Tuesday, October 10, 2017

सोशल मीडियाचा प्रभाव

social media के लिए चित्र परिणाम

मध्यंतरी भाजपाचे अध्यक्ष अमित शहांना कोणी तरी प्रश्न विचारला आणि त्यांनी सोशल मीडियात येणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचे आपल्या अनुयायी कार्यकर्त्यांना आवाहन केले. सहाजिकच आता भाजपाने सोशल मीडियाचा धसका घेतला असल्याचा निष्कर्ष काढला गेल्यास नवल नाही. कारण मागल्या लोकसभा मतदानात भाजपाला सोशल मीडियानेच जिंकून दिले, असे एक सार्वजनिक मत झालेले आहे. ज्यांना ते पटलेले असेल त्यांच्यासाठी हा निष्कर्ष शिरसावंद्य असेल तर नवल नाही. कारण तेव्हा अशी मंडळी सोशल मीडियातून भाजपाने अपप्रचार केल्याचे सातत्याने सांगत होती आणि तेव्हा मुख्य प्रवाहातील सगळेच संपादक पत्रकार भाजपा विरोधात कहाण्य़ा रंगवित होते. कुठलाही एक खेळाडू सांघिक खेळात कितीही हुशार व पराक्रमी असला, म्हणून आपल्या संघाला विजयी करून देऊ शकत नसतो. तशीच स्थिती निवडणूकीसारख्या गुंतागुंतीच्या लढतीमध्ये असते. कुठल्याही एका कारणाने राजकीय पक्षाला सत्ता मिळत नसते किंवा अपुर्व यश संपादन करता येत नसते. सहाजिकच भाजपाचे २०१४ सालातील यश हे फ़क्त सोशल मीडियातून आले, हा एक भ्रम होता. त्या माध्यमाचा चतुराईने भाजपाने वापर केला होता आणि त्याच्याच जोडीला इतर अनेक यंत्रणा व संघटनाही कार्यरत होत्या. आज जसा सोशल मीडियाचा गवगवा करून निष्कर्ष काढला जात आहे, तसाच काहीसा प्रकार दिड वर्षापुर्वी प्रशांत किशोर या आधुनिक चाणक्याविषयी चालला होता. मोदींना पंतप्रधान पदावर बसवण्याचे श्रेय त्यालाच दिले जात होते आणि म्हणूनच उत्तरप्रदेशात तोच प्रशांत किशोर राहुलच्या मदतीला असल्याने भाजपाला ती विधानसभा जिंकणे किती अवघड आहे, त्याचेही कथाकथन रंगलेले होते. पण प्रत्यक्षात प्रशांत किशोर कॉग्रेसला आणखीन रसातळाला घेऊन गेला. प्रशांत किशोर व सोशल मीडियात फ़ारसा फ़रक नसतो.

प्रशांत किशोरने कॉग्रेसला विजयी केले नसेल, म्हणून तो नाकर्ता रणनितीकार होत नसतो. त्याने एक शास्त्र व कार्यशैली विकसित केली आहे. पण त्याचा वापर ज्यांना करायचा आहे, त्यांच्यापाशी तितकी चतुराई व संयमही असावा लागतो. आडात नसेल तर पोहर्‍यात कुठून यायचे, असा मराठी वाकप्रचार आहे. त्याचा अर्थ विहिरीमध्ये दोरीला बांधून भांडे सोडले, म्हणून पाणी भरून बाहेर येईलच असे नाही. त्या विहीरीत पाणीही असावे लागते. प्रशांत किशोर वा सोशल मीडियाचा उपयोग तेव्हाच शक्य असतो, जेव्हा त्याचा वापर करण्याची कुवत पक्ष वा संघटनेमध्ये असावी लागते. भाजपा वा संघापाशी जी अफ़ाट संघटना आहे, त्यांचा उपयोग प्रशांत किशोरने चतुराईने केला होता. पण तशी संघटना कॉग्रेसपाशी नसेल तर बिचारा प्रशांत किशोर काय करू शकणार होता? शिवाय भाजपा वा मोदींनी त्याच्या रणनितीला स्विकारून मोहिम चालवली होती. कॉग्रेसचे मुरब्बी लोकच प्रशांत किशोरला नालायक ठरवण्यासाठी कटीबद्ध झालेले असतील, तर त्याच्या अपयशाला रणनिती कारणीभूत असत नाही. नेमकी तीच गोष्ट सोशल मीडियाची आहे. या नव्या तंत्राचा उपयोग भाजपाने लोकसभेच्या वेळी केला, तेव्हा मुख्यप्रवाहातील माध्यमे भाजपा व मोदी विरोधात मोकाट झालेली होती. एकतर्फ़ी विरोधात होती. त्यांना शह देण्यासाठी भाजपाने सोशल मीडियाचा उपयोग करून घेतला होता. आज तशी माध्यमे मोदी वा भाजपाच्या बाजूने एकतर्फ़ी उभी नाहीत. म्हणूनच सोशल मीडियाला तितका जनमानसावर प्रभाव टाकता येणार नाही. तसे शक्य असते तर उत्तरप्रदेशात भाजपा इतके मोठे यश मिळवूच शकला नसता. किंवा प्रशांत किशोरची रणनिती भाजपाला उत्तरप्रदेशात पराभूत करून गेली असती. पण तसे झाले नाही, कारण भाजपाने अशा कुठल्या एकाच तंत्रावर विसंबून आपली निवडणूक निती योजलेली नाही.

