Sunday, October 1, 2017

बुद्धीबळ आणि सापशिडी

snake ladder के लिए चित्र परिणाम

अनेकांना वाटते बुद्धीबळ म्हणजेच राजकारण असते. पटावरचे मोहरे प्यादे हलवून हा खेळ खेळला जात असतो. तसे प्रत्यक्ष जीवनातील राजकीय नेते कार्यकर्ते हलवून फ़िरवून राजकीय डावपेच खेळले जातात, ह्यात तथ्य आहे. पण म्हणून तसेच राजकारण चालते वा यशस्वी होते असे नाही. पटावर खेळला जाणारा आणखी एक खेळ आहे तो सापशिडीचा असतो. त्यात अनेकदा शिडीच्या घरात पोहोचले, की एकदम मुसंडी मारून उंचावर झेप घेता येत असते. पण नंतरच्या एखाददुसर्‍या खेळीत डाव फ़सला तर सापाच्या तोंडात सापडून तळाला फ़ेकले जाणेही नशिबी येत असते. सहाजिकच खरा राजकारणी असतो, तो कुठल्याही एकाच पटावरचा खेळ करत नसतो, तर दोन्ही पटावर आलटुन पालटून आपली खेळी करत असतो. कुठला प्रसंग आहे आणि परिस्थिती काय आहे; त्यानुसार पट बदलून आपले डाव खेळू शकणारा राजकीय खेळात दिर्घकाळ टिकून रहात असतो. उलट ज्याला दोन्ही पटावरचे राजकारण कळत असते, पण एकातला मोह आवरता येत नाही, असा खेळाडू कधीच यशस्वी होऊ शकत नाही. तो अनेक उत्तम संधी मातीमोल करतानाही आपल्याला दिसू शकतो. नेपोलियन म्हणायचा की केव्हा कोल्ह्याचे कातडे पांघरावे आणि कधी वाघाचे कातडे पांघरून शिकार करावी, हे मला ओळखता येते. राजकारणाच्या अत्यंत निष्ठूर आखाड्यातही प्रत्येक क्षणी सावध असावे लागते. अन्यथा माकडेही पिंजर्‍यात फ़सला, मग वाकुल्या दाखवू लागतात. उलट आपल्या मर्यादित मुरब्बीपणा वा व्यवहारी शहाणपणावर विसंबून डाव खेळणार्‍यांना दिर्घकाळ राजकारणात टिकून रहाता येते आणि मोठमोठे पल्लेही गाठता येत असतात. त्यात कोणी कोणाला संपवू शकत नसतो. यातला प्रत्येक खेळाडू संपला, तर आपल्याच कर्माने नामशेष होऊन जात असतो. त्याला कोणी संपवण्याची गरज नसते.

२०१४ सालात कॉग्रेसच्या चुकांमुळेच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होऊ शकले, असे राहुल गांधी यांनी अलिकडेच गुजरात दौर्‍यावर असताना सांगितले. तत्पुर्वी तेच अमेरिकन दौर्‍यावर मुलाखती देताना म्हणाले, कॉग्रेसला तिचा उर्मटपणा भोवला. २०१२ सालाच्या आसपास कॉग्रेसमध्ये उर्मटपणाचा उदभव झाला आणि पुढे व्हायचे ते झाले. असे राहुलच सांगतात. पण २०१२ सालातच पक्षाची अधिकारसुत्रे त्यांच्याकडे आलेली होती. त्यामुळे उर्मटपणाचे खापर फ़ोडायचे, तर त्यांच्याच माथी फ़ोडावे लागेल. राहुलचे म्हणणे खरे असेल, म्हणजे प्रामाणिकपणे त्यांना तसे वाटत असेल; तर त्यासाठी त्यांना पुढली पाच वर्षे कशाला लागली? त्याच उर्मटपणातून राहुल तरी अजून बाहेर पडले आहेत काय? हेच सत्य त्यांना तीन वर्षापुर्वी किंवा २०१४ च्या दारूण पराभवानंतर उमजले असते, तर एव्हाना कॉग्रेस आणखी रसातळाला गेली नसती. जी गोष्ट एका पक्षाला लागू होते, तीच कुठल्याही राजकीय नेत्यालाही लागू होते. कधीकधी स्थिती आपल्याला पोषक नसते, तेव्हा नमते घेऊन योग्य संधीची प्रतिक्षा करण्याला महत्व असते. लोक वाटेल ते बोलत असतात. तुम्ही यशस्वी झालात मग अतिरेकी स्तुती तुमच्या वाट्याला येत असते आणि पराभूत झालात मग तेच कौतुककर्तेही तुमची निर्भत्सना करायला आघाडीवर असतात. म्हणूनच जय पराजयाच्या काळात आपले भान राखून निर्णय घेण्याला प्राधान्य असते. बिहारचे नेते त्यात अधिक पारंगत आहेत. म्हणून रामविलास पासवान पुन्हा राजकारणात उभारीला आले आणि त्याच काळात उर्मटपणाच्या आहारी गेलेले नितीश उशिरा घरवापसी करून राजकारणात टिकून राहिलेले आहेत. उलट त्याच कालखंडात उर्मटपणाच कहर करीत डाव्यांनी आपला पायाही उखडून टाकण्यापर्यंत मजल मारली. तर कॉग्रेस पक्ष आपलाच विनाश ओढवून घेण्यासाठी अहोरात्र झटत असतो.

