Friday, October 27, 2017

मातोश्री, सोनिया आणि राहुल

thackeray with pranab के लिए चित्र परिणाम

अलिकडेच माजी राष्ट्रपती प्रणबदा मुखर्जी यांचे एक पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यात त्यांनी मध्यंतरीच्या आघाडी युगाच्या राजकारणाचा उहापोह केलेला आहे. त्यात त्यांनी राष्ट्रपती निवडणूकी दरम्यानच्या प्रसंगांचाही उल्लेख केला आहे. २००७ सालात जेव्हा डॉ. अब्दुल कलाम यांची मुदत संपत आलेली होती, तेव्हा नव्या राष्ट्रपती निवडणूकीचे वेध लागलेले होते. अर्थात सत्ता युपीए म्हणजे पर्यायाने कॉग्रेसची होती आणि सोनियांच्या हाती सत्तासुत्रे आलेली होती. तेव्हा त्यांनी आपले विश्वासू शिवराज पाटिल यांना राष्ट्रपती बनवण्याचा घाट घातला होता. पण डाव्या आघाडीने त्याला आक्षेप घेतला आणि अकस्मात नवा उमेदवार निवडताना सोनियांनी तितक्याच निष्ठावान राजस्थानच्या राज्यपाल असलेल्या प्रतिभा पाटील या मराठी उमेदवाराची निवड केली होती. विनाविलंब त्यांना शिवसेनेने पाठींबा दिला होता. अर्थातच ती बाळासाहेबांची जाहिर भूमिका होती. उद्या शरद पवार पंतप्रधान होणार असतील, तर त्यांच्याही मागे आपण मराठी अस्मिता म्हणून उभे राहू; असे बाळासाहेबांनी अनेकदा म्हटलेले होते. प्रतिभाताईंना पाठींबा त्याचाच परिणाम होता. अशा प्रतिभाताई मग उमेदवारी जाहिर झाल्यावर देशभर दौरा करीत होत्या आणि विविध पक्ष व खासदार आमदारांचा पाठींबा मिळवण्याच्या प्रयत्नाला लागल्या होत्या. त्यातच त्यांची मुंबई भेट ठरलेली होती. पण मुंबईला गेल्यास त्या मातोश्रीवर जातील, अशी शक्यता होती आणि म्हणूनच ऐनवेळी त्यांची मुंबईभेट रद्द करण्यात आली. अशी माहिती प्रणबदांनी या पुस्तकातून दिलेली आहे. त्याचे कारणही त्यांनी लपवलेले नाही. प्रतिभाताई वा कुणा कॉग्रेस नेत्याने मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेणे सोनियांना मानवणारे नव्हते, असेही प्रणबदांनी स्पष्ट केले आहे. इतकी राहुल वा सोनियांच्या शिवसेना विषयक प्रेमाची साक्ष पुरेशी आहे ना?

प्रतिभाताईंची मुदत संपल्यावर त्यांच्या जागी प्रणबदा यांचीच सोनियांनी राष्ट्रपती पदासाठी निवड केली आणि तेव्हाही त्यांनी मातोश्रीवर जाणे सोनियांना अमान्य होते. पण शरद पवार यांच्या सल्ल्यानुसार आपण मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांचा वा शिवसेनेचा पाठींबा मागितला, असेही माजी राष्ट्रपतींनी स्पष्ट केले आहे. हा सगळा इतिहास इतक्यासाठी सांगायचा, की सोनिया, राहुल वा आजच्या कॉग्रेसचे शिवसेनाप्रेम त्यातून स्पष्ट व्हावे. अर्थात अशा कोणी मातोश्रीवर येण्याजाण्याने शिवसेनाप्रमुख सुखावत नव्हते. त्यांची भूमिका व व्यक्तीमत्व स्वयंभू होते. कोणाच्या मातोश्रीवर पायधुळ झाडण्याने त्यांना मोठेपण मिळालेले नव्हते, की तशी त्यांची कधी अपेक्षाही नव्हती. पण त्यांच्याविषयी वा एकूणच शिवसेनेविषयी आजच्या कॉग्रेसला असलेली आत्मियता स्पष्ट करण्यासाठी हा इतिहास सांगणे आवश्यक आहे. अशा कॉगेसने नोटबंदी झाली तेव्हा विरोधातली भूमिका घेतली तर योग्यच होते. पण त्यावेळी सोनियांनी घेतलेल्या पवित्र्याला पाठींबा द्यायला शिवसेनेचे खासदारही राष्ट्रपती भवनावर गेले होते. त्यालाही हरकत असायचे कारण नाही. मात्र इतके करूनही सोनियांनी पुढे कधी शिवसेनेला आपल्या डावपेचात समाविष्ट करून घेतलेले नव्हते. वास्तविक याच भाजपा विरोधी पवित्र्यासाठी शिवसेनेने मग कॉग्रेसच्या मीराकुमार यांनाही मते द्यायला काहीही हरकत नव्हती. कारण राष्ट्रपती निवडणूकीत भाजपा वा मोदींनी ठरवलेले उमेदवार रामनाथ कोविंद मुंबईत येऊनही मातोश्रीवर फ़िरकलेले नव्हते. आढेवेढे घेत शिवसेनेने निमूट त्यांनाच मते देण्याचे तरी काय कारण होते? प्रतिभाताई यांच्या विरोधात भाजपाने भैरोसिंह शेखावत यांना उभे केले, तरी सेनेने दाद दिलेली नव्हती. मग यावेळी सेना कडव्या मोदी विरोधात असताना, कोविंद यांना मतदान करण्यात काय अर्थ होता? भाजपा वा मोदी तुमच्या मतांना किंमत देत नसतील, तर फ़रफ़टण्याची काय गरज होती?