आता एक नवी माहिती समोर आली आहे. त्यानुसार कॉग्रेसने भाजपा व मोदींचे आव्हान पेलण्यासाठी एका परदेशी कंपनीचे सहाय्य घेतलेले आहे. केंब्रिज अनालिटीका नावाची ही कंपनी निवडणूकीत जनमानस घडवण्यासाठी व वळवण्यासाठी ख्यातनाम आहे. जगभर सोशल मीडियाचा वापर वाढलेला आहे आणि त्यातले मतप्रवाह अभ्यासून निवडणूकीची रणनिती बनवण्य़ासाठी ही कंपनी ओळखली जाते. अलिकडेच अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणूकीत याच कंपनीने डोनाल्ड ट्रंप यांना मदत केली होती आणि युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याविषयी झालेल्या ब्रेक्झीट सार्वमताच्या वेळीही याच कंपनीने चमत्कार घडवला असल्याचे सांगितले जाते. सोशल मीडिया व त्यावरून व्यक्त होणारी मते, यांचा बारकाईने अभ्यास करून ही कंपनी राजकीय पक्ष व नेत्यांना भूमिका, धोरणे व विषय मुद्दे पुरवण्याचे काम करते. त्याद्वारे लोकमत एका बाजूला वळवण्याचे चमत्कार घडतात असाही दावा आहे. त्यामुळेच त्यांची मदत २०१९ साठी घ्यायचे कॉग्रेसने योजल्याचे म्हणतात. त्यासाठी कंपनीचे प्रमुख नुकतेच भारतात येऊन ज्येष्ठ कॉग्रेस नेत्यांशी सल्लामसलत करून गेल्याचेही ऐकीवात आहे. सहाजिकच त्यांनी आपल्या परीने दिलेल्या काही सुचना कॉग्रेसने वा भाजपा विरोधकांनी वापरल्या असतील, तर सोशल मीडियात भाजपा विरोधी चित्र तयार होणे स्वाभाविक आहे. मात्र त्याचा एकूण जनमानसावर किती प्रभाव पडेल त्याची प्रचिती इतक्यात येणार नाही. हे तंत्र जर अमित शहा वा भाजपाने यापुर्वीच वापरलेले असेल, तर त्याची चाहूल त्यांनाच अगोदर लागू शकते. त्यामुळे शहा यांनी सोशल मीडियाकडे दुर्लक्ष करण्याचे आपल्या सहकार्‍यांना सांगितले असेल, तर ते अशा सूचक प्रचारी थाटाच्या लिखाण व प्रतिक्रीयांकडे पाठ फ़िरवण्य़ासाठी असणार, हे उघड आहे. शिवाय अशा मोहिमेतून मतांवर किती प्रभाव पडतो, ह्याचेही भान या माणसाला असू शकते.

