Thursday, August 7, 2014

मोदी सरकारसाठी राहुल विमायोजना



बुधवारी अकस्मात राहुल गांधी यांनी लोकसभेत आक्रमक पवित्रा घेतला, त्यामुळे अनेकांची झोप उडाली आहे. कारण आपल्या संसदपटूत्वाला विसरून राहुल थेट सभापतींच्या दिशेने धावले आणि त्यांनी आपल्या पक्षाच्या खासदारांसमवेत गोंधळ घातला. कुठल्याही पक्षाचा मोठा नेता कधी संसदेच्या सभागॄहात अशी वर्तणूक करत नाही. राहुल यांनी संसदेत याप्रकारे वागणे योग्य की अयोग्य; त्यावर मग जाणत्यांमध्ये खुप चर्चा झाली व चालू आहे. ज्या माणसावर ऐतिहासिक जबाबदारी असते त्याने लोक काय म्हणतात, त्याची दखल घेऊन आपले वर्तन बदलण्याचे अजिबात कारण नसते. म्हणूनच बाहेर कोणी कितीही संसदीय कामकाज पद्धतीचे रिवाजांचे शहाणपण शिकवले, म्हणून राहुलनी गडबडून जाण्याचे कारण नाही. त्यानी असाच आक्रमकपणा दाखवणे चालू ठेवावे. गेली दोनतीन वर्षे राहुलनी जी ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे, तिच्याअभावी भाजपा किंवा मोदींना इतके मोठे यश मिळवता आले असते काय? देशात प्रथमच लोकसभेत एका बिगर कॉग्रेसी पक्षाला संपुर्ण बहूमत मिळाले आहे. जनता पक्ष वा जनता दल, अशा अनेक पक्षांच्या विलीनीकरणाने झालेल्या कडबोळ्यालाही तितके यश मिळवता आलेले नव्हते. गेल्या दहा वर्षात खुद्द कॉग्रेसलाही एकपक्षीय बहूमताचा पल्ला गाठता आलेला नव्हता. आठ निवडणूकांनंतर स्पष्ट बहूमताचा हा चमत्कार घडला, त्याचे श्रेय तमाम लोक मोदींच्या गळ्यात घालतात, यासारखा राहुल गांधींवर अन्याय असू शकत नाही. समजा राहुल यांच्या हाती कॉग्रेस व पर्यायाने युपीएच्या निर्णयांची सुत्रे नसती, तर मोदींना इतके प्रचंड यश मिळू शकले असते काय? मोदीभक्त वा त्यांचे विरोधक अशा सर्वांनी जरा गंभीरपणे या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची गरज आहे. मग पक्षात येईल, की मोदींनी अफ़ाट प्रयास केले असतील व मेहनत घेतली असेल, पण त्यांच्या यशाला पोषक परिस्थिती निर्माण करण्याचे महत्वपुर्ण काम राहूलनी पार पाडलेले दिसेल.

   २००९ नंतर कॉग्रेसचे बळ वाढले होते आणि भाजपाचे नेतेही मरगळलेले होते. सोनियांनी समर्थपणे विरोधकांना सेक्युलर जाळ्यात ओढून निष्क्रीय केलेले होते. अशावेळी कॉग्रेस विरोधी राजकारणाला कुठेही डोके वर काढायला जागाच शिल्लक उरलेली नव्हती. मनमोहन सिंग यशस्वी पंतप्रधान ठरलेले होते. अशावेळी तेच राजकीय समिकरण चालू राहिले असते, तर मोदींनी कितीही प्रयत्न करून त्यांना पंतप्रधान होता आले नसते. त्यासाठी मनमोहन सिंग व कॉग्रेस पक्षाची प्रतिष्ठा व पत धुळीला मिळवण्याची महत्वपुर्ण कामगिरी कोणीतरी पार पाडायला हवी होती. तीन वर्षापुर्वी राहुलनी तेच काम हाती घेतले. आधी राहुलनी विस्कळीत कॉग्रेस संघटित करायचा पवित्रा घेऊन, मातेने जोडलेल्या सेक्युलर मुर्ख पक्षांना कॉग्रेसपासून दूर करण्याचे मोक्याचे कर्तव्य पार पाडले. त्यांनी बिहारमध्ये लालू पासवान यांना सोनियांपासून तोडले. त्या एकाच फ़टक्यात तिथे भाजपाच्या विरोधातले समिकरण निकालात काढले. लालू-पासवान-कॉग्रेस एकत्र असते, तर नितीश भाजपाला इतके मोठे यश मिळू शकले नसते. त्या एका खेळीतून लालू पासवानसह कॉग्रेस नामोहरम होऊन गेली. मग राहुलनी उत्तरप्रदेशातील भाजपा विरोधी शक्तींचे कंबरडे मोडायची जबाबदारी हाती घेऊन तिथे मुलायम-मायावती-कॉग्रेस यांना विस्कळीत करून टाकले. भाजपा व मोदींच्या आगमनासाठी या दोन राज्यातले भाजपा विरोधी नेते खच्ची व्हायची गरज होती. ते काम राहुलने लिलया एकहाती पुर्ण करून दिले. त्यासाठी आधी भट्टा परसोलचे नाटक रंगवून मायावतींना बदनाम केले आणि नंतर मुझफ़्फ़रनगर दंगलीमुळे विचलीत झालेली मुस्लिम मुले पाक हेरांच्या संपर्कात असल्याचे सांगून, कॉग्रेसची मुस्लिमांशी असलेली नाळ पुरती तोडून टाकली. नंतर बाकीच्या उत्तर भारतात कॉग्रेस निकामी करण्याची सुसुत्र मोहीम राबवली. त्याचे श्रेय मोदींना घेऊन चालेल काय?

