Saturday, October 13, 2018

लोकसभा निवडणूकीची गोळाबेरीज

मतचाचणी विश्लेषण (५)

Image result for modi one man army

आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्याला व कार्यकर्त्याला आहे, तितकीच ती सामान्य जागरुक नागरिकाला वा विविध पक्षाच्या समर्थकालाही आहे. त्याच्याही पलिकडे विविध पक्षांचा नेत्यांचा द्वेष करणार्‍यांनाही त्याविषयी कमालीची उत्सुकता आहे. त्यात जसे मोदीभक्त वा मोदीत्रस्त येतात, तसेच राहुलभक्तही असू शकतात. मग यातल्या मोदी समर्थकांना मोदी पुन्हा येण्याविषयी सकारात्मक वाचायचे असते आणि उलट्या बाजूला मोदी पराभूत कसे होणार, याची उत्कंठा लागलेली असते. मात्र त्यांच्याच मतावर देशातल्या निवडणूका होत नसल्याने सामान्य मतदार कसा विचार करतो व आपले मत कसे प्रसंगानुसार बदलतो, त्यावर अंतिम निकाल अवलंबून असतात. मतदार कधी आवडीने एका बाजूला झुकतात, तर कधी अगतिकेतेच्या पोटी अनिच्छेनेही ठराविक पक्षाला वा आघाडीला मते देत असतात. त्यातली पहिली अगतिकता देशात स्थीर सरकार असावे इतकीच असते. नेत्याने फ़ार मोठा पराक्रम केला नाही तरी किमान सुसह्य होईल असे सरकार चालवावे, अशी अपेक्षा नक्की असते. हा निकष लक्षात घेतला, मग सामान्य मतदाराचा कल ओळखणे सोपे जात असते. तोच कल मतचाचणीतून नेमका व्यक्त होईल, असे अजिबात नसते. पण चाचण्यांमधून एकूण कल कुठे झुकतो आहे, त्याचा अंदाज येत असतो. मतदानाच्या काळातल्या अखेरच्या क्षणी काही घटना त्याला निर्णायक झुकाव देत असतात. याचे उत्तम उदाहरण म्हणून मागल्या लोकसभेच्या अंतिम दोन फ़ेर्‍या व ८० जागांचे मतदान शिल्लक असताना मोदींनी केलेले एक वक्तव्य विसरता कामा नये. कारण त्या एका वक्तव्याने आठ सार्वत्रिक निवडणूकांचा प्रस्थापित पायंडा मोडून एकपक्षीय बहुमताने सत्तांतर घडवले होते. कोणाला आठवते, मोदी तेव्हा काय म्हणाले होते?

बहुधा उत्तरप्रदेशातल्या कुठल्या सभेत त्या अखेरच्या पर्वात मोदी म्हणाले होते, ‘ये मा-बेटेकी सरकार तो गयी. अब सिर्फ़ स्थीर सरकार बनाने के लिये मत देना है.’ तेव्हा साधारण ८० जागांचे मतदान बाकी होते आणि कॉग्रेस व युपीए पराभूत होणार, अशी खात्रीच मोदींनी दिलेली होती. पण मतदाराने आता एकपक्षीय बहूमत म्हणजेच भक्कम सरकार स्थापण्यासाठी मतदान करावे, असे ते आवाहन होते आणि त्यातून त्यांना अखेरच्या क्षणी डळमळीत असलेला व झुकणारा मतदार आपल्याकडे ओढून घ्यायचा होता. ती जादू चालली आणि निकाल लागले, तेव्हा तमाम राजकीय अभ्यासकांना तोंडात बोट घालण्याची वेळ आली. भाजपाला वा मोदींना एकहाती बहूमत, ही बाब अभ्यासक विश्लेषकांच्या गळी उतरणारी नव्हती. त्याची दोन कारणे होती. एक म्हणजे प्रचाराची रणधुमाळी उडवून मोदींनी विक्रमी मतदान घडवून आणलेले होते आणि आजवरचे पूर्वमतदानावर आधारलेले सर्व निकष कोसळून पडलेले होते. २००९ च्या तुलनेत जवळपास दहा टक्क्यांनी मतदान वाढलेले होते आणि त्याचा अंदाज काढणे चाचण्या व अभ्यासकांच्या आवाक्यातली गोष्ट नव्हती. ही बाब तेव्हापुरती मर्यादित नसते. अखेरच्या क्षणी मतदान इकडून तिकडे करू शकणारा दोनचार टक्के मतदार मोठा चमत्कार घडवित असतो, उलथापालथ घडवून आणत असतो. त्याचे स्वत:चे निकष असतात आणि त्याचा अंदाजही अभ्यासकांना लागू शकत नसतो. ते चमत्कार आपण त्यापुर्वीच्या मतदान वा निकालातही पाहू शकतो. २००९ सालात मनमोहन सरकार पुन्हा निवडून देण्याइतके त्यांनी कुठले महान कार्य केलेले होते? याचे उत्तर कोणी देऊ शकेल काय? अन्य कुठला आव्हानवीर समोर नसताना पुन्हा मिळालेली संधी, यापेक्षा दुसरे काहीही उत्तर असू शकत नाही. हे बुजगावणे निदान पाच वर्षे सरकार चालवू शकते, ह्या अगतिकतेने युपीएला दुसरी संधी मिळालेली होती.

