Friday, March 21, 2014

बाळ-कृष्ण रडगाणी


  अडवाणींनी हस्तक्षेप केलाच नसता, तर खरेच गुजरातच्या दंगलीनंतर नरेंद्र मोदींना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले असते, असली भाषा मागल्या काही दिवसात सतत ऐकू येत आहे आणि त्यात तथ्यही असेल. पण मुद्दा इतकाच, की खरेच मोदींना तेव्हा राजिनामा द्यायला भाग पाडले असते, तर गुजरातमध्ये भाजपा शिल्लक तरी उरला असता काय? मुळात दंगलीपुर्वी गुजरातमध्ये भाजपाला उतरती कळा लागली होती, म्हणून पक्षातल्या दुफ़ळीवर कुठलाही उपाय उरला नव्हता. तेव्हा मोदींच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची घोरपड बांधण्यात आली. त्यांनी कधी पक्षाची कुठली उमेदवारी मागितली नव्हती, की सत्तापद मागितले नव्हते. मुख्यमंत्री झाल्यावर लढवली ती पोटनिवडणूक त्यांच्या आयुष्यातली पहिलीच होती. अशा माणसावर आज सत्तेच्या मोहाचे जे आरोप होतात, त्याचे म्हणूनच नवल वाटते. असो, तोही मुद्दा नाही. पुढल्या काळात भाजपाच्या दिल्लीतील नेतृत्वाने कधी मोदींचे खुले समर्थन केले. मोदी विरोधात जी सार्वत्रिक झोड माध्यमातून उठवली गेली; तेव्हा कोणी भाजपा नेताही पाठीशी उभा राहिला नव्हता. ती सगळी टिका एकट्याने सोसून सरकार चालवून पुन्हा देशभर आपली लोकप्रिय प्रतिमा मोदींनी उभी केली. म्हणून आज त्यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार बनवण्यात आलेले आहे. त्यात मोदींच्या स्वार्थापेक्षा भाजपाचा स्वार्थ अधिक आहे. जशी नेहरू गांधी खानदानाला कॉग्रेस पक्षाची गरज नाही, इतकी पक्षाला त्या खानदानाच्या वारसाची गरज असते, तशीच मोदींची भाजपाला गरज आहे. त्यांच्याच लोकप्रियतेवर पक्षाला सत्तेपर्यंत जायचे आहे. मात्र त्याची फ़ळे मोदींनी मागू नयेत ही अपेक्षा असेल, तर कसे चालणार? अडवाणींची तीच अपेक्षा नव्हेतर आग्रह आहे आणि त्यातच त्यांचे गाडे फ़सलेले आहे.

   २००४ पासून दोन सार्वत्रिक निवडणूकीत अडवाणीच भाजपाचे व एनडीएचे सर्वोच्च नेता होते. तेव्हा तर मोदींनी त्यांच्या मार्गात कुठले अडथळे आणलेले नव्हते. पण २००९ च्या पराभवानंतर अडवाणींची प्रतिष्ठा व पक्षावरील हुकूमत संपुष्टात आली. त्याला ते स्वत:च अधिक जबाबदार आहेत. कारण त्यांनी पुढल्या काळात आपली सर्वसमावेशक प्रतिमा बनवताना मुळचा हिंदूत्ववादी पाठीराखा गमावला, तशीच लोकप्रियताही गमावली. आज त्यांचा वडीलधारेपणा ज्यांना आठवला आहे; त्यांनी त्याच अडवाणींना हिंदूत्वाचा भीषण चेहरा म्हणून सतत हिणवले होते. पण अशा कुठल्याही टिका वा कौतुकाने हुरळून न जाणार्‍या मोदींनी त्याच कालखंडात आपली प्रतिमा जनमानसात रुजवली. त्यातून पक्षाच्या देशाभरच्या कार्यकर्त्याला नवी उभारी आली. पुन्हा भाजपाला बहूमत व सत्ता मिळवायची असेल, तर मोदीसारखाच नेता हवा अशी धारणा पक्षात वाढीस लागली. तेव्हापासून अडवाणी आपले वय विसरून मोदीविरोधी डावपेच खेळू लागले. त्याचाच परिणाम आज दिसतो आहे. त्यांचाच चेला असलेल्या मोदीशी अडवाणी गुरूप्रमाणे वागले काय? अण्णांचे उपोषण संपल्यानंतर देशभरातील भ्रष्टाचार विरोधी लोकभावनेचा लाभ उठवण्यासाठी अडवाणी पुन्हा रथावर स्वार झाले. त्यापुर्वीच्या त्यांच्या सर्व यात्रा गुजरातमधून सुरू झाल्या होत्या. याहीवेळी २०११ च्या उत्तरार्धात जनचेतना यात्रा गुजरातमधूनच सुरू होईल असे ठरलेले होते. पण मोदींना ठेंगा दाखवण्यासाठी अडवाणींनी आपल्या यात्रेची सुरूवात मोदीचा कट्टर द्वेष्टा नितीशकुमारच्या हस्ते बिहारमधून केली. हा आज दिसतो, तो संघर्ष तेव्हापासून सुरू झालेला आहे. त्यानंतर प्रत्येक प्रसंगी मोदींना अपशकून करण्याचे डाव खेळणारे, अडवाणी गुरूप्रमाणे वागले होते काय?

