Tuesday, August 26, 2014

अंधश्रद्धा निर्मूलन समिती हाच खोडसाळपणा आहे काय?

(अनंतमुर्तिंच्या मृत्यू निमीत्ताने -लेखांक दुसरा)


पत्रकार म्हणून वेळोवेळी मी माझी मते मांडत असतो. त्याखेरीज आता फ़ेसबुक इत्यादी सोशल मीडियामुळे वेळोवेळी घटनाक्रमावर सर्वांनाच आपली मते व्यक्त करण्याची सोय झाल्याने, तिथेही माझे मतप्रदर्शन चालू असते. सहाजिकच दाभोळकर यांचे काम वा चळवळ आणि त्यांची हकनाक झालेली हत्या, अशा विषयात मी माझी मते जाहिरपणे मांडलेली होती. तेवढेच नाही, यासंबंधाने ज्या घटना घडल्या व त्यावर प्रतिक्रिया आल्या, त्याविषयी सुद्धा मी मतप्रदर्शन केलेले आहे. सहाजिकच दाभोळकरांच्या प्रथम स्मॄतीदिना निमीत्त जे काही घडत होते, त्याचीही दखल अन्य नागरिकांप्रमाणे मी सुद्धा घेतली. त्याच संदर्भात मी एक पोस्ट फ़ेसबुकवर टाकलेली होती. त्यातून स्मृतीदिनाच्या निमीत्ताने झालेल्या विधानांचा परामर्ष घेताना, मी तीन प्रश्न विचारले होते. एक होता, पुनर्जन्माचा, दुसरा पंचांग तिथीचा व तिसरा विचारांच्या हत्येचा. कुठल्याही अंधश्रद्धेचे निर्मूलन हे ज्ञानाचा विस्तार व शंका निरसनातून होत असते. म्हणूनच अशा कामात शंका व प्रश्न विचारले जाण्याचे स्वागत व्हायला हवे. किंबहूना तीच अंधश्रद्धा निर्मूलनाची पहिली पायरी असायला हवी. दाभोळकर यांची संपुर्ण चळवळ विविध दावे करणार्‍यांना प्रश्न विचारून त्यांचे पोलखोल करण्यावरच बेतलेली होती. तसे करताना त्यांच्यावर विविध आरोप झाले. धर्मद्रोहापासून हिंदु द्वेषाचेही आरोप झाले. म्हणून त्यांनी कधी प्रश्न विचारणे थांबावले नाही. मात्र त्यांच्या प्रश्नांची उत्तरे ज्यांना नेमकी देता आली नाहीत, त्यांनी दाभोळकरांवर खोडसाळपणाचा आरोप केला होता. आता त्यांच्याच अनुयायांनी तसा आरोप केला तर मग त्याला काय म्हणायचे? हे दाभोळकरांचे अनुयायी म्हणायचे, की कुठल्या बुवाचे भक्त म्हणायचे?

माझे प्रश्न वा शंका इंटरनेटवरच्या तीन जागेवरून आलेल्या होत्या. त्यापैकी एक होती हनुमंत पवार यांच्या भिंतिवरल्या प्रतिक्रियेची. बाबा आढाव यांनी (पुरोगामी) विचारांची हत्या (प्रतिगामी) विचारांनी केली, असे त्यात म्हटले होते. मात्र त्याच स्मृतीदिनाचे जे पोस्टर होते, त्याची घोषणा होती, ‘माणूस मारता येतो, विचार मरत नाहीत’. विचार मरत नसतील, तर एका विचाराने दुसरा विचार मारला, असे कसे म्हणता येईल? याचा अर्थ घोषणा गल्लत होती वा आढावांना ते काय म्हणत आहेत त्याचाच पत्ता नसावा. पण याकडे लक्ष वेधणारी माझी पोस्ट वाचून हनुमंत पवार यांनी खाजगी पेटीतून मला प्रश्न केला, माझ्या पोस्टवरील फ़ोटोत आपल्याला काय दिसले? तेव्हा त्यांना तसेच गुपचुप उत्तर पाठवले, ‘आढावांची कॉमेन्ट फ़ोटोतील विधानाला छेद देणारी नाही काय?’ त्यावर त्यांनी आणखी एक माहितीचा तपशील मागितला, तोही गुपचुप. मीही गुपचुप पाठवून दिला. पण अर्ध्या तासानंतर मला संदेश मिळाला, की पवार यांनी त्यांच्या भिंतीवर माझी पोस्ट शेअर केली आहे. मलाही बरे वाटले. विवेकाला तिथून सुरूवात होतेय. म्हणून मी त्यांच्या पोस्टवर कॉमेन्ट टाकली, ‘मी फ़क्त विसंगतीवर बोट ठेवले. विवेकवादाच्या वाटचालीत तारतम्य असावे हीच अपेक्षा.’ कारण पवार आपल्या पोस्टमध्ये जे म्हणतात ते खटकणारे होते. ते लिहीतात,

