Friday, August 22, 2014

आम्ही सारे अभिनयसम्राट



 कुठल्याही वाहिनीचे कार्यक्रम चर्चा आपण बघितल्या तर त्यात हल्ली मूळ घटना वा बातमीपेक्षा भलत्याच गोष्टींचा उहापोह चालू असतो. एका बाजूला रुंद चौकटीत घटनेचे चित्रण असेल, तर पुन्हा पुन्हा दाखवले जात असते. पण ते कुठले आहे वा कशामुळे घडले आहे, त्याचा कुठलाही तपशील दिला जात नाही. पण त्याच संदर्भाने आमंत्रित पाहुण्याची बाष्कळ बडबड मात्र चालू असते. मग मध्येच कोणी टिव्ही चालू केला असेल, तर त्याला कसली बडबड चालली आहे व दिसणार्‍या चित्रांचा संबंध काय त्याचाच उलगडा कितीवेळ होत नाही. शिवाय असा उहापोह किंवा चर्चांमध्ये सहभागी होणारे महाभाग, त्या त्या विषयातले कोणीतरी महान अभ्यासक असल्याचेही सांगितले जाते किंवा लिहीलेले वाचायला मिळते. त्याच्या जाणतेपणाचा वा अभ्यासक असण्याचा कसलाही पुरावा नसतो किंवा त्याच्या बोलण्यातूनही तसा साक्षात्कार घडत नाही. थोडक्यात वाहिनीच्या संपादकाला जो कोणी बुद्धीमान वा अभ्यासक वाटतो, त्याला तिथे आणून त्याची बकवास आपल्या गळी मारली जात असते. अर्थात ती बकवास करणारेही तशाच भ्रमात असतात आणि बोलतात. त्यातून मग वाहिनी वा माध्यमाचा अजेंडा आपल्या लक्षात येऊ शकतो. आमंत्रित कशातलाही जाणकार असायची गरज नसते, तर वाहिनी वा संपादकाच्या अजेंड्याचे समर्थन करण्याचे कौशल्य त्याच्यापाशी असावे लागते. शिवाय एखादा बळीचा बकरा बोलवलेला असतो. ज्याला हजर जाणत्यांची टोळी सामुहिकरित्या बळी देतात. अशा चर्चा आपण ऐकल्या आणि त्याचा पडताळा घेतला, तर त्यातले बहुतांश तद्दन बेअक्कल असल्याची खात्री होऊ शकते. त्यांनी व्यक्त केलेली मते वा भाकिते, बहुतेकदा संपुर्णपणे चुकतात. पण त्यांच्यासह सादरकर्त्यांचा लोकांच्या विस्मरणशक्तीवर जबरदस्त विश्वास असल्याने असे कार्यक्रम अव्याहत चालू असतात.

