ऐन विजयादशमीच्या आदल्या दिवशी मुंबईतल्या एल्फ़िन्स्टन स्थानकाशी जोडलेला पादचारी पुल कोसळल्याच्या अफ़वेने दोन डझन लोकांचे प्राण घेतले. त्या घटनेला आता महिन्याचा कालावधी उलटून गेला असताना, तो पुल लष्कराकडून बांधून घेतला जाणार असल्याची बातमी आलेली आहे. रेल्वेला शिव्यांची लाखोली वहाताना पुढे आलेल्या कोणालाही आता या बातमीची शरम वाटलेली दिसत नाही. हे काम लष्कराने कशाला करायला हवे? लष्कराचे काम मुख्यत: लढण्याचे व देशाची राखणदारी करण्याचे असते. बांधकामे वगैरे नागरी क्षेत्रातली बाब आहे. त्यासाठी आपल्याला सेनेची मदत घ्यावी लागणार असेल, तर आपण नागरी समाज वा नागरी सत्ता म्हणून किती नाकर्ते ठरलो आहोत. त्याचीच ही पावती दिली जात असते. नाहीतरी काश्मिर वा नक्षलग्रस्त प्रदेशात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी लष्कराला पाचारण केलेले आहेच. आता बांधकामासाठीही सेनेला आणायचे? मग आम्ही नागरिक व आमचे नागरी लोकशाही प्रशासन काय करणार आहोत? आणि इतका विश्वास त्या सेनादलावर तरी कशाला? त्यांच्यापाशी अशी कुठली जादू आहे, की तिथे नेमकी ठरलेली कामे होऊ शकतात? तर त्यांच्यापाशी एक शिस्त असते आणि त्यात सहभागी असलेले आपले सैनिक बांधव स्वत:चा जीव वाचवण्यापेक्षा तोच जीव धोक्यात घालून इतरांचे जीव वाचवायला पुढाकार घेत असतात. त्यांना अशी बुद्धी कशाला होते? तर ते व्यक्तीगत स्वार्थाला नव्हेतर सार्वजनिक व राष्ट्रीय भावनेला बांधून घेतलेले असतात. देशाची जी प्रतिके व सन्मानाची चिन्हे असतात, त्यांच्या राखणदारीसाठी आपला जीव सर्वस्व पणाला लावण्याची धारणा त्यांनी अंगी बाणवलेली असते. राष्ट्रध्वज वा राष्ट्रगीत यावरून जीव ओवाळून टाकायला ते सिद्ध असतात, म्हणून आपण सुखनैव आपापल्या घरात नांदत असतो. मात्र तशी वेळ आपल्यावर आली, मग आपण एकमेकांना चेंगरून भावाबंदाचाही बळी घेत असतो. कारण आपल्याला राष्ट्रगीत म्हणजे एक उपचार वाटत असतो. त्याची कदर नसते.
आता असे काही म्हटले, मग उगाच सामान्य माणसाच्या भावनांना हात घालण्याचा उद्योग कोणाला वाटेल. नुसते राष्ट्रगीत गायले वा ते गायले जात असताना मान राखण्यासाठी नुसते उभे राहिल्याने देशभक्ती सिद्ध होत नाही, असाही बुद्धीमान दावा आहे. तो कोणी तर्काच्या पातळीवर खोडून काढू शकत नाही. एल्फ़िन्स्टन येथे झालेली चेंगराचेंगरी व त्यातले मृत्यूचे तांडव राष्ट्रगीताने थांबू शकले नसते, असेही कोणी म्हणू शकेल. पण खरेच राष्ट्रभावना वा राष्ट्रगीत असे संकट टाळू शकते, हे आपल्याला ठाऊक नसते. ठाऊक असते, तर असले बुद्धीमान वाद रंगलेच नसते. आणखी दहा दिवसांनी पॅरीस येथील बॉम्बस्फ़ोट मालिकेला दोन वर्षे पुर्ण होतील. तिथे अकस्मात बॉम्बस्फ़ोट होऊ लागले आणि एकामागून एकाचवेळी अनेक भागात असे स्फ़ोट झाले. त्यात १३० लोकांचा काही क्षणात बळी गेला, तर शेकडो नागरीक जखमी जायबंदी झाले. खरेतर त्याच्याही चौपट पाचपट लोकांचा त्यात बळी जाऊ शकला असता. त्यातले शेकडो लोक स्फ़ोटाने नव्हेतर नुसत्या चेंगराचेंगरीनेच मृत्यूच्या दाढेत ओढले गेले असते. कारण सर्वात मोठा घातपात हजारोची गर्दी जमली होती, तिथे घडला होता. पण राष्ट्रगीताने तितके मृत्यूचे तांडव होऊ दिले नाही. स्टाड द फ़्रान्स या भव्य स्टेडीयमवर तेव्हा जर्मनी व फ़्रान्स यांच्यातला अटीतटीचा फ़ुटबॉल सामना रंगलेला होता आणि तिथेही स्फ़ोट झालेला होता. तसे काही घडल्याची कल्पना येताच पळापळ व चेंगराचेंगरी होईल, हीच घातपात्यांची कारस्थानी योजना होती. पण तसे काही होऊ शकले नाही. कारण एका चतुर देशाभिमानी क्रीडारसिकाची समयसुचकता होती. तात्काळ स्फ़ोटाची जागा असलेले स्टेडीयम मोकळे करण्यासाठी झुंबड उडाली आणि हजारो प्रेक्षकांना तिथून अल्पावधीत बाहेर पडणे शक्य नव्हते. कारण बाहेर पडायचे मार्ग एकफ़िन्स्टनच्या पादचारी पुलासारखेच अरुंद व निमूळते होते.
