Saturday, October 14, 2017

रमेश किणी आणि आरूषी

arushi talwar के लिए चित्र परिणाम

गुरूवारी एका जुन्या गाजलेल्या खटल्याचा निकाल लागला आणि तमाम माध्यमांना तोंडात बोट घालण्याची पाळी आली. कारण मागल्या आठनऊ वर्षात माध्यमांनी ज्यांना भयंकर खुनी म्हनून पेश केलेले होते, त्या मृत आरूषीच्या आईवडीलांची हायकोर्टाने त्यातून मुक्तता केली. नुसतेच त्यांना निर्दोष ठरवलेले नाही, तर खालच्या कोर्टात न्यायाचा सिनेमा झाला, अशी मल्लीनाथीही अलाहाबादच्या खंडपीठाने केलेली आहे. आरूषी ही तेरा वर्षे वयाची मुलगी नऊ वर्षापुर्वी आपल्या शयनगृहात मृत अवस्थेत आढळली होती. तिची हत्या बहुधा घरातला गडी हेमराज याने केली, अशी शंका आरंभी घेतली गेली. पण दोनच दिवसात त्याच घराच्या गच्चीवर हेमराजचाही मृतदेह आढळला आणि हे प्रकरण रहस्यमय होऊन गेले. त्याचा तपास पोलिसांकडून होण्यापेक्षा टिव्ही माध्यमांनी तपासकाम हाती घेतले आणि एकूणच दुर्घटनेचा पुर्ण चुथडा करून टाकला. काही दिवसातच हे प्रकरण कौटुंबिक प्रतिष्ठेतून झाले असल्याचा एक निष्कर्ष माध्यमांनी काढला आणि त्यासाठी आरुषीचे आईबापच त्यात खुनी असल्याचा निर्वाळा देण्याची स्पर्धा सुरू झाली. आईबाप डॉक्टर व त्यांच्या मुलीचे घरगड्याशी संबंध असल्यामुळे त्यांनीच प्रतिष्ठेखातर मुलीचा व गड्याचा बळी घेतला, हा निष्कर्ष काढण्यात आला. माध्यमातून त्याचा इतका गदारोळ झाला, की पोलिसांनाही त्यावर तपास करण्याची गरज उरली नाही. आपल्याकडे आता ही एक फ़ॅशन होऊन बसली आहे. कुठलाही तपास चौकश्या होण्यापुर्वी़च आपापल्या गृहीतावर माध्यमे व वाहिन्या हलकल्लोळ माजवून देतात. मग पोलिसांनाही खरे मारेकरी शोधण्यापेक्षा माध्यमांना हवे असलेल्यांना उचलून कोर्टासमोर हजर करण्याला पर्याय उरत नाही. दाभोळकर ते गौरी लंकेश व साध्वी ते पुरोहित, सगळेच त्याचे बळी होऊन बसलेले आहेत. अशा माध्यमांच्या न्यायनिवाड्याने वास्तविक न्यायाचा पुरता बोजवारा उडवलेला आहे. हायकोर्टाने त्याचीच ग्वाही दिलेली आहे.