मंगळवारचीच गोष्ट घ्या कुठल्याही वाहिनीवरचे कार्यक्रम वा चर्चा ऐकल्या असतील, तर ते सादर करणारे पक्के नास्तिक वा अंधश्रद्धा निर्मूलनवादी असल्याची तुम्हाला खात्रीच पटेल. कारण अशा चर्चा कार्यक्रमात त्यांनी अगत्याने एखादा हिंदूत्ववादी बळीचा बकरा आणून बलिदानाचा सोपस्कार पार पाडलेला आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला एक वर्ष पुर्ण झाले म्हणून जे कर्मकांड साजरे करायचे होते, त्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे म्होरकेही थक्क व्हावेत, अशा आवेशात प्रत्येक वाहिनीचा संयोजक बोलत होता. जणू घरात नवसाचा गणपती आणणे वा बोटात ग्रहांच्या खड्याची अंगठी घालणे, हा भीषण गुन्हा असल्याच्या आवेशात बोलणारे हेच लोक दोन दिवसात आता याच महाराष्ट्रात कुठे कुठे नवसाचे गणपती आहेत, त्याचे गुणगान सुरू करणार आहेत. त्यातल्या कुठल्या गणपतीला कोण नावाजलेली व्यक्ती नवस करते, त्याचेही तमाम तपशील सादर होऊ लागतील. मग आपल्या मनात शंकेची पाल चुकचुकेल, २० ऑगस्टला दाभोळकरांसाठी अश्रू ढाळणारे हेच होते काय? त्या दिवशी नवसाच्या माथी अंधश्रद्धेचे खापर फ़ोडणारे हेच होते काय? विज्ञान चमत्काराला मानत नाही सांगणार्‍यांचा, त्या दिवशीचा महाराष्ट्र शाहू फ़ुले आंबेडकरांचा होता, तोच आठवडाभरात थेट नवसाला पावणार्‍या लालबागच्या राजाचा महाराष्ट्र कसा होऊन जातो? पुरोगामी महाराष्ट्राची ही विज्ञाननिष्ठ भूमी नवससायासांची कशी होऊन जाते? चमत्काराचा असा अनुभव याच पुरोगामी माध्यमांकडून आपल्याला येत असतो. यालाच बाजार म्हणतात. कधी बाजार अंधश्रद्धा निर्मूलनाचा असतो, तर कधी तो नवसाला पावणार्‍या कुठल्या राजा गणपतीचा असतो. थोडक्यात माध्यमे वृत्तपत्रे वा वाहिन्या एकविसाव्या शतकातले बौद्धीक वा वैचारिक मॉल बनले आहेत. आस्तिकापासून नास्तिकापर्यंत सर्वप्रकारचा ग्राहकांची मागणी पुरवणारी छोटीमोठी दुकाने तिथे दाटीवाटीने वसलेली असतात.

परवा दाभोळकरांच्या स्मृतीदिनी सजवलेल्या ‘रिंगणात’ नासिरुद्दीन शहा आणला जातो आणि त्याचे प्रदर्शन मांडले जाते. उद्या लालबागच्या राजाचा मंडप उभा राहिला मग त्यात सलमान खान नवस फ़ेडतानाची ‘किक’ ह्याच वाहिन्या आपल्या कंबरड्यात मारणार आहेत. तेव्हाही तशाच चर्चा चालतील. त्यातही जाणते अभ्यासक हजर होतील. आपापले प्रवचन देतील. पण त्यापैकी किती लोकांचा आपण जे बोलतोय वा सांगतोय, यावर विश्वास असेल? सगळाच दुटप्पीपणा. लिहीलेले आपण वाचतो वा अशा शहाण्यांना आपण वाहिन्यांवर ऐकतो, तेव्हा ते मनापासून खरे बोलत असतात काय? त्यापैकी अनेकांना खरे मन व मत व्यक्त करायचीही भिती वाटत असते. मग डोक्यावरचे खोटेपणाचे ओझे उतरवले, की त्यातले काहीजण प्रायश्चित्त म्हणून ट्वीटर वा ब्लॉगवर सत्यकथन करतात. अनेकदा तुम्ही हिंदी इंग्रजी वाहिन्यांवर कुणा भाजपा वा हिंदूत्ववाद्याला जाब विचारणारे एन्कर बघता. खाजगीत त्यांच्याशी बोललात तर तुमचे हे तुम्हीच थक्क होऊन जाल. तिथला वाहिनीवर दिसणारा सेक्युलर खाजगीत चक्क त्याच भूमिकेच्या विरोधात असतो. अर्थात त्याला दुसरीही बाजू आहे. तिथे खुलेआम नवसाच्या गणपतीच्या विरोधात बोलायची हिंमत नसलेले एन्कर ट्विटर वा अन्य माध्यमातून सेक्युलर कंडू शमवून घेतात. हा सगळा प्रकार हवाच कशाला? सातत्याने अविष्कार स्वातंत्र्य वा विचार स्वातंत्र्याची जपमाळ ओढणार्‍या अशा लोकांची कोणी गळचेपी केलेली असते? तिथे मालक वा संपादकाच्या इच्छेनुसार बोलायचे. जणू बातमीदारी वा पत्रकारिता हा अभिनय होऊन गेला आहे. त्यामध्ये कुठला समाजप्रबोधनाचा संदर्भ उरलेला नाही. आपण वाचतो किंवा बघतो, तो निव्वळ देखावा असतो. त्या त्या परिस्थितीशी सुसंगत असणारा. क्वचितच कुणी त्याची प्रामाणिक कबुली देतात. कारण प्रत्येकाला आपला बुद्धीवादी पुरोगामी मुखवटा टिकवून ठेवायचा असतो ना?

