Monday, October 23, 2017

बेचाळिस वर्षापुर्वीची ब्रेकिंग न्युज (उत्तरार्ध)

indira emergency के लिए चित्र परिणाम

त्या दिवशी म्हणजे २६ जुन १९७५ रोजी दुपारी घरून वरळीला मराठा’च्या कार्यालयात पायपीट करीत मुद्दाम आलो, तेव्हा दुपारचे दोन वाजलेले होते. या वाटेतल्या प्रत्येक वृत्तपत्र विक्रेत्याकडे अगत्याने विचारणा केली. तर ‘सांज मराठा’ सोडून अन्य कुठले सांज वृत्तपत्र येऊ शकलेले नव्हते. तेव्हा मराठीत संध्याकाळ, सांज मराठा, इंग्रजीत इव्हिनिंग न्युज व फ़्रीप्रेस बुलेटीन व गुजराथी जन्मभूमी इतकीच वर्तमानपत्रे संध्याकाळची म्हणून प्रसिद्ध होत. ऑफ़िसात गेल्यावर कळले, की सांज मराठा वगळता अन्य वृत्तपत्रांच्या छापखान्यात वितरणापुर्वीच पोलिसांचे छापे पडले होते आणि कुठलेच सांज वृत्तपत्र बाजारात पोहोचू शकलेले नव्हते. ‘सांज मराठा’ पोहोचला त्याचे श्रेय रात्रपाळी उरकूनही अगत्याने काम केलेले कंपोझिटर्स, मशिन खात्यातले कामगार व वितरण खात्यातले आंबेरकर वाक्कर यांना होते. मी फ़क्त प्रसंगावधान राखून सज्जता केली होती. पण तीच त्या दिवशीची मुंबईतील खरीखुरी ‘ब्रेकिंग न्युज’ होती. आज त्या दिवसाचे स्मरण झाले, की ब्रेकिंग न्युज शब्दाची महत्ता कळते आणि उठसुट कुठल्याही वाहिनीवर झळकणारा हा शब्द किती केविलवाणा झालाय, त्याचीही जाणीव होते. देशाला आणिबाणीच्या अंध:कारात घेऊन जाणारी ती बातमी देण्यासाठी आम्ही तेव्हा केलेला आटापीटा आणि आजच्या ब्रेकिंग न्युजची तुलना तरी होऊ शकते का? आज पंतप्रधान मोदी अमेरिकेला वा इस्त्रायलला निघाले, किंवा त्यासाठी विमानतळावर पोहोचले, अशीही ब्रेकिंग न्युज होऊ शकते. मग तेच शब्द खुप निर्जीव निरर्थक वाटू लागतात. किंबहूना आज कोणी अविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी वा असंहिष्णूता असे शब्द बोलतात, तेव्हाही त्यांची कींव येते. कारण त्यापैकी अनेकांनी खरी गळचेपी बघितलेली नाही आणि अनुभवलेली सुद्धा नसल्याचीच ते साक्ष देत असतात.

