सध्या देशात दोन विषय कमालीचे वादग्रस्त झाले आहेत. खरे म्हणजे अशा विधानाला काडीमात्र अर्थ नाही. कारण आपल्या देशात वृत्तवाहिन्यांचा सुकाळ झाल्यापासून प्रत्येक विषयच वादाचा होऊन गेला आहे. चोविस तास वाहिन्यांवर सनसनाटी माजवायची, तर हाती लागेल तो विषय वादग्रस्त बनवावाच लागतो. त्यात काहीच वादग्रस्त वा शंकास्पद नसेल, तर बहुतांश वाहिन्यांना आपला कारभार गुंडाळावाच लागणार नाही काय? सहाजिकच हा अमूक एक विषय वादग्रस्त असल्याचा दावा करण्यात अर्थ नाही. वाहिन्यांवर ज्याचे धुणे बडवले जात असते, त्याला वादग्रस्त म्हणायची आपल्याकडे फ़ॅशन आहे. तर असे दोन वादग्रस्त विषय म्हणजे माजीमंत्री नटवरसिंग यांचे आत्मचरित्र आणि अमेरिकन परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांचा भारतदौरा. अर्थात केरी इथे खास अमेरिकन अध्यक्षाचे दूत म्हणून आलेत आणि भारताच्या नव्या पंतप्रधानांना खुश करण्यासाठी आलेत, हे वेगळे सांगायला नको. मागल्या दहा वर्षात आपल्या देशात नरेंद्र मोदींच्या विरोधात जी अथक सेक्युलर आघाडी चालवली गेली, तिला खाद्य पुरवण्याचे काम अमेरिकन सरकारने केलेले होते. आता त्याच सापळ्यातून बाहेर पडायची केविलवाणी धडपड त्या सरकारला करावी लागत आहे. कारण तोच माणुस आता या खंडप्राय देशाचा पंतप्रधान होऊन बसला आहे आणि त्याच्या मेहरबानीशिवाय अमेरिकेला आपले आर्थिक स्वार्थ जपणे अशक्य आहे. अशा या अमेरिकेने आता त्यांच्या ‘खास’ यादीतून नरेंद्र मोदी यांचे नाव वगळले आहे. खास यादी म्हणजे ज्यांना मानवी हक्काची पायमल्ली केल्याने काळ्या यादीत टाकले जाते अशी यादी. तेच सांगायला बहुधा केरी दिल्लीपर्यंत आलेले असावेत. अर्थात मोदींनी त्यांच्या यादीची कधीच पर्वा केलेली नव्हती. त्यामुळेच यादीतून आपले नाव हटवल्याने मोदींना खुश व्हायचे काही कारण नाही. पण त्याचवेळी नटवरसिंग यांचा गौप्यस्फ़ोट मोठा आहे.
ज्या काळात मोदींना सैतान ठरवण्याची सेक्युलर शर्यत आपल्या देशात तेजीत आलेली होती, त्याच काळात सोनिया गांधींच्या त्यागाचेही मोठे नाटक अहोरात्र रंगलेले होते. २००४ सालात युपीएची सत्ता येऊ घातली, तेव्हा बहूमत आपल्या पाठीशी असल्याचे सांगत सोनिया राष्ट्रपतींना भेटल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात सरकार बनवायची वेळ आली, तेव्हा त्यांनी माघार घेतली होती. कॉग्रेस पक्षानेच नव्हेतर निवडणूकपुर्व मित्रपक्षांनीही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला होता. पण ऐनवेळी त्यांनी माघार घेताना भलतेच कारण दिले होते. आपला अंतरात्मा सांगतो म्हणून आपण माघार घेतली, असा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर फ़ार मोठे नाट्य रंगलेले होते. सोनिया गांधी यांनी महान त्याग केल्याचे नाट्य तमाम वृत्तवाहिन्या दोन दिवस दाखवत होत्या. त्यांनी देशाची सत्ता हाती येऊनही पद नाकारले आणि आपल्या सहकार्याला त्या पदावर बसवले, असे कौतुक दिर्घकाळ चालू राहिले होते. वास्तविक तेव्हाही कॉग्रेसला मोठे यश मिळालेले नव्हते. आधीच्या तीन निवडणूकीत जितके अपयश पक्षाला मिळाले, तेवढेच २००४ सालातही मिळालेले होते. फ़रक होता तो सोबत जमवलेल्या मित्रपक्षांच्या बळाचा. नरसिंहराव व केसरी यांच्या काळात १४० तर २००४ सालात सोनियांनी १४६ जागा जिंकल्या होत्या. पण चित्र असे काही पेश केले जात होते, की सोनियांनी कॉग्रेसला आपले पुर्ववैभवच प्राप्त करून दिलेले असावे. जे धडधडीत खोटे होते. पक्षाला सोडा, युपीएलाही बहूमत मिळवून देण्यात सोनिया अपेशी ठरल्या होत्या. पण आधी त्यांनी मोठा विजय मिळवल्याचा आणि नंतर पंतप्रधान पदाचा त्याग केल्याचा असा डंका पिटण्यात आला, की सत्य बोलायला प्रत्येकजणाला धडकीच भरावी. नटवरसिंग यांनी आता त्याच थोतांडाचा पर्दाफ़ाश केला आहे. सोनियांनी सत्तेचा त्याग केला नव्हता, तर राहुलच्या आग्रहास्तव त्यांनी कठपुतळी पंतप्रधान देशाच्या माथी मारला होता.