एका नागरिकाची व प्रामुख्याने नावाजलेल्या व्यक्तीची पुण्यासारख्या महानगराच्या हमरस्त्यावर राजरोस हत्या होते. त्याच्या हत्याकांडाचे धागेदोरेही वर्षभरात सापडू नयेत, ही खरोखरच मनाला यातना देणारी बाब आहे. पण ज्यांनी गेल्या दोनचार दिवसात त्यासाठी पोलिसांपासून सत्ताधारी वा विरोधी राजकीय पक्षांना मोठ्या आवेशात जाब विचारला, त्यापैकी कितीजणांना खरेच खुनाचा शोध लागण्यात रस आहे? त्यापैकी बहुतांश दाभोळकर समर्थकांना खुनी सापडण्यापेक्षा त्यात सनातन संस्थेला गोवण्यात स्वारस्य आहे. हिंदूत्ववादी यात गोवला जावा, अशीच त्यांची मनोमन इच्छा आहे. त्या दिशेने कितीसे प्रयास झाले व यश मिळाले, यासाठीच जाब विचारला जातो आहे. पण खरोखर खुनी वा त्यामागचे धगेदोरे कोणाला हवेत? बाबा आढावापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रत्येकजण पहिल्या दिवसापासून त्यामागे कारस्थान असल्याचा दावा करतो आहे. हत्येनंतर काही तासातच कोल्हापूरला मुख्यमंत्र्यांनी त्यामागे गांधी हत्येमागची प्रवृत्ती असल्याचा ‘खुलासा’ केला होता. तिथेच दाभोळकर खुनाचा तपास सुरू झाला आणि संपला होता. कारण त्यांच्या समर्थक पाठीराख्यांना जे हवे ते मुख्यमंत्र्यांनी विनाविलंब देऊन टाकले होते. सनातन वा हिंदूत्ववाद्यांवर आरोप करण्याची सुसंधी त्यापैकी प्रत्येकाला हवी होती. ती दिल्यावर सेक्युलर सरकारला आणखी करण्यासारखे काहीच शिल्लक नव्हते. पुढले पाऊल म्हणुन दोनचार सनातनवाले दोनचार दिवसासाठी गजाआड ठेवून सोडून दिले, तिथेच त्या हत्येचा तपास उरकला होता. कारण पहिल्या क्षणापासून तपासाची दिशा चुकवण्यात प्रत्येकाने हातभार लावला होता. ही हत्या सुपारीबाज व्यावसायिक गुन्हेगाराने पार पाडलेली होती. त्याच्या शोधाचे कुठलेच प्रयास झाले नाहीत वा होऊ दिले नाहीत. मग त्यामागच्या सुत्रधारापर्यंत पोहोचण्याचा मार्गच बंद झाला होता ना? खुनी हवाच कोणाला होता? वैचारिक विरोधकांना बदनाम करायचे निमीत्त तेवढे हवे होते. बाकी दाभोळकरांच्या हत्येची वेदना होतीच कोणाला? अभिनयाची एक नवी संधी, आणखी काहीच नाही.

11 comments:

  1. भाउसाहेब, आपल्या या लेखात अनेक गोष्टींची सरमिसळ आहे त्यामुळे वड्याचे तेल वांग्यावर असा प्रकार होतो आहे. तुम्ही माध्यमांबद्दल जे बोललात त्याच्याशी मी सहमत आहे. पण तुम्ही त्यातच जे अंनिस वाल्यांवर कोरडे ओढले आहेत त्याबद्दल माझे मत ऐकून घ्याल (आणि इतरांनाही वाचू द्याल) अशी आशा बाळगतो. असो - नमनास एवढे तेल पुरे!