गुरूने आपल्या चेल्याच्या कर्तृत्वाचे कौतुक करावे, त्याला आशीर्वाद द्यावा. पण इथे अडवाणी सतत मोदींना अपशकून करण्यात धन्यता मानत राहिले. गेल्या गुजरात विधानसभा निवडणूका असोत किंवा मोदींची गतवर्षी पक्षाचा प्रचारप्रमुख म्हणून झालेली निवड असो. सहा वर्षापुर्वी दुसर्‍यांना विधानसभा जिंकलेली असताना मोदींना संसदीय मंडळातून वगळणे असो. किंवा मोदींना पुढे केल्यास एनडीए संपेल किंवा अन्य पक्ष सोबत येणार नाहीत; अशी भाषा असो. यातून अडवाणी काय करीत होते? पुढे मोदींना प्रचारप्रमुख नेमल्यानंतर सर्व पदांचे राजिनामे देऊन झाले. २०१४ सालात कुठलाच पक्ष बहूमत मिळवणार नाही. कॉग्रेस वा भाजपाच्या पुढाकाराने सरकार बनू शकत नाही, असल्या शापवाण्या कोणी केल्या होत्या? पक्षाचा सर्वोच्च नेताच पक्षाची शिस्त मोडून पक्षाला अपायकारक मतप्रदर्शन करीत असेल, तर त्याला गुरूस्थानी मानता येईल काय? आता सुद्धा पदोपदी पंतप्रधान पदाचा उमेदवार असलेल्या मोदींना अपमानित करण्याच्या खेळी अडवाणी करीत असतील, तर त्यातून स्वत:लाच बदनाम व अप्रतिष्ठीत करून घेत आहेत. कार्यकर्त्याच्या मनातून उतरलेल्या नेत्याची किती नाटके बाकीच्या नेत्यांनी सोसावी, यालाही मर्यादा असतात. याक्षणी मोदींनी उमेदवारी नाकारायचा उलटा पवित्रा घेतला असता तर अडवाणीं यांची स्थिती काय झाली असती? असेच डाव सोनियांच्या बाबतीत शरद पवार कंपनी खेळली होती. त्यांना परत कधी पक्षाच्या मुख्यालयात तरी कार्यकर्त्यांनी पाय टाकू दिला काय? कार्यकर्ता पक्षाला जिंकण्यासाठी राबत असतो आणि त्याला जिंकून आणणारा नेता हवा असतो. ती किमया गमावून बसलेल्या अडवाणींनी कितीही अश्रू ढाळले तरी उपयोग नाही. उर्वरीत आयुष्य़ पक्षाने सन्मानाने वागवायला हवे असेल, तर ह्या बाळलिला सोडून, रडगाणी थांबवून त्यांनी कृष्णाप्रमाणे गीतोपदेश करायचे कर्तव्य पार पाडण्यात शहाणपणा असेल.

1 comment: