Saturday, October 28, 2017

नॉन मॅट्रीकची परिक्षा

rahul cartoon kureel के लिए चित्र परिणाम

१९६०-७० च्या दशकात आजच्यासारखी दहावीची शालांत परिक्षा नव्हती. तेव्हा अकरावीची परिक्षा म्हणजेच शालांत परिक्षा असायची आणि त्याला मॅट्रीकही संबोधले जायचे. त्या काळात या मॅट्रीकची महत्ता इतकी होती, की आज तितकी कुठल्याही पदवी प्रमाणपत्रालाही किंमत नाही. अशा काळामध्ये एखादा विद्यार्थी अकरावी म्हणजे मॅट्रीक नापास झाला, तरी त्याला फ़िकीर नसायची. तो मोठ्या अभिमानाने आपण नॉन मॅट्रीक असल्याचे जगाला सांगायचा. कारण नॉन मॅट्रीक म्हणजे निदान अकरावीपर्यंत शाळा शिकला, असे गृहीत असायचे. त्यामुळेच कुठे नोकरी वा कामधंद्याच्या शोधात फ़िरणार्‍या माणसाला शिक्षण किती विचारले, तर तो बेधडक नॉन मॅट्रीक असे ठोकून द्यायचा. त्याचा अर्थ त्याने अकरावीपर्यंत शाळा शिकलेली आहे, असा अजिबात नव्हता. चौथी वा सातवीतच शाळा सोडलेले अनेक असायचे आणि तेही बेधडक नॉन मॅट्रीक असे ठोकून द्यायचे. त्याची आठवण आता अकस्मात झाली, ती तात्कालीन विद्रोही लेखक पत्रकार भाऊ पाध्ये यांच्यामुळे! त्याच काळात मराठीत ‘सोबत’ वा ‘माणुस’ अशी लोकप्रिय वाचनीय साप्ताहिकेही होती. त्यापैकी ‘सोबत’मध्ये भाऊ पाध्ये ‘पिचकारी’ नावाचे सदर लिहीत. त्या सदरात भाऊंनी एक लेखात या मॅट्रीक परिक्षेचा छान उल्लेख केला होता. ती परिक्षा अकरावीची वार्षिक परिक्षा असायची आणि ती शालांत परिक्षा मंडळाकडून घेतली जायची. त्यामुळे त्यात नापास झालेल्यांना पुढल्या मार्च महिन्यापर्यंत काही काम नसायचे. पुढल्या वर्षीच्या परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी नव्याने पुन्हा अभ्यासाला लागणे, किंवा अभ्यास सोडून कामधंद्याला लागणे; असे पर्याय असायचे. त्यातली जी मुले वा त्यांचे पालक किमान मॅट्रीक होणे आवश्यक मानायचे, ते कंबर कसून अभ्यासाला कामाला लागायचे. किंवा जे उडाण्टप्पू असायचे, ते पालकांच्या आग्रहाखातर अभ्यासाचे नाटक करायचे.

