गेल्या पावसाळी अधिवेशनात बहुजन समाजाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी संसदेच्या सदस्यत्वाचा तडकाफ़डकी राजिनामा दिला आणि त्यानंतर त्या जणू अंतर्धान पावलेल्या होत्या. पण या आठवड्यात त्यांनी अकस्मात सार्वजनिक जीवनात नव्याने प्रवेश केलेला दिसतोय. मध्यंतरी त्या काय करीत होत्या, त्याची कुठली खबरबात नव्हती. पण अचानक अवतरलेल्या मायावतींनी एक नवीच धमकी हिंदू धर्माचार्यांना दिलेली असून त्यामुळे तिकडे लोकांचे लक्ष वेधले गेलेले आहे. पण आजकाल मायावती फ़ारशी सनसनाटी माजवणारे काही सांगत बोलत नसल्याने, माध्यमांनी त्यांच्याकडे साफ़ दुर्लक्ष केलेले असावे. अन्यथा इतकी जबरदस्त धमकी दिलेली असताना त्यावर साधी चर्चाही कशाला होऊ नये? हिंदू धर्माचार्यांनी आपल्या कारवायांना आवर घातला नाही, तर आपण हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्माचा अवलंब करू अशी ही धमकी आहे. पण त्यामुळेच अवघ्या जगाला व बहुधा मायावतींच्या अनुयायांना प्रथमच त्या हिंदू असल्याचा साक्षात्कार झालेला असेल. कदाचित खुद्द मायावतींनाही त्या हिंदू असल्याचा अलिकडेच साक्षात्कार झालेला असावा. अन्यथा यांनी धर्म सोडण्याची धमकी कशाला दिली असती? भारतीय राज्यघटना प्रत्येक नागरिकाला त्याच्या आस्थेनुसार धर्माचे पालन करण्याची मोकळीक देते आणि त्यात कोणी हस्तक्षेप करू शकत नाही. असे असताना मायावतींना कुठल्या धर्माचार्यांना इशारे देण्याची मुळातच गरज काय? त्या घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांच्या कट्टर अनुयायी आहेत. त्यामुळे त्यांनी धर्माचार्यांपेक्षाही घटनेवर जास्त विसंबून रहायला नको काय? जर त्या घटना मानत असतील, तर त्यांच्या एक गोष्ट सहज लक्षात यायला हवी होती, की त्यांच्या हिंदू असण्याचा संबंध धर्माचार्यांच्या अधिकाराशी नसून, व्यक्तीगत आस्थेशी संबंधित आहे. मग धर्माचार्यांना इशारे कशाला?
गेल्या दोन दशकापासून मायावती सार्वजनिक जीवनात आघाडीवर आहेत. त्यांनी चार वेळा देशातील सर्वात मोठ्या उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवलेले आहे, या इतक्या प्रदिर्घ कालखंडात व कारकिर्दीत त्यांनी आपल्या हिंदूधर्मिय असल्याची कुठलीही साक्ष आजवर दिलेली नाही. पण प्रत्येक वेळी हिंदू धर्म वा त्यातील चालिरिती याविरुद्ध अगत्याने मतप्रदर्शन केलेले आहे. त्यांच्याच कारकिर्दीत उत्तरप्रदेशात नवे जिल्हे निर्माण झाले, त्यापैकी एकाचे नाव गौतमबुद्ध नगर असे ठेवण्याचे अगत्यही त्यांनी दाखवलेले आहे. या कालखंडात लोक त्यांच्याकडे बौद्ध म्हणूनच बघत आलेले आहेत. नाही म्हणायला बारातेरा वर्षापुर्वी त्यांनी धर्माचार्य नव्हेतरी ब्राह्मण संमेलने भरवून अनेकांना चकीत केलेले होते. त्यांच्यापुर्वी बसपाचे सर्वेसर्वा असलेले कांशीराम यांच्या कारकिर्दीत पक्षाची भूमिका सातत्याने हिंदूविरोधी राहिलेली आहे. ब्राह्मण बनिया खत्री चोर, बाकी सारे डीएसफ़ोर अशी लोकप्रिय घोषणा होती. त्यातून त्यांनी दलित वगळता बाकी सर्व जातीतले हिंदू म्हणजे चोर असल्याचा उदघोषही केला होता. पुढल्या काळात आणखी आक्रमक घोषणा आली, ती तिलक तराजू और तलवार, इनको मारो जुते चार अशी होती. यातून केव्हाही आपला धर्माभिमान बसपा वा मायावतींनी दाखवलेला नव्हता. त्याविषयी कुठली आस्था दाखवलेली नव्हती. सहाजिकच धर्माचार्यांशी मायावतींचा कधी संबंध आला नाही, की त्यांनी सक्ती केलेल्या धर्माशीही मायावतींचा संबंध नाही. मग अक्स्मात धर्माचार्यांना धमकावण्याचे प्रयोजन काय? की हाततले राजकारण निसटल्याने मायावती भरकटल्या आहेत? लोकसभा व विधानसभा अशा दोन्ही निवडणूकांमध्ये त्यांच्या पक्षाची पुरती धुळधाण उडाल्यावर त्यांना अचानक धर्म आठवला आहे. इतकी वर्षे ज्यांना जातीच्या पलिकडे बघताही आले नव्हते, त्यांना आता धर्माचा पुळका कशाला आला आहे?
