Tuesday, October 24, 2017

हौशेनवशे प्यादेमोहरे

Image result for hardik alpesh jignesh

गुजरात विधानसभा निवडणूक आता रंगात येऊ लागली असून, त्यात जी नाटके रंगत आहेत. त्यातून लोकांचे प्रबोधन होण्यापेक्षा मनोरंजन मात्र अधिक होत चालले आहे. एका बाजूला मागला आठवडाभर तीन तरूण आंदोलक नेते कॉग्रेसमध्ये दाखल होणार अशा बातम्या होत्या. त्यात पाटीदारांचे नेते हार्दिक पटेल यांच्यासह दलित नेता जिग्नेश मेवाणी व इतरमागास नेते अल्पेश ठाकूर यांची नावे होती. यातली गंमत मात्र माध्यमांनी स्पष्ट करून सांगितली नाही. अल्पेश ठाकुर याने जाहिरपणे कॉग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे सांगितले होते. पण त्याच्याशी हार्दिकचे जुळणार कसे, याचा खुलासा कोणाला करावा असे वाटलेले नाही. हार्दिक पटेल याने पटेलांचे आरक्षण आंदोलन छेडले होते आणि त्याला दोन वर्षापुर्वी मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्याच्याच परिणामी आनंदी पटेल यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागलेले होते. पण त्याच आंदोलनाची दुसरी एक प्रतिक्रीया होती, ते इतरमागास आंदोलन. ज्याचे नेतृत्व अल्पेश ठाकुर याने केले. त्याच्या मागण्य़ातील प्रमुख मागणी पाटीदार समाजाला आरक्षण देऊ नये अशी आहे. थोडक्यात कॉग्रेसला अल्पेशच्या मागण्या मान्य असतील, तर तिथे हार्दिकला स्थान असू शकत नाही. उलट हार्दिकला खुश करायचे तर अल्पेशच्या मागण्या झुगारणे भाग आहे. मग ह्या दोन तरूण नेत्यांना कॉग्रेस एकत्र कसे नांदवणार, ही समस्या आहे. पण त्याची चर्चा कोणीच करणार नाही. करणार तरी कशाला? नुसताच धुरळा उडवून सनसनाटी माजवायची असेल, तर दिशाभूल महत्वाची असते ना? मुद्दा इतकाच, की कॉग्रेस या तीन घटकांच्या तरूण नेत्यांना एकाचवेळी कसे सोबत घेऊ शकते? पण त्याची फ़िकीर कोणाला आहे? नुसता निवडणूकीतला तमाशाचा फ़ड रंगवायचा असेल, तर असले मूलभूत प्रश्न निरर्थक होतात. आता त्याच्याही पुढे नाटक गेले आहे आणि खरेदीविक्रीच्या आरोपाला सुरूवात झाली आहे.

भाजपाने कोण तरूण नेता कॉग्रेसकडे जातो याची चिंता केली नाही. त्यापेक्षा त्यातला प्रभावी आंदोलक नेता हार्दिक पटेल याच्या निकटच्या सहकार्‍यांना फ़ोडायचे काम हाती घेतले. शनिवारी अशा दोन नेत्यांना भाजपात समाविष्ट करून घेतल्याची घोषणा झाली आणि इतरही येणार असल्याची बातमी आलेली होती. त्यापैकी एक नरेंद्र पटेल यांच्याही भाजपा प्रवेशाची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली. खुद्द नरेंद्र पटेल त्यात हजर होते आणि त्यांनीही त्या घोषणेला दुजोरा दिलेला होता. मग काही तासातच नरेंद्र पटेल यांनी आपला रोख बदलला आणि भाजपाने आपल्याला खरेदी करण्याचा डाव खेळल्याचा आरोप करणारी पत्रकार परिषद घेतली. त्यात किती तथ्य आहे, त्याचा खुलासा बहुधा कधीच होणार नाही. कारण असली नाटके नव्याने होऊ घातलेली नाहीत. यापुर्वी अनेकदा असे आरोप झालेत आणि ते तपासात खोटे पडलेले आहेत. २००८ सालात अणूकराराने राजकीय वाद उफ़ाळला होता. त्या कराराला विरोध करताना युपीए सरकारचा पाठींबा डाव्या आघाडीने काढून घेतला आणि मनमोहन सरकारला लोकसभेत बहूमत दाखवण्याची वेळ आलेली होती. तेव्हा कॉग्रेसने विविध पक्षांचे खासदार विकत घेण्याचे दुकान उघडले होते. त्यातही काही नवे नव्हते. नरसिहराव यांच्या कारकिर्दीत बहूमतासाठी अशी खरेदी झाल्याचे कोर्टातही सिद्ध झालेले आहे. मात्र विषय संसदेच्या आवारातला असल्याने त्यात कोणाला दोषी ठरवून शिक्षा देण्याची अधिकार कक्षा आपल्यापाशी नसल्याचे सांगून कोर्टाने त्यातून अंग काढून घेतले होते. २००८ सालात भाजपाच्या तीन खासदारांनी पाठींब्यासाठी कॉग्रेसने कोट्यवधी रुपये देऊ केल्याचा थेट संसदेतच आरोप केला होता व तिथेच काही कोटींच्या नोटा सभापतींना सादर केल्या होत्या. म्हणूनच नरेंद्र पटेल जो आरोप करीत आहेत, त्यात नवे असे काहीही नाही.

