आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर वाराणशीमध्ये काळी शाई आणि अंडी फ़ेकण्यात आली. असे कृत्य कधीही निषेधार्हच असते. पण अशा घटना आजवर इतक्या फ़टाफ़ट कधी घडत नव्हत्या आणि एकाच पक्षाच्या बाबतीत सहसा कधीच घडलेल्या नाहीत. मग त्या आम आदमी पक्षाच्याच बाबतीत का होत असाव्यात? शिवाय प्रत्येकवेळी त्या घटना कॅमेराला साक्षी ठेवूनच कशा होतात? कुठल्याही सर्वसाधारण बुद्धीच्या व्यक्तीला असा प्रश्न पडायला हवा. पण आपल्या वृत्तवाहिन्यांचे पत्रकार व त्यावरचे जाणते अभ्यासक यांच्यापाशी सामान्य बुद्धीचा कमालीचा दुष्काळ असल्याने त्यांना मात्र त्याविषयी किंचीतही शंका कधी आलेली नाही. अथवा कुणी त्याचा उहापोह करण्याचा प्रयासही केलेला नाही. कदाचित हे अतिबुद्धीमान लोक असल्याने सामान्य आम आदमीला येणार्या शंका त्यांना सतावत नसाव्यात. म्हणून हे ‘सातत्य’ दुर्लक्षित राहिले असावे. पण याच संदर्भात एक गोष्ट मुद्दाम अगत्याने सांगावीशी वाटते. महिलादिनी ८ मार्च रोजी जंतरमंतर येथे याच पक्षातर्फ़े एक धरण्याचा कार्यक्रम योजलेला होता. तिथे अकस्मात एक इसम धावत व्यासपीठावर आला आणि त्याने नेमक्या कॅमेरासमोर बसलेल्या योगेंद्र यादव नामक ‘आप’नेत्याच्या तोंडाला काळे फ़ासले. त्याला मारहाण झाली आणि पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तो आम आदमी पक्षाचाच कार्यकर्ता असल्याचे नंतर निष्पन्न झाले. तोपर्यंत ‘आप’नेत्यांनी व त्यांच्याशी सहानुभूती असलेल्या वाहिन्यांनी विरोधी पक्षावर तोंडसुख घेतले. पण मुद्दा पुढेच होता. चौकशीनंतर तो हल्लेखोर म्हणाला त्याला केजरीवालच्याच तोंडाला काळे फ़ासायचे होते. ते खरे मानायचे तर समोर योगेंद्र यादव आहे, हे त्याला कसे ठाऊक नाही?
तो हल्लेखोर पक्षाचा कार्यकर्ता असूनही त्याला यादव आणि केजरीवाल यांच्यातला फ़रक कळत नाही, असे मानायचे काय? त्या दिवशी केजरीवाल गुजरातमध्ये नौटंकी करायला गेलेले असल्याने जंतरमंतर येथे केजरीवाल उपस्थित नसणार; हे त्याच पक्षाच्या दिल्लीतील कार्यकर्त्याला ठाऊक नसते काय? आता सुद्धा केजरीवाल वाराणशीच्या दौर्यावर आहेत आणि तिथे चहूकडून वाहिन्यांचे कॅमेरे त्यांचे चित्रण करीत आहेत. अशा भर रस्त्यावर कोणी त्यांच्यावर अंडी फ़ेकतो किंवा काळ्या शाईची बाटली उपडी करतो. पण एकाही कॅमेरात या वस्तू कुठून येतात त्याचा मागमूस आढळत नाही? जणू हवेतून अशा वस्तू निर्माण होतात आणि केजरीवाल व त्यांचे सहकारी कलंकीत होतात, असे मानायचे काय? असा चमत्कार दोन आठवड्यापुर्वी मलेशियन प्रवासी विमानाच्या बाबतीत घडलेला आहे. पण तो दूर उंच अवकाशात जिथे कॅमेरे सज्ज नसतात तिथे घडला होता. क्वालालंपूर येथून