Sunday, October 1, 2017

एका हाताची टाळी



दसर्‍याचा शिवसेना मेळावा ही आता अर्धशतकातील मुंबईची एक परंपरा झालेली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब निवर्तले तरी ती कायम चालली आहे. मात्र सेनेच्या व्यासपीठावरचे चेहरे बदलून गेले आहेत. आरंभीच्या काळात दत्ताजी साळावी, प्रमोद नवलकर, मनोहर जोशी, वामनराव महाडीक इत्यादी नेत्यांची वर्दळ तिथे दिसायची. नंतरच्या कालखंडात अनेक चित्रपट कलावंतही त्या मंचावर दिसलेले आहेत. एकदा तर या मेळाव्याला हजर असलेल्या तात्कालीन सुपरस्टार वैजयंतीमाला चक्क पाऊस पडताना उघड्या मंचावर भिजल्या, तरी सभा चालली होती. त्याच व्यासपीठावर कॉम्रेड डांगेही हजेरी लावून गेलेले आहेत. तो इतिहास आजच्या पिढीला कितपत ठाऊक आहे त्याचा अंदाज करता येत नाही. पण अगदी पहिल्या वर्षापासून हा मेळावा गाजत राहिलेला आहे. कारण त्या पहिल्या मेळाव्यात बाळासाहेबांनी दाक्षिणात्य लुंगीवाल्यांच्या विरोधात आवाज उठवला होता आणि मेळावा संपवून परतणार्‍या शिवसैनिकांच्या जमावाने दादर परिसरातील उडीपी नावाच्या बहुतांश दाक्षिणात्य हॉटेलांवर जबरदस्त हल्ले चढवलेले होते. त्यामुळे शिवसेनेच्या त्या नव्या उदयाकडे व स्वरूपाकडे अवघ्या माध्यमांचे पहिल्या दिवशीच लक्ष गेले होते. अगदी त्या पहिल्या मेळाव्यानेच राष्ट्रीय माध्यमात शिवसेनेची दखल घेतली गेली होती. त्यानंतर सेनेचा मेळावा किंवा मोर्चा म्हटल्यावर आसपासच्या परिसरात वर्दळ कमी व्हायची. फ़ेरीवाले व धंदेवाले आपला ‘संसार’ आवरून बसायचे. अशा शिवसेनेचा यावेळचा मेळावा वेगळ्याच घटनेने लक्षात राहिल. कारण शिवाजी पार्कचा हा मेळावा संपवून माघारी परतणार्‍या एका घोळक्याने नजिक वास्तव्य करणार्‍या राज ठाकरे यांना आवाज देऊन बाहेर बोलावले. त्यांनीही चक्क बाहेर येऊन शिवसैनिकांची थेट हस्तांदोलन केले. थोडक्यात एका हातानेही टाळी वाजते असेच दाखवून दिले.

