Thursday, August 14, 2014

मनात नाही इच्छा, घागर उताणी रे गोपाळा



   दहीहंडी हा मुळातच सण म्हणता येणार नाही. गोकुळष्टमीच्या निमित्ताने हौस म्हणून काही लोकांच्या पुढाकाराने सुरू झालेला हा खेळ, अलिकडल्या काळात राजकारण्याच्या बाजारू वृत्तीचा बळी झाला. मुंबई व तिथल्या चाकरमानी लोकांची ही हौस होती. मुंबईच्या कष्टकरी वस्तीतल्या व्यायामशाळांतील धडधाकट लोकांना त्यांच्या शरीरसौष्ठवाचे प्रदर्शन करण्याची संधी, असे या खेळाचे स्वरूप होते. पन्नास वर्षापुर्वी अशा हंड्या फ़ोडायला फ़िरणार्‍या गोविंदांची पथके, ही प्रामुख्याने व्यायामशाळांचीच असायची. आपापल्या विभागातली इतर सामाजिक सांकृतिक मंडळे कुणा शेठजीला हाताशी धरून वा वर्गणी काढून, त्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस म्हणून काही रक्कम हंडीला जोडायची. साधारण तीनचार थरापर्यंत मनोरा बनवून हंडी फ़ोडायचा हा खेळ असायचा. दोन चाळीच्या मधल्या बोळात अशा हंड्या बांधल्या जात आणि गोविंदा पथके त्या फ़ोडायला फ़िरत असत. त्यात शौर्य व धाडसाला प्राधान्य असायचे. गोविंदा मंडळ असा कुठलाही प्रकारच नव्हता. साधारण दुसर्‍या मजल्याच्या उंचीवर बांधलेली हंडी खुप उंच मानली जायची. कारण तेवढी उंची गाठायलाच पाच सहापेक्षा अधिक थर लावावे लागत. त्यातल्या बक्षीसाच्या रकमेला कुठले महत्व नसायचे. तर थर लावण्याच्या धाडसाला प्रोत्साहन असायचे. असे गोविंदा गल्लीबोळात फ़िरायचे आणि लोकांनी आपापल्या चाळीतून त्यांच्यावर कळशी बादलीतून पाणी ओतून त्यांना भिजवायचे, असे त्या खेळाला सार्वजनिक सामुहिक स्वरूप यायचे. जिथे पाणी ओतायची कंजूषी व्हायची, तिथे गोविंदाही रहिवासी बघ्यांना खिजवत ‘घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा’ अशी खिल्ली उडवायचे. तो खरा गोविंदाचा खेळ होता. आज त्यातली ती मौज कितीशी शिल्लक उरली आहे? आता मजा बाजूला पडली आहे आणि त्यात नको इतका जीवघेणेपणा आलेला आहे.

पंचवीस तीस वर्षापुर्वी या खेळाला अनेक बाजूंनी विकृती चिकटत गेल्या. आधी अशा हंडीला अधिकाधिक रोख रकमेची बक्षीसे लावून त्याला जुगारी रंग चढवला गेला. गोविंदा पथके रस्त्याने नाचत भिजत परिसरात फ़िरायचे बाजूला पडले आणि त्यांना दूरचे पल्ले व हंड्या शोधण्यासाठी गाड्या आवश्यक भासू लागल्या. मग ट्रक वा बसमधून गोविंदा दौरे करू लागले. त्याच दरम्यान थरावर थर चढणार्‍यांना त्यांची कसरत करू देण्यापेक्षा, तेव्हाच विचलीत करण्याचा हिणकस प्रकार सुरू झाला. कळशी वा बादलीतून त्यांच्यावर पाणी ओतणे मागे पडले आणि प्लास्टीकच्या पिशव्या वा फ़ुग्यात भरलेल्या पाण्याचा मारा सुरू झाला. गोविंदाचा आडोसा घेऊन रस्त्यावरून जाणार्‍या पादचारी नागरिकांवर पाण्याचे रंगाचे फ़ुगे फ़ेकण्याचा भलताच हिडीस रंग त्याला येत गेला. हंडी फ़ोडायला थर लावणार्‍यांचे अंग ओले आणि त्यात खांद्यावर उभे रहाणार्‍यांचे पाय घसरणे अपरिहार्य. अशावेळी त्यांचे लक्ष आपल्या मनोर्‍यावर केंद्रीत असायला हवे. तर भोवताली जमलेले लोक वा इमारतीतून गंमत बघायला गर्दी केलेले बघ्ये त्यांच्यावर अशा फ़ुग्यातून पाणी फ़ेकू लागल्याने, दोनतीन थर लागतानाच कोसळण्याला घातक स्वरूप त्याला येत गेले. जणू त्यांनी हंडी फ़ोडायची म्हणजे आपल्या जीवाची बाजी लावायची असते, असा काहीसा समज तयार होत गेला. अशा पथकांनी थरावर थर उभे करायचे आणि तिथे जमलेल्या प्रेक्षकांनी व्यत्यय आणून त्याला अधिक जीवघेणा प्रकार करायचा, असा बदल होत गेला. त्यात कसरत, कौशल्य व धाडसाला संधी देण्याचा मूळ हेतू कुठल्या कुठे हरवून गेला. जुन्या ग्रीक पुराणात जश्या चवताळलेल्या श्वापदासमोर माणसाला सोडून द्यायचे हिंस्र खेळ व्हायचे आणि सभोवार प्रेक्षागारात बसलेला जनसमुदाय पाशवी आनंद घेत, त्या जीवघेण्या खेळाची अमानुष मौज लुटायचा, तसे दहीहंडीसे स्वरूप होत गेले.