त्या दिवशी दुपारी २६ जुन १९७५ रोजी शिवशक्तीमध्ये पोहोचलो तेव्हा संपादक खातेच नाही तर संपुर्ण इमारतीमध्ये शोककळा पसरलेली होती. कारण पोलिसांनी येऊन छपाई बंद केली होती आणि टेलिप्रिन्टरवरून आलेल्या फ़तव्यानुसार आचारसंहिता जारी होईपर्यंत कुठल्याही माध्यमाने काहीही प्रसिद्ध करण्यालाच गुन्हा ठरवले गेलेले होते. सहाजिकच करायचे काय, हा प्रश्न ऑफ़िसात उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या चेहर्‍यावर होता. त्या उदासीन वातावरणातही भविष्याचा विचार चालू होता. यापुढे वर्तमानपत्रे, माध्यमे व पत्रकारितेचे भवितव्य काय असेल? जणू तो टेलिप्रिन्टर मरून पडला होता आणि त्याच्या निष्प्राण देहाकडे बघून आम्ही सुतकी चेहर्‍याने बसलो होतो. ज्येष्ठ बोलत होते, आम्ही कनिष्ठ कुजबुजत होतो. उद्याचा पेपर निघण्याची कोणाला खात्री वाटत नव्हती. पंतप्रधान हुकूमशहा झाल्या होत्या आणि विरोधकांची पुरती गळचेपी करण्यात आली होती. मिसा या कायद्यानुसार विरोधातल्या बहुतांश प्रमुख नेते व कार्यकर्त्यांची धरपकड झालेली होती. दाद मागायची तरी कोणाकडे याचेही उत्तर कोणापाशी नव्हते. जरा कुठे चुकलो किंवा चुकलो असे सरकारला वाटले, तरी काय होईल? या प्रश्ना़चे उत्तर हवे असेल, तर साध्वी प्रज्ञा अथवा कर्नल पुरोहित कशा अवस्थेतून मागली पावणे नऊ वर्षे गेले, त्याचा नुसता अंदाज केला तरी पुरे आहे. अनेक कार्यकर्ते त्या काळात बेपत्ता झाले. तुरूंगात असले तरी त्यांचा शोध घेण्याची कुठली सोय नव्हती आणि त्या अंधारपर्वाला सुरूवात करणा्रा तो पहिला दिवस होता. अपरात्री इंदिराजींनी आणिबाणी घोषित केली, त्याला अजून चोविस तास झाले नव्हते. अशा वेळी आम्ही शिवशक्तीमध्ये सुतकी चेहर्‍याने बसलेलो होतो. चुकलेल्या हरवलेल्या मुलासारखी आमची नजर पुन्हा पुन्हा त्या मृतवत टेलीप्रिन्टरकडे जात होती. पुन्हा तो जीवंत होईल आणि खडखडू लागेल, या आशेने तसे होत राहिले. जे संपादक खात्यात होते, तेच इतर खात्यातही होते.

सूर्य बुडायची वेळ आली तरी काही थांगपत्ता नव्हता. बहुधा पावणेसातच्या सुमारास अचानक टेलिप्रिन्टर चुळबुळल्यागत आवाज करू लागला. मी उठून तिकडे धावलो आणि माझ्यासोबतच प्रत्येकजण उठून तिकडेच सरसावला होता. पुढली दहाबारा मिनीटे अशाच आशाळभूत स्थितीत गेली आणि मग ते यंत्र खडखडू लागले. आणिबाणीत बातम्या कशा व कुठल्या द्यायच्या वा देऊ नयेत; त्याची मर्यादा सांगणारी आचारसंहिता त्यातून येऊ लागली होती. सत्ताधारी पक्ष व सरकारी धोरण वा नेत्त्यांच्या विरोधातील कुठलीही बातमी प्रसिद्ध करण्याला प्रतिबंध घालण्यात आला होता. कामगारांचे संप वा विविध आंदोलने, विरोधकांची धरपकड अशा बातम्यांना बंदी घालण्यात आलेली होती. कुठल्याही बातमी लेखातून सरकार विरोधात मत बनवण्याला प्रतिबंध घातलेला होता. अशा स्थितीत वर्तमानपत्र कसे छापले जाणार? कारण काय सरकार विरोधी ते छापल्यावरच ठरू शकणार होते आणि ज्याच्या हाती कायद्याचा अधिकार होता, त्याला काय वाटते, त्यानुसारच निकष लागणार होते. अशा स्थितीत रात्र उजाडली होती आणि पुन्हा उद्याचा ‘मराठा’ काढण्याची हिंमत माझ्यात नव्हती. पण रात्रपाळी माझीच होती आणि कामाला सुरूवात करण्यापर्यंत रात्रीचे आठ वाजलेले होते. मी ठामपणे ती जबाबदारी नाकारली आणि माझ्या मदतीला सर्व ज्येष्ठ उभे ठाकले. त्या प्रत्येकाने पेपर मीच काढायचा आणि लागेल ती मदत देण्यासाठी रात्रभर ठिय्या देऊन थांबायची तयारी दर्शवली. मी व प्रदीप सर्व भार संभाळत होतो. पण लिहून कंपोजला पाठवायच्या प्रत्येक कागदावर ज्येष्ठांच्या सह्या अगत्याने घेत होतो. आत्माराम सावंत, रामभाऊ उटगी, पुष्पा त्रिकोकेकर, व्यंकटेश राजुरीकर असे सगळेच मध्यरात्रीपर्यंत सोबतीला बसले होते आणि हातजुळणीच्या पानाचा नमूना बघून रामभाऊंनी सही केली, तेव्हाच अंक छापायला गेला होता. या् सर्व ज्येष्ठांनी त्या एका रात्रीच्या आठ तासात जी पत्रकारिता व आत्मविश्वास मला दिला, तो पुढल्या आयुष्यभर पुरून उरला आहे. 

