Wednesday, August 6, 2014

नरेंद्र मोदींचा खोटारडेपणा पकडला



   छे छे, ज्य़ू नावाचा कोणी अस्तित्वात नसेल तर तो अस्तित्वात आहे असे दाखवावे लागेल. खरा ज्यू नसेल तर काल्पनिक ज्य़ु तरी हवाच. चळवळ उभी करायची असेल तर ज्याचा द्वेष करावासा वाटेल, ज्याच्या नावाने द्वेषाची चिथावणी देता येईल, असा कोणीतरी हाडामासाचा खराखुरा शत्रू आवश्यक असतो. असा खरा शत्रू नसेल तर लोकांना चिथावता येत नाही. केवळ अमूर्त कल्पना पुढे करून ती गोष्ट साध्य होत नाही. (हर्मान रॉशनिंग यांच्या ‘हिटलर स्पिक्स’ पुस्तकातून)

   मोदी विरोधक किंवा सेक्युलर विचारधारेने भारावलेल्यांची नेमकी अशीच मानसिकता असते, याचा वारंवार अनुभव येत असतो. वर्षभरापुर्वी अशीच संततधार पावसाची वेळ होती आणि त्यात ढगफ़ुटीने उत्तराखंडात हाहा:कार उडवला होता. त्यावेळी कुठल्या बैठकीसाठी दिल्लीला आलेल्या मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्या नैसर्गिक संकटात फ़सलेल्या गुजराती बांधवांना सोडवायला तिकडे धाव घेतली होती. तेव्हाचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोदींना घटनास्थळी जाण्याची परवानगी नाकारली होती. पण मोदी तिकडे गेले आणि फ़सलेल्या गुजराती नागरिकांना मदत देण्याची जबाबदारी त्यांनी आपल्यापरीने पार पाडली होती. मात्र त्याविषयी त्यांनी वा त्यांच्या पक्षाने कुठली बातमी प्रसिद्ध केली नाही. पण मोदींनी पंधरा हजार गुजराती पर्यटकांना एका दिवसात सोडवल्याची एक बातमी टाईम्स वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आणि त्यावरून गदारोळ सुरू झाला. मोदींना थापाड्या ठरवण्यापासून राम्बो अशी त्यांची हेटाळणी करण्यापर्यंत जाणत्यांचीही मजल गेली होती. मोदी फ़ुकटचे श्रेय लुबाडतात वा प्रसिद्धीसाठी वाटेल त्या थापा मारतात, असे खापर फ़ोडण्याची स्पर्धाच चालली. अखेर त्या बेशरमपणाला कंटाळून मूळ बातमी देणार्‍या टाईम्सच्या बातमीदारानेच ही ‘टाईम्स’ची थापेबाजी असल्याचा खुलासा केला होता. मूळ बातमी मोदी वा त्यांच्या पक्षाने दिली नव्हती, की खुलासाही त्यांचा नव्हता. खुलासा टाईम्सचा होता. त्यातून हिटलरचे वारस व वंशज कुठल्या टोळ्या करून आपल्यात वावरतात त्याचा पत्ता लागू शकतो. वर्षभरापुर्वीच्या त्या खोटारडेपणाची आज आठवण एवढ्यासाठी आली, की गेला आठवडाभर त्याच ‘जाती’चा नवा खोटारडेपणा तेजीत चालला आहे. वृत्तपत्रापासून सोशल मीडियामध्ये सार्वत्रिकपणे चालू आहे. नेपाळ दौर्‍यावर गेलेल्या मोदींनी जीतबहादूर नावाच्या कित्येक वर्षापुर्वी हरवलेल्या मुलाला त्याच्या कुटुंबाशी भेटवल्याची ती बातमी आहे.