    "परवा दाभोळकरांच्या स्मृतीदिनी सजवलेल्या ‘रिंगणात’ नासिरुद्दीन शहा आणला जातो आणि त्याचे प्रदर्शन मांडले जाते."
    कबूल channel वाल्यांना सलमान आणि नसिरुद्दीन सारखेच. पण इथे रिंगण वाल्यांनी नासीरचे प्रदर्शन मांडले म्हणने चूक आहे. एका बाजुला कलाकारांना सामाजिक बांधिलकी नाही असें आपण म्हणतो - आणि दुसरीकडे कोणी काही जाहीर कृती केली की त्याला "प्रदर्शन" म्हणणे अन्यायाचे आहे.

    "बहुतांश दाभोळकर समर्थकांना खुनी सापडण्यापेक्षा त्यात सनातन संस्थेला गोवण्यात स्वारस्य आहे. हिंदूत्ववादी यात गोवला जावा, अशीच त्यांची मनोमन इच्छा आहे."
    हे विधान तर मुख्यमंत्र्यांच्या "गोडसे प्रवृत्ती" विधानाइतकेच अश्लाघ्य आहे. हे मनकवडेपण आपण कुठल्या सिद्धीने प्राप्त करून घेतलेत? या विधानाबद्दल अजून काय म्हणू एका सज्जन माणसाला?

    असो. एका विषयाला धरून सुसूत्रपणे तुमच्याकडून ऐकण्याची इच्छा आहे. अशी राळ उडवून तुम्ही स्वच्छ संवादाचा मार्ग बंद करीत आहात.

    ReplyDelete
    Replies
    1. <<>>
      Prakash Bal
      August 21
      दाभोलकरांच्या हत्येचा तपास न लागणे ही सरकारच्या दृष्टीने लाजीरवाणी गोष्ट निश्चित आहे. पण तपास योग्य पूरकारे होत नसताना सरकारपुढे प्रखर राजकीय आव्हान उभे करण्यात पुरोगेम्यांना साफ अपयश आले त्याचे काय? सध्याच्या राजकीय व्यवस्थेचे स्वरूप जाणून न घेता 'आमचा पोलिसांवर विश्वास आहे', असे म्हणत राहणे, हा पराकोटीचा राजकीय भाबडेपणा नव्हता काय? 'आम्ही सारे दाभोलकर' असे म्हणत, गाणी गात, पथनाट्य करीत पहिली पुण्यतिथी पाळणे हे पराकोटीचे करूणाजनक, कीव वाटणारे व उद्वेग आणणारे दृश्य होते. इतके घडूनही हिंदुत्ववादी आक्रमक राजकारणाची पुरोगाम्यांना पुरेशी जाण नाही, हे पुन्हा एकदा दिसून आले. मुळात दाभोळकरांनी आपली मोहीम अराजकीय व एककलमी ठेवल्यामुळे असे घडणे एकप्रचारे अपरिहाय॔च होते, हेही कधी लक्षात घेतले जाणार आहे की नाही? भारतातील 90 टक्के अंधश्रद्धा या आरोग्याशी निगडीत आहेत. त्यामुळे अंधश्रद्धा विरोधी मोहीम हा व्यापक राजकीय-आथ्रिक चळवळीचा भाग असायला हवा होता. ही ये चळवळीची मोठी उणीव होती, हे लक्षात घेतले जाणार आहे की नाही? उद्या महायुतीचे राज्य आल्यावर त्यांनी कायदा रद्द केला वा त्यात मोठे बदल केल्यास पुन्हा एकदा गाणी म्हणत, पथनाट्य करीत हतबलतेचे केविलवाणे प्रदश॔न करणार की, रस्त्यावर उतरून प्रखर आंदोलन छेडणार?
      ======================
      तुम्ही ज्या गोतावळ्यातले भक्त आहात, त्यांची मानसिकता इथे युवराज कडून व्यक्त होते. त्यामुळे खुनाचा शोध लागण्यापेक्षा खुनाचा राजकीय लाभ उठवण्याची वृत्ती स्पष्ट होते.
      http://bhautorsekar.blogspot.in/2013/09/blog-post_20.html

      ता. क. आणखी एक बाब, मी सेक्युलर पुरोगामी नसल्याने दुसर्‍यांच्या प्रतिकुल प्रतिक्रिया वा मते दडपून टाकत नाही.