August 21 at 5:23pm ·
भाऊ तोरसेकर यांची हि पोस्ट माझ्या सर्व मित्रांसाठी share करत आहे ….
आपण सुज्ञ आहात यावर विश्वास आहे … तोरसेकरांनी post मधून उपस्थित केलेले प्रश्न प्रामाणिक आहेत, तिरकस आहेत, खोडसाळ आहेत, कि दाभोलकरांच्या विचारांचा त्यांची हत्या करूनही जोरदारपणे समाजात प्रसार होत आहे, हे पाहून केलेला द्वेष आहे. …. याचा निर्णय आपण घ्यायचा आहे …

हा प्रकार मन उद्विग्न करणारा होता. माझे प्रश्न प्रामाणिक बरोबरच तिरकस व खोडसाळ आहेत किंवा कसे, असे पवार यांना कशाला वाटावे? की दाभोळकरांचे अनुयायी असल्याने त्यांनी काहीही सांगावे आणि बाकीच्या जगाने नि:शंक मनाने ते ब्रह्मवाक्य म्हणून स्विकारावे, अशी अंनिसची अपेक्षा आहे? कुठल्याही बापू-बुवांची तशी अपेक्षा असते. तिथे जाऊन त्यांच्या विधाने वा दावे यांच्याबद्दल शंका विचारल्या, मग ताबडतोब त्यांचे भक्तगण तुमच्यावर खोडसाळपणाचा आरोप करीत असतात. हनुमंत पवार यांनी त्यापेक्षा काय वेगळे केले आहे? त्यांच्या यादीत असलेल्यांकडे माझी पोस्ट शेअर करताना मित्रांना सूज्ञ संबोधले आहे. मग इतरांच्या यादीतले मित्र सूज्ञ नसतात काय? आणि इतरांचे सोडून दया, पवार माझ्या शंकांचे निरसन कशाला करत नाहीत? बाबा आढाव विचार मारला जाऊ शकतो, अशी ग्वाही देतात आणि अंनिसची घोषणा मात्र विचार मरत नसल्याची आहे. त्यातला विरोधाभास खुद्द हनुमंत पवार यांना सांगूनही उमगला नाही, की त्याचा खुलासा द्यावा असे वाटले नाही. उलट माझी शंका व प्रश्न खोडसाळ आहेत काय, याची सूज्ञांकडून तपासणी करावी असे त्यांना सुचले. एकूणच अंनिसमध्ये अशा लोकांचा कितपत भरणा आहे मला ठाऊक नाही. पण पवार यांना माझे प्रश्न खोडसाळ असल्याची शंका आलेली असेल, तर दाभोळकर सातत्याने इतर बुवा-बापूंना शंका विचारत होते, त्याला काय म्हणायचे? शंका विचारणे हा खोडसाळपणा असेल, तर मग अवघी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळच खोडसाळ तिरकसपणाचा नमूना होत नाही काय?  

पहिली गोष्ट म्हणजे पवार यांनी किती प्रामाणिकपणा दाखवला? त्यांना जे काही वाटले ते त्यांनी माझ्या पोस्टवर तिथेच जाहिरपणे विचारायला हरकत नव्हती. परंतु त्यांनी तसे करायचे सोडून मेसेज बॉक्सच्या गुपचुप मार्गाने आधी माझ्याकडून माहिती घेतली. ती गोपनीयता मी पाळल्यावर त्यांनी मला खोडसाळ दाखवायचा केलेला प्रयास कितीसा प्रामाणिकपणाचा पुरावा मानायचा? वास्तविक तिथेच कॉमेन्टच्या मार्गाने चर्चा झाली असती, तर उघड चर्चा होऊ शकली असती. पण पवारांनी गुपचुप खातरजमा करून घेतली आणि मग शहजोगपणे माझ्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह लावायचा खोडसाळपणा केला. प्रामाणिकपणा असा असतो? माझ्या तीन शंकांपैकी एकीचा निरसन सुनील तांबे या मित्राने केले. तो दाभोळकरांचा चहाता व अनुयायीही म्हणायला हरकत नाही. तिथी किंवा पंचांग म्हणजे भारतीय कालगणना आहे, त्याचा धर्माशी संबंध नाही, असे मांडताना त्याने ग्रेगरीयन कॅलेंन्डरची छान माहिती तिथेच पोस्टवर कॉमेन्ट म्हणून मांडली. अन्य दोन शंकांची उत्तरे त्याला देता आली नाहीत, तर निदान खोडसाळपणाचा आरोप तरी त्याने केला नाही. याचे उलटे टोक म्हणून हनुमंत पवार यांच्याकडे बघता येईल. आपले अज्ञान झाकण्यासाठी त्यांनी मला खोडसाळ, तिरकस ठरवण्यात धन्यता मानली. अर्थात अंनिसमध्ये अशा लोकांचा खुप भरणा आहे. निदान माझ्या वाट्याला असे अतिशहाणे खुप आलेत. किंबहूना त्यांच्याच अशा वर्तनाला अधोरेखित करण्यासाठी मी ती पोस्ट लिहीली होती.