चार वर्षापुर्वी या खटल्याचा निकाल गाझियाबादच्या सीबीआय कनिष्ठ न्यायालयात लागलेला होता. आधी नॉयडा पोलिसांनी तपास केला. मग माध्यमांच्या दबावामुळे तपास सीबीआयकडे सोपवला गेला. सीबीआयनेही दोनदा स्वतंत्रपणे वेगळ्या पथकांकडून तपास करवून घेतला. पण खुन झाला हे सत्य असले, तरी त्यातले गुन्हेगार शोधून त्यांच्यावर आरोप सिद्ध करणे वेगळी गोष्ट असते. ती बातमीतून सनसनाटी माजवण्यासारखी गंमत नसते. त्यामुळेच कोर्टात सिद्ध होणारे पुरावे आणि त्यांना पुरक अशा इतर गोष्टी जमवाव्या लागत असतात. त्यांची न्यायालयासमोर संगतवार मांडणी करावी लागत असते. पुढे बचाव पक्षाच्या सरबत्तीसमोर ते साक्षी व पुरावे तग धरण्याइतके मजबूत असावे लागतात. वाहिन्यांवरील चर्चेत दुसर्‍या बाजूची मुस्कटदाबी करून गुन्हे कोर्टात सिद्ध होत नसतात. म्हणूनच मागल्या दहाबारा वर्षात माध्यमांनी सिद्ध केलेल्या प्रत्येक गुन्ह्यात नंतर आरोपी निर्दोष मुक्त झालेले आहेत. दाभोळकर हत्येला काही तास पुर्ण होण्यापुर्वी त्यामागे नथूराम प्रवृत्ती असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आणि त्यानंतर आता चार वर्षे उलटून गेली, तरी कुठलाही पुरावा किंवा साक्षीदार पोलिसांना शोधून काढता आलेला नाही. मात्र तितक्याच उत्साहात नंतर पानसरे, कलबुर्गी व आता गौरी लंकेश यांच्या खुनाचे गुन्हेगार माध्यमांनी शोधलेले व सिद्ध केलेले आहेत. याला सनसनाटी माजवून गुन्हेगारांना पळवाट मिळवून देणे इतकेच म्हणता येईल. आरूषी प्रकरणाचा निकाल नऊ वर्षांनी असा लागला, तसाच दाभोळकर ते गौरी लंकेश प्रकरणाचा निवाडा आणखी पाचसात वर्षांनी लागला तर नवल वाटण्याचे कारण नाही. कारण त्यांचा तपासात माध्यमांनी व तथाकथित पुरोगाम्यांनी सतत प्रयत्नपुर्वक अडथळे आणलेले आहेत. ज्या खुनाला वा गुन्ह्याला कोणी साक्षीदार नसतो, ते कुशलतेने तपास करून सोडवावे लागत असतात.

दाभोळकर ते गौरी वा आरूषीच्या प्रकरणात कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपलब्ध नव्हता. अशा गुन्ह्यांचा शोध घेताना परिस्थितीजन्य पुरावे व प्रासंगिक संदर्भांना खुप महत्व असते. जिथे घटना घडली तिथे जितक्या वेगाने तपास सुरू होईल, तितके महत्वाचे धागेदोरे मिळू शकत असतात. म्हणूनच घटनास्थळी इतरांना येजा करू दिली जात नसते. संबंधितांना अंधारात ठेवून गुन्हेगाराला गाफ़ील राखण्याला प्राधान्य असते. पण आरूषीच्या हत्याकांडात तिच्या घराचे वा घटनास्थळाचे चित्रण करायला वाहिन्यांच्या लोकांनी इतकी घुसखोरी केली, की पुराव्यांची पुर्णपणे हेळसांड झाली. विविध कारस्थानाच्या कहाण्या रंगवण्य़ाच्या नादात त्यांनी पोलिसांना तटस्थपणे काम करू दिले नाही. वास्तविक घटनेचा अभ्यास निरीक्षण करण्यापेक्षा अमूक एका दिशेने तपास करण्याचा अट्टाहास इतका झाला, की पोलिसांना धागेदोरे शोधण्यापेक्षाही माध्यमांना शांत करण्याचीच मेहनत घ्यावी लागली. कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी हत्या हा मुद्दा इतका रेटून धरण्यात आला, की खुद्द कनिष्ठ न्यात्यालयही त्यात भरकटून गेले. आता हायकोर्टाचे ताशेरे बघितले तर त्याची कल्पना येते. खालच्या कोर्टाचा न्यायाधीश पुर्वग्रहदूषीत होता व त्याने चित्रपटाचा दिग्दर्शक असल्यासारखा निवाडा केला असल्याचे हायकोर्टाने म्हणावे, यातच सर्वकाही आले. सीबीआयने दोनदा चौकशी करून अखेरीस कुठलाही सज्जड पुरावा नसल्याचा अहवाल दिलेला होता. परंतु तिथल्या न्यायाधिकार्‍यांनी तो फ़ेटाळून असलेल्या पुराव्याच्या आधारेच आरोपपत्र दाखल करण्याचा फ़तवा काढला. थोडक्यात असलेला पुरावा पुरेसा असल्याचा निर्णय त्या न्यायाधीशांनी आधीच केलेला होता. नंतर फ़क्त सुनावणीची औपचारिता पार पडली. म्हणजे खटल्याचा देखावा उभा करण्यात आला आणि हायकोर्टात जेव्हा त्याच साक्षीपुराव्याची कसोटी लागली, तेव्हा सगळा डोलारा कोसळून पडला.