   शनिवार रविवारी ही बातमी अनेक वाहिन्या रंगवून सांगत व दाखवत होत्या. काही वृत्तपत्रांनीही त्याला वारेमाप प्रसिद्धी दिली होती. त्यात त्या मुलाच्या मुलाखतीही दाखवल्या जात होत्या. हा मुलगा दहा बारा वर्षापुर्वी भावासोबत नेपाळहून भारतात आला आणि हरवला. भरकटत तो अहमदाबादला पोहोचला. तिथे त्या किशोरवयीन मुलाला कुणीतरी मोदींना भेटवले आणि तो त्यांच्याच सोबत राहू लागला. पुढे नेपाळच्या एका व्यापार्‍याशी मोदींची ओळख झाली आणि त्यांच्या करवी मोदींनी त्याच अनाथ मुलाच्या कुटुंबियांचा शोध लावला. त्याची ओळखही पटवली. पण दरम्यान तो मुलगा गुजरातमध्ये स्थायिक झाला होता, शिकतही होता. म्हणूनच कुटुंबियांचा शोध लागल्यावर मायदेशी जाऊन परतला होता. आपले शिक्षण त्याने पुर्ण करावे आणि त्याला इतकी मदत केलेल्या मोदींनाच तो मुलगा दत्तक दिल्याचे त्याच्या आईने सांगून टाकलेले होते. त्यामुळे कुटुंबाला भेटून जीतबहादूर माघारी परतला होता. इकडे त्याला आसरा देणारे मोदी देशाचे पंतप्रधान झाले होते आणि त्यांना नेपाळला भेट द्यायची होती. तीच संधी साधून जीतबहादूरच्या कुटुंबाला भेटावे अशी इच्छा मोदींनी बाळगली. त्याप्रमाणे त्यांनी नेपाळ दौर्‍याच्या वेळी त्याला सोबत यायचा आग्रह धरला. काठमांडूत त्याच्या कुटुंबाला भेटायला बोलावून घेतले. पण ज्यांना नुसतीच सनसनाटी माजवायची असते, त्या माध्यमांनी मोदी त्या मुलाला प्रथमच कुटुंबाला भेटवणार अशी अतिशयोक्ती केली. म्हणजे हरवलेला जीतबहादूर प्रथमच नेपाळला चाललाय हा जावईशोध माध्यमांचा होता. आणि ती आपली थाप आता माध्यमांनी मोदींच्या गळ्यात बांधली असून जी्तबहादूर आधीच कुटुंबाला भेटला असल्याचा शोध लावला आहे. सहाजिकच भेट घडवून आणायचा ‘मोदींचा दावा’ खोटा पाडायची स्पर्धा सुरू झाली आहे. हरकत नाही. पण मुळात तसा दावा मोदींनी कधी व कुठे केला होता?

   हिटलर म्हणतो, तसा खरा नसेल तर खोटा ज्य़ु तरी निर्माण करायचा असतो. त्याचप्रमाणे मोदींच्या विरोधात कुठला पुरावा नसेल, तर आपणच कंड्या पिकवायच्या असतात आणि मग त्याच खोट्या असल्याचा टाहो सुद्धा आपणच फ़ोडायचा असतो. त्याला सेक्युलर प्रेरणा म्हणतात. मुद्दा जीतबहादूर आपल्या कुटुंबाला भेटण्याचा नसून एका अनाथ हरवल्या मुलाला आश्रय देऊन त्याच्या पायावर उभे करण्याचा आहे. दहा वर्षापुर्वी भेटलेल्या त्या मुलाला आयुष्यात उभे करायचे श्रेय कुणाचे आहे? नुसत्या सुविधा त्याला पुरवल्या नाहीत, तर पाठपुरावा करून त्याच्या जीवनाला मोदींनी आकार दिलेला आहे. मात्र दहा वर्षात त्याचा कुठे गवगवा केला नाही, की झाला नाही. इतकेच नाही, आज देशातली सर्वात महत्वाची व्यक्ती झाल्यावरही त्या मुलाशी असलेले नाते मोदी विसरलेले नाहीत. नेपाळला जाणार म्हटल्यावर पंतप्रधान झालेल्या मोदींना जीतबहादूर आठवतो हे महत्वाचे असते. त्याला सोबत नेऊन त्याच्या कुटुंबाला भेटायची आस्था मोलाची असते. अर्थात त्याला माणूसकी म्हणतात, ती ओळखण्यासाठी मानवी संवेदनशीलता आवश्यक असते. सेक्युलर असलात, मग मानवी भावनांशी खेळ करून लाभ उठवायचे असतात. मोदींना नेमके तेच आजवर जमलेले नाही. म्हणून तो मानवतेचा सर्वात मोठा शत्रू आहे. उलट कलावती नावाच्या महिलेच्या दु:ख, दैन्य, वेदना व यातनांचे राजकीय भांडवल करणारे राहुल गांधी सेक्युलर महापुरूष असतात. कारण त्यांना मुडद्याच्या टाळूवरचे लोणी खाता येते आणि चितेवर आपल्या पोळ्या भाजून घेता येतात. कलावती ही विदर्भात आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याची पत्नी. तिच्या घरी एक रात्र मुक्काम करून राहुल गांधींनी किती प्रसिद्धी मिळवली? तिच्या नावाने मतांचा कुठे कुठे जोगवा मागितला? पण सत्ता मिळाल्यावर त्यांना कलावती हे नाव तरी लक्षात राहिले काय? याला सेक्युलर संवेदशीलता म्हणतात.