‘विचार वा विवेक सांगणार्‍याची हत्या त्याचे शत्रू-विरोधक कुठल्याही हत्याराने करू शकतात. पण त्याने सांगितलेल्या विचार किंवा विवेकाची हत्या अशा मारेकर्‍यांना कधीच करता येत नाही. त्या हत्याकांडाचा अधिकार मूळ विचार-विवेक सांगणार्‍याचे अनुयायी व भक्तांच्या अंधानुकरणाकडे राखीव ठेवलेला असतो.’

हनुमंत पवार यांह्या खोडसाळपणाने त्याची सत्यता पटवली. मुद्दा असा, की ही माणसे अशी का वागतात? आपण शहाणे, वरीष्ठ वा अभिजन आहोत, हे सिद्ध करण्यासाठी त्यांना सातत्याने इतरांना अडाणी वा खोटे पाडत बसावे लागते. आपला खरेपणा सिद्ध करता येत नसतो, तेव्हा मग विचारलेल्या प्रश्न वा शंकांना टाळून खोडसाळपणाचा उलटा आरोप करणे सोयीचे असते. असे लोक मग टोळी करून टोळी युद्धासारखे वागतात. सभ्यतेचा मुखवटा लावण्यासाठी त्याच टो्ळीबाजीला चळवळ असे साळसूद नाव देतात. पण कुठल्याही पशूंच्या कळपाप्रमाणे हिंस्रही वागू शकतात. रेगे सर त्याचीच ग्वाही देत म्हणतात, ‘समाजात जेव्हा एखादा वरिष्ठवर्ग अभिजनवर्ग असतो तेव्हा त्याचे सदस्य एकमेकांशी वागताना अतिरेकी सभ्यतेचे संकेत पाळताना आढळतात. त्याची उलट बाजू अशी की, या वर्तुळाबाहेरच्या व्यक्तीशी, कनिष्ठ व्यक्तीशी वागताना, ते जाणूनबुजून असभ्यरितीने वागतात.’ मी त्यांच्या टोळीतला नाही म्हटल्यावर माझ्याशी अतिरेकी असभ्य वर्तन होणार आणि कोणीतरी त्यांच्याच वर्तुळातला असेल, तर त्याच्याशी अतिरेकी सभ्यता दाखवली जाईल. म्हणजे त्याच्या (इथे बाबा आढावांच्या) चुकांवर पांघरूण घालायला सगळी बुद्धी पणाला लावली जाईल. यालाच आजकाल सभ्यता व सुसंस्कृतपणा म्हणतात. ज्यांच्यात कुठल्याही सभ्यतेचा व प्रामाणिकपणाचा संपुर्ण अभाव असतो.  (अपुर्ण)
--------------------------------------------------------------------------------------------
(इथे संदर्भासाठी रेगे सरांचा तो परिच्छेद मुद्दाम प्रत्येक लेखा सोबत टाकणार आहे.)

‘समाजात जेव्हा एखादा वरिष्ठवर्ग अभिजनवर्ग असतो तेव्हा त्याचे सदस्य एकमेकांशी वागताना अतिरेकी सभ्यतेचे संकेत पाळताना आढळतात. त्याची उलट बाजू अशी की, या वर्तुळाबाहेरच्या व्यक्तीशी, कनिष्ठ व्यक्तीशी वागताना, ते जाणूनबुजून असभ्यरितीने वागतात. सामाजिक समतेच्या दिशेने वाटचाल करताना या कृत्रिम सभ्यतेवर आणि कृत्रिम असभ्यतेवर आघात करावेच लागतात. अधिकाधिक व्यक्तींना सभ्यतेच्या परिघात आणावे लागते आणि कृत्रिम सभ्यपणा अधिक सुटसुटीत करावा लागतो. या प्रक्रियेत एकेकाळी असभ्य मानल्या गेलेल्या वागण्याच्या रिती सभ्य म्हणून स्विकारल्या जातात. पण याचा अर्थ असा नव्हे की, सभ्यतेचा दंडकच झुगारून देण्यात आलेला असतो. समाजातील व्यक्ती एकमेकाची कदर करीत, सामंजस्याने, सुसंवादाने एकत्र राहायचे असले तर समाजात सभ्यतेचे दंडक असावेच लागतील. समाजात असे दंडक आहेत याचा अर्थच असा की, समाजातील बहुसंख्य माणसे बहुसंख्य प्रसंगी ते दंडक पाळतात. शिवाय याचा अर्थ असा की, जबाबदारीने वागणारा माणूस हे सर्व दंडक प्रसंगी पाळायचा सतत प्रयत्न करीत असतो.’
(प्रा. में पुं रेगे.- ‘नवभारत’ जाने-फ़ेब्रु १९९७)

1 comment:

  1. परिवर्तनवादी लोकच सर्वात जास्त अपरिवर्तनशील असतात ,याचा अजून एक नमूना तुम्ही पेश केलात भाऊ.
    तसेच महापुरूषाना त्यांच्याच तत्वज्ञानातून बदनाम /पराभूत करण्यात त्यांचेच व्यक्तिपूजक अनुयायी अग्रभागी असतात,हे सनातन सत्तय ही अधोरेखित केले ...धन्यवाद

    ReplyDelete