बिजींगला निघालेले विमान कुठल्या कुठे बेपत्ता झालेले आहे. त्याला सागर-धरतीने गिळंकृत केले, की ते हवेत अदृष्य होऊन गेले; त्याचा अजून थांगपत्ता लागलेला नाही. तोच चमत्कार केजरीवाल व त्यांच्या सहकार्यांच्या बाबतीत होताना दिसतो आहे. तिथे अजस्त्र विमान हवेत विरून बेपत्ता होते आणि इथे विरळ हवेतून विविध वस्तू अवतरतात आणि केजरीवाल यांना कलंकित करतात. कुठून आल्या, कशा आल्या त्याचा थांग लागत नाही, कोणी लावत नाही. आपल्या देशात आणि एकूणच पृथ्वीतलावत किती अजब घटना घडू लागल्या आहेत ना? गुजरातमध्ये दिवसभर केजरीवाल धुमाकुळ घालत फ़िरले, तेव्हा त्यांच्यावर कुठला हल्ला झालेला नव्हता. मग रात्री ते एकटेच आपल्या कार्यकर्त्यांसोबत निघाले असताना, त्यांच्य गाडीवर कोणीतरी दगड मारला होता.
हा सगळा तमाशा आता दिवसेदिवस खुपच मनोरंजक व अतर्क्य होत चालला आहे. वाराणशीची घटना अधिकच साक्षात्कारी आहे, कारण तिथे पोहोचण्याच्या आधी एक दिवस केजरीवाल यांनी आपल्या विरोधात काहीतरी कारस्थान भाजपा शिजवत असल्याचा आरोप केलेला होता. असे अंतर्ज्ञान असलेल्या व्यक्तीला भारत सरकारने तात्काळ ताब्यात घेतले पाहिजे. कारण त्याला होणार्या हल्ल्याच्या पुर्वसुचना मिळण्याची वा चाहुल लागण्याची अमोघ शक्ती अवगत आहे. त्याच्या मदतीने अनेक घातपाती, दहशतवादी वा जिहादी हल्ले रोखता येणे शक्य आहे. दिल्लीत बसून वाराणशीतल्या कारस्थानाचा सुगावा लागू शकतो, त्या व्यक्तीला भारतात बसून अफ़गाण, सिरिया वा रशियात होणार्या घातपाताचेही आधी संकेत मिळू शकतात. केजरीवाल यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाचा नाद सोडून मानवजातीला घातपाती हिंसेपासून सुरक्षित करण्याचे महान उदात्त कार्य हाती घेण्य़ाची गरज आहे. तशी शक्ती त्यांच्यात नसेल, तर मग वाराणशीत असे काही घडणार हे त्यांना कुठून कळले होते? दोनच मार्ग संभवतात. तसे कारस्थान शिजवणार्या कोणीतरी त्यांना तशी माहिती दिलेली असावी, किंवा त्यांनी स्वत:च प्रसिद्धीच्या हव्यासापायी असला पोरकटपणा करून घेतलेला असावा. विरोधकांपासून आपल्याला धोका असल्याचे कंठशोष करून सतत सांगणार्या हिटलरने त्याचा पुरावा देण्यासाठी स्वत:च सरकारी इमारती व संसदेवर हल्ल्याचे कारस्थान कसे यशस्वीरित्या राबविले होते, त्याचा इतिहास जगप्रसिद्ध आहे. केजरीवाल त्याच वाटेने निघालेत काय? नसेल तर मग त्यांनी हाती घेतलेल्या झुंडीच्या राजकारणाचे दुसरे कुठले विवेचन असू शकते? वाराणशीतला तमाशा आजवरच्या नाटकातला सर्वात थरारक रियालिटी शो म्हणावा लागेल.
भाऊ तुम्ही इतके पावसाळे बघितले , मग केजरीवाल मुळे इतकी बैचेनी कसली, कितीतरी वेळ फक्त केजरीवाल वरच लिहतात.
ReplyDelete