ह्या सर्व गोष्टी इतक्यासाठी सांगायच्या, की सध्या शिवसेनेला राहुल गांधी यांच्यात सक्षम नेतृत्व दिसू लागलेले आहे. प्रत्येक पक्षाचा व नेत्याचा आपापला दृष्टीकोन असतो. त्यामुळे तो सर्वांना वा इतरेजनांना मान्य होण्याची काहीही गरज नसते. पण पक्ष वा नेत्याचा दृष्टीकोन हा त्यांच्या पाठीराख्या मतदाराला तरी पटणारा असला पाहिजे. नुसताच एका कोणाला विरोध म्हणून तिसर्‍याच्या मागे फ़रफ़टण्याला राजकीय भूमिका म्हणता येत नाही. नेमक्या अशाच फ़रफ़टण्यातून गेल्या पाव शतकात देशातले अनेक राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष नामशेष होऊन गेलेले आहेत. बंगाल वा केरळात भाजपाची नावनिशाणी नसताना, त्याच्या विरोधात दंड थोपटून उभा राहिलेल्या डाव्यांनी साडेतीन दशकातील आपली बंगालची हुकूमत नामशेष करून टाकली. २०१० पर्यंत तिथे सत्तेत असलेला मार्क्सवादी पक्ष आज बंगालमध्ये तिसर्‍या क्रमांकावर फ़ेकला गेला आहे आणि मायावती व मुलायमची तशीच स्थिती उत्तरप्रदेशात झाली आहे. आपला राज्यातील खरा विरोधक असलेल्या कॉग्रेसशी चुंबाचुंबी केल्यामुळे अशा पक्षांची आपल्याच हक्काच्या प्रदेशात धुळधाण उडालेली आहे. महाराष्ट्रात शिवसेना क्रमाक्रमाने त्याच मार्गाने वाटचाल करू लागलेली आहे. तिच्या नेत्यांना राहुल गांधी देशाचे नेतृत्व करण्यास समर्थ असल्याचा शोध लागला असेल, तर महाराष्ट्रातील सेनेच्या पाठीराख्या मतदाराला कोणता संदेश दिला जात असतो? भाजपा नको असेल, तर कॉग्रेसकडे वळावे. आगामी लोकसभेत राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात आणि तसे करणार्‍यांना मते द्यावीत, असा सुप्त संदेश या भूमिकेतून जात असतो. असा संदेश मोदी विरोधात चिथावणीला खुसखुशीत असला, तरी तो मतदार शिवसेनेचा फ़ोडत असतो. बहुधा त्यामुळेच नांदेडमध्ये असलेली मते शिवसेना गमावून बसली आणि अशोक चव्हाण महापालिकेत दैदिप्यमान यश मिळवून गेले.

राहुल गांधी देशाचे नेतृत्व करायला समर्थ नेता असतील, तर त्यांनीच नेमलेला महाराष्ट्राचा नेता अशोक चव्हाण राज्यात सत्ता राबवायला वा मुख्यमंत्री व्हायला योग्य ठरतो ना? शिवसेनेच्या मुखपत्राने असे काही सांगण्यापुर्वीच बहुधा हा संकेत सेनेच्या मतदारापर्यंत गेलेला असावा. अन्यथा नांदेडमध्ये शिवसेनेचा इतका धुव्वा कशाला उडाला असता? पाच वर्षापुर्वी तिथे शिवसेनेला सोबत घेऊन भाजपाला अवघ्या दोन जागा मिळवता आल्या होत्या आणि सेनेने चौदा जागा जिंकलेल्या होत्या. तिथे आज काय परिस्थिती आहे? लोकांनी भाजपाला दोनचार जागा अधिकच्या दिल्या आहेत. पण सेनेच्या असलेल्या सर्व जागा काढून घेतल्या आहेत. त्याचा अर्थ इतकाच होतो, की भाजपाला सत्ता मिळू द्यायची नसेल, तर शिवसेनेच्या मतदारांनी थेट अशोक चव्हाणांना सत्ता बहाल केलेली आहे. नाहीतरी उद्या राहुल यांचेच नेतृत्व सेना पत्करणार असेल, तर राहुल यांच्या पक्ष व नेमलेल्या नेत्यालाच मते थेट देऊन टाकण्यात गैर काय आहे? मतदार इतका सोपासरळ विचार करत असतो. मतदान तसेच करत असतो. जे सेनेच्या नांदेडच्या मतदाराने करून दाखवले, तेच आता सामना या मुखपत्रातून व्यक्त होत असेल, तर सेनेची वाटचाल योग्य दिशेने चाललेली आहे असेच म्हणावे लागेल. नेत्यांचे सोडून द्या, पण सेनेचे मतदार योग्य संदेश आधीच ओळखुन वागू लागल्याचा हा पुरावा मानता येईल ना? म्हणूनच भाजपाच्या मोदीभक्तांनी उगाच काहूर माजवण्याचे काहीही कारण नाही. महाराष्ट्रात कॉग्रेसला भवितव्य असल्याची ग्वाही आजचा दोन क्रमांकाचा राजकीय पक्षच देत असेल, तर अशोक चव्हाण यांनी छाती फ़ुगवून चालले पाहिजे. कारण त्यांना आमदारही गोळा करावे लागणार नाहीत. १९९९ सालात सेना-भाजपा युतीला सत्तेपासून वंचित ठेवणारे पुरोगामॊ पक्ष आज कुठे आहेत? त्यांनीही पवार-सोनियाच सक्षम असल्याचे दाखले दिलेले नव्हते काय?