त्या काळात नटवरसिंग सोनियांचे निकटवर्ति होते. आज आपल्या पुस्तकात सिंग यांनी सोनियाच पडद्याआड राहून देशाचा कारभार चालवत असल्याचे म्हटलेले आहे, त्यात नवे काहीच नाही. दिल्लीत वावरणारा प्रत्येक जाणता पत्रकार ते ओळखून होता. पण सत्य बोलायचेच नाही, अशी शपथ घेणार्यांकडून सत्याचा बोलबाला होणार कसा? पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे प्रसिद्धी सल्लागार संजय बारू वा एक माजी अधिकारी पारख यांची पुस्तके यापुर्वीच आलेली आहेत. त्यांनीही मनमोहन सिंग यांना त्यांच्या अपरोक्ष सरकारमध्ये काय चालते तेही ठाऊक नसल्याचा खुलासा केलेला आहेच. थोडक्यात सोनियांनी सत्तेचा त्याग वगैरे काहीही केलेला नव्हता. उलट सत्तेची जबाबदारी मनमोहन सिंग यांच्या गळ्यात अडकवून खरी सत्ता सोनियाच राबवत होत्या. मात्र त्याची कुठलीही जबाबदारी आपल्यावर येणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली होती. याला त्याग म्हणत नाहीत, तर निष्पाप मनमोहन सिंग यांचा बळी देणे म्हणतात. जबाबदारीबाह्य सत्ता उपभोगणे म्हणतात. म्हणून तर राहुल गांधी यांनी एक अध्यादेश टरटरा फ़ाडून टाकला आणि मनमोहन सिंगच कशाला, अन्य कुठला मंत्री अवाक्षर बोलू धजावला नव्हता. गेली दहा वर्षे देशातल्या माध्यमे व संपादक पत्रकारांनी हे एक पाखंड निरागस जनतेच्या माथी सराईतपणे मारले. एका त्यागी माणसाला बळीचा बकरा म्हणून सत्तापदावर बसवले आणि एका सत्तापिपासू महिलेला त्यागाची मुर्ती म्हणून तिचे अखंड खोटेनाटे कौतुक चालविले होते. खरी सत्ता सोनियांच्या हातीच आहे, याची बहुतांश संपादक व पत्रकारांना माहिती होती, ते दिल्लीतले उघड गुपीत होते. बारू, नटवर यांनी नवे काहीच सांगितले नाही. ज्या सत्याचा गळा घोटण्याचा महान पुरूषार्थ दिल्लीतले पत्रकार बेईमान वागून करीत होते, त्यांच्या चेहर्यावरचे मुखवटे अशा पुस्तकातून फ़ाडले गेले आहेत.