दहाबारा वर्षापुर्वी शिवसेनेत मोठी घुसळण सुरू झाली. हळुहळू आपल्या वयामुळे कामातून बाजुला होत बाळासाहेबांनी आपला वारसा उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला व त्यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली. तेव्हा त्यात पुढाकार असलेले दोन नेते आता सेनेतून बाहेर पडले असून, कडवे विरोधक वा टिकाकार झालेले आहेत. राज ठाकरे त्यापैकीच एक होत. तेव्हा शिवसेनेचे मुख्यमंत्रीपदाचे हक्कदार नारायण राणे होते आणि संघटनात्मक पातळीवर लोकप्रिय वक्ता म्हणून राज ठाकरे उदयास येत चालले होते. त्यापैकी राणे यांनी २००४ च्या निवडणूका संपल्यावर अल्पावधीतच सेनेला जय महाराष्ट्र केला आणि कॉग्रेसची वाट धरली. त्यानंतर काही अवधीतच राज ठाकरे यांनीही आपल्या काकांना म्हणजे शिवसेनाप्रमुखांना एक निर्वाणीचे पत्र लिहीले आणि अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करीत वेगळी चुल मांडली. मागल्या दोनचार निवडणूकात  दोन भावांच्या भांडणात शिवसेना दुभंगल्याचे दु:ख अनेक जुन्याजाणत्या शिवसैनिकांना होत राहिले आणि त्यांनी एकत्र येऊन शिवसेना अधिक बलशाली बनवण्याचे आग्रहही धरले गेले. कधी राजच्या निवासस्थानी तर कधी मातोश्रीवर असे निष्ठावान जुने शिवसैनिक आपल्या इच्छा व्यक्त करण्यासाठी मिरवणूकाही घेऊन गेले होते. तर कधी कोणी मोठी पोस्टर्स लावूनही तशा आशा व्यक्त केल्या होत्या. पण विविध प्रसंगी एकत्र येऊनही दोन भाऊ राजकारणात एकत्र येऊ शकलेले नाहीत. खुद्द उद्धव एकेदिवशी गंभीर आजारी पडले, तेव्हा अलिबागचा कार्यक्रम सोडून राज ठाकरे धावत मुंबईत दाखल झाले होते. पुढले तीन दिवस त्यांनी इस्पितळ सोडले नव्हते. आपणच गाडी चालवूनच राजनी उद्धवना मातोश्रीत सुखरूप पोहोचते केलेले होते. पण राजकारणात पुढे काही झाले नाही. दुफ़ळी तशीच कायम राहिली. राज ठाकरे यांनी ती सदिच्छा कधी मरू दिली नाही आणि याही दसर्‍याला त्याचीच पुनरावृत्ती झाली म्हणता येईल.

जेव्हा राज ठाकरे सेनेतून बाहेर पडले वा त्यांनी तसा इशारा दिलेला होता, त्यानंतर त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी अशीच शिवसैनिकांची वर्दळ झालेली होती. तिथे हजारोच्या संख्येने बाळासाहेबांना मानणार्‍या तरूणांची गर्दी झाली होती आणि राज यांची समजूत घालायला काही नवे सेनानेतेही पोहोचले होते. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यापैकी काही नेत्यांच्या गाड्यांवर जमावाने हल्ला चढवला व मोडतोडही केलेली होती. तिथेच विषय संपला आणि तडजोड निकालात निघून, पुढे काही महिन्यांनी राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा नावाने नवा पक्ष स्थापन केला होता. तेव्हा कोणी त्यांना फ़ारसे मनावर घेतलेले नव्हते. पण २००९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणूकात शिवसेना व भाजपा अशा युतीला पराभूत करण्यात राज यांनी मोठी कामगिरी बजावली. मगच लोक त्यांच्या पक्षाकडे गंभीरपणे बघू लागले. विधानसभेत तर त्यांनी मुंबईतील सहा आमदार निवडून आणून आपले वर्चस्व सिद्ध केलेच. मात्र मागल्या लोकसभा विधानसभा निवडणूकीत त्यांच्या पक्षाची वाताहत होऊन गेली. अनेक नेते त्यांना सोडून गेले. काही आधी तर काही नंतर दुरावले. पण मोदीलाटेवर स्वार झालेल्या शिवसेनेने लोकसभेत मोठे यश मिळवले आणि विधानसभेत युती तुटली असतानाही प्रथमच एकाकी लढताना शिवसेनेने स्वबळावर राज्यात मोठे यश संपादन केले. कॉग्रेस व राष्ट्रवादी या दोन प्रस्थापित पक्षांपेक्षाही अधिक मते व अधिक जागा मिळवून शिवसेना बाळासाहेबांच्या निधनानंतरही मजबूत असल्याची साक्ष दिलेली होती. सहा महिन्यांपुर्वी महापालिका निवडणूक लागली, तेव्हा राज यांनी सेनेशी जुळवून घेण्याचा अखेरचा प्रयत्न केला होता. पण त्याचा उपयोग झाला नाही आणि दोघांच्या भांडणात भाजपाला मुंबईत मोठे लक्षणिय यश मिळून गेले. राज यांचा पक्ष मोठ्या प्रमाणात खच्ची झाला.