महाराष्ट्रात मनसे हा पक्ष २०१० च्या सुमारास जन्माला आला. त्याला मिळालेल्या प्रतिसादाने अनेकांना चकीत करून टाकलेले होते. पण त्याला यश पचवता आले नाही आणि आता अपयश पचवणे, त्याला भाग झालेले आहे. देशातल्या अनेक लहानमोठ्या राजकीय पक्षांची अशीच अवस्था आहे. त्यांना कुठल्या परिस्थितीत कोणती भूमिका घ्यावी, त्याचा अंदाजही बांधता आलेला नाही. २०१३ नंतर देशाच्या राजकीय क्षितीजावर उगवलेल्या नरेंद्र मोदी यांच्या राजकारणाने स्थिती खुपच पालटली आहे. जुने व आजवरचे राजकीय आडाखे बदलून टाकलेले आहेत. त्याला मोदीलाट ठरवून अनेकांनी आपले जुने पवित्रे कायम ठेवलेले आहेत. दिल्ली बिहारच्या निकालांनी अनेकांना वाटले मोदीलाट ओसरली. पण मग उत्तरप्रदेशच्या निकालांनी सर्वांचे डोळे दिपले. काश्मिरचा माजी तरूण मुख्यमंत्री ओमर अब्दुला याने तर २०१९ विसरा आणि २०२४ च्या तयारीला लागा; असे मतप्रदर्शन तेव्हा केलेले होते. कारणही स्वाभाविक होते. उत्तरप्रदेश या देशातील सर्वात मोठ्या राज्यात तीन वर्षे उलटून गेल्यावरही मोदींनी प्रचाराची रणधुमाळी उडवून पुन्हा दैदिप्यमान यश संपादन केले होते. त्यामुळे खुद्द मोदी वा त्यांचे पक्षाध्यक्ष अमित शहा सुद्धा जितके भारावून गेले नाहीत, तितके विरोधक भारावल्याचा पुरावा म्हणून ओमर अब्दुला यांच्या प्रतिक्रीयेकडे बघता येईल. एका विजयाने मस्तवाल होणे, किंवा एका मोठ्या पराभवाने निराश होऊन जाण्याने राजकारणात टिकता येत नाही. भरती ओहोटी तटस्थपणे अनुभवणार्‍यालाच दीपस्तंभ होता येत असते. नरेंद्र मोदींनी तो तटस्थपणा अंगिकारला आहे. म्हणून सोळा वर्षात त्यांना इतकी मजल मारता आलेली आहे. तिथेच बाकीचे नेते व पक्ष त्यांच्यासमोर तोकडे पडत असतात. लोकसभा जिंकल्यावर वा उत्तरप्रदेश विधानसभेत मोठे यश मिळवल्यानंतर मोदींची प्रतिक्रीया काय होती?

लोकसभेतले यश आपण एकट्याने मिळवलेले नाही. जनसंघ व नंतरचा भाजपा म्हणून अखंड राबलेल्या चार पिढ्यातील कार्यकर्त्यांच्या अखंड श्रमाचे हे फ़ळ आहे, अशी संयमी प्रतिक्रीया मोदींनी १७ मे २०१४ रोजी दिल्लीच्या पक्ष मुख्यालयात बोलताना दिलेली होती. उत्तरप्रदेश विधानसभेत पुन्हा मोठे यश मिळवल्यानंतर त्याच जागी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदी म्हणाले होते, अधिक फ़ळे आली तर झाडाला त्या भाराने नतमस्तक व्हावे लागत असते. यश पचवण्याची किमया त्यात सामावलेली आहे. उलट अशा प्रत्येक पराजयानंतर राहुल किती संयम दाखवू शकले आहेत? लालू व नितीश यांच्या मदतीने एक बिहारमध्ये मोदींचा पराभव केला तर राहुलमध्ये आलेला उर्मटपणा नजरेत भरणारा होता. दोन निवडणूकांच्या मधल्या काळात राजकीय पटावरचे बुद्धीबळ खेळायचे. प्यादे-मोहरे हलवायचे आणि जेव्हा निवडणूकांना सामोरे जायची वेळ येईल, तेव्हा सापशिडीचा पट मांडायचा; अशी रणनिती शहा-मोदी आखत चालले आहेत. अहमद पटेल यांच्या राज्यसभेतील निवडणूकीत तारांबळ उडाल्यावर कॉग्रेसने विनाविलंब गुजरातमध्ये विधानसभेची तयारी सुरू केली असती, तर गोष्ट वेगळी होती. पण तसे झालेले नाही. दिल्लीतले नेते बुद्धीबळाचा पट मांडणार आणि राज्यातले नेते सापशिडीचा खेळ करणार; असाच परस्पर विरोधी खेळ चाललेला असतो. जे कॉग्रेसचे तेच अन्य लहानमोठ्या पक्षांचे चालले आहे. मग भाजपाला आव्हान कोणी व कसे द्यायचे? अखंड देशव्यापी पायपीट करणारा पक्षाध्यक्ष आणि दुसरीकडे माध्यमातील अपप्रचारातून लोकमत बदलण्याची आशाळभूतपणे प्रतिक्षा करणारे अन्य पक्ष; अशी ही विषम लढाई होऊन बसली आहे. राजकारणाच्या खेळाचे बदललेले नियम व परिस्थितीच कोणाला लक्षात घ्यायची नसेल, तर यापेक्षा वेगळे काही होऊ शकत नाही.

