Sunday, October 29, 2017

भटाला दिली ओसरी

shyam rangeela के लिए चित्र परिणाम


"A lie gets halfway around the world before the truth has a chance to get its pants on."  - Sir Winston Churchill

गुजरातमध्ये संजीव भट नावाचा एक आयपीएस अधिकारी सरकारी सेवेत होता. पंधरा वर्षापुर्वी गुजरातच्या गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेस ही गाडी रोखून पेटवून देण्यात आली, त्यात ५९ प्रवाशांचे होरपळून बळी गेले होते. मग त्याची संतप्त प्रतिक्रीया म्हणून गुजरातभर दंगल उसळली आणि तिला मुख्यमंत्री असूनही नरेंद्र मोदी यांनी आवर घातला नाही, असा मुळातच आरोप होता. स्वातंत्र्योत्तर काळात प्रत्येक मुख्यमंत्र्यावर देशात असे आरोप झालेले आहेत. पण गुजरातची गोष्टच वेगळी होती. ह्या दंगल व मुख्यमंत्र्याला देशातल्या माध्यमांनी व तथाकथित पुरोगामी विचारवंतांनी इतके मनावर घेतले, की ती दंगलच मुळात मुख्यमंत्र्याने पेटवली व भडकू दिली असा निष्कर्ष काढून झाला होता. त्या निष्कर्षाचा जनक हा संजीव भट नावाचा अधिकारी होता. त्याने दंगलीच्या दरम्यान एक आवई पिकवली, की दंगल पेटल्यानंतर मुख्यमंत्री मोदी यांनी ज्येष्ठ अधिकार्‍यांची बैठक बोलावली आणि त्यात दंगल आवरू नये, असे आदेश दिल्याचा त्याचा दावा होता. त्या बैठकीला आपण हजर होतो असेही त्याने रेटून सांगितलेले होते आणि त्याच्यावर कुठलीही कारवाई करणेही सरकारला अशक्य झाले होते. संजीव भट याच्यासारखा कोणी अफ़वाबाज पुरोगाम्यांना नेहमी हवा असतो. त्याने सत्य बोलण्याची गरज नसते, की तसे काही घडण्याची गरज नसते. कुठल्या तरी माध्यमात तसे काही छापून आणायचे आणि मग तात्काळ देशाच्या कानाकोपर्‍यातून त्यावर गदारोळ सुरू करायचा, ही त्यातली मोडस ऑपरेन्डी झालेली आहे. पण संजीव भटच्या बाबतीत ह्याची थेट सुप्रिम कोर्टकडून चौकशी व तपासणी झाली. हा इसम तद्दन खोटारडा असल्याचेही सिद्ध झाले. आता त्याची जागा ‘द वायर’ नावाच्या वेबसाईटने घेतलेली आहे. हे संकेतस्थळ बेधडक काहीही खोटे लिहीते व प्रसिद्ध करते आणि मग त्यावरून काहूर माजवणे ही फ़ॅशन होत चालली आहे.