आणिबाणी हळुहळू नित्यक्रम झाला. वर्तमानपत्रे पुरती अळणी होऊन गेली. कुठलीही टिका वा टिपण्णी त्यातून करायला प्रतिबंध होता. काही धाडसी संपादक पत्रकारांनी आपापल्या पद्धतीने निषेध नोंदवण्याचे मार्ग शोधले. कोणी एका दिवशी संपादकीय सदराचा मजकूर न टाकताच कोरी जागा सोडली. कोणी रिकामे चौकोन काळे करून निषेध नोंदवले, अशा संपादकांना इशारे देऊन वा अन्य मार्गाने त्रास दिला जात होता. ‘ओपिनियन’ नावाचे एक इंग्रजी साप्ताहिक कोणी पारशी गृहस्थ चालवित होते. त्यांच्या मागे तर इतके शुक्लकाष्ट लावण्यात आले, की त्यांना प्रति सप्ताह नवनव्या छापखान्यात जावे लागत होते. तसे करण्याआधी आपल्या साप्ताहिकाचा छापखाना बदलण्याची प्रतिज्ञापत्रावर कोर्टात ग्वाही द्यावी लागत होती. पंजाब केसरी नावाच्या दैनिकाची वीज तोडण्यात आली होती. तर या जिद्दी संपादकाने छपाईयंत्र ट्रॅक्टरच्या मदतीने चालवून वर्तमानपत्र काढण्याचा पराक्रम केला होता. यातले कोणी अविष्कार स्वातंत्र्याचे झेंडे खांद्यावर घेऊन गळचेपीचा टाहो फ़ोडत बसले नव्हते, की त्यांनी आपले काम थांबवले नव्हते. काही वर्तमानपत्रात सरकारने सेन्सॉर करणारे अधिकारीही बसवले होते. लौकरच ‘मराठा’वर तीच वेळ आली. लागोपाठ दोन दिवस असे आलेले अधिकारी समाधानकारक सेन्सॉर करीत नसल्याने बदलले गेले आणि मग अभ्यंकर नावाचे वयस्कर निवृत्त अधिकारी आमच्या माथी मारण्यात आले.

