Friday, October 13, 2017

नांदेडचा धडा, अर्थात शिकणार्‍यांसाठी!

nanded mahapalika के लिए चित्र परिणाम

नांदेड महापालिकेचे निकाल अनेकांना काही शिकवू पहात आहेत. अर्थात ते शिकाय़चे किंवा नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तिथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एकहाती मिळवलेले यश नेत्रदिपक नक्की आहे. कारण मागल्या विधानसभेपासून देशातली व राज्यातली कॉग्रेस पुरती मरगळलेली आहे. त्याही काळात चव्हाण यांनी लोकसभेची नांदेडची जागा जिंकलेली होती. आता त्यांनी महापालिका जिंकलेली आहे. त्यात ८१ पैकी ७१ जागा जिंकणे नक्कीच स्पृहणिय आहे. कारण चव्हाणांना बालेकिल्ल्यातच नेस्तनाबूत करण्यात भाजपा अपेशी झाला आहे. पण त्याचा आनंद कॉग्रेसपेक्षाही शिवसेनेला अधिक झाला आहे. मागल्या विधानसभा निवडणूकीमध्ये युती तुटल्यापासून या दोन जुन्या मित्रांमध्ये जुंपलेली आहे. त्यात आपल्या अपयशापेक्षा दुसर्‍याच्या अपयशाने ते अधिक खुश होताना दिसतात. म्हणूनच अशी संधी मिळाली, म्हणजे दोघेही एकमेकांना बोचकारून घेण्यास विसरत नाहीत. सहाजिकच आपल्या जागा १४ वरून घसरून एकावर आल्याचे सेनेला दु:ख होण्यापेक्षा भाजपाला महापालिका जिंकता आली नाही याचा आनंद अधिक झाला, तर समजू शकते. पण या मतदानात एकट्या भाजपा वा शिवसेनेचा पराभव झालेला नाही, तर ओवायसी यांच्या मजलीस व पवारांची राष्ट्रवादी यांचाही पुरता बोजवारा उडालेला आहे. म्हणूनच कॉग्रेसच्या या यशाची योग्य मिमांसा होण्याची गरज आहे. त्यात प्रत्येक पराभूत व विजयी पक्षासाठी काही धडा सामावलेला आहे. विजयी झालो तर कशामुळे आणि पराभूत झालो, तर कोणत्या कारणाने; त्याची मिमांसा प्रत्येकाने करणे भाग आहे. शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून तसा अभ्यास ‘आपल्या पद्धतीने’ करण्याचा वादाही केला आहे. म्हणजे काय, ते त्यांनाच ठाऊक! कारण विधानसभेतील स्वबळावर मिळवलेल्या चांगल्या यशानंतरही तो पक्ष आपल्या यशापयशाची कुठली मिमांसा करताना दिसलेला नाही.