ज्या ट्रंप यांना रिपब्लिकन पक्षाने उमेदवारी देताना आढेवेढे घेतले, त्या पक्षाच्या गळ्यात हा उमेदवार मारण्याचे श्रेय नक्कीच त्या कंपनीला व तिच्या रणनितीला आहे. पण तेव्हाची एक गोष्ट अनेकजण विसरतात. ट्रंप यांना पक्षातर्फ़े उमेदवारी देण्याला अनेकांचा विरोध होता. अखेरीस अशी वेळ आली, की पक्षाने उमेदवारी नाकारली, तर स्वतंत्र उमेदवार म्हणून आखाड्यात उतरण्याची धमकीही ट्रंप यांनी दिलेली होती. आता इतकाच प्रश्न आहे, की तसे झाले असते तर ट्रंप जिंकले असते काय? पक्षाच्या पाठबळाशिवाय ती कंपनी ट्रंप यांना अमेरिकेच्या अध्यक्षपदी बसवू शकली असती काय? नसेल तर पक्ष व संघटनेची महत्ता लक्षात येऊ शकेल. भारतात अमेरिकन अध्यक्षीय लोकशाही नाही आणि संसदेत बहुसंख्येने सदस्य निवडून आणावे लागत असतात. त्या सदस्यांना नियंत्रित करू शकेल व जनमत खेळवू शकेल असा कोणी नेता संसदीय लोकशाहीत पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी आवश्यक असतो. नुसता उत्तम रणनितीकार व प्रचाराचे ढोलताशे कामाचे नसतात. त्यांनी रणधुमाळी माजवता येते. पण प्रत्यक्ष लढाई जमिनीवर लढणार्‍या सैनिकांच्या बळावरच जिंकता येते. देशातल्या लक्षावधी मतदान केंद्रात ही लढाई लढली जात असते. त्यात कार्यकर्त्यांची प्रचंड फ़ौज निर्णायक घटक असतो. त्यांच्या जोडीला प्रशांत किशोर वा सोशल मीडीया असला, तर मोठा विजय संपादन करणे सोपे होते. नुसत्या सोशल मीडियावर विसंबून वा त्यापुरती रणनिती योजून लढाया जिंकता येत नाहीत. फ़ार तर तशा प्रयत्नात प्रशांत किशोरची प्रतिष्ठा मातीमोल करता येते, किंवा अशा कंपन्यांची अब्रु निकालात निघू शकते. याचे भान होते म्हणून ट्रंप यांनी पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी इतका आटापिटा केला. नुसत्या एका कंपनीच्या सोशल मीडीयाच्या मोहिमेवर ट्रंप विसंबून राहिले नाहीत. कॉग्रेसपाशी आज कितीसे पक्ष संघटन शिल्लक उरले आहे?

4 comments:

  1. खर आहे भाउ तुमच

    ReplyDelete
  2. भाऊ इतके सोपे नाही ते. त्यांनी अमेरिकेच्या निवडणुकीत धुमाकूळ घातलाय. ट्रम्पमहाशयांनी त्यांच्या सांगण्यानुसार रंग बदललेत. परवा अमेरिकेत राहुल जे बोलला ते पण यांच्यातच येतेय.
    त्यांच्या सिस्टिम चा प्रॉब्लेम हा आहे, की त्यांचा प्रचार पर्सनलाईझड आहे, आणि ते मला काय प्रचार करतायत हे तुम्हाला समजण्याची शक्यता केवळ 10% आहे, अश्या परिस्थितीत अत्यंत सावधपणे पावले उचलणे आवश्यक आहे. ते भाजपा अध्यक्ष करत असतील याबद्दल शंका नाही, पण दोनच मुद्दे मला मांडायचे आहेत.
    1. केम्ब्रिज अटलांटिकाला प्रशांत किशोर समजू नका
    2. राहुलसारखा सामान्य वकूबाचा माणूस सत्तेवर येणे आपल्याला परवडणारे नाही, त्यामुळे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांनीच आता सावध होऊन पावले उचलली पाहिजेत.

    ReplyDelete
    Replies
    1. 2014 la aap party khup form madhe hoti at least delhi madhe... tya veli bjp ne sarvat shevti delhichya jaganvaril umedvar declare kelele... kahi vela maun khup changle aste... aani hi vel kaam karun dakhavnyachi aahe... pracharachi nahi...
      bhauni yapurvi kahi lekhanmadhe mhanlyapramane pakistan prashna sodvun parat sattevar yeta yene shakya aahe kiva 17 te 18% hindu vote bank (ji 18% muslim vote bank la nil karu shakte ti tayar aahe)
      aata fakta ekach uddesh... max voting...
      aapoaap bjp jinkel...

      Delete
  3. Tari pan Donald Trump ani Rahul Gandhi madhe basic far farak ahe. Donald Trump yanchyakade kitihi virodh kela tari USA sathi kahi Vision ahe. RG kade India sathi tashi kaslihi vision nahi. Actually te kaslihi vision vagaire mandnyachya far lamb ahet. Donald Trump Yanni tyanchi vision Cambridge Atlantica vagaire media through project keli. Basically Donald Trump yanchyakade kahitari vision hoti mhanun tar the Media through project karu shakle. Rahul Gandhi yanchyakade vision ch nahi tyamule nusti high level media vaprun project karayla tyanchyakade ahe tari kay? ha Motthhha prashna ahe...

    ReplyDelete