अभ्यंकर मितभाषी होते. पण त्यांची बुद्धी व नजर चाणाक्ष होती. तसे हे गृहस्थ मनमिळावू व संयमी होते. पण संध्याकाळी आल्यावर प्रत्येक मजकूर नजरेखालून घालायचे. एक एक शब्दासाठीही हुज्जत करीत. माझ्या इतका त्यांच्याशी शब्दासाठी दुसरा कोणी वाद करीत नसे. ते हसायचे आणि खुप हुज्जत झाल्यावर काही शब्दाचा हट्ट सोडूनही द्यायचे. तसे आम्ही मित्रही झालो होतो, पण कामाच्या बाबतीत त्यांनी कधी सैलपणा दाखवला नाही. दुपारी चारनंतर त्यांचे आगमन व्हायचे आणि आम्ही गंमतीने त्यांचे ‘या भयंकर’ अशा शब्दात स्वागत करायचो. त्यांनी कधी त्याविषयी नाराजी व्यक्त केली नाही, की आमच्या हेतूबद्दल शंका घेतली नाही.
पुढे ज्या कारणास्तव इंदिराजींनी आणिबाणी लागू केली होती, तो त्यांच्यावरचा निवडणूक खटला सुप्रिम कोर्टात चालू झाला. त्यात अनेक मुद्दे होते. अलाहाबाद हायकोर्टाने त्यांची निवड रद्द केली होती आणि त्यावर अपील करून त्यांनी सुप्रिम कोर्टात दाद मागितली होती. पण दरम्यान आणिबाणी लादून त्यांनी विरोधकांचीच नव्हेतर संसदेचीही गळचेपी केलेली होती. तिथे राक्षसी बहूमताच्या बळावर इंदिराजींनी एक अशी घटना दुरूस्ती करून घेतली होती, की त्याच कारणास्तव प्रसिद्ध वकील नानी पालखीवाला यांनी इंदिराजींचे वकीलपत्र सोडून दिले होते. इतकेच नाही, तर सुप्रिम कोर्टात पालखीवाला इंदिरा विरोधी खट्ला लढणार्‍या शांतीभूषण यांच्या सहाय्यालाही उभे ठाकले होते. या दुरूस्तीसह निवडणूक खटला घटनपीठासमोर चालू होता आणि त्याचे येणारे वृत्तांकन मराठीत भाषांतरीत करण्याचे काम मलाच सतत करावे लागत होते. सहाजिकच त्यातल्या एक एक शब्दावरून अभ्यंकर व माझ्यात खटके उडायचे. त्यांनी एकही शब्द बदलला तरी मी तिथे त्यांना सही करायला लावायचो. उद्या गफ़लत झाली, तर कोर्टाचा अवमान सेन्सॉरने केला, असे सिद्ध होण्याचा तो पुरावा असेल, अशीही धमकी मी नेहमी त्यांना द्यायचो. पण त्यांच्यावर कधी अशा धमकीचा परिणाम झाला नाही. अखेरीस निकालाचा दिवस आला.

सुप्रिम कोर्टाच्या त्या खटल्यातील निकालपत्रावर कुठलाही सेन्सॉर लागू असणार नाही, असा निर्वाळा देण्यात आला होता. त्यामुळेच त्या दिवशी मी लिहीलेले ते कागद अभ्यंकरांना दाखवण्यास नकार दिला. तेव्हा आमच्यात खरी व प्रथमच खडाजंगी उडाली. मी हट्टाला पेटलो होतो, तर ते नुसते वाचणार बदल करणार नाही, असे वारंवार मला समजावत होते. पण त्या आणिबाणीत मिळालेले इवले स्वातंत्र्य गमावण्यास माझी तयारी नव्हती, ते त्यांनाही कळत होते. पण माझ्या तरूणपणाला आव्हान देण्यात त्यांनाही मजा वाटत असावी. मात्र जेव्हा त्या दिवसाची हेडलाईन समोर आली, तेव्हा त्यांनी जोरदार आक्षेप घेतला. निकालावर मी दिलेली हेडलाईन त्यांना खुप आक्षेपार्ह किंवा विपर्यास करणारी वाटत होती. कारण सुप्रिम कोर्टाने इंदिराजींची निवड वैध ठरवली होती. पण घटनादुरूस्ती रद्दबातल केलेली होती. मी घटनादुरूस्ती हा विषय धरून सुप्रिम कोर्टात इंदिराजींचा पराभव असे शीर्षक दिले होते. ते त्यांना विपर्यास वाटत होते आणि त्यात तथ्य होते. कारण सामान्य वाचकासाठी निवडणूक खटल्याचा निकाल होता. त्यालाच जोडून घटनादुरूस्तीचाही उहापोह झालेला असला तरी बातमीकडे लोक प्रथमदर्शनी निवडणूक म्हणूनच बघत होते, बघणार होते. म्हणून असे शीर्षक व्यवहारी दिशाभूल होती. पण निकालावर सेन्सॉर नसल्याचा माझा हट्ट मान्य करून अभ्यंकर साहेबांनी हेडलाईन तशीच राहू दिली. त्यामुळे इतर वृत्तपत्रात इंदिराजी सुप्रिम कोर्टात विजयी असे शीर्षक असताना ‘मराठा’त मात्र इंदिराही हरल्याची हेडलाईन होऊ शकली होती. पुढे आणिबाणी उठल्यावर दादरला वास्तव्य करणारे अभ्यंकर साहेब अनेकदा भेटायचे आणि जुन्या आठवणींना उजाळा यायचा. आपल्यावर किती निर्बंध आहेत, यासाठी रडत बसण्यापेक्षा जे उपलब्ध आहे, त्याचाही वापर चतुराईने केल्यास खुप स्वातंत्र्य उपभोगता येते, हा धडा त्यातून शिकायला मिळाला.