अशा काळात महाराष्ट्रामध्ये प्रजा समाजवादी नावाचा एक अखिल भारतीय पक्ष कार्यरत होता आणि त्याच्या राजकारणाविषयी विश्लेषण करताना भाऊ पाध्येंनी मॅट्रीक नापास विद्यार्थ्याचे रुपक वापरलेले होते. ह्या मुलांची वाईट स्थिती अशासाठी असायची, की नापास होऊनही त्यांना शाळेची कटकट शिल्लक राहिलेली नसायची. म्हणजे बोर्डाच्या पुढल्या परिक्षेसाठी त्यांनी तोच अभ्यास नव्याने करायचा, अशी अपेक्षा असायची आणि त्यांना शाळेत जायची गरज नसे. शाळाही त्यांचा वर्ग घेत नसे. अशी मुले मग अभ्यासाला बसली, की त्यांच्या समोर एक मोठी समस्या यायची. त्यांनी कुठल्याही विषयाचे पुस्तक उघडले, तरी त्त्यातला अभ्यास त्यांना आठवायचा आणि अभ्यास आपण केलेला असल्याचे आठवायचे. मग तोच तोच अभ्यास करताना कंटाळा यायचा. सहाजिकच अभ्यासाची उडवाउडवी करण्याखेरीज त्यांच्यापुढे दुसरा पर्याय नसायचा. पण घरातल्या वडीलधार्‍यांना शांत राखण्यासाठी त्यांना अभ्यासाचे नाटक रंगवावे लागे आणि बाकीचा वेळ उडाण्टप्पूपणा करण्यात वाया जायचा. असे सहाआठ महिने गेल्यावर नववर्ष उजाडायचे आणि बोर्डाच्या परिक्षेचा मार्च महिना जवळ यायचा. तेव्हा परिक्षेचे वेध लागायचे आणि अशी नॉन मॅट्रीक मुले घाईघाईने अभ्यासाला लागायची. अर्थात त्यातले बहुतांश पुन्हा नापासच व्हायचे आणि कायमचे असे नॉन मॅट्रीक म्हणून मिरवायचे. तर त्यांची उपमा भाऊ पाध्येनी प्रजा समाजवादी पक्षातल्या लोकांना दिलेली होती. निवडणूका आल्या, मग या पक्षाच्या नेत्यांना परिक्षा आल्याचे भान यायचे आणि दोन निवडणूकांच्या मधल्या काळात पक्षाची संघटना उभारण्याचे भान नसायचे. मग त्या नॉन मॅट्रीक मुलांप्रमाणे हे लोक प्रत्येक निवडणूकीत दणकून आपटायचे. पराभूत व्हायचे आणि मग पुढल्या निवडणुका येईपर्यंत बौद्धीक टिंगलटवाळ्या करण्यात रममाण होऊन जायचे. असे पाध्येंना म्हणायचे होते. आज राहुल गांधी काय वेगळे करीत असतात?

उत्तरप्रदेशचा लज्जास्पद पराभव पाठीशी असताना सहा महिन्यांनी गुजरातची निवडणूक असल्याचे कॉग्रेसला ठाऊक नव्हते काय? त्यासाठी तात्काळ काम सुरू करून निदान पक्षाची संघटना जमवता आली असती. उत्तरप्रदेशातही सहा महिने आधी टिंगलटवाळ्या करण्यात गेल्या आणि अखेरीस ज्याची टिंगल केली, त्याच अखिलेशला सोबत घेऊनही पुन्हा नॉन मॅट्रीक म्हणवून घ्यायचीच पाळी आली ना? मागल्या पाच वर्षात राहुल कॉग्रेसचे नेतृत्व करीत असताना, त्यांनी कुठली निवडणूक स्वबळावर जिंकून दाखवली आहे? यापैकी प्रत्येक निवडणूकीत त्यांनी कुठलाही अभ्यास केला नाही, की तयारी केली नाही. निवडणूकांचे वेध लागल्यानंतर धावपळ करायची आणि कुठल्या तरी पक्षाला सोबत घेऊन आपली नौका पार जाण्याचा आटापिटा करायचा, असाच खेळ करीत हा कॉग्रेसचा ज्येष्ठ नेता राहिलेला नाही काय? बिहारमध्ये मोदी लाट रोखण्य़ासाठी सज्ज झालेल्या लालू-नितीश आघाडीत सहभागी झाल्याने कॉग्रेसला चारवरून चोविस आमदार निवडून येणे शक्य झाले. त्यातले उमेदवार मिळताना सुद्धा कॉग्रेसची मारामार झालेली होती आणि आजही गुजरातमध्ये प्रदेशाध्यक्ष भरत सोलंकी म्हणतात, उसनवारीचे उमेदवार आणावे लागत आहेत. मग मागल्या तीन वर्षात राहुल गांधींनी कुठल्या निवडणूकीसाठी पक्षाची काय बांधणी केली, असा प्रश्न पडतो. अर्थात तेव्हाच्या मॅट्रीक परिक्षेतही पेपर चुकीचे तपासले गेल्याच्या तक्रारी अनेक भुरटे करायचे. राहुल गांधीही मतदान यंत्रात गफ़लती असल्याच्या तक्रारी करीत असतात. त्या काळातल्या नॉन मॅट्रीक व राहुल गांधी यांच्यात आणखी एक साम्य आहे. ते नॉन मॅट्रीकवाले परिक्षा केंद्र बदलून परिक्षेला बसायचाही प्रयोग करीत. राहुल गांधीही सातत्याने वेगवेगळ्या प्रांतातल्या विधानसभांना सामोरे जाऊन एक तरी विजय आपल्या खात्यात जमा करण्यासाठी धडपडत असतात. पण नशिबाने त्यांना साथ दिलेली नाही.

