Friday, August 29, 2014

शंकराचार्य आणि माध्यमातले शुक्राचार्य



द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद यांनी गेल्या काही दिवसात अकारण साईबाबा भक्तांचा रोष ओढवून घेतला आहे. वास्तविक हिंदू समाजाने कुणाला देव मानावे आणि कुणाची मंदिरात स्थापना करावी, पूजा बांधावी, हे सांगण्याचा अधिकार यांना कोणी दिला? देशात कायद्याचे राज्य आहे आणि प्रत्येकाला आपल्या श्रद्धेनुसार भक्ती पूजाअर्चा करण्याचे स्वातंत्र्य राज्यघटनेने बहाल केलेले आहे. त्यामुळे जे कोणी स्वत:ला हिंदू समजणारे आहेत, त्यांना जो देव वाटेल, त्याला भजायचे स्वातंत्र्य आपोआपच मिळालेले आहे. त्याच बरोबर त्यांच्या भक्तीमार्गात अडथळे आणायला अन्य कुणा आचार्य वा महाराजाला प्रतिबंध केलेला आहे. सहाजिकच अशा श्रद्धाळूला जो कोणी त्याचा आचार्य वा पुरोहित मान्य असेल, त्यानेच धर्माचरणाविषयी मार्गदर्शन करावे. आपली मते कुणावर लादू नयेत. असे असताना शंकराचार्य पदावर बसलेल्या व्यक्तीने असल्या उचापती करण्याचे काही कारण नाही. बाकीचे शंकराचार्य वा मठाधीश सहसा त्यात पडत नाहीत. पण हे महाशय मात्र एखाद्या कसलेल्या राजकीय नेत्याप्रमाणे नेहमी सामाजिक राजकीय उचापती करीत असतात. त्यावर प्रतिसाद देणारेही तितकेच लबाड दिसतात. ज्यांना आपापला राजकीय उल्लू सिधा करायला अशा कुरापती उपयुक्त असतात, तेव्हा हे महाभाग विद्वान त्याच स्वरूपानंदाला हाताशी धरून काहूर माजवत असतात. बाबरी मशिद वा राममंदिराचा वाद उफ़ाळला होता, तेव्हा हेच महोदय विश्व हिंदू परिषदेच्या विरोधात बेताल आरोप करीत होते. तेव्हा त्यांच्या प्रत्येक शब्दाला माध्यमातून उचलून धरले जात होते. कारण संघ परिवाराच्या हिंदूत्वाला हेच शंकराचार्य नावे ठेवत होते. लगेच त्यांचा प्रत्येक शब्द ब्रह्मवाक्यासारखा प्रमाण होता. पण आज त्यांनी साईबाबांवर तोफ़ डागली, तर त्यात संघाचा थेट संबंध जोडता येत नसल्याने तेच शंकराचार्य प्रमाण मानले जात नाहीत.

चारपाच महिन्यांपुर्वी लोकसभा निवडणूक जोरात रंगलेली होती, तेव्हाही याच शंकराचार्यांनी धमाल उडवून दिली होती. मार्च महिन्यात गुजरात सोडून नरेंद्र मोदी आणखी एका मतदारसंघात उमेदवारी करणार असल्याची बातमी आली आणि लौकरच वाराणशी हे नाव पुढे आले. मग मोदीभक्तांनी जयघोष सुरू केला होत. ‘हरहर मोदी घरघर मोदी’ अशी ती घोषणा होती. त्यावरून याच शंकराचार्यांनी आक्षेप घेतला होता. असा घोषणातून मोदीना देव बनवले जात आहे आणि तो हिंदू धर्माचा घोर अवमान असल्याचे स्वरूपानंदांनी सांगितले होते. तेव्हा कोणी त्यांच्या त्या अधिकाराला आव्हान दिले होते काय? कशाला धर्माचरण म्हणावे किंवा कशाला हिंदूधर्माची विटंबना म्हणावे, याचा निवाडा त्यांनी कुठल्या अधिकारात केला होता? पण तेव्हा तमाम नास्तिक व सेक्युलर याच शंकराचार्यांना भक्तीभावाने आरत्या ओवाळून शरण गेले. त्यांचा आक्षेप ब्रह्मवाक्य असावा त्याप्रमाणे मोदी स्वत:ला परमेश्वर ठरवतात, असे आरोप सरसकट सुरू झाले होते. मग मोदींनीच आपल्या चहात्यांना ती घोषणा आवरती घ्यायची विनंती केली होती. पण मुद्दा शंकरचार्य़ांचा आडोसा घेऊन मोदींवर शरसंघान करणार्‍यांचा होता. अशा घोषणेने धर्मबुडवेगिरी कशी काय होते? खरे तर असा सवाल तेव्हाच स्वरूपानंद यांना विचारला गेला पाहिजे होता. पण तो विचारला गेला नाही. कारण तेव्हा मोदींवर तोफ़ा डागायला त्यांचेच बरळणे उपयुक्त ठरत होते. आता तेच बरळणे चालू आहे. पण त्याचा कुठेही संघ वा मोदींशी संबंध नसताना त्याचा मोदी सरकारशी संबंध जोडण्याचा चावटपणा सुरू आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यानेच समाजात धार्मिक दुफ़ळी माजवायचे उद्योग सुरू आहेत, हा आरोप करून त्यासाठी स्वरूपानंद यांचे वक्तव्य पुढे केले जात आहे. तसे असते तर याच शंकराचार्य महोदयांनी तेव्हा मोदींच्या घोषणेवर आक्षेप कशाला घेतला असता?

