मागला आठवडाभर दिवाळीचा मोसम असूनही बाजार किती मंदावले आहेत, अशा बातम्यांचा सुळसुळाट झालेला आहे. त्यावरून काही जुन्या स्मृती जाग्या झाल्या. एक काळ म्हणजे खुप जुना नव्हेतर चार दशकांपुर्वीचा काळ आठवला. तेव्हा दसरा किंवा नवरात्रीच्या सुमारास बातम्यांमधून लोकांना दिवाळी जवळ आल्याचा सुगावा लागत असे. आता फ़टाक्यावर बंदी किंवा तत्सम बातम्यांनी दिवाळी आल्याची चाहुल लागते. तेव्हा नेमकी उलटी गोष्ट होती. फ़टाके किंवा इतर कुठल्या खर्चिक गोष्टी सोडून द्या. घरात कुटुंबासाठी चार दिवस गोडधोड खायला आवश्यक असलेले फ़राळाचे पदार्थ बनवायच्या वस्तुही मिळताना मारामार होती. कारण बहुतेक जीवनावश्यक वस्तु व सामान रेशनवर उपलब्ध असायचे. खुल्या बाजारातून गहूतांदूळ वा रवामैदा, तेलतूप सामान्य माणसाला परवडणार्या गोष्टी नव्हत्या. सहाजिकच किमान दरात जो माल सरकारी शिधावाटप दुकानात मिळत असे, त्यावर बहुतांश लोकसंख्येची दिवाळी अवलंबून असायची. रेशनवरही पुरेसा मालपुरवठा असेल याची कोणी हमी देऊ शकत नसे. अशा कालखंडात दिवाळी जवळ आली, मग मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर, प्रेमा पुरव, मंगला पारीख, जयवंतीबेन मेहता अशा विविध पक्षाच्या महिला राजकारणी रस्त्यावर उतरायच्या आणि कशासाठी आंदोलन करायच्या? तर दिवाळी निमीत्त दोनतीन किलो रवामैदा व डालडा सारखे वनस्पती तुप अधिकचे मिळाले पाहिजे, म्हणून जोरदार आंदोलने सुरू व्हायची. त्यातून दिवाळी जवळ आली हे लोकांना कळायचे. या महिला पक्षभेद मतभेद विसरून मंत्रालयात घुसायच्या आणि लाठ्या झेलून गरीब जनतेच्या तोंडी गोडधोड पडावे, म्हणून कष्ट काढायच्या. त्याच्या बातम्या झळकत, तेव्हा लक्षात यायचे की दिवाळी आली. कारण सामान्य जनता खुप गरीब होती. पण त्यांची दिवाळी खुप श्रीमंत होती.
कोणालाही हा शब्दप्रयोग विरोधाभासी वाटेल. कारण लोक गरीब असतील तर दिवाळी श्रीमंत कशी असू शकेल? तर त्या गरीबांची श्रीमंती त्यांना मिळालेल्या नेतृत्वात सामावलेली होती. ते नेते व त्यांचे पक्ष गरीबाला भेडसावणार्या समस्या व अडचणी सोडवण्यात अखंड गर्क असायचे. दिवाळीत फ़टाके वाजवण्याने प्रदुषण होते, असली प्रवचने देण्याइतकी बुद्धी त्या नेत्यांपाशी नव्हती. त्यापेक्षा गरीबाच्या गांजलेल्या आयुष्यातले दोनचार दिवस गुण्यागोविंदाने जावे आणि त्याचे तोंड त्या दिवशी तरी गोड व्हावे, याची फ़िकीर अशा नेत्यांना होती. याच गरीबांतले गिरणी कामगार वा तत्सम उद्योगातल्या कष्टकर्यांना पोरा्ंसाठी नवी कापडे घेता यावीत, यासाठी दोनचारशे रुपयांचा बोनस मिळावा, म्हणून संपाचे हत्यार उपसणार्या कामगार नेत्यांचा तो जमाना होता. अर्थात त्यावेळची जनताही तशीच होती. घरात कोंड्याचा मांडा करणारी गृहीणी होती आणि कुठून तरी बांबूच्या पडलेल्या काटक्या गोळा करून दिवाळीचा आकाश कंदिल बनवण्यात सुट्टी खर्ची घालणारी पोरेटोरे चाळवस्त्यांमध्ये आनंदाने जगत होती. लोकांचे पगार तरी किती होते आणि कुठल्या गरजेच्या वस्तु घ्याव्या, याची भ्रांत प्रत्येकाला होती. दिवाळी निमीत्त सेल वगैरे होत नसत, किंवा फ़टाक्यांची आतषबाजी करण्याची कुवत लोकांमध्ये नव्हती. दिवाळीच्या निमीत्ताने वर्षातले नवे कपडे खरेदी व्हायचे आणि कंदिल वा तत्सम रोषणाईच्या वस्तु बाजारात उपलब्धच होत नव्हत्या. मिठाईची पाकिटे वा दुकानातला तयार फ़राळ ही संकल्पना आलेली नव्हती. अगदी थोडक्यात सांगायचे, तर दिवाळीचा बाजार झालेला नव्हता. आपापल्या आयुष्यातला आनंदाचा सोहळा साजरा करून इतरेजनांच्या आनंदाकडे निरागसपणे बघण्याची निर्दोष नजर लोकांपाशी होती. दिवाळी श्रीमंती दाखवण्याचा सण नव्हता. लोक गरीब होते आणि दिवाळी श्रीमंत होती.