      Delete

    2. इतकी सुंदर निरागस निर्बुद्धता आपल्या भक्तांमध्ये रुजवणे ज्या प्र-सिद्धीने दाभोळकरांना साध्य झाले. तिथून मला हे मनकवडेपण प्राप्त झाले असावे. या विषयावर माझे अनेक लेख ब्लॉगवरही आहेत. पण त्यापैकी काहीच न वाचता एका लेखातल्या दोनतीन वाक्याच्या आधारे थेट मला लेबल लावण्यापर्यंत मजल मारण्याची सिद्धी सोपीसरळ म्हणता येईल काय?

      Delete
    3. तुम्ही मला निर्बुध्द म्हणतांना त्याला "निरागस" हे ही विशेषण जोडलेत हा तुमचा मोठेपणा (खरच). खर आहे - जाहीर भुमिका एक आणि खाजगीत दुसरंच असं अनेकांच असतं - तसा तरी आरोप तुम्ही केला नाहीत. माझे असे अगणित मित्र आहेत की ते खाजगीत गांधीला मारले ते योग्यच झाले असं म्हणतात. संघाने गांधीना प्रातःस्मरणीय केलं असलं तरी ही त्यातले बरेच जण गोडसेचे निस्सीम चाहते आहेत. परवा अनंतमूर्ती मेल्याचा सोहळाही काहींनी बंगळुरुत साजरा केला. अशा बुद्धीपेक्षा निर्बुध्दता बरी!

      Delete
    4. abhaymitaan,

      १.
      >> एका बाजुला कलाकारांना सामाजिक बांधिलकी नाही असें आपण म्हणतो - आणि
      >> दुसरीकडे कोणी काही जाहीर कृती केली की त्याला "प्रदर्शन" म्हणणे अन्यायाचे
      >> आहे.

      एक तत्त्व म्हणून तुमचं हे विधान मान्य. मात्र श्री. नसिरुद्दीन यांना व्यासपीठावर आणून नक्की काय सामाजिक बांधिलकी साधली गेली? तसेही श्री. नसिरुद्दीन सामाजिक कार्यात अग्रेसर असतील कदाचित, पण हा कार्यक्रम निषेधाचा आहे. सामाजिक नव्हे.

      २.
      >> हे विधान तर मुख्यमंत्र्यांच्या "गोडसे प्रवृत्ती" विधानाइतकेच अश्लाघ्य आहे. हे
      >> मनकवडेपण आपण कुठल्या सिद्धीने प्राप्त करून घेतलेत? या विधानाबद्दल अजून
      >> काय म्हणू एका सज्जन माणसाला?

      कुणी हिंदुत्ववादी या हत्याप्रकरणात गोवला जावा अशाच प्रकारे प्रसारमाध्यमांनी राळ उडवली होती. सनातन संस्थेचे संदीप शिंदे साधे संशयितही नव्हते. त्यांना गोव्याहून कशासाठी उचलण्यात आलं? त्यांच्या मोठ्या भावाचीही चौकशी का करण्यात आली? यावरून वृत्तपत्रांनी इतका गहजब केला की जणू गुन्हेगार मिळालाच. प्रत्यक्षात या दोघांचा हत्येशी काडीमात्र संबंध नाही. नंतर पोलिसांनी एका मुस्लिमास ताब्यात घेतले. तेव्हा त्याचं साधं नावही उघडपणे छापलं नाही. सनातनच्या साधकांची यथेच्छ बदनामी आणि मुस्लिम संशयिताच्या नावाचा उल्लेखही नाही. हा काय प्रकार चाललाय ते सगळ्यांना कळतंय.

      भाऊंनी फक्त या गोष्टींचा उल्लेख केला तर त्यात काय चुकलं?