२००९ सालात मतदान मार्च एप्रिल महिन्यात झाले. त्याच्या आधी चारपाच महिने काय घडले होते? कोणाला त्याचे स्मरण तरी आहे काय? २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानहून दहा फ़िदायीनांची एक टोळी समुद्रमार्गे मुंबईत येऊन रक्तपात करीत तब्बल दोन दिवस धुमाकुळ घालत होती. त्यांनी तीन मोठे पोलिस अधिकारी व अनेक सामान्य शिपाई ठार मारले. अडीचशेहून अधिक सामान्य नागरिकांचा हकनाक बळी घेतला. त्यात काही परदेशी नागरिकांचाही समावेश होता. रेल्वेस्थानकापासून पंचतारांकित हॉटेलपर्यंत कुठेही शेकडो लोकांना ओलीस ठेवून त्यांच्याशी जीवाचा खेळ केला. त्यात सामान्य लोक बळी पडलेच. पण भारताच्या गृहमंत्र्याचाही बळी द्यावा लागलेला होता. नाकर्तेपणाची शिक्षा म्हणून शिवराज पाटिल यांना तडकाफ़डकी बाजूला करावे लागलेले होते. तेवढेच नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख व उपमुख्यमंत्री गृहमंत्री आर आर आबा पाटिल यांनाही सत्तेवरून बाजूला व्हावे लागलेले होते. ही घटना नोव्हेंबर २००८ मधली आणि त्यानंतर अवघ्या चारपाच महिन्यात मुंबई ठाण्यातले लोकसभेचे मतदान झालेले होते. इतक्या महान कर्तबगारीसाठी मुंबईकराने कोणाला पाडले आणि कोणाला निवडून दिले? आधीच्या जितक्या जागा युपीए कॉग्रेसपाशी होत्या, त्यापेक्षा अधिक जागा याच भागात कॉग्रेसला मिळाल्या होत्या. मग त्या मतदाराने हत्याकांडाचे बक्षीस म्हणून युपीए कॉग्रेसला १० पैकी ८ जागा बहाल केल्या होत्या काय? आज मोदींवर आश्वासने पुरी झाली नाही म्हणून लोक नाराज असतील, तर तेव्हा दहशतवादाने उध्वस्त झालेला मुंबईकर मनमोहन सरकारवर खुश होता म्हणायचे काय? नसेल तर त्याने युपीएला अधिक जागा कशाला दिल्या होत्या? ती निवड नव्हती, तर स्थीर सरकार चालवण्यासाठीची अगतिकता होती. डळमळीत भाजपा वा वेगळ्या पवित्र्यात उभे ठाकलेले इतर पक्ष, तशी कुठलीही शक्यता दाखवू शकत नसल्याचा तो परिणाम होता.

देशाला सरकार हवे असते, अन्यथा अराजक माजेल आणि त्यातला सर्वात मोठा बळी सामान्य माणुस असतो. अभ्यासक विचारवंत किंवा सुखवस्तु लोकांचे जीवन खुप स्थीर असते. अराजकाचे चटके त्यांना बसत नाहीत. म्हणूनच त्यांन स्वातंत्र्य वैचारिक घटनात्मक मोकळीक वा आकडेवारीचा खेळ खुप प्रिय असतो. त्याउलट सामान्य माणसाला आपल्या नित्यजीवनाततले स्थैर्य खुप प्यारे असते. म्हणूनच अनेकदा विधानसभा वा स्थानिक निवडणूकीत नाकर्त्या राष्ट्रीय पक्षाला तो मतदार लोकसभेसाठी भरभरून मतदान करीत असतो. आपला किरकोळ राग गुंडाळूनही मते देत असतो. त्याचा उत्तम दाखला त्याच २००९ च्या निवडणूकीत उत्तरप्रदेशच्या मतदानातही आढळून येतो. तिथे २००७ च्या मतदानात कॉग्रेसचे ४०५ जागांपैकी २४ आमदार निवडून आले होते आणि अवघ्या दोन वर्षांनी २००९ सालात त्याच उत्तरप्रदेशात कॉग्रेसचे २१ खासदार निवडून आले. त्याला मग कॉग्रेसने राहुल गांधींचा करिष्मा ठरवला, ही गोष्ट वेगळी. कारण मग राहुलनी तिथे सातत्याने फ़ेर्‍या सुरू केल्या आणि २०१२ सालात एकहाती कॉग्रेसला उत्तरप्रदेश विधनसभा जिंकून देण्याचाही चंग बांधला. पण प्रत्यक्षात पुन्हा विधानसभा मतदान झाले तेव्हा ४०५ पैकी फ़क्त २८ जागा कॉग्रेसला जिंकता आल्या. दोन्ही विधानसभात कॉग्रेस तीस आमदार संख्या पार करू शकली नाही. मग मधल्या लोकसभेत २१ जागा कशा मिळू शकल्या? तर दिल्लीत देशाचे सरकार बनवण्याची क्षमता कॉग्रेसपाशी होती. उत्तरप्रदेशात सरकार बनवणार्‍या सपा किंवा बसपाकडे ती राष्ट्रव्यापी क्षमता नव्हती. भाजपाही त्या स्थितीत नव्हता. मग अशा इतर पक्षातला काही मतदार आपली निवड बदलून तेव्हापुरता वेगळा विचार करीत असतो. २०१४ मध्ये मोदींचे यश अशा बदलाविषयी जनमानसात आत्मविश्वास निर्माण करण्यातून आलेले आहे. तिथेच कॉग्रेस नामोहरम होऊन गेलेली आहे.

