आमच्या चाळीतली दिपाली पळून गेली आणि तिच्या प्रियकराशी तिने वडीलधार्यांच्या इच्छा झुगारून परस्पर लग्न केले. लाजाळू व अबोल दिपालीच्या या धाडसाचे सर्वांनाच कौतुक होते. पण आमच्यापैकी कोणी तिचे कौतुक कधी तिच्या कुटुंबासमोर केले नव्हते. तसा तिचा प्रियकर अरविंद खुप चांगला मुलगा होता. कसले व्यसन नाही, चांगला शिकलेला आणि तरीही बेकार होता. मात्र अतिशय उत्साही व कल्पक होता. इमानदारी तर त्याच्या घरी धुणीभांडी करीत होती. त्याच्या हेतूवर कोणी शंका घेऊ शकत नव्हता. म्हणूनच आम्हाला दिपालीच्या धाडसाचे खुप कौतुक होते. पण तिच्या घराच्या मुर्खांना हे कोणी समजवायचे? इतका सुशील व सदगुणी जावई त्यांना शोधून तरी मिळणार होता काय? शिवाय कुठल्याही हुंडा वा देण्याघेण्याशिवाय मुलगी खपली, याचा आनंदच नको का व्हायला? पण जुन्या कालबाह्य समजूतीत फ़सलेल्यांना कोणी शहाणपण शिकवायचे? म्हणून आम्ही गप्प बसायचो. आपसात मात्र आम्हाला दिपालीचे तंतोतंत कौतुक होते, हे नाकारण्यात अर्थ नाही. चुकून कुठे दिपाली अरविंद जोडप्याने भेटलेच, तर गल्लीतल्या पोरांनीच नव्हे; तर थोरामोठ्यांनीही दिपालीला सुखी संसाराचे आशीर्वादच दिले होते. पण कुठे माशी शिंकली देव जाणे.
सात आठवडे झाले नाहीत आणि एकेदिवशी त्याच घरात धुसफ़ुस ऐकू आली. प्रत्येकजण डोकावून बघत होता, गुपचुप खबर काढली जात होती. दिपाली माहेरी परतल्याचे वृत्त होते. त्यात काय मोठे? रडारड कशाला? दिपालीच्या मैत्रिणी तिथे जाऊन खबर घेऊन आल्या, तेव्हा हळुहळू बातमी गल्लीभर पसरली. दिपालीने पळून जाऊन ज्याच्याशी लग्न उरकले होते, त्याने तिला सोडून पळ काढला होता. अर्थात त्याने तिला फ़सवले नव्हते. लग्नापुर्वी दिपालीला हवे ते घेऊन देण्य़ाची व महाराणीप्रमाणे सुखात ठेवण्याची शेकडो वचने अरविंदाने दिलेली होती. त्यात त्याने कुठली म्हणून कसर सोडली नाही. पहिल्या काही दिवसातच त्याने उधारी उसनवारी करून नववधूचे सर्व कोडकौतुक केले. पण जसजसे दिवस जाऊ लागले, तसतसे त्याच्या लक्षात आले. आपण कबुल केले त्याप्रमाणे दिपालीला आपण नुसत्या शब्दांची उधळण करून सुखात ठेवू शकत नाही. तिला कबुल केल्याप्रमाणे कुठलेच वचन आहे त्या परिस्थितीत पुर्ण करू शकत नाही. मग काय करायचे? दिलेले शब्द व वचने पुर करता येणार नसतील, तर दिपालीचा नवरा म्हणून त्या ‘अधिकारा’ला चिकटून बसणे ही बेईमानी नव्हे काय? अरविंद गडबडून गेला. सोनालीला त्याने ताजमहाल बांधून द्यायचे कबुल केले होते. सोन्यादागिन्यांनी मढवायचे मान्य केले होते. रोज नवी साडी व वस्त्रेप्रावरणे द्यायचे म्हटले होते. वास्तव बघितले तर घरात दोनवेळा पोट भरायला अन्न नव्हते आणि त्यासाठी कुठेतरी नोकरी करून चारपैसे मिळवायची अरविंदाची तयारी नव्हती. शिवाय बडे उद्योगपती, कारखानदार, भांडवलदार कारस्थान शिजवल्याप्रमाणे त्याला नोकरीही द्यायला तयार नव्हते. अशा सर्वांच्या कारस्थानाला बळी पडायची वेळ अरविंदावर आली आणि त्याने मनाशी निर्धार केला.
आपण दिपालीची फ़सवणूक करीत आहोत. तिचा नवरा होऊन आपण तिची हौसमौज पुर्ण करू शकत नसू, तर बायको म्हणून तिला चिकटून बसण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही. ही बेईमानी आहे. आपली नियत साफ़ असली पाहिजे. जिला आपण नवरा म्हणून दागदागिने देऊ शकत नाही, तिला रडतकुढत नुसत्या दोन वेळच्या अन्नापाण्यावर बायको म्हणून गुंतवून ठेवणे, ही शुद्ध बेईमानी आहे. बिचारी दिपाली पहिल्यापासूनच अबोल व मितभाषी. लग्नाच्या आधी विचारले, तेव्हा तिने नुसत्याच मानेने होकार दिला होता. आताही तिची अपेक्षा फ़ार मोठी नव्हती. दोनवेळ चुल पेटावी आणि ताटामध्ये पोटाची आग विझेल इतके अन्न पडावे. जे काही डोक्यावर छप्पर आहे, त्या घरात नळाला पाणी यावे आणि उजेड पडण्याइतकी वीज यावी. घ्राबाहेर पडलो तर चार पावले सुखरूप चालता येतील असा रस्ता असावा. इतकी तिची किमान अपेक्षा होती. पण तिला विचारतो कोण? सात आठवडे म्हणजे ४९ व्या दिवशी अरविंदाने निर्णय घेतला. आपण ज्या बायकोला शालू, दागदागिने देऊ शकत नाही, ताजमहाल बांधून देऊ शकत नाही, तिला चिकटून बसण्यात अर्थ नाही. त्याने परस्पर दिपालीला सोडून जाण्याचा निर्णय घेतला. आपल्या घराच्या छतावर उभा राहून त्याने आपल्य इमानदारीची त्यागपुर्ण गर्जना केली. बिचारी दिपाली निमूट उठून माघारी माहेरी आमच्या चाळीत पोहोचली आणि मुसमुसून रडते आहे. तिच्याकडे कोणी फ़िरकलेला नाही. पण इमानदार त्यागी अरविंदाचे गोडवे गायला मोठमोठे प्रतिभावंत आपली बुद्धी राबवत आहेत. इतर गल्लीबोळातल्या सोनाली, मोनाली, मिताली त्याच्या प्रेमात पडल्या आहेत. नवरा असावा, प्रियकर असावा तर असा.
गुन्हा अरविंदाचा कधीच नसतो. कुठल्याही प्रेमात फ़सलेल्या दिपालीचाच गुन्हा असतो. कधी दिपाली कुंटणखान्यात विकली जाते, कधी तिला वार्यावर सोडून जाणारे त्यागी ठरतात, त्यांची भजने होतात. त्या भजनांच्या गदारोळात दिपालीचा टाहो कोणाला ऐकू येतो?
No comments:
Post a Comment