शिवसेना वा भाजपा या मित्रांनाच या मतदानाने दणका दिलेला नाही. राष्ट्रवादी व मजलीस अशा दोन पक्षांचे अपयशही डोळ्यात भरणारे आहे. त्यापैकी मजलीस हा पक्ष मागल्या पालिका निवडणूकीपासून महाराष्ट्रात अवतरला. त्याने महाराष्ट्रातील वाटचालच नांदेड येथून पालिका निवडणूकीने केली आणि लहानसहान पालिका वगैरे लढवताना विधानसभेतही दोन आमदार निवडून आणलेले होते. पण तेही विरोधातील मतांची कमालीची विभागणी झाल्यामुळेच विधानसभा गाठू शकलेले होते. त्याचवेळी मुस्लिम मतांचे ओवायसींच्या भडकावू भूमिकेविषयीचे आकर्षण त्याला कारणीभूत झालेले होते. त्याला फ़ारकाळ मुस्लिमातही पाठींबा मिळण्याची वा टिकण्याची शक्यता नव्हती. त्याची साक्ष दोन वर्षापुर्वी बांद्रा पुर्व येथील पोटनिवडणूकीनेच दिलेली होती. सेनेच्या बाळा सावंत या आमदाराच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी पोटनिवडणूक झाली, तेव्हा आधीची मतेही मजलीस टिकवू शकली नव्हती. नांदेडमध्ये त्याच्या पुढले पाऊल पडले आहे. मागल्या पाच वर्षात ओवायसी बंधूंनी अतिशय प्रयत्नपूर्वक देशातील मुस्लिम नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी पुढाकार घेतलेला होता. त्याला महाराष्ट्रात थोडाफ़ार प्रतिसाद मिळाला. पण बाकी अन्यत्र त्यांना मुस्लिमांची मतेही मिळवता आली नाहीत. बिहार उत्तरप्रदेशात त्यांचा फ़ज्जा उडालेला होता आणि नांदेडने त्यावर आता शिक्कामोर्तब केले म्हणायचे. त्यांनी धुर्तपणे मुस्लिम दलित अशी मोट बांधलेली होती. म्हणून त्यांना थोडाफ़ार प्रतिसाद मिळत होता. आजवर कॉग्रेसची मक्तेदारी असलेल्या या समाजघटकावर मध्यंतरीच्या काळात बसपा समाजवादी अशा पक्षांनी वर्चस्व प्रस्थापित केले होते. दुबळी विस्कळीत मुस्लिम लीग त्याला कारणीभूत होती. तिथे ओवायसी बंधूंनी शिरकाव करून घेतला होता. पण तीनचार वर्षातल्या मतदानाच्या निकालांनी मुस्लिम पुन्हा कॉग्रेसकडे परतु लागल्याची ही खुण आहे. त्याचे कारण काय असावे?

मागल्या तीनचार वर्षात कॉग्रेसची दुर्दशा झाली हे सत्य आहे. पण ज्या कारणाने झाली, यातून बाहेर पडण्याऐवजी राहुल गांधी व त्यांच्या सवंगड्यांनी या काळात अधिक जोरकसपणे आपणच मुस्लिमांचा एकमेव मसिहा असल्याचे चित्र उभे करण्याचा प्रयास केला. त्यामुळे़च मुस्लिम मतदार आता पुन्हा कॉग्रेसकडे वळू लागला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी या पक्षाकडे असलेला मुस्लिम मतदारही मोठ्या प्रमाणात कॉग्रेसकडे झुकला आहे. नांदेडमध्ये त्याची अधिक स्पष्ट साक्ष मिळाली आहे. बंगाल उत्तरप्रदेश अशा राज्यातही कॉग्रेस आता मुस्लिमांचा पक्ष ठरत चालला आहे. मुस्लिम दाट वस्ती असलेल्या भागात अशा गठ्ठा मतदानाच्या जोडीला किरकोळ हिंदू वा बिगरमुस्लिम मतेही नगरसेवक निवडून आणतात. त्याचा लाभ चव्हाणांना मिळालेला आहे. पण उलट शिवसेना व भाजपा यांच्यात मतविभागणी होऊनही त्याचा लाभ कॉग्रेसला मिळाला. त्यात युती असताना सेनेला जो लाभ मिळत होता, तो गमावला व भाजपाला आपली शक्ती वाढलेली दाखवण्याची संधी प्राप्त झाली. आताच्या या निकालाचा ताताडीचा लाभ नक्कीच चव्हाणांना झाला आहे. पण त्यात दुरगामी तोटाही असतो. कॉग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या मुस्लिम सदस्यांची संख्या हळुहळू अन्य समाजघटकांना खटकू लागली, मग कॉग्रेसच्या पारड्यातली हिंदू मते पर्याय शोधू लागतील. हेच नेमके पाच वर्षानंतर उत्तरप्रदेशात घडलेले आहे. २०१२ सालात विधानसभेत सर्व पक्षाचे मिळून ६८ मुस्लिम आमदार निवडून आलेले होते आणि त्याचा जनमानसावर पडलेला प्रभाव दोन वर्षानंतर लोकसभेत एकही मुस्लिम खासदार निवडला जाऊ नये, इतका विपरीत घडला होता. पाच वर्षांनी विधानसभा मतदानात ही आमदारसंख्या उत्तरप्रदेशात ६८ वरून २४ इतकी खाली आलेली आहे. नांदेड त्याच दिशेने वाटचाल करू लागले तर नवल नाही.

