Wednesday, March 5, 2014

चुकचुकणारी पाल



   कॉग्रेसचे नेते जगदंबिका पाल रविवारी लखनौच्या सभेत मोदींच्या हजेरीत भाजपामध्ये दाखल होणार असल्याच्या बातम्या तीन दिवस आधी गाजत होत्या. पण त्यावर कुणा कॉग्रेस प्रवक्त्याने प्रतिक्रिया दिली नाही किंवा भाजपाकडूनही दाद मिळाली नाही. स्वत: पालही त्याबद्दल गप्पच होते, गेली तीनचार वर्षे कॉग्रेसचा दिल्लीतला राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून कार्यरत असलेला ज्येष्ठ नेता; आपल्याविषयी अशा बातम्या झळकत असताना गप्प राहिल काय? अशा बातम्या चालू आहेत, तर त्याचे खंडन कुठल्याही पक्षनिष्ठाने तात्काळ करायला हवे होते. पण पाल यांनी त्यापैकी काहीच केले नाही आणि ज्या लखनौच्या सभेचा उल्लेख चालू होता, ती उरकल्यानंतर पाल खुलासा करायला पुढे आलेले आहेत. याचा अर्थ सरळ होता, की आपण कॉग्रेसमधले नाराज आहोत व भाजपाने आपल्यासाठी स्वागताच्या पायघड्या पसराव्यात. किंवा कॉग्रेस नेतृत्वाने आपल्याकडे येऊन पक्षातच रहाण्यासाठी मनधरणी करावी, अशीच जगदंबिका पाल यांची अपेक्षा असावी. निवडणूकीच्या काळात अनेक नगण्य वा निरूपयोगी नेते याप्रकारचा लापंडाव खेळत असतात. वाजपेयी यांची भाची करुणा शुक्ला यांनी चार महिने वाट बघून शेवटी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला. ज्यांची राजकारणातील ओळख निव्वळ मोठ्या नेत्याचे कुटुंबिय इतकीच असते, त्यांचा पक्षाच्या कार्यात वा संघटनात्मक कामात काहीही उपयोग नसतो. तसेच निव्वळ पदामुळेचे मोठे मानले गेलेले जगदंबिका पाल यांच्यासारखे नेते नावापुरते मोठे असतात. बाकी निरूपयोगी असतात. त्यांच्या रुसव्याफ़ुगव्याकडे डोळेझाक करणेच व्यवहारी शहाणपणा असतो. कॉग्रेस व भाजपाने पाल यांच्याबाबतीत तेच केले म्हणायला हरकत नाही. पण त्यानंतर पाल यांचे निवेदन ह्या उलट्या बोंबा आहेत.