लोकांची बाहेर पडण्यासाठी झुंबड उडाली, तेव्हा त्या धक्काबुक्कीत चेंगराचेंगरी होण्याचा धोका ओळखून, आपल्या फ़्रेन्च देशबांधवांना शीर देण्यासाठी कुणा नागरिकाने उच्चरवात राष्ट्रगीत गायला सुरूवात केली आणि त्यानंतर काही क्षणातच अवघा हजारोचा जमाव खड्या स्वरात फ़्रान्सचे राष्ट्रगीत गावू लागला. त्यांचा आवाज स्टेडीयम व त्याच्या आवारात दुमदुमू लागला आणि क्षणार्धात अवघी गर्दी भयमुक्त होऊन परस्परांना मदत करायला सज्ज झाली. कुठलीही चेंगराचेंगरी झाली नाही व चाललेली धावपळ थंडावली. शांत संथ गतीने ती गर्दी सुखरूप बाहेर पडली. त्यात म्हातारे मुले व महिलाही होत्या. पण कोणाला कसली इजा पोहोचली नाही. हे काम तिथे हजर असलेल्या पोलिसांनी केले नाही की कुणा रक्षकांनी केले नाही. कोणी स्वयंसेवक त्यासाठी कार्यरत झाले नव्हते. नुसत्या राष्ट्रगीताने त्या हजारोच्या जमावाला आपण सर्व एका देशाचे नागरिक म्हणून परस्परांचे बांधव असल्याची जाणिव दिली. त्या जाणिवेने जे काम केले, ते कुठला कायदा वा यंत्रणा करू शकत नव्हती. त्या संकटसमयी राष्ट्रगीताची महत्ता काय असते, ते लोकांनी अनुभवले. एल्फ़िन्स्टनचा पादचारी पुल असो किंवा फ़्रान्सचे ते भव्य स्टेडीयम असो, दोन्हीकडे तितकाच सैरभैर झालेला जमाव होता. कदाचित फ़्रान्सचा जमाव अधिक भयग्रस्त होता. पण त्याला नुसत्या राष्ट्रगीताने व त्याच्या गुणगुणण्याने धीर दिला. ज्याचा अभाव एल्फ़िन्स्टन स्थानकात होता. कारण भारताप्रमाणे फ़्रान्समध्ये अतिशहाणे लोक राष्ट्रगीताच्या उपचाराची गरज काय असल्याची विचारणा करण्याइतके प्रगत नसावेत. म्हणून तिथे संकटसमयी बाकी यंत्रणा ठप्प झाल्या असताना, जखमी फ़्रेन्च जनतेसाठी राष्ट्रगीत एक जालीम ‘उपचार’ ठरला. शब्द एकच म्हणजे उपचार असला, तरी त्याचे दोन भिन्न अर्थ ज्यांना समजू शकतात, ते सामान्य बुद्धीचे लोक असतात.
