Monday, October 16, 2017

‘अनुभवाचे’ बोल

pranab के लिए चित्र परिणाम

२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत नरेंद्र मोदींनी चमत्कार घडवला असे म्हटले, की मिमांसेला जागा शिल्लक उरत नाही. कारण मग कॉग्रेस वा युपीएचे अपयश झाकता येत असते. उलट मोदींच्या विजयातील त्यांच्या विरोधकांचे योगदान शोधायला गेले, तर खरी कारणमिमांसा होऊ शकत असते. माजी राष्ट्रपती प्रणबदा मुखर्जी यांनी आपल्या ताज्या पुस्तकात त्याचाच अप्रत्यक्ष उहापोह केलेला आहे. युपीएच्या दुसर्‍या कारकिर्दीत कुठल्या चुका झाल्या व घडामोडी कशा घडत गेल्या; त्याचा अभ्यासपुर्ण उहापोह प्रणबदा यांनी आपल्या ताज्या पुस्तकात केला आहे. त्याचे शिर्षकही बोलके आहे. ‘आघाडीची वर्षे: १९९६ ते २०१२’ असे या पुस्तकाचे नाव असून त्यामध्ये प्रणबदांनी मागल्या दोन दशकातील राजकीय घडामोडींचे विश्लेषण आपल्या अनुभवानुसार केलेले आहे. त्याच्या प्रकाशनानंतर प्रणबदांनी अनेक मुलाखती दिल्या आहेत, तसेच अनेक जाहिर कार्यक्रमही केलेले आहेत. त्यात आजवर पडद्याआड असलेल्या अनेक घटनांची थेट माहिती प्रथमच समोर येत आहे. युपीएच्या पराभवाची सुरूवात मोदी यांच्या आखाड्यात उतरल्यानंतर नव्हे, तर त्याच्याही खुप आधीपासून झाली होती. किंबहूना दुसर्‍यांदा कॉग्रेसच्या हाती युपीए म्हणून सत्ता आल्यावर कॉग्रेसश्रेष्ठी बेपर्वा किंवा उद्धट होत गेले. त्यातून जी विपरीत स्थिती निर्माण झाली, त्यानेच मोदींना आमंत्रित केले, असे म्हणावे लागेल. देशाचा कारभार किती हलगर्जीपणे चालला होता त्याचीच कबुली प्रणबदांनी दिली आहे. त्यांनी तसे शब्द वापरलेले नसतील, पण त्याचा मतितार्थ तोच आहे. त्यांचे दुर्दैव असे, की पोटतिडीकेने आजही ते पक्षातले दोष दाखवित आहेत. पण तिकडे कोणी ढुंकूनही बघायला तयार नाही. जी स्थिती २०११ मध्ये होती तीच आज सहा वर्षानंतर व इतक्या मोठ्या पराभवानंतरही कायम आहे. मग या पक्षाचे पुनरुत्थान कसे व्हायचे?

अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनाला मिळालेल्या प्रतिसादाने तेव्हाचे युपीए सरकार कमालीचे त्रस्त होते. अशी कबुली देऊन प्रणबदा एका कार्यक्रमात म्हणतात, त्यानंतर भ्रष्टाचार व काळापैसा या विषयावर योगगुरू बाबा रामदेव यांनी उपोषणाचा पवित्रा घेतला होता. त्यात अण्णा आंदोलनाची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून आधीच ते रद्द करून घ्यावे, असे युपीएला वाटत होते. त्यासाठी कुणा ‘महत्वपुर्ण व्यक्तीने’ रामदेव यांच्याशी बोलणी करण्याचा सल्ला प्रणबदांना दिला होता. पण त्यांची हिंदी भाषा चांगली नसल्याने दुभाषाचे काम करण्यासाठी त्यांनी सोबत कपील सिब्बल यांना नेलेले होते. ही भेट दिल्लीच्या विमानतळावर झालेली होती. ती यशस्वी झाली नाही आणि अखेरीस रामदेव बाबांनी उपोषण आरंभले. त्यांचे हजारो अनुयायी जमलेले होते. तर त्यांना मध्यरात्री तिथून हटवण्याची आततायी पोलिस कारवाई हाती घेतली गेली. त्यामुळे मोठा कल्लोळ माजला. त्यात एका महिलेचा मृत्यूही झालेला होता. ते आंदोलन मोडण्यात सरकारी दमनशक्ती यशस्वी झाली, तरी सरकारच्या त्या दमनशक्तीने लोकांची सहानुभूती रामदेव यांच्या बाजूने गेली होती. रामदेव, लोकपाल व निर्भया अशा तीन घटना लागोपाठ घडल्या होत्या आणि त्यात सरकराची बेफ़िकीरी जगासमोर आलेली होती. मात्र पुढे त्यातून सरकार सावरू शकले नाही. कारण त्यातून सावरण्याचा विचारही सत्ताधारी पक्षात झाला नाही. जेव्हा सरकार बेगुमान वागू लागते, तेव्हा सामान्य माणूस आपल्या परीने पर्याय शोधू लागतो. नेमक्या त्याच कालखंडात नरेंद्र मोदींचे पंतप्रधान पदासाठी नाव घेतले जाऊ लागले आणि कॉग्रेसच्या काही उठवळ नेत्यांनी त्याची टिंगल करीत जनमानस डिवचण्याचा पोरखेळ केला. परिस्थिती पक्षाला क्रमाक्रमाने प्रतिकुल होत असताना आगामी पंतप्रधान म्हणून राहुल गांधी यांचे नाव पुढे करण्याचाही अतिरेक तेव्हाच सुरू झाला होता.

यापैकी रामदेव यांना भेटण्यासाठी सरकारचा प्रतिनिधी म्हणून अर्थमंत्री मुखर्जी यांना पुढे करणारी ती व्यक्ती कोण, हे प्रणबदांनी उघड केलेले नाही. पण ज्यांना राजकारणाची जाण आहे, त्यांना तसे सांगणारी व्यक्ती सोनिया असू शकतात, हे वेगळे समजावण्याची गरज नाही. बाकी मनमोहन सोडून अन्य कोणी कॉग्रेस पक्षात असा नव्हता, की ज्याने प्रणबदांना असे सल्ले दिले असते. प्रत्यक्षात तो डाव फ़सला आणि नंतर पोलिस कारवाई झाल्यावर प्रणबदा विमानतळावर कशाला गेले होते, असाही प्रश्न समोर आला होता. थोडक्यात सरकारला पोलिसी बडगा उचलायचाच होता, तर रामदेव यांची मंत्र्यांनी भेट घेण्याचे काही प्रयोजन नव्हते. म्हणूनच तशी भेट घेण्यात आपली चुक झाली, असे तेव्हाही प्रणबदांनी म्हटलेले होते आणि आताही त्यांनी त्याची कबुली दिलेली आहे. पण सवाल इतकाच येतो, की त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला तोंडघशी पाडायचा खेळ कोणी केला? ज्याने कोणी केला, त्यानेच कॉग्रेस व युपीएची कबर खोदायला घेतलेली होती. त्याचाच लाभ मोदींना पुढल्या वर्ष दिड वर्षात मिळत गेला. गुजरातचे सरकार व तिथला कारभार याची कुजबुज त्याच काळात सुरू झाली होती आणि त्याची युपीए सरकारशी तुलना चालू झाली होती. त्यातून सावरण्याची तीच खरी वेळ होती. पण आपल्याला अन्य कोणी पर्याय नाही, म्हणून कितीही नाराज असला तरी भारतीय मतदार पुन्हा युपीए व कॉग्रेसलाच निवडून देणार; असा आत्मविश्वास कॉग्रेसला अरेरावी करायला भाग पाडत होता. आपल्या नाकर्तेपणाचे पुरावे युपीए देत असेल, तर लोक पर्याय शोधणार आणि अशावेळी गुजरातचा बदनाम नरेंद्र मोदी पर्याय होऊ शकत नसल्याचा आणखी एक खुळा आत्मविश्वास युपीएला खड्ड्यात घेऊन गेला. आंदोलनामुळे सरकार त्रस्त होते असे प्रणबदा कबुल करतात. पण तेव्हा ज्याप्रकारे कॉग्रेसनेते व श्रेष्ठी वागत होते, त्यात मस्ती दिसत होती. ग्रासलेपणाचा लवलेश त्यात नव्हता.