पालिका निवडणूक काळात राज यांचा पुत्र अमित गंभीर आजारी होता आणि त्यांना झुंज देता आलेली नव्हती. आता अमित त्यातून बाहेर पडला आहे आणि अलिकडेच राज यांनी नव्या दमाने पक्षाला उभारी देण्य़ाचा मनोदय व्यक्त केला आहे. येत्या दोन दिवसात त्यांनी परळच्या दुर्घटनेविषयी सरकारला जाब विचारण्यासाठी मोर्चाही योजलेला आहे. तिथून त्यांनी पुनश्च हरिओम म्हणायचे ठरवले आहे. त्यात त्यांना लोकांचा पाठींबा हवाच आहे. पण लोकभावना ओळखून त्याला शब्द देण्याची किमया राजनी यापुर्वीही दाखवलेली आहे. सहा वर्षापुर्वी रझा अकादमीने रोहिंग्या मुस्लिमांवरील अन्यायाचा आवाज उठवण्यासाठी मोर्चा योजला आणि आझाद मैदान परिसरात धुमाकुळ घातला होता. त्याला उत्तर देण्यासाठी कुठला राजकीय पक्ष पुढे सरसावला नाही. पण कितीही प्रतिबंध घातले असताना राज ठाकरे यांनी मनसेतर्फ़े योजलेला मोर्चा वादळी ठरला होता. बंदी झुगारून निघालेल्या त्या मोर्चाला जोरदार प्रतिसाद मिळाला होता आणि आसामी भाषेतील वर्तमानपत्रांनीही त्याच्या हेडलायनी केलेल्या होत्या. पुढे मुंबईचे तात्कालीन पोलिस आयुक्तही बदलले गेले होते. आज पुन्हा राजनी तशाच एका हळव्या विषयावर क्षुब्ध मुंबईकरांचे नेतृत्व करण्याचा घाट घातला आहे. त्यात ते किती यश मिळवतात हे दिसेलच. पण आजही त्यांच्याविषयी सामान्य शिवसैनिकात दुजाभाव नसल्याची ही पहिली साक्ष राज यांना सुखदायी नक्कीच वाटली असेल. त्यांनी निर्धास्तपणे आपल्या घरापर्यंत आलेल्या शिवसैनिकांच्या जमावाला अभिवादन केले आणि पुढे येऊन त्यांच्याशी ‘हात मिळवला’. ही बाब प्रदर्शनीच आहे. पण त्यातला संकेत असा आहे, की मनात असेल तर एका हातानेही टाळी वाजू शकते. इच्छा असेल तर मार्ग निघू शकतो. भाजपाला शह देण्यासाठी कुणी सोबत घेण्याची इच्छाच त्या दिशेने पुढले पाऊल ठरू शकेल. पण ‘मनसे’ इच्छा तशी असायला हवी

13 comments:

  1. जबरदस्त निरीक्षण, भाऊ. हे तुम्हीच करू शकता. दुर्दैव हे की त्याचा उपयोग हे लोक करत नाहीत. राज ठाकरे तर फक्त विनोदी बातम्याच वाचतात की काय, कोण जाणे. दर तीन महिन्यांनी भाषण करतात तेंव्हा टिंगलीस उपयुक्त अशा विनोदी बातम्यांचीच कात्रणे घेऊन उभे असतात.

    ReplyDelete
    Replies
    1. श्रीनिवास साहेब राज साहेबां विषयी बोलण्या इतकी तरी आपण आपली कुवत करावी मग बोलावे, राज साहेब कधीतरी बोलत असले तरी ते योग्य बोलतात उगाच वायफळ बोलण्यापेक्षा कमी बोललेले नेहमीच चांगले असते आणि हो ज्याला तुम्ही विनोद म्हणता ना ते करायला ही अक्कल लागते म्हणतात ना नक्कल करायला ही अक्कल लागते आणि ते जे बोलतात ते पुराव्या सहित आणि अजून एक ते कात्रण नाही उभे करत तर ते पुरावे असतात.. अहो शिवसैनिकांनी ज्या प्रेमा आणि आदरापोटी राजसाहेबांना घरातून बाहेर बोलावून घेतलं ते तुम्हाला कधीच कळणार नाही असो त्यामुळे आपण ज्याच्यावर टीका करीत आहोत तेवढी पात्रता तरी आहे का स्वतःची ते ही पाहावे साहेब.. धन्यवाद..