देश, समाज वा संस्था संघटना यांच्या कुठल्याही बोधचिन्हे वा सन्मानचिन्हे यांची महत्ता कसोटीच्या प्रसंगी अनुभवास येत असते. देशातल्या लक्षावधी बालकांना विविध आजाराला प्रतिबंध करणार्या लशी टोचल्या जातात वा डोस दिले जातात. त्याची तेव्हा काहीच गरज नसते. त्याची उपयुक्तता जेव्हा तशा आजाराच्या साथी येतात, तेव्हा कळत असते. मग कुठलाही आजार झालेल्या मुलांना बालकांना सार्वत्रिक लसीकरण वा प्रतिबंधक उपाय कशासाठी करायचे? त्यातून त्या बालकांच्या रक्तपेशी वा शरीराला रोगजंतूंशी प्रतिकार करण्याची सवय लावली जात असते. सहाजिकच जेव्हा तशी साथ येते, तेव्हा रक्तपेशी वा बालकाचे शरीर प्रतिकाराला सज्ज असते. देश वा राष्ट्रभक्ती तशीच हाडीमाशी खिळवावी लागते. तिची सवय लावावी लागते. तरच वेळप्रसंगी ती उफ़ाळून येते आणि समाज सामुहिक प्रतिकाराला सिद्ध होत असतो. तो सरकार वा प्रशासनाच्या मदतीची आशाळभूतपणे प्रतिक्षा करत नाही. एल्फ़िन्स्टन घटनेनंतरही अशाच सामान्य लोकांनी पुढाकार घेऊन जखमी वा बाधितांना मदत केली. त्यापैकी कितीजण सरकारच्या नावाने शंख करीत बसले होते? खात्रीने सांगता येईल, की त्यातले बहुतांश मदतकर्ते तितक्याच उत्साहाने राष्ट्रगीत म्हणताना दिसतील वा त्या गीताचा सन्मान करायला कुठेही उभे रहात असतील. उलट ज्यांना त्याक्षणी दुसर्याला मदत करण्यापेक्षा आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढण्याची सवय लागलेली असते, असे लोकच मग राष्ट्रगीताच्या सन्मानाचा उपचार कशाला; असली पोकळ बुद्धीवादी भाषा बोलताना दिसतील. कारण राष्ट्रवाद किंवा समाजहित हा प्रदर्शनाचा विषय नसतो, ती कर्तव्याच्या क्षणी उडी घेण्याची जबाबदारी असते. तो चर्चेचा विषय नसतो. कृतीची जाणिव असते. जी प्रगत फ़्रान्समध्ये आढळते तशीच ती भारताच्या कुठल्याही गरीब गचाळ वस्तीतही आढळते.
sarvansathi 2 warshache lashkari shikshan saktiche kele pahije! apoaap deshbhakti, samajik janeev, shist saglya goshti yetil.
ReplyDeleteभाऊ, जबरदस्त! नि:शब्द करणारं विश्लेषण.
ReplyDeleteभाऊ,
ReplyDeleteस्वातंत्र्यवीर सावरकर यानी शिवतिर्थावर भाषण करताना "माझ्या हाती सत्ता दिलीत तर मी भारतात वीस वर्षे लष्करी शासन लावीन असे सांगितले होते"."स्वराज्य" निर्मीतीला त्याचीच आवश्यक्ता होती.
काॅन्ग्रेसला त्याची जनतेला भिती घालून हे स्वैराचारी स्वातंत्र्य मिळवून दिले.सर्व व्यवस्थापनावर आता लष्कराच्या करड्या नजरेचीच आवश्यक्ता आहे.
मस्तच भाउ
ReplyDeleteवाह भाऊ... अप्रतिम ��
ReplyDeleteखरच भारतात कधी येईल हो सर्वांमध्ये अशी अतूट देशभक्ती?
प्रत्येक परिस्थिती मध्ये कसे रहावे व गोंधळ गडबड होऊ देयु नये याचा आदर्श नमुना .
ReplyDeleteखूप छान भाऊ,
ReplyDeleteएकीकडे आपण दिलेल्या उदाहरणातून दिसून येणार फ्रान्स च्या लोकांच राष्ट्रावर अमूल्य प्रेम, विनाशकारी परिस्थिती त्यांनी आली असताना त्यांनी दाखवलेला संयम आणि दुसरीकडे राष्ट्रगीत मनोरंजन अगोदर सुद्धा कंटाळवाणे समजणारे देशद्रोही लोक, भाऊ यातून आस वाटतय की येणार्या काळात लोकशाहीचा अणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आव आणत राष्ट्रद्रोही लोक राष्ट्राला नुकसान पोहोचवतील हे स्पष्ट दिसतय