   २००९ सालात कलावतीच्या घरी जाऊन राहुल गांधी यांनी अश्रू ढाळण्याचे अप्रतिम नाटक रंगवले होते. त्यातून तिच्या दु:खात सहभागी झालेल्या राहुलनी तिचे कोणते कोटकल्याण केले? तर अवघ्या वर्षभरात त्याच कलावतीच्या जावयाला शेती बुडाली म्हणून आत्महत्या करावी लागली. थोडक्यात कलावतीच्या मुलीलाही विधवा व्हायची पाळी आली. काही महिन्यात मुलीनेही आत्महत्या केली. याला सेक्युलर सहृदयता म्हणतात. जिथे मोदी अत्यंत उलट्या काळजाचा माणुस आहे. त्याने जीतबहादूर या एका अनाथ अनोळखी मुलाच्या आयुष्याचे कल्याण केले आणि त्याचे सर्व नातेसंबंध लक्षात ठेवून कुटुंबाचीही संधी मिळताच भेट घेतली. यासारखा भंपकपणा दुसरा असू शकतो काय? प्रामाणिकपणा त्याला म्हणतात, जो राहुल गांधींनी केला. प्रसिद्धीसाठी कलावतीच्या झोपडीत मुक्काम ठोकला आणि तिच्या मळकट कपड्यातल्या नातवंडांना मांडीवर घेऊन फ़ोटो काढले व त्यांच्याच नावाने मतांचा जोगवा मागितला. तेवढा हेतू साध्य झाल्यावर अशा कलावती व त्यांचे कुटुंब मेले की तडफ़डले; याकडे ढुंकून बघायचे नाही, म्हणजे प्रामाणिक जनसेवा असते. मोदींना हे कधीच कळणार नाही. त्यामुळे मोदी हा माणुस कधीच सेक्युलर व पुरोगामी होऊ शकणार नाही. होऊही नये, असेच जीतबहादूर वा त्याचे कुटुंबीय म्हणतील. जीतबहादूरचा अनुभव कळला, तर कलावतीही तेच म्हणेल. जीतबहादूर पहिल्यांदाच आपल्या कुटुंबाला भेटला किंवा कसे यावर शब्दच्छल करणार्‍यांना कलावती आठवली का? त्यापैकी कितीजणांना कलावतीची आजची अवस्था माहिती आहे? ती माहिती मिळवावी, असे त्यांना वाटलेही नाही. कारण हे सगळे सेक्युलर लोक वास्तवात हिटलरचे वंशज वारस असतात. त्यांना खर्‍या वेदना, यातना, दु:ख वा समस्यांशी कर्तव्यच नसते. त्यांना खोट्या काल्पनिक भ्रमात जगणे व वावरणे त्यांना खुप भावते. त्यांना जीतबहादूर आणि कलावती यातले साधर्म्य शोधायची इच्छा तरी कशी होईल? खोट्यातच जगणार्‍या भ्रमिष्टांना खर्‍याची, वास्तवाची व सत्याची अलर्जी असणारच ना? त्यांनी मोदींच्या खोटेपणाचे प्रमाणपत्र दिल्यावर मोदींना सत्यवचनी ठरवायची गरज तरी उरते काय?

8 comments:

  1. भाऊ, खरेच सांगतो हे सगळे वाचून डोळ्यातून अश्रु वहायला लागले. धन्य आहे तुमची पत्रकारिता !

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. हे सगळे ठीक आहे पण, अतिरेकी सोडणार्‍याला भारत-रत्न पुरस्कार कसा काय मिळू शकतो ?
    (अभिमन्यू यशवंत अळतेकर , अपेक्षाभंग सोसणारा भूतपूर्व संघ स्वयंसेवक)

    ReplyDelete
    Replies
    1. Atireki sodun denya maage kiti politics khelave laagle asel hyachi kalpana sudhdha karvat nahi. eki kade tya atirekyala tithech chechun takaychi ichcha ani dusri kade aapleech janata kahi mooth bhar lokaan chya jeeva sathi netyaan kade ghalnaae saakde. Kunache aiku? kay karu?

      Delete
  4. भाऊ सुंदर अप्रतिम अवर्णनीय

    ReplyDelete
  5. Narendra Modi is most honest devoted loyal person to this nation. And this need not any certificate especially by the corrupt congress. He should continue to implement his ideals for the development of the nation. I personally think that he is most illegible person to feel the pulse of the people for their betterment.

    ReplyDelete