आता जग खुप बदलून गेले आहे आणि अनेक सामान्य माणसांपाशीही चांगला पैसा आलेला आहे. चार दशकापुर्वीच्या तुलनेत समाजातला मोठा वर्ग वा लोकसंख्या सुखवस्तु झालेली आहे. पुर्वी ज्याला चैन मानले जायचे, त्या गोष्टी वस्तु आता जीवनावश्यक बनलेल्या आहेत. मैदारवा, साखर वा तेलतुप यांच्या माहागाईची चर्चा आता होत नाही. आता बाजारात वॉशिंग मशीन, टिव्हीचे आधुनिक मॉडेल, गाड्या वा अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तुंचा खप किती होतो, त्यावर दिवाळीचा आनंद मोजला जात असतो. त्या अर्थाने यंदाची दिवाळी खुप गरीब होऊन गेली आहे. आजच्या जमान्यात वा नव्या पिढीला मृणालताईंच्या महागाई आंदोलनाचे किस्से मनोरंजक हास्यास्पद वाटतील. पण त्या काळात दिवाळीचा आनंद लुटलेल्या अनेकांना आजच्या श्रीमंतीतली दिवाळी गरीब झालेली वाटेल. कारण पैसा हातात असूनही अपुरा वाटू लागलेला आहे आणि तेव्हा पैसा अपुरा असतानाही आनंदाला तोटा नव्हता. मोठे व्यापारी दुकानदार लक्ष्मीपूजेनंतर मोठी आतषबाजी करीत. त्यांनी वाजवलेल्या भव्यदिव्य फ़टाके बघण्यात आनंद होता. त्याबद्दल असुया नव्हती. मजेची गोष्ट म्हणजे कोणी कोणाला ‘हॅपी दिवाली’ तेव्हा म्हणत नसे. तशा शुभेच्छा वा अभिष्टचिंतनाची गरजही नव्हती. मित्र आप्तेष्ट एकमेकांचे इतके हितचिंतक असायचे, की संकटाच्या प्रत्येक प्रसंगात धावून येण्यातूनच शुभेच्छांची देवाणघेवाण होत असे. सणासुदीला शुभेच्छा देण्याचा मुहूर्त शोधण्याची कोणाला गरज भासत नसे. दारातला पोस्टमन, बसमधला कंडक्टर वा कुठला दुकानदार वा सरकारी कर्मचारी शुभेच्छा असल्यासारखा वागायचा. त्यात परस्परांसाठी शुभेच्छा होत्या. आता तशा जगण्या वागण्यातल्या शुभेच्छा संपलेल्या आहेत. म्हणून मग अगत्याने टाहो फ़ोडून शुभेच्छांचा शाब्दिक वर्षाव करावा लागत असतो. शुभेच्छा व आनंदाचे भव्य देखावे उभारावे लागत असतात.
एकमेकांना सुखी समाधानी करण्याची ती वृत्ती मागल्या तीनचार दशकात आपण गमावून बसलो आहोत. त्यातून आपली दिवाळी गरीब होऊन गेली आहे. कुणा मुलीची छेड रस्त्यावर काढली जात असता्ना पुढाकार घेऊन तिच्या मदतीला जाण्याच्या सदिच्छा आपण हरवून बसलो आहोत आणि न्यायासाठी मेणबत्या पेटवण्यात दिवाळी साजरी करू लागलो आहोत. कुठल्या सत्कार्याला पैसे मोजून सहकार्य करताना, त्यातल्या वेदनांवर फ़ुंकर घालण्याची जबाबदारी टाळण्याने आपल्याला बधीर करून टाकले आहे. रोजच आनंद साजरा करण्याच्या हव्यासाने आपल्याला दिवाळी सण व दु:ख यातला फ़रक उमजेनासा झाला आहे. चितळ्यांच्या दुकानातील फ़लक कोणीतरी सोशल माध्यमात टाकला. चकल्या वा अनारसे संपलेत. अशी त्यावरची सूचना दिवाळीतला पोकळपणा सांगते. त्या दुकानात गेलेल्या अनेकांना तिथली चकली वा अनारसे चुकल्याचे दु:ख झाले असेल, तर मग दिवाळी येऊनही काय फ़ायदा? ती दु:खच घेऊन आली ना? घरात कटकट करण्यापेक्षा बाजारातून दिवाळीचा फ़राळ विकत आणण्यात आनंद असेल, तर दिवाळीच्या तिथीची व सोहळ्याची तरी गरज काय? खिशात पैसा खुळखुळणार तितके दिवस दिवाळी असते. तिचा आनंदाशी काय संबंध? ती दिवाळी राहिली नाही, त्या मृणालताई राहिल्या नाहीत. ती गरीबी राहिली नाही. ही कसली श्रीमंती आहे, जिने आपली दिवाळीच गरीब केविलवाणी करून टाकली आहे? ह्या कसल्या शुभेच्छा, ज्यांनी आपल्याला दुसर्याच्या वेदनांवर फ़ुंकर घालण्याचीही इच्छा राहिलेली नाही? हे कसले सण सोहळे आहेत? ज्यात आपली माणूसकीच कुठल्या कुठे गायब होऊन गेली आहे. दिव्यांची रोषणाई वाढली आणि मनातला अंधार अधिकच दाटत चालला आहे. दुरावलेले आजोबा आजी, पितापुत्र वा मुले नातवंडे परस्परांना दिवाळी निमीत्त कॅडबरी देतात, त्या जाहिरातीइतकी दिवाळीची दुसरी विटंबना कोणती असेल?