आणिबाणीत वा त्या काळात संपर्काची वा प्रसारची साधने खुप मर्यादित होती आणि त्यासाठी लागणारी संपन्नता सामान्य लोकांच्या हाती नव्हती. त्यामुळे कार्यकर्ते वा विरोधकांना अडगळीतले छापखाने शोधून पत्रके छापावी लागत होती. अशी चोरटी छापलेली पत्रके गुपचुप वितरीत करावी लागत होती. एकमेकांशी संपर्क साधणेही खुप अवघड व अशक्य कोटीतली गोष्ट होती. वर्तमानपत्रांचे मालक वा कंपन्यांची मुस्कटदाबी केल्यावर विरोधी आवाज नेस्तनाबुत झाला होता. आज त्याच्या तुलनेत सत्ता किंवा प्रशासन कोणाला आपल्या विरोधात बोलण्यापासून रोखू शकत नाही. सामान्य माणसाच्या हाती इतके स्वातंत्र्य व सोपी संपर्क साधने सहज उपलब्ध झालेली आहेत, की कुठल्याही बड्या वृत्तपत्र वा वाहिनीपेक्षाही एक सामान्य माणूस अधिक प्रभावीपणे आपले मत वा विरोध जगापर्यंत घेऊन जाऊ शकतो. अविष्कार स्वातंत्र्य नियंत्रणाखाली ठेवणे सरकारच्या वा कुठल्याही सत्ताधीशाच्या आवाक्यातले राहिलेले नाही. अगदी काश्मिर वा अन्यत्र या संपर्क साधनांचा दंगल व हिंसेसाठी मुक्त वापर होत असतानाही, सरकार त्यावर निर्बंध लादू शकलेले नाही. अशा स्थितीत आणिबाणी आली वा अघोषित आणिबाणी आल्याचा कांगावा करणार्‍यांची खरेच कीव करावी असे वाटते. कुणा भांडवलदाराने फ़ेकलेल्या तुकड्यावर ज्यांचे अविष्कार किंवा विचारस्वातंत्र्य अवलंबून असते, ते कधीही स्वतंत्रच नसतात. स्वातंत्र्य भीक म्हणून मिळत नाही वा मागता येत नाही. माझ्यासारखा सामान्य निवृत्त पत्रकार आज या उतारवयात ब्लॉगच्या रुपाने रोज जगभरात लाखो लोकांपर्यंत माझे मत वा भूमिका घेऊन जाऊ शकत असेल, तर कुणाला विचारांच्या गळचेपीची भिती कशाला वाटावी? सत्तेने वा सरकारने संरक्षण दिलेले स्वातंत्र्य कधी स्वातंत्र्य असू शकत नाही. तुम्ही  घेता ते आणि प्रतिकुल स्थितीतही उपभोगता, त्याला स्वातंत्र्य म्हणतात. ते माझ्या उमेदीच्या वयात आमच्या पिढीने आणिबाणीत खुप उपभोगले. इंदिराजी अखेरीस त्याच स्वातंत्र्याला शरण गेल्या आणि पुढल्या निवडणूकीने त्यांना धडा शिकवला. कारण पत्रकारीता हा स्वभाव असतो. स्वातंत्र्य ही इच्छाशक्ती असते. अविष्कार ही उपजतवृत्ती असते. या गोष्टींना कोणी प्रतिबंध करू शकत नाही, की त्यावर निर्बंध आणू शकत नाही. सुरक्षेच्या पिंजर्‍यात बागडणार्‍या पोपटांना स्वातंत्र्य ठाऊक नसते, ते व्याख्येतले स्वातंत्र्य मागत असतात आणि त्यातच गुरफ़टून जगत असतात. खुल्या आसमानाची अथांगता वा उंची त्यांना कधी समजत नाही आणि कधी बघायची हिंमत केली, तरी खरे स्वातंत्र्यच त्यांना भयभीत करीत असते. बेचाळीस वर्षापुर्वी इंदिराजींनी लादलेल्या आणिबाणीने तोच धडा शिकवला. (समाप्त)