11 comments:

  1. भाऊ हे राजकारण आहे . एरवी तुम्ही बातमीमागची बातमी फोडून सांगता . पण सेना हा विषय निघाला की तुमचे मोदीप्रेम जागृत होते .मग सेनेची प्रत्येक भुमिका तुम्हाला चुकीचीच वाटू लागते किंवा तुम्ही तसं भासवू लागता .
    असो . सेना कुणाचला काय वाटतं यावर चालत नसते . आमचं नेतृत्व खमकं आहे . ते स्वतःच्या पद्धतीने राजकारण करून विरोधकांना गप्प बसवतील यात शंका नाही .

    ReplyDelete
    Replies
    1. भाऊंचे सेनाप्रेम किती आहे ते तुम्हाला माहीत नाही म्हणून तुम्ही अस म्हणताय.
      पण भाऊंना आपला तो बाब्या अस करवत नाही हे खर कारण आहे.
      बाळासाहेब असते तर ते कसे वागले असते तसे उद्धवजी वागत नाहीयेत ही खरी खंत आहे.

      Delete
    2. भाऊंचा मुद्दा आपल्याला समजला नसावा.

      Delete
    3. तुम्हाला बहुदा भाउ कोण आहेत हे माहित नाहीये..

      Delete
    4. तुम्ही भाऊंचे आधीचे लेख बहुदा वाचले नसावे... भाऊंचा आवडता पक्ष आहे सेना.

      आणि पुढच्या काही काळात शिवसेना नक्कीच विरोधकांना गप्प करेल, कारण सेनाच तेव्हा विरोधी पक्ष असेल(?)

      हे खमकं नेतृत्व सेनेला लोकांना विसरायला भाग पाडेल.

      Delete
    5. आजकाल हेच दिसतंय सगळीकडे. स्वतःला शिवसैनिक म्हणवणारे मिळेल ते कारण वापरून मोदींना शिव्या घालत सुटलेयत. असल्या लोकांच्या नशिबी राहुल गांधीच शोभतो.

      Delete
    6. ज्या काही मोजक्या लोकांना बाळासाहेबांना थेट भेटायला जाण्याची परवानगी मातोश्रीवर होती त्यातले एक भाऊ आहेत जरा विचार करुन कमेंट करत जावा dada

      Delete
  2. उष्ट्रानाम विवाहेषु गीतं गायन्ति गदार्भा,
    परस्परं प्रशंसति अहो रूपं अहो ध्वनि ।।

    उंटाच्या रूपाचे गुणगान गाढव करते, तर गाढवाच्या आवाजाची प्रशंसा उंट करतो, असा हा प्रकार आहे.

    ReplyDelete
  3. एकदम खरे आहे, सेनेची निर्मिती कारण हा काँग्रेस पक्ष आहे. आता काँग्रेस ला टिकून राहण्यासाठी पायरीची गरज आहे. ती पायरी आज सेना स्वतः बनत आहे.स्वताचे अस्तित्व मुंबई आवडून इतर महाराष्ट्रात सेना गमावून बसत चालली आहे. त्यावर कडी करणारा आत्मघातकी विचार राऊत ने व्यक्त केला आहे. चला निदान मतदार जागृत तरी होईल की आपले मत नेमके कोणाला जाणार जे त्याला स्पष्ट झाले आहे.

    ReplyDelete
  4. सेनेचे नक्की काय चालले आहे समजत नाही. त्यांना सत्ताधारी म्हणावे की विरोधक हे त्यांना व इतर जणांना समजताच नाही आहे, हे सत्य आहे. निवडून दिल्यावर त्यांच्या अश्या वागण्याने नांदेड मध्ये त्यांना घरी बसावे लागले आहे. यातून बोध घेऊन सेनेने आपला मार्ग ठरवावा निदान सैनिकांना तरी दिलासा मिळेल. सध्या त्यांना काहीच समजत नाही आहे.

    ReplyDelete