१९८० नंतर बसपा या पक्षाचा उदय झाला आणि पुढल्या काळात मायावतींनी आपल्या जातव या दलित जातीच्या समुहाला आकर्षित करून घेतले. उत्तरप्रदेशात मोठी लोकसंख्या असूनही या समाजघटकाला कोणी आक्रमक नेता लाभलेला नव्हता. मायावतींच्या निमीत्ताने तसा नेता लाभल्याने हा समाज त्यांच्या मागे एकवटला तर गैर काहीच नव्हते. पण सत्तेच्या राजकारणात मायावती इतक्या भरकटत गेल्या, की आपली बरकत म्हणजेच दलितांचे कल्याण, अशी समजून मायावतींनी करून घेतली. त्यांच्या आप्तस्वकीयांचे उखळ पांढरे झाले आणि अन्य कुठल्याही पक्षातील नेत्यांचे कुटुंबिय झपाट्याने श्रीमंत होऊन जातात, तशीच मायावतींच्या निकटावर्तिय लोकांची चंगळ झाली. मात्र या कालावधीत त्यांच्या ज्ञातीबांधवांच्या वाट्याला फ़ारसे काही आले नाही. त्यांनी ‘अच्छे दिन’ येण्य़ाची अपेक्षा बाळगलेली नव्हती. पण किमान सुसह्य दिन यावेत, इतकीही अपेक्षा आपल्या जातीच्या नेत्याकडून बाळगण्यात गैर काय होते? मंडल शिफ़ारशी अंमलात आल्यानंतरच्या काळात ज्या मागास व पिछड्या जातीच्या नेत्यांना उभारी मिळाली, त्यापैकीच मायावती, मुलायम, लालू यांची गणती आहे. पण त्यातून त्या समाज घटकांच्या वाट्याला काय सुबत्ता आली? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. यापैकी प्रत्येकाने आपापल्या जातीच्या समूहाला झुलवले आणि आपल्या परिवाराचे कल्याण करून घेतले. मायावती त्यापैकीच आहेत. म्हणून त्यांना आता ती राजकीय शक्ती गमावल्यानंतर आपल्या धर्माचे स्मरण झालेले आहे. १९८० च्या दशकात जशी उत्तर भारतातील मागास जातींच्या संघटनाची आरोळी ठोकली गेली होती, त्याकडे मायावती पुन्हा वळताना दिसत आहेत. म्हणून कुठलेही नजरेत भरणारे कारण नसताना अचानक मायावतींनी धर्माचार्य मंडळींना धमक्या देण्याची भाषा केलेली आहे.
२००७ सालात त्यांनी एकहाती उत्तरप्रदेशात बहूमत मिळवले व संसदेतही चांगले प्रतिनिधीत्व संपादन केले. तेव्हापासून मायावतींना सोशल इंजिनीयरिंग करण्यातल्या कुशल राजकारणी मानले जात होते. पण एकहाती सत्ता आल्यापासून त्या भरकटत गेल्या. त्यांनी पक्षाची लोकप्रियता बाजारभावाने विकल्याचे आरोप त्यांच्यावर सतत होत राहिले. त्यांचेच एक एक सहकारी पक्षाला रामराम ठोकून मायावती उमेदवारीची तिकीटे विकतात असे आरोप करू लागले होते. तोच मायावतींसाठी सावधानतेचा पहिला इशारा होता. जितक्या मोठ्या रकमा नोटाबंदीनंतर मायावतींनी बॅन्केत जमा केल्या, त्यातून या वस्तुस्थितीचे पुरावे मिळालेले आहेत. त्याचे पहिले दुष्परिणाम लोकसभा निकालातून समोर आलेले होते. विसर्जित लोकसभेत २० हून अधिक खासदार असलेल्या बसपाला २०१४ सालात एकही सदस्य निवडून आणता आला नाही. नंतर तीन वर्षांपुर्वी झालेल्या विधानसभेत ९० आमदार असलेल्या त्यांच्या पक्षाला यंदा ३० चा पल्ला ओलांडता आला नाही. मायावतींना पुन्हा राज्यसभेत निवडून जाण्यासाठी आवश्यक असलेली आमदार संख्याही त्यांना टिकवता आली नाही. हे सर्व धोक्याचे इशारे होते. ते ओळखून सावध होण्यापेक्षा मायावती नुसता आततायीपणा करत गेल्या आणि त्यातच त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचाही राजिनामा देऊन टाकला. आधीच बिगर जातव दलित त्यांना सोडून गेलेले होते आणि आता त्यांचे जातवांवर सुद्धा प्रभूत्व राहिलेले नाही. त्यामुळे पहिल्यापासून सुरूवात करण्याची नामुष्की त्यांच्यावर आलेली आहे. तसे नसते तर अशी इशार्याची भाषा मायावती का बोलल्या असत्या? मुलायम आधीच बारगळले आहेत आणि मायावती तशीच स्थिती झाल्याची कबुली आपल्या अशा आततायी बोलण्यातून देत आहेत. याचा अर्थ इतकाच, की पुढल्या काळात बसपा, समाजवादी वा कॉग्रेस यांना नवे नेतृत्व उभे करावे लागेल. किंवा त्यांची जागा व्यापणारे नवे पक्ष व नव्या संघटना उदयास येऊन भाजपाला नवे राजकीय आव्हान उभे करतील. आक्रमक मायावतींची ही इशारेवजा भाषा प्रत्यक्षात खुप केविलवाणी वाटते.
No comments:
Post a Comment