सोनिया-राहूल अशा गांधी घराण्याच्या पुण्याईवर सापशिडीचा डाव जिंकण्याचे दिवस संपलेले आहेत आणि दिल्लीत बसून बुद्धीबळाच्या पटावर राजकीय बाजी मारणेही शक्य राहिलेले नाही. राजकारण व निवडणूकीविषयी उदासिन असलेल्या वर्गाला त्या प्रक्रीयेत ओढून आणण्याचा नवा पवित्रा मोदी शहांनी आणलेला आहे. त्यातूनच त्यांनी इतकी मोठी बाजी सातत्याने मारून दाखवलेली आहे. लोकसभेपासून उत्तरप्रदेश विधानसभेपर्यंत जी प्रत्येक निवडणूक भाजपा जिंकला, तिचा बारकाईने अभ्यास केला तर प्रत्येकवेळी मतदानाचे प्रमाण व टक्केवारी वाढवून त्यांनी बाजी मारलेली दिसेल. हे आजच्या राजकारणातले मोठे हत्यार झालेले आहे आणि त्यापासून कुणाही पक्षाला पळ काढता येणार नाही. उदासिन मतदाराला मैदानात आणून आपल्या विरोधातील मतसंख्येला नामोहरम करण्याची ही रणनितीच भाजपाला यश देते आहे. तिला शह देणे वा पराभूत करणे म्हणजे अशा उदासिन मतदार वर्गात जाऊन त्याला आपल्या बाजूला वळवणे इतकाच पर्याय आहे. माध्यमातील प्रचार वा विभागवार असलेले व्यक्तीगत प्रभाव, यांच्यापासून दूर असलेला मोठा वर्ग आहे. तो दुर्लक्षित आहे. तो कुणाच्या खिजगणतीत नाही. त्याला भाजपाने वा मोदी-शहांनी आपले प्रभावी शस्त्र बनवले आहे. त्याच्यापर्यंत पोहोचायचे तर यशवंत सिन्हांची स्वपक्षावरील टिका वा अर्थशास्त्रज्ञांचे हवाले उपयोगाचे नाहीत. तिथपर्यंत पोहोचणारी संघटना व यंत्रणा आवश्यक आहे. असा बहुतांश वर्ग मुख्यप्रवाहातील माध्यमे व सोशल माध्यमातील उलथापालथ, यापासून मैलोगणती दूर आहे. भाजपाची एक फ़ळी पारंपारिक माध्यमात बुद्धीबळ खेळत असते आणि दुसरी फ़ळी त्या दुर्लक्षित वर्गापर्यंत जाऊन सापशिडीच्या खेळात बाजी मारून जाते. हा दुहेरी डाव कुणा विश्लेषकाला जाणुन घ्यावा असे वाटलेले नाही. कुणा पक्षाला त्यालाच छेद देण्याचा विषयही सुचलेला नाही. मोदी-शहांच्या यशाचे तेच खरे गमक आहे.

4 comments:

  1. जबरदस्त विश्लेषण (भाजपने बूथ लेव्हल मनजमेंट स्ट्रॉंग करून ठेवलंय)

    ReplyDelete
  2. तेच सध्या बरेचसे पत्रकार शायनिंग इंडियाच जे झाल ते मोदीजी बाबत होइल अस म्हनतायत.आधार काय तर सोशल मिडियावर सुरू असलेल्या टिपन्या.अशा वेळी किव येते त्यांच्या बुदधिची.युपी निवडणुकित एका टीवीवर दाखवल होत की एका खेड्यात काही सुविधा नाहीत रस्ता पन तिथे एका घरावर भाजपचा झेंडा होता त्या कार्यकर्ताने सर्वाना मतदान करायला लावल गाडी करुन.साहजिकच लोकांनी भाजपला मत दिल

    ReplyDelete
  3. 2019 madhe suddha modich yetil ashi apeksha watte. Ani tech ghadle pahije. Karan rahul gandhi sarkhya bawlat mansala aapla pant pradhan zalela pahanyachi taaqat nahi kunat.

    ReplyDelete