एक तर मला फ़टकळ म्हणून कुठल्या चर्चेत बोलवत नाहीत. जाहीर व खाजगी असे दोन चेहरे घेऊन मी जगात वावरत नाही. म्हणूनच वाहिन्यांवर मी सहसा दिसत नाही. मोठी नावाजलेली माध्यमे माझ्यापासून दूर असतात. त्यांना आपापले मुखवटे टिकवण्यासाठी माझ्यासारखी ब्याद दूर ठेवणे सोयीचे असते. माझी त्याबद्दल तक्रार नाही. म्हणूनच मी कुठल्या वाहिनीने चुकून बोलावलेच, तरी त्याबद्दल परिचितांमध्ये कल्पनाही देत नाही. त्याची इथे सोशल माध्यमात जाहिरातही करीत नाही. कारण त्यातून व्यक्तीगत मार्केटींग होण्याचा प्रमाद मला नको असतो. जे लोक ती वाहिनी बघत असतील, त्यांच्यापुरता तो कार्यक्रम मर्यादित रहावा, असा त्यामगचा हेतू आहे. त्यासाठीच गेल्या दोन महिन्यात काही कार्यक्रमात सहभागी होऊनही त्याबद्दल इथे मतप्रदर्शन टाळले होते. पण शनिवारी झालेल्या ‘एबीपी माझा विशेष’मध्ये माझा चुकीचा उल्लेख झाला, म्हणून इथे स्पष्टीकरण देणे अगत्याचे झाले.
रामगोपाल वर्माच्या गणपती विषयक ट्वीटच्या संदर्भात चर्चेच्या अखेरीस बोलताना मी मांडले की ‘विद्वत्ता म्हणून लोकभावनेशी मुद्दाम खेळणार्यांना त्याचे हल्ल्यातून चोख उत्तर मिळत असेल, तर त्याला मी हल्ला मानत नाही. कारण कुरापत काढणार्याची तीच अपेक्षा असते.’ ते माझे चिथावणीखोर विधान अजिबात नाही. आजवर पंचेचाळिस वर्षे पत्रकारिता करताना मी सातत्याने तशी भूमिका खुलेआम मांडली आहे. अविष्कार स्वातंत्र्य वा माध्यमांचा वापर कुणाला दुखावण्यासाठी करणेच गुन्हा आहे आणि त्याला संरक्षण मिळू नये, असे माझे प्रामाणिक मत आहे. माझ्याही लिखाणातून असे घडले असेल, तर मला ते दाखवून माझ्यावरही हल्ला झाल्यास त्याचे मी स्वागतच करेन असे अनेकदा जाहिर लिहीलेही आहे. पण असा मुद्दा मांडताना एक सहभागी मित्र संजीव खांडेकर यांनी तिथेच मतभेद असल्याचे स्पष्ट केले. त्याबद्दल माझी तक्रार नाही. ते त्यांचे मत असू शकते. पण त्यांना समजावताना संयोजक एन्कर प्रसन्न जोशी यांनी अकारण मल्लीनाथी केली. भाऊ हे काहीकाळ ‘सामना’त काम केलेले आहेत, असे त्यांनी शेजारीच बसलेल्या खांडेकरांना ‘समजावले’. त्याची काय गरज होती?