अलिकडेच भाजपाचे अध्यक्ष अमित शहांच्या मुलाने फ़क्त ५० हजार रुपयांच्या भांडवलावर ८० कोटी रुपयांचा नफ़ा कमावला, अशी आवई या संकेत स्थळाने प्रसिद्ध केली आणि मग त्याचा गवगवा थेट राहुल गांधींपासून कॉग्रेसचा प्रत्येक प्रवक्ता करू लागला. तमाम पुरोगामी पक्षनेते व प्रवक्तेही त्याचा शंख करू लागले. पण शहांचा पुत्र जय याने त्यावर खुलासा देण्यापेक्षा या संकेतस्थळाच्या कंपनीलाच शंभर कोटी रुपये अब्रुनुकसान भरपाईची नोटीस पाठवली. मग तथाकथित पुरोगामी पत्रकारांचे धाबे दणाणले. कारण त्यांनी जाणीवपुर्वक अफ़वाबाजी केली, हे त्यांनाही पक्के ठाऊक होते. मग त्यांनी जय शहाच्या बाबतीतली मुळच्या आरोपाची बातमी दुरूस्त करून शेपूट घातले. पण शहापुत्राने कोर्टात धाव घेतलेली असल्याने आता सुटका नव्हती. म्हणूनच या शहाण्यांची गोची झालेली आहे. त्यांनी मग नेहमीचा कांगावा सुरू केला. कोणी अब्रुनुकसानीचा खटला भरला तर हे त्यालाच अविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी म्हणून रडू लागले. यात गळचेपी कसली? ज्याच्यावर आरोप केला आहे. त्याने कोर्टात जाऊन तुमचा आरोप सिद्ध करण्याची संधीच दिलेली आहे ना? तुम्ही तर चौकशीची मागणी केली होती. पण आरोपीनेच तुम्हाला आरोप सिद्ध करा म्हटल्यास घाबरायचे कशाला? पण हे असेच चालू आहे आणि म्हणून मग आपण मुद्दाम भाजपाच्या विरोधात अशी बातमी दिली नव्हती, असाही बचाव सुरू झाला. अशीच वार्ता व गौप्यस्फ़ोट आपण सोनियांचा जावई रॉबर्ट वाड्रा याचाही केला होता, असा दावा ‘द वायर’चे संपादक सिद्धार्थ वर्दराजन यांनी केला. ही माणसे कशी पांढरपेशा भामटे आहेत, त्याचा हा आणखी एक नमूना! कारण वाड्राची भानगड चव्हाट्यावर आणली गेली, तेव्हा वर्दराजन हे गृहस्थ ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाचे संपादक होते आणि वाड्रा प्रकरणातले सर्व भक्कम पुरावे असतानाही याच वर्दराजन यांनी ती बातमी चक्क सात महिने दडपून ठेवलेली होती.

शालिनी सिंग नावाच्या शोधपत्रकार महिलेने वाड्रा प्रकरणाचा बारकाईने अभ्यास करून ती बातमी वर्दराजन यांच्याकडे पाठवली होती. पण त्यातल्या त्रुटी दाखवत याच संपादकाने ती सात महिने प्रसिद्ध केली नाही. अखेरीस त्या पत्रकाराने आपली मेहनत वाया जाऊ नये, म्हणून सर्व तपशील गौप्यस्फ़ोट करण्यासाठी दिल्लीतले ज्येष्ठ वकील व तेव्हाच्या आम आदमी पक्षाचे संस्थापक प्रशांत भूषण यांच्याकडे सोपवली. त्यांनीच मग अरविंद केजरीवाल यांच्यासह ती माहिती पत्रकार परिषद घेऊन जाहिर केली. तोपर्यंत वर्दराजन वा ‘हिंदू’ने ही बातमी प्रसिद्ध केलेली नव्हती. पण गौप्यस्फ़ोट होऊन गेल्यावर मात्र तीच दडपून ठेवलेली बातमी तशीच्या तशी छापली. मात्र त्यावर कोर्टात जाण्याची हिंमत वाड्रांना झालेली नव्हती. कारण बातमी व त्यातला तपशील संपुर्णपणे खरा होता. उलट अमित शहापुत्र जय शहा याच्या बाबतीतला पुर्ण तपशील खोटा वा दिशाभूल करणारा होता. म्हणजे दोन्ही बातम्यांचा तुलनात्मक अभ्यास केला, तर जय शहाची बातमी खोटी दिशाभूल करणारी व वाड्राची बातमी नेमकी खरी होती. पण वर्दराजन नावाचा संपादक खोट्याला प्रसिद्धी देतो आणि सत्य मात्र दडपून ठेवतो, हे लक्षात येऊ शकेल. अशा खोटारडेपणाला आजकालचे पुरोगामी अविष्कार स्वातंत्र्य म्हणतात. अन्य कोणाची बदनामी करणे वा तशा धमक्या देऊन पैसे उकळण्याला आता पत्रकारिता असे नाव या लोकांनी दिले आहे. तसे नसते तर हेच सगळे लोक गाझियाबाद येथून अटक झालेल्या विनोद वर्मा नावाच्या भामट्याच्या समर्थनाला कशाला उभे ठाकले असते? कुणा मंत्र्याचे लैंगिक चित्रण करून पैसे उकळण्याचा आरोप या विनिद वर्मावर आहे. आता अटक झाल्यावर त्याने आपण त्या मंत्र्याचा गौप्यस्फ़ोट करणार होतो, असा खुलासा केलेला आहे. पण जे चित्रण बातमी होती, ते इतके दिवस लपवून कशाला ठेवले होते, त्याचे काही स्पष्टीकरण नाही.