      Delete
    2. तोरस्कर साहेब आपला ब्लॉग छान आहे.. तुमचा शब्द प्रयोगी खूप छान आहे.. अगदी स्पष्ट आणि समजेल असं आहे.. आपल्या सारख्या ब्लॉगर्समुळे समाज प्रबोधन होण्यास मदत होते.. धन्यवाद..

      Delete
    3. ज्या रंगाचा चश्मा लावणार तसंच जग दिसणार

      Delete
    4. श्रीनिवासजी आपण कधी राजसाहेबांचे भाषण नीट पाहिले ,ऐकले आहे का , भाषणात जी काही कात्रण ,तत्कालीन पुरावे इ असतात त्याला तुम्ही विनोदी म्हणता हाच मोठा विनोद म्हणावा लागेल , टोल प्रश्नावर केलेला अभ्यास गोळा केलेले पुरावे , इतकी वर्षे मुंबईच्या प्रश्नांवर घेतलेली अभ्यासपूर्ण भूमिका , महाराष्ट्र विकास आराखडा हे सगळं तुम्हाला विनोदी वाटतं आणि मग गांभीर्यपूर्ण काय 15/15लाख खात्यांवर जमा करणार , मुंबईला मूलभूत सुविधा न देता कर्ज काढून बुलेट ट्रेन आणणार

      Delete
  2. सुंदर भाऊ.. 👍

    ReplyDelete
  3. दोन्ही भाऊ एकत्र येऊन देशाला काय फायदा ?
    कायम कोणाच्या ना कोणाच्या विरोधात २,४ शिव्यांनी व दादागिरीने सुरु केलेले आंदोलन फार काळ टिकत नाही..
    एकीकडे हिंदुत्व सांगायचे व दुसरीकडे .. मराठी मराठी करत बिहारी व गुज्जूंना झोडपायचे व सत्ते करीता MIM शी जाऊन मिळायचे हे सर्व लोक बघत आहेत.
    चांगल्या गोष्टींना विरोधा साठी विरोध करून आपले अस्तित्व जपण्याचा केविलवाणा प्रयत्न जाणवितो आहे.
    बघुयात, देशाचे व राज्याचे नशिब चांगले असेल तर सद्बुद्धी मिळेलही..

    ReplyDelete
  4. मस्त भाऊ ! राज ठाकरे यांच्याकडे अनेक गुण आहेत ,.. बाळासाहेबानंतर त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहिले जाते .... पण दुर्दैवाने ... भाषणानतर जे प्रत्क्ष्यात यायला पाहिजे ते येत नाही .... काही दुर्गुण / उणीवा आहेत ज्या त्यांनी दूर करायला हव्यात ... म्हणजे भाषणाची कला मतदानात परिवर्तीत होईल ..

    ReplyDelete
  5. भाऊ,
    राजकारण हा राज ठाकरेचा "व्यवसाय" आहे.
    ते समाजकारण नाही. अन्यथा महाराष्ट्राने मनसेला स्वीकारले असते.

    ReplyDelete
  6. मला तर राजमध्येच बाळासाहेब दिसतात वागण्या बोलण्यात आणि दिसण्यात.त्यांच्यात बाळासाहेबांचा DNA आहे.त्यांनाच खर तर शिवसेना अध्यक्ष करायला हव होत

    ReplyDelete
    Replies
    1. ताई दुरून डोंगर साजरे . बाळासाहेबांचा वारसा योग्य व्यक्ती चालवतोय .

      Delete
  7. भाऊ राज ठाकरेंचा पक्ष व्यक्तीद्वेषातून निर्माण झालाय . सेनेच्या खच्चीकरणासाठी तो कुठलीही पातळी गाठू शकतो . हे सामान्य जनतेला उशीरा का होईना उमगलेय . ज्या दिवशी जनतेला जाणवेल की राज ठाकरे खरोखरच जनतेसाठी लढतायत त्यादिवशीच त्यांचा पक्ष मुळ धरू शकेल .

    ReplyDelete