पहिली गोष्ट म्हणजे मी कधीच ‘सामना’मध्ये काम केलेले नाही. पण ‘सामना’ हे शिवसेनेचे मुखपत्र सुरू होण्याआधी ‘मार्मिक’ साप्ताहिक हे सेनेचे मुखपत्र होते. त्याचा तीन वर्षे कार्यकारी संपादक म्हणुन मी काम केलेले आहे. कदाचित त्या काळात पत्रकारिता म्हणजे काय हे प्रसन्नाला समजण्याचे वय नसावे. पण त्याहीपेक्षा विनोदाची गोष्ट म्हणजे त्याने हा खुलासा संजीव खांडेकर यांना समजावण्यासाठी केला. तो सुद्धा ऐन गणेशोत्सवाच्या मोसमात केला. विनोद एवढ्यासाठी, की मी ‘मार्मिक’चे संपादन करत होतो, तेव्हा संजीव खांडेकर यांनी मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सवांना समाजोपयोगी वळण देण्याची एक मोहिम हाती घेतली होती. त्यानुसार उत्सवाच्या वर्गणीतून काही रक्कम त्यांनी योजलेल्या समाजोपयोगी कार्याला द्यावी, असे आवाहन केले होते. त्यासाठी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही पाठींबा मिळवला होता. मग त्यासाठी ‘मार्मिक’चा एक विशेषांकही आम्ही काढला होता. सहाजिकच मी ‘सामना’ सुरू होण्यापुर्वी सेनेच्या ‘मार्मिक’ या मुखपत्रात काम करत होतो, हे खांडेकरांना आठवत असेल. त्यांना प्रसन्नाने माझी पार्श्वभूमी समजावण्याची गरज होती काय? शिवाय तशी टिप्पणी करण्यामागचा हेतू शुद्ध असू शकतो काय? ‘सामना’ म्हणजे शिवसेना आणि शिवसेनेशी संबंधित म्हणून हल्लेखोरीचे समर्थन; असेच सुचवायचा हेतू स्पष्ट होत नाही काय?
विद्वत्तेचा अहंकार अशा रितीने समाजात सौहार्द निर्माण करण्यापेक्षा बेबनावच निर्माण करतो. माध्यमे हा विस्तवाशी खेळ असतो याचे भान सुटले, मग रामगोपाल वर्माची ट्वीट काय आणि जाता जाता अनावश्यक टिप्पणी प्रसन्नाने केली, यांच्यात कुठला गुणात्मक फ़रक करता येईल? माझ्याविषयी पुर्वग्रह त्यांनी मनात बाळगण्याला माझी अजिबात हरकत नाही. पण त्याविषयी जाहिर वाच्यता करताना आपण कुणाला तरी अकारण दुखावतो वा त्याची बदनामी करतोय, याचे भान ठेवायला नको काय? हेच भान ठेवले जात नाही आणि अतिरेक होतो. मजा अशी असते, की सामान्य बुद्धीच्या रस्त्यावरच्या लोकांनी ती प्रगल्भता दाखवली पाहिजे आणि सातत्याने आपल्या बुद्धीमत्तेचे प्रदर्शन मांडणार्यांनी मात्र, लोकांच्या भावनाच नव्हेतर प्रतिष्ठेशी खेळावे खेळावे काय? असेच कोणाला म्हणायचे असेल तर त्याचा अर्थ काय घ्यायचा? आम्ही कुठल्याही महिलेच्या अब्रुशी खेळू, पण तिने सभ्यपणे कायदेशीर मार्गाने आमचा बंदोबस्त करावा, यापेक्षा भिन्न काही अर्थ निघू शकतो काय?
(अर्थात कार्यक्रम चालू असताना पुण्याच्या स्टुडिओत असल्याने मला मुंबईतून प्रसन्ना बोलल्याचे तेव्हा पुरेसे ऐकू आलेले नव्हते. अन्यथा तिथेच ‘सामना’ झाला असता. पण दुसर्या दिवशी एका वाचकाने अगत्याने माझा मोबाईल क्रमांक शोधून मला हा प्रकार नजरेस आणून दिला. मग संपुर्ण शो पुन्हा युट्यूबवर बघून व तपासूनच ही प्रतिक्रिया जाहिरपणे मांडलेली आहे.)
https://www.youtube.com/watch?v=jTgenovm-vA
Bhau,
ReplyDeleteतुमचा अभिमान वाटतो.
Asha anchor chi pol khol Kara.
Truely yours,
Atul joshi