अडवाणी, सुषमा स्वराज वा अन्य भाजपा नेते आपल्याला आव्हान देण्याइतके समर्थ नाहीत, यावर विसंबून कॉग्रेसने मस्तवालपणा चालविला होता. त्यातून जनतेमध्ये जी संतापाची भूमिका वाढत चालली होती, त्याची त्यांना फ़िकीर नव्हती. हीच प्रणबदांची कबुली आहे. अलिकडे त्याचीच कबुली राहुल गांधी यांनीही अमेरिकेत मुलाखती देताना दिलेली आहे. अशा सर्वांनी जी परिस्थिती निर्माण केली वा बिघडवली, त्यातून मोदी हे नाव अधिक उजळ होत गेले. कारण त्यानंतरच मोदींनी आपली देशव्यापी प्रचार मोहिम सुरू केली. तेव्हा मोदी गुजरातभर सद्भावना यात्रा करीत फ़िरत होते आणि तिसर्‍यांदा गुजरात जिंकल्यावर देशाचे नेतृत्व करण्यासाठी उडी घेण्य़ाची त्यांची तयारी चालू होती. तर मोदींना पोषक असे वातावरण निर्माण करण्यास कॉग्रेस उद्धटपणाने हातभार लावत होती. मुद्दा इतकाच आहे, की पराभवातून कॉग्रेस काही शिकलेली नाही. म्हणून तर पाच वर्षे उलटून गेल्यावरही सुधारण्याची कुठलीही चिन्हे दिसत नाहीत. कॉग्रेसचे एककल्ली नेतृत्व आणि खोटा आत्मविश्वास ह्या खर्‍या अडचणी आहेत. हेच अप्रत्यक्षरित्या माजी राष्ट्रपती आजही सांगत आहेत. आताही मोदींना शिंगावर घ्यायला निघालेल्या राहुल वा त्यांच्या सहकार्‍यांना नरेंद्र मोदी उमगलेला नाही. कॉग्रेस अंतर्गत स्थिती २०११-१२ पेक्षा अजून बदललेली नाही. असाही संकेत प्रणबदा देत आहेत. पण म्हणून कोणी शहाणा होईल अशी शक्यता नाही. लोक मोदींना कंटाळले मग माघारी येतील, हा खुळा आशावाद आहे. कारण युपीएची सत्तेतली मस्ती लोकांनी अनुभवली आहे आणि निदान अजून तरी तितका मस्तवाल कारभार मोदी सरकारने केलेला दिसला नाही. म्हणूनच प्रणबदा यांच्याकडून राहुल व सोनियांनी दोन अनुभवाचे बोल ऐकून घेतले, तर कॉग्रेसला सत्तेत आणणे शक्य नसले तरी दुर्दशेतून सावरणे नक्कीच शक्य होईल.

2 comments:

  1. आजकाल सोशल मिडिया वर पन कांगी लोक तेच म्हनतायत की लोक मोदीजीवर चिडलेत gstमुळे.पव परवाच ते म्हनाले की व्यापार्याशी बोलतायत.राहुलने सुटबुट की सरकार म्हनल्यानंतर उज्वला योजना आनली होती.मोदीजी चुका सुधारतात.मुख्य म्हनजे विपक्षच त्यांना गाफिल ठेवत नाही.

    ReplyDelete
  2. यथायोग्य . पण भाऊ खरोखरच मोदी सरकारचा मस्तवालपणा जनतेला दिसला नाही असं वाटतंय आपल्याला ?

    ReplyDelete