आज दहीहंडी आपण बघतो तिने पुर्णपणे त्या अमानुष पाशवी खेळाचे रुप धारण केलेले आहे. तिथे पकडून आणलेले कैदी वा शत्रू सैनिकांना श्वापदापुढे फ़ेकले जायचे. इथे पैसे व त्यातली मोठमोठ्या रकमेची बक्षीसे तरूणांना वा हिंमतबाजांना आखाड्यात ओढून आणतात. काही ठिकाणी कुणा नेत्याच्या प्रतिष्ठेसाठी मंडळे उभी राहुन असे गोविंदा निर्माण झालेत. पौगंडावस्थेत अंगात मस्ती असते आणि जगाला गुंडाळून ठेवण्याची नवी उर्मी मनापासून शरीरात उसळी मारत असते. तेव्हा ‘काही तरी तुफ़ानी करूया’ असे प्रत्येकाला वाटत असते. देहात तेवढी ताकद वा मनात तेवढी हिंमत नसली, तरी अशा उर्मी जमावात उसळी मारून बाहेर येतात. उंदराचाही सिंह व्हावा असा कालखंड असतो. त्यांना कोणीतरी पुढे ढकलायची प्रतिक्षा असते. अशा लोकांना आपल्या राजकीय प्रतिष्ठेसाठी पदरमोड करणारा कोणी भांडवलदार हवा असतो. ती जबाबदारी उचलणारे उपटसुंभ नेते गल्लीबोळात उदयास आले आणि अग दहीहंडी नावाचा गल्लीतला एक साधा खेळ, मोठा उत्सव बनून गेला. त्याचा राजकीय लाभ ओळखून मग अनेक नेते त्यात उतरले आणि अमानुषतेने कळस गाठला. त्यात आयुष्यातून कायमचे उठणार्‍यांचा टाहो कोणाच्या कानी कसा पडायचा? हीच जगरहाटी आहे. मग ती अमानुषता दहीहंडीच्या बाबतीतली असो किंवा मेणबत्त्या पेटवून कुठल्या समभावी समविचारी खुळेपणाचे पाखंड माजवणारी असो. इथे उंचीवरून कोसळणार्‍या व त्यात जखमी होणार्‍याची कुणाला फ़िकीर नाही. तर मानवतावादाच्या आहारी जाऊन ‘अमन की आशा’ नावाचा होणारा खेळ सारखाच असतो. तिथे तुकाराम ओंबळे कशामुळे मारला जातो? दोन्हीकडले धोके आपापल्या समजूतीचा अटटाहास चालवण्यातून होत असतात. जितकी अमानुषता उंच हंडीच्या हट्टापायी पोसली जाते, तितकीच अमानुषता मानवी हक्काच्या नावाखाली जिहाद पोसण्यातूनही चालूच असते.

कोणाची अमानुषता आहे त्यानुसार त्याचे समर्थक व विरोधक यांची विभागणी होत असते. आज दहीहंडीच्या विरोधात तावातावाने बंदीच्या मागणीचे समर्थन करणारे जिहाद दहशतवादाचे बळी पडतात, तेव्हा मैदानात येतात काय? रझा अकादमीच्या धिंगाण्यानंतर यातले किती लोक त्या महिला पोलिसांच्या बेअब्रू वा जाळपोळीची चिंता करीत अशा मेळाव्यांवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी पुढे सरसावले होते? थोडक्यात आपली सगळी माणुसकी वा हळवेपणा आपापल्या समजुती व पुर्वग्रहाच्या आधारावर कार्यरत होत असतात. जिथे आपल्या समजूती लोकांच्या जीवाशी खेळणार्‍या असतात, तिथे आपल्या जाणिवा व संवेदना सुप्तावस्थेत जात असतात. मातम नावाचा प्रकार चालतो, तेव्हा कोवळ्या वयातली शिया पंथीय मुले स्वत:लाच रक्तबंबाळ करून घेण्यार्‍या जखमा सोसत मिरवणूका काढतात. त्याची यापैकी कितीजणांनी दखल घेतली आहे? कोणी त्यासाठी कोर्टात वा बालकल्याण मंत्रालयाकडे धावल्याचे आपल्या कानावर आले आहे काय? मानवी मनोर्‍याच्या उंचीबाबत घसा कोरडा होईपर्यंत बोलणार्‍या एकाला तरी त्या मनोर्‍यावर फ़ेकले जाणारे पाण्याचे फ़ुगे जीवघेणे अस्त्र असते, याची आठवण तरी आहे काय? त्या फ़ुग्यांवर बंदीची मागणी एकानेही केलेली नाही. कारण दहीहंडी समर्थक वा विरोधक यापैकी कोणाला त्या मनोर्‍यासाठी वापरल्या जाणार्‍या बालकांच्या सुरक्षेची फ़िकीर नाही, की कदर नाही. त्यांना आपापल्या समजूती व अट्टाहासाची प्रतिष्ठा अधिक मोलाची आहे. त्यातून आपल्या भूमिकेची बाजी मारण्याची ही शर्यत आहे. त्यासाठी दहीहंडी हे एक निमीत्त झाले इतकेच. जितके यातले आयोजक राजकारणी स्वार्थी आहेत, तितकेच त्यातले विरोधक मतलबी आहेत. गोविंदाच्या जुन्या गाण्याच्या चालीवर म्हणायचे तर ‘त्यांच्या मनात नाही इच्छा, घागर उताणी रे गोपाळा’

1 comment:

  1. भाऊ, नेहमी सारखेच वेगळे काहीतरी वाचायला मिळाले. दोन्ही बाजुंचा योग्य समाचार आपण घेतला आहे.

    ReplyDelete