अलिकडेच कॉग्रेसला मोठा विजय मिळाला, तो पंजाबमध्ये आणि तिथे दहा वर्षाची अकालींची सत्ता कॉग्रेसने हिसकावून घेतली. त्यात राहुल गांधींचे मोठे योगादान कोणते असेल? तर त्यांनी पंजाबात पक्षाचा सहसा कुठला प्रचार केला नाही, की त्यात ढवळाढवळ केली नाही. उलट त्यांनी आपली सर्व शक्ती उत्तरप्रदेशात पणाला लावली आणि तिथे पक्षाला स्वबळावर मिळवता आल्या होत्या, तितक्याही जागा गमावून दाखवण्याचा पराक्रम राहुलनी केला. अगदी त्यांच्या अमेठी या लोकसभा मतदारसंघात पाचपैकी एकही विधानसभा जागा त्यांना जिंकून दाखवता आली नाही. पण त्यांना त्या पराभवाचे किंवा अपयशाचे कुठले दु;ख आहे काय? राहुलच्या चेहर्‍यावर जे बेफ़िकीरीचे भाव आपण सातत्याने बघत असतो, ते बारकाईने अभ्यासले, तर तुम्हाला पन्नास वर्षे जुन्या नॉन मॅट्रीक मुलांचे चेहरे लगेच ओळखता येऊ शकतील. त्यापैकी बहुतांश मुलांना नापास होण्यात आपला कुठला गुन्हा असल्याचे कधी वाटत नसे. केंद्र चुकीचे होते वा पेपर तपासणार्‍याची चुक झाली असेल, असाच त्यांचा दावा असायचा. सहाजिकच नापास होण्याचे कुठलेही वैषम्य त्यांच्या चेहर्‍यावर किंवा वागण्यात दृगोचर होत नसे. जेव्हा जेव्हा मी प्रफ़ुल्लीत असा राहुलचा चेहरा वाहिन्यांच्या पडद्यावर बघतो, तेव्हा त्यांचा जोश बघितल्यावर मला अर्धशतकापुर्वीचे ते नॉन मॅट्रीक विद्यार्थी आठवतात. लागोपाठ परिक्षेला बसून नापास़च होण्यातल्या त्यांच्या जिद्दीचा पुन:प्रत्यय येतो. त्यांनी अखेरच्या दिवसात रात्री जागून केलेला अभ्यास व त्याचे नाटक आठवते. म्हणून मला भाऊ पाध्येंची त्यावेऴची रुपककथा आठवली. जियो राहुल! कालपरवा अर्थमंत्री जेटलींना एका वाहिनीच्या पत्रकाराने राहुलच्या भवितव्यविषयी प्रश्न विचारला, त्याचे त्यांनी अतिशय समर्पक उत्तर दिले. जोवर लागोपाठ पक्षाला राहुल निवडणूका पराभूत करून देत आहेत, तोपर्यंत त्यांचे भवितव्य उज्ज्वल आले, असे मत जेटलींनी व्यक्त केले.

5 comments:

  1. आणि भाजपने युपी च्या यशानंतर लगेच गुजरात ची तयारी केली जिंकुन सुद्धा.तुम्ही म्हनता तसा एवढ हारून सुद्धा नवा उत्साह राहुल कसे आणतात काय कळत नाही.एखादा डिप्रेस तरी झाला असता किंवा खरच कामाला लागला असता.राहुल काहीच करत नाही.

    ReplyDelete
  2. भाऊ,

    खुप छान आणि सर्वसामान्य माणसालाही पटेल अशा भाषेत लिहील आहात, सद्धया राहुल गांधी यांना विनाकारण मोठ करण्याचे जे बालिश प्रयत्न चालू आहेत, त्यातून सर्वसामान्य माणसांमधे जो संभ्रम निर्माण झाला आहे, हा लेख तो संभ्रम दूर करण्याचे काम नक्की करेल..!!

    ReplyDelete
  3. खरोखरच गुजरातच्या निकालाविषयी उत्कंठा लागून राहीली आता तर .
    कारण जे आमच्या डोळ्यांना दिसतंय आणि जे भाऊ दाखवतायत ते जुळत नाहीये .

    ReplyDelete
  4. भाऊ, जर पप्पू पास झाला तर ....

    ReplyDelete
  5. भाऊ, यतार्थ लेखन. फारच समर्पक वर्णन.

    ReplyDelete