या शंकराचार्यांचा इतिहास बघितला तर ते नेहमी कॉग्रेसी राजकारणाला पुरक राहिले आहेत. अयोध्येतील मंदिराचा विषय असो किंवा अन्य धार्मिक विवादाचा प्रसंग असो; त्यांनी नेहमी संघ वा विश्व हिंदू परिषदेला छेद देणारी भूमिका घेतलेली आहे. नेहमी संघ वा भाजपाला गोत्यात टाकणारी विधाने केलेली आहेत. सेक्युलर मंडळीच्या हाती कोलित देणारी विधाने करण्याचाच त्यांना इतिहास आहे. मग असा धर्माचार्य अकस्मात मोदींचा हस्तक कसा बनला? मोदी वा भाजपाची सत्ता आल्याने असा माणूस शिरजोर कसा होऊ शकेल? उलट असा माणूस भाजपाच्या सत्तेला गोत्यात आणण्यासाठीच काहीही करू शकेल ना? ही पार्श्वभूमी लक्षात घेतली, तर आज हे शंकराचार्य अकारण साईबाबा भक्तांवर कशाला घसरलेत, त्यामागची प्रेरणा लक्षात येऊ शकते. साईबाबा यांच्या महात्म्याची पुजा करणार्‍यात अर्थातच हिंदूंचा भरणा सर्वाधिक आहे. त्यामुळे साईबाबा विरोधात वक्तव्य केल्याने हिंदूमध्येच दुफ़ळी माजवली जाऊ शकते. त्यात मोदी, भाजपा वा संघाने कुठलीही बाजू घेतली तरी त्यांच्या हिंदूत्वावर प्रश्नचिन्ह उभे करण्याची संधी निर्माण होते. साईबाबांचे समर्थन केले तर भाजपाचे हिंदूत्व धर्मबाह्य असल्याचा ओरडा केला जाणार आणि उलटी बाजू घेतली तर साईबाबांचे हिंदू भक्त विचलीत होणार. हाच एक राजकीय डाव असू शकतो. साईबाबा अर्धशतकापेक्षा अधिक काळ भक्तीचे केंद्र राहिले आहे. इतका काळ स्वरूपानंदांना त्यातली धर्मबुडवेगिरी कशाला दिसली नव्हती? मोदी सत्तेपर्यंत पोहोचायची प्रतिक्षा हे धर्माचार्य करीत होते काय? आताच कशाला त्याची वक्रदृष्टी शिर्डीकडे वळली आहे? मजेची गोष्ट म्हणजे त्यांच्यावर मोदी सरकारचे हस्तक म्हणून आरोप केला जातो. पण संघ भाजपाही त्यांच्या समर्थनाला पुढे आलेला नाही, की कॉग्रेस त्यांच्या विरोधात दंड थोपटून उभी राहिलेली नाही.

अर्थात शंकराचार्य वा त्यांनी साईबाबांच्या विरोधात उघडलेली मोहीम महत्वाची नाही. त्यापेक्षा त्यामागची राजकीय प्रेरणा महत्वाची आहे. आता मोदी विरोधातल्या राजकारणाने किती हिडीस वळण घेतले आहे त्याचा हा पुरावा आहे. मोदींना कुठल्याही राजकीय पेचात फ़सवता येत नसल्याने, त्यांना हिंदुत्वाच्याच सापळ्यात ओढायचा खेळ यातून खेळला जात आहे. अन्यथा या वादाचा मोदींच्या सत्तेशी संबंध काय? एका बाजूला देवबंद या मुस्लिम धर्मपीठाचे धर्ममार्तंड इराकमध्ये सुन्नी मारेकर्‍यांना सहाय्य करायला ‘स्वयंसेवक’ भरती करतात, त्यावर माध्यमांनी आवाज उठवलेला नाही. दुसरीकडे शिया मौलानांनी इराकच्या शिया धार्मिक सत्तेला वाचवायला इथून लढवय्ये पाठवायच्या गर्जना केल्याबद्दल गवगवा नाही. वास्तविक सामाजिक सौहार्दासाठी तोच गंभीर मामला आहे. पण त्यावर पांघरूण घालणारेच माध्यमातून शिर्डी साईबाबा व स्वरुपानंद यावर गदारोळ करतात, त्यामागे एक रणनिती दिसते. माध्यमांच्या खंदकात दबा धरून बसलेले काही शुक्राचार्य हिंदूमध्येच बेबनाव उभा करायचे कारस्थान तर राबवित नाहीत ना? कांची शंकराचार्यांना अटक झाली तेव्हा किंवा आसाराम अटकेच्या वेळीही संघाने नाराजी उघड केली होती. पण आज तेच संघवाले वा विश्वहिंदू परिषद स्वरूपानंद प्रकरणात अलिप्त आहेत. मोदी सरकारशी त्याचा बादरायण संबंध हे (माध्यमांच्या खंदकात बसलेले) बंकराचार्य कशाला जोडत आहेत? त्यापैकी कोणालाच स्वरूपानंद यांची कॉग्रेसी जवळीक कशी आठवत नाही? त्यांनी ‘हरहर मोदी’ घोषणेला घेतलेला आक्षेप कसा आठवत नाही? एकूणच सध्या माजलेले काहुर धर्माशी संबंधित नसून धर्माचे राजकारण करायला योजलेले कॉग्रेसी कारस्थान असू शकते. म्हणून कोणी कॉग्रेसी वा सेक्युलर भक्त शंकराचार्यांचा निषेध करीत नाहीत. पण त्यांच्या साईविरोधाला मोदी विजयाशी जोडण्याची चतुराई मात्र दाखवतात.

1 comment:

  1. मग या शंकराचार्याना सचिन तेंडूलकर चे मंदिर बांधलेले कसे काय चालले?

    ReplyDelete