(अक्षर मैफ़ल दिवाळी २०१७ लेख)

10 comments:

  1. Emergency is the real breaking news and publishing the evening newspaper before time and sending it to the people through paper sellers is real breaking news as no other newspaper not able to publish the same.

    ReplyDelete
  2. 1ch numbar. agadi vyvasthi kal samor ubha zala...
    Khare aahe ata paristhiti khup badalali aahe
    ani lok parach kavala karu lagale aahet .

    ReplyDelete
  3. मस्तच भाउ खरच आणिबाणि म्हनजे काय नुसत महित होत तुम्ही खरोखर जीवंत अनुभव सागितला.आज पुरावे नसताना पत्रकार लोक एखाद्याची बदनामी करतात व तो कोर्टात गेला तर यांना आणिबानी वाटते.इतक नको इतक स्वातंत्र्य झालय

    ReplyDelete
    Replies
    1. पत्रकारीता हा स्वभाव असतो. स्वातंत्र्य ही इच्छाशक्ती असते. अविष्कार ही उपजतवृत्ती असते. या गोष्टींना कोणी प्रतिबंध करू शकत नाही, की त्यावर निर्बंध आणू शकत नाही. वा भाऊ वा ! तुमच्या कारकिर्दीला सलाम !

      Delete
  4. Bhau krupaya utar vay ha shabd paray wapru naka.vait watle .. ajun khup time kabhi Aaplyala..Khun girana koi muskil bat nahi par giri hui vo ek bund aane wali naslo me hausla aur jigar paida kar sakti hai ya nahi yahi kashmakash hai.. salam bhau..Sir..

    ReplyDelete
  5. salute bhau aaplya karkirdila असेच मार्गदर्शक पाहिजेत आपल्या भारत भूमिला

    ReplyDelete
  6. आजही वृत्तपत्रांना बातम्या पुरविणाऱ्या यू.एन.आय. आणि पी.टी.आय. या संस्थांमध्ये विशिष्ट विचारसरणीच्या संपादक मंडळाचे वर्चस्व आहे. त्यांनी गेल्या पाच वर्षांत अनेक घटनांचे वार्तांकन सरकार अडचणीत यावे अशा पद्धतीने केलेले आहे.

    ReplyDelete
  7. भाऊ तुमचे लिखाण म्हणजे एक जिवंत अनुभव असतो त्यावेळेस च्या काळात घेऊन जाणारा लेख आहे,भाऊ ग्रेट आहात आणि राहणार ह्यात शंका नाही

    ReplyDelete