   गेल्या दोन वर्षात राहुल गांधी यांनी कॉग्रेस पक्षाला जितके म्हणून हास्यास्पद व नामोहरम करणे शक्य होते, तितके करायचे काम अत्यंत निष्ठेने पार पाडले नसते; तर मोदींना मरगळल्या कॉग्रेसवर इतका प्रभावी राजकीय हल्ला चढवणे शक्यच झाले नसते. म्हणूनच मिळालेल्या यशाने भाजपावरही चकीत व्हायची पाळी आली. उलट निकालाच्या दिवशी राहुल-सोनिया कॅमेरासमोर आले आणि त्यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारली. तेव्हाही राहुलच्या चेहर्‍यावरचे समाधान लपले होते काय? आपण ऐतिहासिक कामगिरी बजावली आणि कॉग्रेस विरोधी पक्ष म्हणूनही शिल्लक रहाणार नाही, इतकी परिस्थिती निर्माण केल्याचा आनंद राहुल लपवू शकले नव्हते. पण अर्थातच त्यांचे अजून समाधान झालेले नाही. कारण कॉग्रेसची जी आज अवस्था आहे, त्यातून तो पक्ष सावरण्याची शक्यता कोणी नाकारू शकत नाही. म्हणजेच कॉग्रेसमुक्त भारत हे उद्दीष्ट अजून राहुल साध्य करू शकलेले नाहीत. म्हणूनच त्यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारली तरी पक्ष नामशेष होत असल्याची जबाबदारी स्विकारलेली नाही. अजून ते ऐतिहासिक काम आपल्याकडून पुर्ण झालेले नसल्याची प्रामाणिक जाणिव त्यांना आहे. म्हणूनच दोन महिन्याची विश्रांती संपताच त्यांनी बुधवारी नव्याने आक्रमक पवित्रा घेऊन पुढली पावले उचलली आहेत. लोकसभेत त्यांनी कारण नसताना ज्याप्रकारे सभापतींच्या आसनाकडे धाव घेतली व नंतर बाहेर सभापतींवर पक्षपाताचा आरोप केला, त्यातून त्यांचे अगत्य आपण सहज बघू शकतो. मात्र राहुल समर्थक मंडळींना त्यातही त्यांचा आक्रमकपणा दिसतो आहे. संदर्भहीन वागण्याने पक्षाची शतकाहून अधिक मोठी प्रतिष्ठा धुळीस मिळते, याची राहुलना फ़िकीर नाहीच. पण त्यांच्या समर्थकांना तरी कितीशी फ़िकीर आहे? सगळेच मिळून कॉग्रेस संपवण्याच्या कार्यक्रमात झोकून दिल्यासारखे वागताना दिसत नाहीत काय?