२ जी स्पेक्ट्रम घोटाळा, राष्ट्रकुल घोटाळा, कोळसा खाण घोटाळा, त्यासंबंधीच्या फ़ाईल्स पंतप्रधान निवासातून गायब होण्याचे प्रकार दिल्लीतल्या चतूर पत्रकारांना माहित नव्हते काय? इशरत जहान, सोहराबुद्दीन चकमकी वा स्नुपगेटचे तपशील शोधून काढणार्या दिल्लीच्या पत्रकारांना पंतप्रधानांच्या अपरोक्ष देशाच्या कारभारात होणारा हस्तक्षेप कळत नव्हता, यावर कोणी विश्वास ठेवायचा? या पत्रकारांना हा प्रशासकीय, घटनात्मक व राजकीय घोटाळा ठाऊक असून त्यापैकी कोणीच त्याचा गौप्यस्फ़ोट दहा वर्षात कशाला केला नाही? यातले अनेक पत्रकार कुठल्या पक्षाला कुठली मंत्रालये मिळावीत, त्याचा सौदा करीत होते ना? म्हणजेच नटवर असो किंवा संजय बारू असोत, त्यांनी आपापल्या पुस्तकातून मोठ्या राजकीय नेते वा सत्ताधार्यांचे गौप्यस्फ़ोट केले आहेत, त्याची वाच्यता दिल्लीतल्या एकाहून एक शोधपत्रकारांनी कधीच कशी केली नाही? दिल्लीत बसलेले हे नावाजलेले पत्रकार गुजरातला जाऊन छुप्या कॅमेराने अनेक चित्रणे याच काळात करीत होते. पण देशाच्या माथी मारला गेलेला बुजगावण्या सरकारचा फ़्रॉड समोर घडत असतानाही जगाला सांगायची इच्छाही त्यातल्या कुणा पत्रकाराला कशी झाली नाही? नसेल तर दोनच कारणे संभवतात. एक म्हणजे हे दिल्लीतले तमाम नावाजलेले पत्रकार पुरते बुद्दू असायला हवेत. आणि तसे नसेल, तर हे सुद्धा त्या राजकीय फ़्रॉड व कारस्थानातले भागिदार असायला हवेत. नटवरसिंग यांनी सोनियांचा गौप्यस्फ़ोट केला तोच पत्रकारितेचाही खोटेपणा आहे. कारण हे सोनियांइतकेच दिल्लीच्या पत्रकारांनी जपलेले झाकलेले गुपित नाही काय? राजरोस सोनिया व त्यांचे हस्तक सरकारी कारभारात हस्तक्षेप व ढवळाढवळ करीत असल्याचे धागेदोरे विविध घोटाळ्यांच्या तपशीलातही सापडतात. त्याविषयी मौन धारण करणारे माध्यमातले मौनमोहन आजवरच्या आपल्या मौनाचा खुलासा कधी करणार आहेत? नेपोलीयन त्यांच्याबद्दल म्हणतो, ‘इतिहास म्हणजे सहमतीने स्विकारलेले असत्य.’ नटवरसिंगांनी त्यात सहमतीने गप्प बसलेल्यांनाच नग्न केलेले नाही काय?
भाऊ, बरेचसे पत्रकार आता राजकीय पक्षांच्या PRO चे काम करत आहेत हे लपून राहिलेले नाही. आजच्या महाराष्ट्र टाइम्स मधे नटवरसिंह यांच्या गौप्यस्फोटाची बातमी कशी लिहली आहे पहा.....
ReplyDelete'नटवर यांना सोनियाचे उत्तर- (बातमी जशीच्या तशी) नवी दिल्ली: इंदिरा गांधी व राजीव गांधीच्या हत्येनंतर सोनियांनी पंतप्रधानपद स्विकारल्यास त्यांच्या जिवाला धोका असण्याच्या काळजी पोटीच राहुल यांनी सोनियांना हे पद न स्वीकारण्याचा आग्रह धरला, या नटवरसिंह यांच्या 'गौप्यस्फोटा'ला गुरुवारी सोनियांनीच 'पंतप्रधानपद का नाकारले यावर आता मीच पुस्तक लिहते', अशा शब्दात नटवर यांच्या दाव्याची हवाच काढुन टाकली.'
आता यामधे 'हवाच काढून टाकली' हे कसे काय? सोनिया गांधी यांनी हे मान्य केले असते किंवा जबरदस्त असे काही वेगळे उत्तर दिले असते तर असे म्हणता आले असते. परंतू मटाला बातमीच Dilute करुण सांगायची आहे मग ते असेच लिहणार.
आपण केलेला 'गौप्यस्फोट' सगळ्यात भारी आहे.
मोदी साहेबांनी या पत्रकारांना पत्रकार न म्हणता बातम्यांचे व्यापारी (न्युज ट्रेडर) म्हणले आहे आणि त्यात फार तथ्य आहे. नागपूरी भाषेत बरखा दत्त किंवा राजदिप सरदेसाई सारख्या लोकांना भाड्याचे बैल म्हणतात. पत्रकारितेचे ढोंग करीत हि लोक निव्वळ स्वतः चे पोट भरीत नाहीत तर असत्याच प्रसार करुन देशाचे प्रचंड नुकसान करतात. गेल्या दहा वर्षातील घोटाळ्यांमधे आणि एकुण अप्रगतीत या पत्रकारांचा फार मोठा हात आहे.
ReplyDelete