प्रत्येक निवडणूक मोठ्या प्रमाणात जिंकणे ही पक्षाची महत्वाकांक्षा असू शकते. पण ती साध्य झाली नाही तरी त्यातून काय साध्य झाले, तेही तपासून बघायचे असते. भाजपाने भले जागा कमी जिंकल्या असतील. पण दुसर्‍या क्रमांकाची मते मिळवताना अन्य तीन प्रतिस्पर्धी पक्षांना नामोहरम केले असेल, तर तिलाही जमेची बाजूच मानले पाहिजे. त्याहीपेक्षा या ताज्या मतदानात मुस्लिम एकगठ्ठा कॉग्रेसच्या बाजूला गेल्याने तो मुस्लिम पक्ष झाल्याची गोष्ट पुढल्या काळात हिंद्त्ववादी पक्षाला लाभदायक ठरणारी असू शकते. जिथे म्हणून मुस्लिम गठठा मतदान करू लागतात, त्याची प्रतिक्रीया म्हणून हिंदू मतेही धृवीकरण होऊन भाजपाकडे वळतात, हा इतिहास आहे. नांदेडच्या पालिका मतदानात कॉग्रेसने झाडून मुस्लिम मते मिळवली व मजलीसला संपवले असेल, तर त्याने स्वत:वर मुस्लिम पक्ष असा शिक्का मारून घेतला आहे. हे आपापल्या वॉर्डातले मुस्लिम नगरसेवक जितके धर्मांध वर्तन करतील, तितकी तीव्र प्रतिक्रीया हिंदू समाजात उमटणार आहे. भाजपासाठी तो लाभ असू शकेल. अर्थात तशी भाजपाची रणनिती असेल तर. नुसत्याच जागा वा पालिका जिंकण्याला प्राधान्य असेल, तर गोष्ट वेगळी! राष्ट्रवादी पक्षाला यातून शिकायचा धडा म्हणजे आता त्यांच्या वेगळ्या अस्तित्वाला बाजारात पत राहिलेली नाही. त्यांनी कॉग्रेसमध्ये विलीन व्हावे किंवा अस्तंगत व्हावे. मुस्लिम पक्षांनाही तसाच संकेत या मतदानाने दिलेला आहे. त्यांनी उगाच धर्माधिष्ठीत पक्ष म्हणून वेगळी चुल मांडण्यापेक्षा सरळ मुस्लिमधार्जिण्या कुठल्याही सेक्युलर पक्षात विलीन होऊन जावे आणि मतविभागणीची अडचण थांबवावी. देशातले मतदान अधिक स्पष्टपणे दोन गटात विभागले जात असल्याचा हा संकेत आहेत आणि ज्याला शिकायचा असेल, त्याच्यासाठी त्यात धडा जरूर आहे. ज्यांना शिकायचे नसते, त्यांच्यासाठी आनंदच आहे.

9 comments:

  1. पुरोगामी पत्रकारांना तर हर्षवायु झालाय.राज्यात काॅंगरेस परतीची स्वप्ने पडु लागलीत.पन चव्हान नांदेड सोडुन इतरत्र एवढे लक्ष घालनार नाहीत कारन गटबाजी त्यांचे करीयर कांगी नेत्यानीच संपवलय