   जगदंबिका पाल हे राजकीय पात्र आज लोकांना फ़ारसे लक्षात राहिलेले नसेल. म्हणूनच त्यांचा पुर्वेतिहास सांगण्याची गरज आहे. १९९८ सालात उत्तरप्रदेशमध्ये भाजपाप्रणित आघाडीचे राज्य होते. त्यात कॉग्रेसमधून फ़ुटून निघालेला एक गट सहभागी होता. लोकतांत्रिक कॉग्रेस असे त्या पक्षाचे नाव होते. त्या गटाच्या पाठींब्याच्या बदल्यात जे मंत्री घेण्यात आलेले होते, त्यात पाल यांचा समावेश होता. याच गटाला हाताशी धरून तिथले सेक्युलर राज्यपाल रोमेश भंडारी यांनी सत्तापालटाचे घटनाबाह्य नाट्य रंगवले होते. त्या नाटकातले प्रमुख पात्र म्हणूनच जगदंबिका पाल यांची जगाला ओळख झाली. एका फ़टक्यात भंडारी यांनी कल्याणसिंग सरकार बरखास्त करून जगदंबिका पाल यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्यात त्यांच्या गटाचे अध्यक्ष नरेश अग्रवाल यांचाही समावेश होता. या सरसकट घटनाबाह्य वर्तनाच्या विरोधात भाजपाने सुप्रिम कोर्टात धाव घेतली, तर अटलबिहारी वाजपेयी यांनी लखनौमध्ये आमरण उपोषण आरंभले होते. अखेरील कोर्टाच्या आदेशानुसार विधानसभा तात्काळ भरवून बहुमताची चाचणी घेण्यात आली. तिथे राज्यपालासह जगदंबिका पाल यांचे कारस्थान उघडे पडले आणि कल्याण सिंग यांची सत्ता कायम राहिली. पुढे काही महिन्यातच लोकसभा निवडणूकीत भाजपाला मोठे यश मिळून वाजपेयी पंतप्रधान झाले. मात्र तेव्हा आपल्या पापाच्या अपराधी भावनेमुळे वाजपेयींच्या शपथपिधीपुर्वीच रोमेश भंडारी यांनी राज्यपाल पदाचा राजिनामा दिला होता. अशा अत्यंत कुटील व कसलाही विधीनिषेध न बाळगणार्‍या प्रवृत्तीचे द्योतक म्हणून आपण जगदंबिका पाल यांच्याकडे बघू शकतो. त्यांच्या डावपेचांना कॉग्रेससह भाजपाचे नेतृत्व बळी पडले नसेल, तर त्या दोघांची पाठ थोपटायला हवी.

   असल्याच माणसांनी राजकारण अगदी कुजवून व नासवून टाकले आहे. एकवेळ राजकारणात खर्‍याखुर्‍या गुंडगुन्हेगारांचा वावर परवडला. कारण तसे गुंड आपल्या पापकर्माला निदान तात्विक मुलाम देऊन समोर येत नाहीत. जगदंबिका पाल व त्यांचे तेव्हाचे सहकारी नरेश अग्रवाल यांच्यासारखे हुशार तेवढेच बदमाश लोक राजकारणाची पुरती नासाडी करून टाकत असतात. तेव्हाच्या घडामोडीत आधी राज्यपालांना सामील असलेले नरेश अग्रवाल काही तासातच कोलांटी उडी मारून पुन्हा कल्याणसिंग यांच्या गोटात परतले होते. आणि त्यांनी आपण भाजपालाच पाठींबा देत असल्याचा निर्वाळा दिलेला होता. आज तेच अग्रवाल मुलायमच्या समाजवादी पक्षाचे राज्यसभेतील खासदार असून राष्ट्रीय प्रवक्तेही आहेत. मोदींच्या जातियतेविरुद्ध वैचारिक भंपकबाजी सातत्याने करीत असतात. ‘चायवाला देशका प्रधानमंत्री नही बन सकता’ असे प्रथम मतप्रदर्शन करणारा नेता अग्रवालच होता. पाल वा अग्रवाल यांच्यासारख्या लोकांनी राजकारणात बेशरमीचा प्रभाव निर्माण केलेला आहे. त्यांच्यामुळेच पक्षांच्या भूमिका वा वैचारिक धारणेला अर्थ उरलेला नाही. आज अशा जगदंबिका पालने आपल्यावर कॉग्रेस पक्षात अन्याय होतो म्हणणे; हाच मुळात कॉग्रेसवर अन्याय आहे. कारण अशा बदमाशांची काडीमात्र विश्वासार्हता नसताना त्यांना कॉग्रेस वा भाजपाने सोबत घेतल्याने ते प्रतिष्ठीत होतात. मात्र त्यातूनच राष्ट्रीय राजकीय पक्षांना नेहमी भ्रष्ट झाल्याचा आरोप सोसावा लागत असतो. त्या पक्षातला तळागाळातला निरपेक्षपणे काम करणारा कार्यकर्ता अशा संधीसाधुंमुळे बाजूला फ़ेकला जात असतो. म्हणूनच कुठल्याही पक्षाने असली चुकचुकणारी पाल आपल्या पक्षात असू नये की येऊही नये; याचीच काळजी घ्यायला हवी.

No comments:

Post a Comment