भारतीय राज्यघटनेने अविष्कार स्वातंत्र्य नागरिकांना बहाल केलेले आहे. ते कुणाची बदनामी करणे वा प्रतिष्ठीतांना बदनामीच्या धमक्या देऊन पैसे उकळण्याचा खास अधिकार नाही. मराठीत ‘भटाला दिली ओसरी, तर भट हातपाय पसरी’ अशी उक्ती आहे. हा सगळा स्वातंत्र्याचा प्रकार तसाच बोकळला आहे. आताही कोणी श्याम रंगीला नावाच्या नकलाकाराला सरकारने मोदींची नक्कल करण्यास प्रतिबंध केल्याची थाप ‘द वायर’ने प्रथम प्रसिद्ध केली आणि रंगीलानेच विविध वाहिन्यांवर जाऊन ती बातमी खोटी वा दिशाभूल असल्याचा खुलासा केला आहे. वास्तवात ज्या वाहिनीवर त्याचा कार्यक्रम व्हायचा होता, त्यांनीच रंगीलाला राहुल वा मोदींची नक्कल करू नकोस असे सांगीतले होते. पण त्यातला राहूल गायब करून ‘द वायर’ने जणिवपूर्वक खोटारडेपणा केलेला आहे. आधी त्यांनी खोटे काही सांगायचे आणि नंतर त्यांच्या इतर साथीदारांनी अफ़वांचे रान उठवायचे, ही मोडस ऑपरेन्डी होऊन बसली आहे. पण त्यांचे वा सोशल मीडियातील काही उतावळ्या शहाण्यांचा अपवाद करता, लोकही आता अशा भुलभुलैयात फ़सत नसल्याने पुन्हा तेच लोक तोंडघशी पडत असतात. पण म्हणतात ना? कोडग्या कोडग्या लाज नाही, कालचे बोलणे आज नाही. पुरोगाम्यांनी आपल्या दुर्दशेसाठी मोदींना दोष देण्यापेक्षा आपल्या मर्कटलिलांचे जरा आत्मपरिक्षण करावे. तरच यातून त्यांना बाहेर पडता येईल. कारण आता त्यांचे आरोप म्हणजे खोटेच असणार, अशी एक सार्वत्रिक समजूत बनत चालली आहे. त्याचा दुष्परिणाम असा संभवतो, की उद्या त्यांनी खरेखुरे कुठले नरेंद्र मोदी वा अमित शहांचे पापकर्म चव्हाट्यावर आणले, तरी लोक त्यावर विश्वास ठेवणार नाहीत. जी अवस्था आता गुजरातच्या तमाम समाजसेवी संस्था वा देशातल्या अन्य विचारवंतांची होऊन गेलेली आहे. सत्याला सामोरे जाणे इतकाच त्यातून सुटण्याचा एकमेव मार्ग आहे.


5 comments:

  1. खरय भाउ,त्यात भर म्हनजे गोरखपुर मध्ये बालकांच्या मृत्युला योगी जबाबदार,पन अहमद पटेल हाॅस्पिटल मध्ये Isis च्या नोकरास ते जबाबदार नाहीत हे काय लोकांच्या लक्षात येत नाही

    ReplyDelete
  2. पुरोगाम्यांची अवस्था लांडगा आला रे आला ह्या कथेतील त्या मेंढपाळासारखी झालेली आहे..!

    ReplyDelete
  3. सत्यमेव जयते . . .

    ReplyDelete
  4. सत्य लोकांना समजायला लागलंय

    ReplyDelete
  5. bhau Jay Shah chi balance sheet Ministry of Company Affairs chya website var available aahe. Balance sheet madhun samjun yet aahe ki capital kiti aahe aani loan kiti milale....

    ReplyDelete