   अशावेळी भाजपा वा मोदींनी काय करावे? इतिहासातील सर्वात धुर्त सेनानी मानला गेलेला नेपोलियन बोनापार्ट म्हणतो, ‘शत्रू आत्महत्या करीत असेल, तर त्यात आपण हस्तक्षेप करू नये.’ मोदींनी मागल्या दोन वर्षात नेमके तेच केले. त्यांनी राहुल यांनी कॉग्रेस नामशेष करण्याची जी मोहीम हाती घेतली होती, त्यात अजिबात हस्तक्षेप केला नाही. त्याचे परिणाम लोकसभा निवडणूक निकालांनी दाखवले आहेतच. पण त्याच नेपोलियनची आणखी एक शिकवण आहे. मोदी त्याचेही अगत्यपुर्वक पालन करताना दिसतात. ‘शत्रूशी सातत्याने लढाई करू नये, अन्यथा त्याला आपले सगळेच डावपेच उमगतात आणि त्याला पराभूत करणे अशक्य होऊन जाते.’ निकाल लागून सत्ता मिळाल्यापासून मोदींनी लढावूपणा गुंडाळून ठेवला आहे. पण पराभूत होऊनही राहुल वा त्यांचे कॉग्रेस समर्थक मात्र तेच तेच डावपेच योजून मोदींशी लढतच आहेत. परिणामी मोदींना हरवण्यासारखी कुठलीच खेळी त्यांच्यापाशी शिल्लक उरलेली नाही. मात्र राहुल गांधी व त्यांचे पाठीराखे स्वत:च्या मुर्खपणावर भलतेच खुश आहेत. त्यातून ते अधिकच मुर्खपणा करीत सुटले आहेत. बुधवारी लोकसभेत राहुलनी दाखवलेली ‘आक्रमकता’ त्याच मुर्खपणाचा उत्तम नमूना होता. तो भाजपा व मोदी यांच्यासाठी लाभदायक ठरणार असेल, तर त्यांनी त्यात हस्तक्षेप कशाला करावा? दुर्दैव इतकेच, की जे मोदींना उमगले आहे, ते त्यांच्या भक्त समर्थकांना कळलेले नाही. म्हणून मोदींपेक्षा त्यांचे समर्थकच राहुलच्या आक्रमकतेने विचलीत होत आहेत. राहुलनी शहाण्यासारखे वागावे आणि मोदींच्या राजकीय वाटचालीत आव्हान उभे करावे; असे मोदी समर्थकांना वाटते काय? मला तसे वाटते कारण मी मोदी समर्थक असण्यापेक्षा लोकशाहीभक्त आहे आणि त्यात सत्ताधारी व विरोधक तुल्यबळ असावेत अशी माझी इच्छा असते. दुर्दैवाने राहुल वा मोदी अशा दोन्ही गोटात त्याचा अभाव जाणवतो. मात्र राहुल यांचे राजकारण ही निष्ठा नसून छंद आहे. म्हणूनच त्यांच्याकडून राजकीय शहाणपणाची अपेक्षा करता येत नाही. किंबहूना राहुलचे कॉग्रेस नेतृत्व हाच मोदीसत्तेसाठी सर्वात मोठा विमा आहे.

1 comment:

  1. भाऊ आपण अत्यंत परखड विश्लेषण केले आहे. राहूल बाबांच्या एवढ्या चूका झाल्यातरी माध्यमांतील काही मंडळी अजूनही त्यांचा उदोउदो करण्यात गर्क आहेत. ७ ऑगस्टच्या मटामधील बातमी बघा.....

    'सरकारविरोधात राहुल पुन्हा आक्रमक' (front Page -2)

    राहुल आक्रमक झाले म्हणजे काय तर विरोधी पक्षांबरोबर तेही संसदेत वेलमधे उतरले.

    बातमीत आणखी लिहले आहे की 'महिनाभरापूर्वी महागाईच्या मुद्दयावर सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी राहुल सभागृहाच्या मध्यभागी पोहचले होते.'

    भाऊ आता याला 'आक्रमकपणा' म्हणता येईल काय? वेलमधे उतरणे म्हणजे आक्रमकपणा ? नशीबकी वेलमधे उतरून गोंधळ घातला हे लिहले नाही.

    वरील बातमी शिवाय बाजुलाच वेगळा रंग देवून (ठळकपणा येण्यासाठी) राहुल आणि जेटली संसदेबाहेर पत्रकारांशी काय बोलले ते लिहले आहे.

    'राहुल यांचे आरोप जेटलींचा पलटवार'

    'संसदेत एकाच व्यक्तीची किंमत उरली आहे असे वाटते, असा टोला संसद भवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधींनी मोदींना लगावला'

    आता मटा जेटलीबद्दल काय म्हणतो बघा..
    'राजप्रसादात तख़्त पालटण्याच्या भीतीमुळे आणि घरात उद्भवलेल्या समस्यांवरून लक्ष उडविण्यासाठी राहुल गांधी लोकसभेत आक्रमक झाल्याची टीका अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली'

    आता टोला कोणी लगावला आणि टीका कोणी केली हे वाचकांना कळत नाही का? राहुल जसा काँग्रेसला संपवयाला निघालाय त्याला असे पत्रकार मदतच करत आहेत असे मला वाटते.

    मोदी सरकारसाठी 'राहुल विमायोजना' आहे तशीच ही पत्रकारांची मोदी सरकारसाठी 'आरोग्य विमायोजना' आहे.

    ReplyDelete