      आपला नम्र,
      -गामा पैलवान

      Delete
    5. श्री. गामा पैलवान - आभार, अतिशय सरळ विशेषणरहित भाषेबद्दल! निषेध करणं हे सामाजिक बांधीलकीचं पहिलं पाउल नाही का? आपले साहित्यिक सोडा पण एकाही राजकारण्याने एक शब्द उच्चारला नाही. कारण दोघांनाही चांगलेच माहित आहे की दाभोलकरांना constituency नाही. दुसरे अहो आपल्या पोलिसखात्याने किती मुसलमांनांना तुरुंगात "under trial" चौकशीविना डांबून ठेवले आहे त्याची गणती नाही. अनेकजण दहा वीस वर्षांनी पुरव्याअभावी सुटत आहेस अशा बातम्या येत असतात. नक्कीच सनातनच्या कार्यकर्त्यांबाबत हेच घडलय आणि ते निषेधार्हच आहे.

      Delete
    6. abhaymitaan,

      दाभोलकरांच्या हत्येच्या संदर्भात निषेध करणं हे सामाजिक बांधिलकीचं पाहिलं पाऊल मलातरी वाटंत नाही. हत्येनंतर महिनाभरात हे विचारवंत जे गायब झाले ते थेट पहिल्या पुण्यतिथीला उगवले. सोबत नसिरुद्दीन यांना घेणे म्हणजे माडाखाली बसून दूध पिण्याचा प्रकार आहे. लोकं बांधिलकीची प्रशंसा न करता नसिरुद्दीन शोभेचे बाहुले आहेत असंच म्हणणार.

      असो.

      सनातनच्या बाबतीत आपण जो अंदाज लावला आहे तो पार चुकीचा आहे. सनातन संस्थेवर बंदी घालायला आबा पाटील उतावळे झालेत. तसूभर जरी पुरावा सापडला असता तर लगेच संस्थेवर बंदी घातली असती. तसेच गोवा स्फोटात दाखल झालेल्या आरोपपत्रात सनातन संस्थेचं नावही नाही.

      आपला नम्र,
      -गामा पैलवान

      Delete
    7. श्री. गामा पैलवान, एक महत्वाचा संदर्भ राहून गेला. नाट्यकर्मी अतुल पेठेने गेले सहा महिने गावागावात शिबिरे घेऊन तीस-एक पथनाट्ये लिहून आणि बसवून घेतली आणि त्याचा सुसूत्र प्रयोग "रिंगण" या नावाने झाला. अतुल पेठेंचे मित्र, ज्येष्ठ नाट्यकर्मी आणि एक संवेदनशील कलावंत या सर्व नात्यांनी श्री. नसिरुद्दीन शाह तिथे होते. त्या गोष्टीची खिल्ली "प्रदर्शन" म्हणून उडवणे हे, काय म्हणू, थोडं बटबटीत आणि असंवेदनशील वाटतं. अधिक काय लिहू?
      आपला,
      अभय पाटील
      http://abhaymitaan.wordpress.com/
      https://soundcloud.com/abhaypatil/tracks

      Delete
  2. Khara pahata tya pulavar jya thikani Dabholkarancha khun jala tya thikanich ANIS cha bhakt nitya nemane karyakram karu lagala tevapasunch yanchi kiva karavi asa vatu lagale....

    ReplyDelete
  3. मला तुम्ही अनुल्लेखाने मारले नाहीत पण "शाल-जोडीतून" मारलेत - जसे "मी सेक्युलर पुरोगामी नसल्याने दुसर्‍यांच्या प्रतिकुल प्रतिक्रिया वा मते दडपून टाकत नाही." त्याच चालीवर म्हणतो की "मी हिंदूत्ववादी नसल्याने शेलक्या - म्हणजे कंडू , बाष्कळ, बकवास, प्रदर्शन - अश्या शब्दांची बरसात मी करणार नाही. सब घोडे बारा टक्के असं का करताय? जादूटोणा विरोधी कायदा झाला की सत्यनारायण केलाततरी तुरुंगात टाकतील अशो हूल उठवणाऱ्यापेक्षा केविलवाणे मेणबत्तिवाले बरे. आणि युवराज मोहितेने राजच्या मांडीला मांडी लावली रे लावली की तो जे मुद्दे लावून धरतोय ते एकदम कुचकामी ठरतात की काय? असो.

    ReplyDelete