खरंचच दिवाळी गरीब- नाही कंगाल झालीय. भाऊ,ज्या काळात तुम्ही आम्हाला नेलंत तो काळ आम्हासाठी गरीब होता पण दिवाळीचे चार दिवस मात्र खरोखरीच आनंदात जायचे व ती उर्जा पुढील दिवाळी पर्यंत पुरायची.
ReplyDeleteफटाके आमच्या आटोक्यात नसायचे पण वडिलांनी आणून दिलेले ताजमहालचे चित्र असलेले तॊट्यांचे पाकीट असे किंवा लवंगी कींवा टीकल्यांच्या डब्या असोत, त्या एकेक सोडवून उदबत्ती हाती घेवून उडविण्यातही मजा होती. आजूबाजूचेही सर्व तसेच होते त्यामुळे लाज वा असुया पेक्षा मिळणारा आनंद मोठा असे. सर्व फराळ घरीच तयार होत असे. वडिल जेव्हा चिवडा बनवायचे व चव बघायला बशी भरून द्यायचे तेव्हाचा आनंद अवर्णनीय असायचा. दरवर्षी वेगवेगळा आकाशकंदील बनविण्याची अहमहिका लागायची. त्यातल्यात्यातही कधी चांदणी, विमान आदि नाविन्य आणायचा आमचा प्रयत्न असायचा. पणत्यांच्या रांगा लावण्यातील आनंद ही काही वेगळा असायचा. आज त्याचे फोटोज आमच्या कडे नाहीत पण मनावर कोरलेले ते फोटॊ डिलीट होण्याची संभावनाच नाही.
खरोखरीच दिवाळीच्या त्या आनंदाला आजची पिढी वंचीत होत्येय व आज ती पिढी मिळवित असलेला आनंद अक्षय व निर्भेळ आहे का व तॊ कायमचा त्यांचे लक्षात राहू शकेल का ह्याबाबत खात्री देता येत नाही!
खूपच
Deleteछान
मनाला साद घालणारे लेखन.भाऊ तुम्हाला उत्कृष्ट ब्लाॅगलेखनासाठी पुरस्कार मिळायला हवा.
ReplyDeleteअंतर्मुख करायला लावणारा लेख...धन्यवाद !!!
ReplyDeletekhup chan...
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteखरं आहे.
ReplyDeleteखरय भाउ
ReplyDeleteSolid!!
ReplyDeleteफारच मार्मिक लेख आज ६०च्या अलीकडे पलीकडे असलेल्यांना फारच पटेल असा लेख
ReplyDeleteअप्रतिम!!!👍
ReplyDeleteKhupach sundar lekh
ReplyDeleteभाऊ ............मस्त लेख !! जुन्या आठवणी जागृत झाल्या !!
ReplyDeletejune diwas aathwale aani dolyat pani aale bhau.
ReplyDeleteMy age is 63 I remember everything.
ReplyDeleteThanks Bhau your artical is gift for us. We will never furget you.������
पेपर मध्ये मुबंईतल्या मिल व त्यापुढे किती टक्के बोनस जाहिर झालाय, याची यादी यायची तिच तेव्हा आमच्या साठी दिवाळी ची चाहूल. एकाच ताग्यात सर्व भावंडांचे कपडे.
ReplyDeleteसकाळी एकाकडे करंजी, दुपारी दुसरीकडे अनारसे. असे सारे मिळुन फराळ बनवायचे, मग ते पुन्हा एकमेकांच्या घरी वाटायचे. अशा अनेक आठवणी जाग्या झाल्या.
खरेच भाऊ आपल्या पिढीचे मनोगत व्यक्त केलं तुम्ही.
ReplyDeleteअगदी मनातल.... काल आतषबाजी पहातांना आम्ही असच काही बोलत होतो!
ReplyDeleteमस्त , जुन्या आठवणी जाग्या झाल्या माझ्या वॉलवर शेअर करतोय !
ReplyDeleteBhau aayushy 45 varshe mage gel tya aathvanini dole panavale aaj sarv kahi aahe pan ti aapulki aani to jivhala nahi aaj kono kunachi vat pahat nahi aani vichar manat yeto na sangta aapan kunchya ghari kase jave man marun aandache dekhave sajre krnya palikade aajche sanvaar nahit
ReplyDeleteडोळे खाडकन उघडवणारा लेख
ReplyDelete