    ReplyDelete
  2. नांदेड शहरामध्ये मी स्वतः चार वर्षे वास्तव्य केलेले आहे. आपण सर्वाना ठाऊक नसेल पण नांदेड हे फार संवेदनशील शहर आहे इथे किरकोळ वादही विशिष्ट समाजामधील धार्मिक तेढ (जी मुद्दलातच भरपूर साठली आहे) वाढवून सामाजिक स्वास्थ्य व जनजीवन विस्कळीत होण्याचा मोठा इतिहास आहे.
    या पार्श्वभूमीवर गेल्या महानगर पालिकेमध्ये आलेले एम आय एम चे नगरसेवक मिळालेल्या यशाने हुरळून जाऊन ज्या बेदरकारपणे वागत होते त्याचा परिणाम सामान्य शांतताप्रिय मुसलमान नागरिकांच्या मनावर झाला व मुस्लिमेतर समाजामध्ये मुस्लिम समाजाबद्दल संशयाचे वातावरण वाढले याचा एकत्रित परिपाक होऊन सामान्य मुस्लिम मतदार पून्हा काँग्रेसच्या वळचणीला उभा राहिला.
    आज जरी अशोकरावांनी हा विजय मिळवला असला तरी मी स्वतः काँग्रेस पक्षाचा तीन पिढ्याचा कार्यकर्ता असून अत्यंत खेदाने हे सांगतो कि पुढील विधानसभा व लोकसभा निवडणुकीमध्ये याचा बॅक लॅश काँग्रेसला नक्की बसणार व हिंदू शीख मागासवर्गीय असे सर्व मुस्लिमेतर मतदान भाजप मागे एकवटणार. महानगर पालिका देऊन विधानसभा व लोकसभेचा फायदा करून घेण्याचे हे भाजपचे गणित अशोक रावांना उमजले नाही कि उमजून ही सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये त्यांना विजयासाठी मुस्लिम समाजाचा अनुनय करणे भाग पडले हे त्यांना व भगवंतालाच ठाऊक.
    देव न करो पण जेवढी राजकीय समज मला आहे त्यावरून मला असे वाटते की ही काँग्रेसची नांदेड मध्ये जिंकण्याची शेवटची वेळ आहे.

    ReplyDelete
  3. नांदेडमध्‍ये कॉंग्रेसने ि‍किती मुस्‍लीम उमेदवारांना उमेदवारी ि‍दिली आणि ि‍किती मुस्‍लीम नगरसेवक ि‍निवडून आले याची माहिती ि‍मिळेल का

    ReplyDelete
    Replies
    1. काँग्रेसने २४ मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी दिली व सर्व २४ निवडून आले .
      लिंक

      http://abpmajha.abplive.in/maharashtra/nanded-waghala-municipal-corporation-result-2017-467317

      Delete
  4. भाजप सोडून सगळ्यांच्या पराभवाचे छान विश्लेषण केलेत भाऊ. भाजपवाले दुसऱ्या कोणाचे अजीबात ऐकणार नाही - हे आपणास बरोब्बर ठाऊक आहे.

    ReplyDelete
  5. बहुतेक
    यावेळी मतदान यंत्रात घोळ नसावा,

    गुजरात हरले की सुरू होईल

    मतदान यंत्रात घोळचा शिमगा

    ReplyDelete
  6. भाजपा हरली म्हणजे त्यांचे ते खेळी असते, आणि जर भाजपा जिंकली कि चमत्कार. ही जे काही विश्लेषण होत आहे यात नक्की तुमचा काही अभ्यास असेल भाऊ पण आम्ही मतदार वर्तमानात जगतो झालेतर जास्तीत जास्त पाच वर्षांचा विचार करतो. भाजपा किती योग्य आणि राजकारणात धुरंदर आहे याचे आम्हाला काय? आम्हाला तर आता हिंदुत्व कमी आणि जातित्व जास्त जाणवतोय. असो......

    ReplyDelete
  7. मुळात फार एकांगी विश्लेषण आहे.कॉंग्रेस सोडून सर्व विरोधक 30%मतदान मिळवू शकले नाहीत हा निकालाचा अण्वयार्थ आहे.70% यश एखाद्या समुदायावर मिळत नसते.त्या नेत्यांची लोकमान्यता असते.

    ReplyDelete