजूर करून घेतले. म्हणजेच लोकपालसाठी राजिनामा दिला व सत्ता तात्काळ सोडली, हे शुद्ध ढोंग होते. कारण दिल्लीत अडकून पडण्यापेक्षा राष्ट्रव्यापी मोहिम चालवून लोकसभा निवडणूकीच्या माध्यमातून पडायला उतावळे कोणीही उमेदवार उभे करायचे, हीच मुळची राजकीय खेळी होती.

   जनमत कौल घेऊन उमेदवार ठरवायचे आणि आमच्या पक्षात हायकमांड नाही, ही भाषा तात्काळ बंद झाली. साडेतिनशेहून अधिक उमेदवार आज त्या पक्षाने उभे केले आहेत आणि त्यांना हायकमांड असल्याप्रमाणे मुठभर नेत्यांनी परस्पर तिकीटे दिली आहेत. त्याबद्दल संस्थापक सदस्यांनी जाहिर तक्रारी केल्या आहेत. कार्यकर्ते चिडलेले आहेत. पण त्यांचा आवाज कोणापर्यंत पोहोचतो? दिल्लीकर जनता संतापलेली आहे. पण त्याची तरी केजरिवाल टोळीला कुठे फ़िकीर आहे? त्यांना अधिकाधिक प्रसिद्धीतून देशाच्या कानाकोपर्‍यात आपल्या पक्षाचा डंका पिटायचा आहे आणि ते साध्य होते आहे, शिवाय कोणीही उमेदवार उभे केले, तरी त्यांच्या नावाने पडणारी मते पक्षाच्या खात्यात मोजली जाणार आहेत. उद्या त्यापैकी कोणीही पक्षात नसला म्हणून बिघडत नाही. नवे लोक येतील. नवे बकरे सापडतील. मायावतींच्या बसपामध्ये किती नेते टिकले आहेत? आजच्या निवडणूकीतले पुढल्या पाच वर्षात त्या पक्षात कुठे कायम असतात? नेमकी तीच केजरीवाल यांची रणनिती आहे. या लोकसभा निवडणूकीतून त्यांना पक्षाचा देशव्यापी अधिकाधिक क्षेत्रात सांगाडा उभा करायचा आहे. त्यासाठी पक्षाची निशाणी असलेल्या झाडू विकत घेण्यासाठी पैसे खर्चणारे उमेदवार हवेत. झाडू नाचवणारे लोक हवेत. आणि खात्यात जमा होतील अशी मते हवीत. त्यानंतर त्यापैकी कोणाची आम आदमी पक्षाला गरज असणार नाही. जी चारपाच टक्के मते मिळतील व राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळेल, तेच खरे लक्ष्य आहे. त्यातून पुढल्या काळात भाजपा विरोधी व डाव्या आणि विस्कळीत कॉग्रेसला कंटाळलेल्या कार्यकर्त्यांना पर्याय द्यायची मूंळ योजना आहे. थोडक्यात मोदी विरुद्ध लढायचे आणि प्रत्यक्षात सेक्युलर पक्षांना हरवायचे, हे आम आदमी पक्षाचे आजचे उद्दीष्ट आहे.

No comments:

Post a Comment