आरूषीच्या खटल्याची वाटचाल व पुरोहित साध्वी यांच्यावरील हिंदू दहशतवाद खटल्याची प्रगती बघितली, तर आपल्याला त्यात एक साधर्म्य आढळून येईल. दोन्हीकडे कुठलाही पुरावा किंवा साक्षीदार नसताना केवळ सार्वत्रिक गदारोळाला शांत करण्यासाठी चौकशी, तपास व खटल्याचे देखावे उभे केलेले दिसतील. आरूषीच्या खटल्यात दोन वर्षात सीबीआयने सज्जड पुरावे नसल्याचा निर्वाळा दिलेला होता. पुरोहित प्रकरणात नऊ वर्षांनी तेच सत्य एनआयए या तपास संस्थेने सुप्रिम कोर्टाला कथन केले आहे. नऊ वर्षे पुरावे असताना खटला चालविण्याचे धाडस का झाले नाही? या खटल्यातील विद्वान वकील महिलेने आपल्यावर दबाव आल्याची भाषा केली होती. पण सरकार बदलण्यापुर्वी अनेक वर्षे ह्या वकिलीणबाई खटला पुढे कशाला रेटू शकल्या नव्हत्या? सतत माध्यमात येऊन वावड्या उडवण्यापलिकडे अशा लोकांनी काय केले होते? ते़च गुजरात दंगलीमागे कारस्थान असल्याच्या आरोपाविषयी सांगता येईल. पंधरा वर्षे अनेक चौकश्या व तपास पथके नेमण्यात आली आणि कोणालाही एक साधा कोर्टात सिद्ध होणारा पुरावा शोधता आलेला नाही किंवा सादर करता आलेला नाही. पण आरोप मात्र ठामपणे चालू होते आणि आहेत. कारण यापैकी कोणाला सत्याचा शोध आवश्यक वाटत नाही की हत्याकांड हिंसेवर न्याय मिळावा अशीही अपेक्षा नाही. त्यांना अशी हत्याकांडे व दंगली आपल्या राजकीय भूमिका पुढे रेटण्यासाठी कच्चामाल म्हणून वापरायच्या असतात. त्यातल्या पिडीत वा बळींच्या न्यायाविषयी त्यांना कुठलीही आपुलकी नसते. म्हणूनच ते न्यायासाठी आक्रोश करून प्रत्यक्षात न्यायाचाच बोजवारा उडवित असतात. इशरत, जाफ़री, मालेगाव किंवा आरूषी अशा प्रत्येक प्रकरणात न्यायाचा बोजवारा उडालेला आहे. रमेश किणीच्या हत्येचे तरी रहस्य अजून कुठे उलगडले आहे? तेव्हा ऊर बडवणार्‍या कुणाला आज किणी आठवतो तरी काय?

3 comments:

  1. Maharashtratlya eka patrkarane tar kaharch kela Tv varchya debate madhye sanatan santhechya manasala tumhich khuni mhanun chalu programme madhun haklunch lavle, tapas ajun chalu asatana.ashane khara khuni jo koni asel to savadh zalach asel ki.

    ReplyDelete
  2. आरूषीच्या आईवडिलांना तरी खुनी सापडला पाहिजे असे वाटते का?त्यासाठी त्यानी पोलिसांना कसे सहकार्य केले?त्यांनी स्वत:चा काही संशय,तर्क पोलीसांकडे व्यक्त केला का?याबद्दल काहीं माहिती कुठे मिळेल का?

    ReplyDelete
  3. अगदी खरं आहे.

    ReplyDelete