Thursday, March 27, 2014

एकाच माळेचे मणी



   मंगळवारी वाराणशीमध्ये गेलेल्या आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी तिथे रोडशो केला. त्यात काही असंतुष्टांनी सडकी अंडी त्या नेत्यांवर फ़ेकली. तर कोणी शाई सुद्धा फ़ेकल्याचे दिसत होते. यातून आपली लोकशाही व निवडणूकीचे राजकारण किती खालच्या थराला जात आहे; त्याची साक्ष मिळाली. अर्थात त्याची जबाबदारी सर्वच पक्षांवर आहे यात शंका नाही. पण ज्यांच्यावर हा हल्ला झाला, ते केजरीवाल व त्यांचे सहकारी त्यात संपुर्ण निर्दोष आहेत, असे म्हणता येईल काय? वारंवार आम आदमी पक्षाचे नेते गांधीनामाचा जप करीत असतात. गांधीवादाचे शांततामय राजकारण आपण करतो असा त्यांचा दावा असतो. पण त्यात किती तथ्य आहे? त्यांनीही मग शाईहल्ल्याचा निषेध केला. पण त्यांचा निषेध कितीसा खरा मानायचा? की सगळाच बनाव होता? कारण काशी दौर्‍यावर जाण्यापुर्वीच केजरीवाल यांनी तिथे भाजपावाले काही कारस्थान शिजवत असल्याचा संशय व्यक्त केला होता. बाकीच्या पक्षाचे नेते असला संशय कधी व्यक्त करीत नाहीत, की त्यांच्यावर असे हल्ले होत नाहीत. वारंवार आम आदमी पक्षाच्याच वाट्याला असे प्रसंग कशाला येतात, तेही एक कोडेच आहे. पण खरेच या पक्षाला असल्या वृत्तीचे वावडे आहे काय? असेल तर त्याप्रमाणे वागणार्‍यांना या पक्षाने आपल्या संघटनेत स्थान देता कामा नये. याबद्दल त्या निषेधाच्या गर्दीत कुठेच चर्चा झाली नाही. वास्तविक अशा उचापतखोरांना प्रतिष्ठीत करण्याचे पाऊल आजच्या राजकारणात आम आदमी पक्षानेच उचलले आहे. त्यांनी दिल्लीत ज्यांना उमेदवारी दिली, त्यात केवळ अशाच एका कृतीने नाव कमावलेल्या व्यक्तीला स्थान दिलेले आहे. त्याचा उल्लेख कुठल्याच बातमीत कशाला नसावा? 

   तब्बल पाच वर्षापुर्वी भारताचे गृहमंत्री असलेले चिदंबरम एक पत्रकार परिषदेत बोलत होते. तिथे एका पत्रकाराने १९८४ सालच्या शीखविरोधी दंगली संबंधात प्रश्न विचारला होता. जगदीश टायटलर यांना सीबीआयने क्लिनचीट दिल्याबद्दल तो प्रश्न होता. चिदंबरम यांनी त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे टाळले, तरी त्याने पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारायचा प्रयत्न केला. पण चिदंबरम यांनी ठामपणे त्याचे उत्तर देण्यास नकार दिला. तेव्हा या पत्रकाराने संतप्त होऊन पायातला बूट काढून गृहमंत्र्याच्या दिशेने भिरकावला होता. तात्काळ तिथल्या सुरक्षा रक्षकांनी धाव घेतली आणि त्याला ताब्यात घेतले होते. तो पत्रकार घोषणा देत राहिला आणि त्याला पोलिस बाहेर घेऊन गेलेले होते. पुढे चिदंबरम यांनी त्याच्यावर कुठली तक्रार दाखल करण्यास नकार दिला, म्हणून तो सुटला. त्याचे नाव होते जर्नेलसिंग. आज तो प्रसंग वा त्यातली हिंसक आक्रमकता कोणाला आठवत नाही, याचे नवल वाटले. सध्या तोच जर्नेलसिंग काय करतो आहे? ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल, तो हल्लेखोर जर्नेलसिंग लोकसभेची निवडणूक दिल्लीतूनच लढवतो आहे. त्याला आम आदमी पक्षानेच उमेदवारी दिलेली आहे. एका बाजूला पादत्राण मंत्र्यावर फ़ेकणार्‍याला उमेदवारी द्यायची आणि दुसरीकडे आपल्यावर शाई अंडी फ़ेकणार्‍यांना हिंसक म्हणायचे, यात इमानदारी कशाला म्हणावे? प्रश्न असा, की अशा घटनांचे निषेध करणार्‍यांना किंवा त्यावर रसभरीत चर्चा करणार्‍यांना पुर्वेतिहास कशाला आठवत नाही? शाईचे डाग कपड्यांवर मिरवून त्याचा निषेध करणार्‍या आपनेत्यांना, जर्नेलसिंगाच्या पराक्रमाची आठवण कोणीच कशाला करून देऊ नये? 

   अर्थात असली उदाहरणे आपल्या देशात वा निवडणूकीत नवी नाहीत. आणिबाणीनंतर जनता सरकारच्या कारकिर्दीत इंदिराजींना अटक झाली, म्हणून प्रवासी विमानाचे अपहरण करणार्‍या भोला पांडे व त्याच्या भावाला नंतरच्या निवडणूकीत कॉग्रेसने उमेदवारी दिलेली होती. अकाली दलाच्या एका गटाने सरकारच्या विरोधात बंड पुकारणार्‍या सिमरन सिंग मान या पोलिस अधिकार्‍याला १९९० च्या काळात उमेदवारी दिलेली होती. जेव्हा आपण हल्ल्यचे बळी असतो, तेव्हा त्या कृतीला गुन्हा म्हणायचे असते आणि आपण हल्लेखोर असतो, तेव्हा त्यात गुन्हा नसतो, असा एकूण आपल्या राजकीय पक्षांचा त्या बाबतीतला निकष आहे. म्हणूनच कमीअधिक प्रमाणात सर्वच पक्षात असे कायदा मोडणारे वा गुन्हेगार सर्वच पक्षात आढळतील. युपीएच्या पहिल्या सरकारात लालूंच्या पक्षाचा तस्लिमुद्दीन नावाचा एक मंत्री होता. त्याच्यावर खुनाचा आरोप होता. त्याने मार्क्सवादी नेत्याचा खुन केल्याचा आरोप होता. पण तरीही त्याच्या मंत्रीपदाला त्याच मार्क्सवादी पक्षानेही आक्षेप घेतला नव्हता. त्याच सरकारमध्ये राजीव गांधी हत्येतील संशयित महिला द्रमुकतर्फ़े निवडून आली, तिला मनमोहन सिंग यांनी द्रमुकच्या पाठींब्यासाठी मंत्री बनवले होते. मोदींच्या मंत्रीमंडळात गुजरातचा एक मंत्री खुनाच्या आरोपाखाली खटल्याला सामोरा जातो आहे. त्यामुळेच कोणी आपण धुतल्या तांदळासारखे पवित्र असल्याचा दावा करण्यात अर्थ नाही. आम आदमी पक्ष नित्यनेमाने ती जपमाळ ओढतो म्हणून हा जुना इतिहास सांगावा लागला. आता नवलाई संपुन तोही पक्ष इतरांसारखा पक्का बनवेगिरी करू लागल्याचे हे उदाहरण होय.

No comments:

Post a Comment