मागला महिनाभर तरी आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आणि त्यांचे विविध सहकारी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर वाटेल तसे आरोप करीत आहेत. त्या आरोपाचे पुरावे द्यावेत अशी मागणी सहसा कोणी केली नाही. जणू मोदी यांच्या विरोधात बरळणे, हीच केजरीवाल यांना मिळणार्या अफ़ाट प्रसिद्धीची एकमेव पात्रता असावी; अशी अथक प्रसिद्धी केजरीवाल यांना देण्यात आली. ते आरोप करताना केजरीवाल यांनी वापरलेली भाषा कुठल्याही संसदीय सभ्यतेच्या मर्यादा संभाळणारी नव्हती. पण त्याबद्दल कोणी त्यांना जाब विचारला नाही. आणि क्वचितच कोणी तसा प्रयत्न केला असेल, तर आपली चुक कबुल करण्याची वा चुक सुधारण्याची कुठलीही तसदी केजरीवाल यांनी घेतली नाही. मोदीच नव्हेत तर हरियाणाचे मुख्यमंत्री भुपिंदर सिंग हुड्डा यांच्याही बाबतीत असे असभ्य शब्द केजरीवाल राजरोस वापरत राहिले. पण तेव्हाही कोणी त्यांना हटकले नाही किंवा अशी भाषा असेल तर सभ्यतेची मर्यादा पाळण्यासाठी माध्यमांनी केजरीवालांना प्रसिद्धी देण्य़ाला लगाम लावला नाही. महिनाभरापेक्षा अधिक काळ मोदी वा हुड्डा यांनी त्याकडे मर्कटलिला म्हणून साफ़ दुर्लक्ष केले होते. पण जेव्हा त्या माकडचेष्टाच राजकारणातील मोठेच आव्हान असल्याचे चित्र जाणिवपुर्वक निर्माण करण्यात आले; तेव्हा त्या प्रवृत्तीला चपराक हाणणे अगत्याचे झाले होते. अर्थात ती चपराक केवळ केजरीवालच नव्हे; तर त्यांना वारेमाप प्रसिद्दी देणार्या माध्यमांनाही बसण्याची गरज होती. जम्मू येथे प्रचारसभेला गेले असताना मोदींनी ती चपराक हाणली. त्यामुळे केजरीवाल व त्यांच्या आम आदमी पक्षापेक्षा माध्यमातलेच मुखंड विचलित झाले आहेत. आणि ते स्वाभाविक आहे.
मोदी यांनी जम्मूतील आपल्या भाषणात केजरीवाल यांच्या पार्श्वभूमीचा इतिहासच समोर ठेवला आणि त्यांच्या राजकारणाचे धागेदोरे खुलेपणाने लोकांसमोर मांडले. हे धागेदोरे जर केजरीवाल व आम आदमी पक्षाच्या देशनिष्ठेवर प्रश्नचिन्ह लावणारे असतील, तर त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करण्यात गैर ते काय? केजरीवाल कुठलेही संदिग्ध मुद्दे घेऊन मोदी देश विकायला निघाल्याचा आरोप करीत असतील, तर तोही एकप्रकारे देशद्रोहाचा आरोप असतो, त्याबद्दल कधी प्रश्न विचारला गेला नाही किंवा त्याच्या सभ्यतेवर प्रश्नचिन्ह लागलेले नव्हते. मोदींनी कुणा उद्योगपतीला गुजरातच्या जमीनी विकासासाठी दिल्या, म्हणजेच विकल्या; असा आरोप बेछूटपणे होत असेल, तर केजरीवाल तरी कितीसे वेगळे आहेत? निदान हे उद्योगपती तरी भारतीयच आहेत. केजरीवाल ज्यांच्या समर्थनाला उभे राहिलेत, त्यातले बहुतांश गुन्हेगार आरोपी देशद्रोही आणि पाकिस्तानप्रेमी घातपाती व दहशतवादी आहेत. तर त्यांना पाकिस्तानचा एजंट संबोधण्यात गैरलागू ते काय? जो निकष केजरीवाल यांनी तयार केला, त्याच निकषाच्या आधारे मोदींनी उलट आरोप केलेला आहे. अफ़जल गुरू किंवा तत्सम लोकांच्या मागे केजरीवाल किंवा त्यांचे सहकारी ठामपणे उभे राहिलेले नाहीत काय? हे आरोपी पाकिस्तानच्या भारतविरोधी कारस्थानातले भागिदार असल्याचे न्यायालयात सिद्ध झालेले नाही काय? त्यांच्याविषयी आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांची सहानुभूती लपलेली गोष्ट आहे काय? मोदींनी अंबानीचे विमान वापरले म्हणून त्या उद्योगाचे एजंट ठरत असतील; तर अफ़जल गुरूच्या फ़ाशीने दु:खी होणारे केजरीवाल पाकिस्तानचे हस्तक का होऊ शकत नाहीत? निकष व मोजपट्टी त्यांनीच तयार केली आहे, तर तिचे परिणामही भोगले पाहिजेत.
पण मजेची गोष्ट अशी, की तेच केजरीवाल आपल्यावर तसेच शब्द झेलायची पाळी आल्यावर गडबडून गेले आहेत. असे शब्द पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याने मोदींना शोभत नाहीत, असली सारवासारवी त्यांनी केली. रेलभवनच्या रस्त्यावर मुख्यमंत्र्याने उपोषणाला बसणारे केजरीवाल असतील, तर शोभादायक असते. ‘ये शिंदे कौन होता है, मुझे रोकनेवाला’ असे एकेरी उल्लेख देशाच्या गृहमंत्र्याविषयी केजरीवाल बोलतात, तेव्हा ते शोभनिय असतात. पण दुसर्या कोणी तीच भाषा ऐकवली, मग अशोभनिय होत असते. ज्यांनी असली टपोरी भाषा थेट प्रक्षेपणातून बेधडक देशभर प्रसारित केली; त्यांनाही तेव्हा ती भाषा अशोभनीय वाटलेली नव्हती. कारण मोदी शिव्याच घालण्याच्या लायकीचा असतो. कधीकाळी आपल्या देशातल्या सोवळ्याओवळ्यात असेच चालत असे. गरीब पददलिताचे पूजनीय देव मरीआई वा म्हसोबा यांची हेटाळणी शिवीसारखे शब्द म्हणून केली जात होती. पण उच्चभ्रूंची पूजनीय दैवते मात्र ‘लक्ष्मीनारायणाचा जोडा’ अशा कौतुकाच्या सूरात उच्चारली जात होती. हाच फ़रक इथेही व आजही दिसून येतो. आजच्या राजकीय पंडीत सेक्युलरांचा केजरीवाल लाडका आहे. त्यामुळेच त्याने कुणाचा अपमान करावा, कुणाला अपशब्द वापरावेत, ती सुसंस्कृत भाषा असते. आणि त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आणि देणारा मोदी असेल, तर भाषा लगेच विटाळली जाते. कोण म्हणतो, आपल्या देशात समता समभाव आलेला आहे? मुद्दा तोच तर आहे. मोदींनी महिनाभर ही अवहेलना सोसली आणि अतिरेक होतोय म्हटल्यावर उलटा जोडा हाणला. म्हणूनच केजरीवालपेक्षा त्याच्या बेताल बडबडीला प्राधान्य देणार्या माध्यमांना मोदींची भाषा अधिक झोंबली आहे. यालाच सौ सोनारकी एक लोहारकी म्हणतात ना?
No comments:
Post a Comment