या निमीत्ताने एक शंका मात्र जरूर आहे. खरेच या नरेंद्र पटेलना भाजपाला उघडे पाडायचे होते, की तोही केवळ प्यादे मोहरा म्हणून इतरांकडून खेळवला गेलेला नेता आहे? कारण ज्याप्रकारे घटनाक्रम घडला, त्यापेक्षा किंचीत वेगळी चाल खेळली असती, तर भाजपाला जगासमोर उघडे पाडण्याची उत्तम संधी त्याच्यापाशी होती. नंतर काही तासांनी दहा लाखाच्या नोटा पत्रकारांसमोर फ़ेकण्याची गरज अजिबात नव्हती. हार्दिक पटेलचा हा निकटचा सहकारी एका समारंभात नव्हेतर पत्रकार परिषदेतच भाजपामध्ये दाखल झालेला होता. त्यापूर्वी त्याला एक कोटीपैकी दहा लाखाची अनामत रक्कम दिल्याचा त्याचा आरोप आहे. शिवाय आपण कितीही पैशात विकले जाणार नाही, असेही हा नेता म्हणतो. त्याच्या शब्दावर विश्वास ठेवायचा तर त्याने काही तास गप्प बसण्याची तरी काय गरज होती? ज्या पत्रकार परिषदेत भाजपात त्याला सहभागी कररून घेतल्याची घोषणा झाली होती, तिथेच त्याला हा गौप्यस्फ़ोट करता आला असता. म्हणजे जेव्हा त्याला पक्षात घेतल्याचा सोहळा पत्रकारांसमोर चालला होता, तिथेच पत्रकारांशी बोलतानाच त्याने आपल्याला भाजपाने विकत घेतल्याचा आरोप करण्यात काय अडचण होती? तशा आकस्मिक खुलाश्याने भाजपाचे तिथे उपस्थित असलेले नेते रंगेहात पकडले गेले असते आणि त्यांना पत्रकारांनी पळता भूई थोडी केली असती. काही क्षणात ही बातमी थेट प्रक्षेपणातून देशभर दिसली असती आणि गुजरात सोडाच, भाजपाच्या देशभरच्या नेते प्रवक्त्यांना कॅमेरासमोर येण्याची भिती वाटली असती. पत्रकारांच्या समोरच सर्वकाही चालू असल्याने नरेंद्र पटेलच्या जीवालाही कुठला धोका संभवत नव्हता. त्याहीपेक्षा कळस म्हणजे भाजपाच्या कार्यालयातच भाजपाची सर्वात मोठी नाचक्की होऊन गेली असती. भाजपाला पुरते उघडे पाडण्यासाठीच या सौदेबाजीच्या नाटकात हा नेता सहभागी झाला असेल, तर त्याने मधले तीन तास कशाला उसंत घेतली?

नंतरच्या आरोपांपेक्षा थेट भाजपात सहभागी होण्याच्या सोहळ्यातच नरेंद्र पटेल यांना शहाणपण का सुचलेले नाही? याचा अर्थच सौदा पक्का झालेला होता. पण हातात आलेल्या रकमेपेक्षाही मोठी रक्कम ‘अनामत’ नाकारण्यातून मिळण्याची बहुधा नवी ऑफ़र आलेली असावी. त्यामुळे काही तास दहा लाखाची उब घेतल्यावर या पाटीदार नेत्याला उशिरा शहाणपण सुचलेले असावे. ज्या पद्धतीचे राजकारण गेल्या काही वर्षात चाललेले आहे. त्यात खरेदीविक्री हा नवा किंवा एकाच पक्षाच्या मक्तेदारीचा विषय राहिलेला नाही. त्यात सगळेच समान गुंतलेले आहेत. शंकरसिंग वाघेला यांना कॉग्रेसमध्ये आणताना कॉग्रेसने मुख्यमंत्रीपदाची लालूच दाखवलेली नव्हती काय? नंतरही या निवडणूकीत त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीची संधी नाकारली गेली नसती, तर वाघेला पक्षाच्या विरोधात इतक्या टोकाला गेले असते काय? म्हणूनच जे काही चालले आहे, त्यात भाजपाच्या इन्काराला अर्थ नाही, तसाच कॉग्रेसने सोवळेपणाचा आव आणण्यातही तथ्य नाही. प्रत्येकजण आपापल्या परीने गैरप्रकार करूनच लोकमत जिंकण्याचे खेळ करतो आहे. २२ वर्षात पुन्हा निवडणूक जिंकणे शक्य झाले नसतानाही, कॉग्रेसला नव्याने पक्षाची संघटना उभी करण्याची इच्छा झाली नाही. त्यापेक्षा आता वाघेलांप्रमाणेच हार्दिक वा अन्य तरूण आंदोलक नेत्यांना आमिषे दाखवण्याने काय पावित्र्य जपले जात असते? एक गोष्ट मात्र नक्की अशा बाजरपेठेत नव्याने आलेल्या तरूण नेत्यांचा हकनाक बळी जात असतो. हार्दिक वा कोणी अल्पेश आता काही दिवस बातम्यातून झळकतील. १८ डिसेंबरला विधानसभांचे निकाल लागल्यावर त्यातल्या कोणाची दखल कुठल्याच पक्षाचे श्रेष्ठी घेणार नाहीत. जत्रेतल्या हौशेनवश्यांपेक्षा त्यांना कोणी किंमत देत नाही, हे त्यांच्या नंतर लक्षात येईल, तोपर्यंत सावरण्याची वेळ निघून गेलेली असेल.

3 comments:

  1. निकाल काहीही लागो या तीन तरुनांचे करीयर संपनार एवढे नक्की.युपीच्या माजी मुख्यमंत्रीची आज काय अवस्था आहे तिथे ह्या तिघांचे पक्ष पन नाहीत.

    ReplyDelete
  2. हार्दिक पटेल च्या मित्राला आगामी काळात एखादे खात्याचा मंत्री बनवून मोदी जी विरोधक तिन्ही तरुणांना कायमचा शह देतील हे नक्की

    ReplyDelete