शिवसेना वा चंद्राबाबू नायडूंना त्याचे भान राहिलेले नाही आणि तेच भान सुटल्यामुळे मागल्या खेपेस मायावती व अखिलेश यांना उत्तरप्रदेशात जोरदार फ़टका बसलेला होता. सामान्य मतदार अभ्यासक बुद्धीमंत नसतो, तो व्यवहारी असतो. त्यामुळेच महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा वा लोकसभेला मतदान करताना, तो आपली निवड बदलत असतो आणि असा बदलणारा मतदार वास्तवात मोठी उलथापालथ घडवून आणत असतो. तो अडवाणींच्या पांगळ्या भाजपापेक्षा थोड्या अधिक जागा कॉग्रेसला २००९ सालात देतो आणि मनमोहन सरकार चालू ठेवतो. पण मोदींसारखा भक्कम पर्याय समोर आल्यावर थेट एकपक्षीय सरकारचीही शक्यता वास्तवात आणून दाखवत असतो. तृणमूलच्या ममतांनी कॉग्रेसशी हातमिळवणी केल्यावर डाव्या आघाडीला संपवून टाकत असतो आणि बिहारमध्ये नितीशना धडा शिकवल्यानंतर विधानसभेत भाजपा अमित शहांनाही धुळीस मिळवत असतो. त्याला कुठल्या पक्षाही कर्तव्य नसते. तर निवडणूक ज्या संस्थेसाठी आहे, त्यात नालायकातला कोण बरा कारभार चालवू शकेल, इतकीच निवड करायची असते. अभ्यासकांना ती विविध निकषावर सर्वोत्तम निवड हवी असते आणि सामान्य मतदाराला कामचलावू सरकार हवे असते. यात बुद्धीमंत नगण्य आणि सामान्य मतदार संख्येने अफ़ाट असल्याने त्याचे पारडे जड असते. मोदी वा राहुल वगैरे नुसती प्रतिके असतात. म्हणून अमर्त्य सेन यांना उत्तम वाटणारा राहुल पराभूत होतो आणि त्यांनाच नको असलेला मोदी यशस्वी होतो. हा सामान्य माणसाने ठरवलेला निकष समजून घेतला, तर अमूकतमूक झाले नाही वा त्या आश्वासनांचे काय झाले; असे खुळे प्रश्न सुचणार नाहीत आणि त्यावर निकालाचे अंदाज बांधण्याची चुक होणार नाही. आपली हौस वा खाज भागवून घेण्याचे समाधान नक्की मिळते. बहुतेक वाहिन्यांवर तीच खरूज खाजवण्याचा उद्योग बारमाही चालू असतोच ना? मझ्या लिहीण्याने कोणी जिंकणार नसतो की हरणारही नसतो.

10 comments:

  1. In 2009 mns factor was there in mumbai

    ReplyDelete
  2. भाउ खरच १५लाख एेकुन एेकुन वाहिन्यावर आणि सोशल मिडियावर वीट आलाय या मुर्खांना एवढीपन अक्कला नाही कीभारतातल्या गरीबात गरीब मतदाराने १५लाखासाठी मोदींना मतदान केल नव्हत कारन तस काही आश्वासन मोदींनी दिलच नव्हत हे १००% सत्य आहे आणि जे१५ लाखाचा गळा काढतायत ते मोदीविरोधी आहेत किंवाा आता नाराज आहेत मग त्यांनी मोदींना २०१४ साली मत दिलच नसनार आणि मतदार१५ ेनार म्हनुन मत देतो या पेक्षा बौद्धिक दिवाळखेोरी काय असु शकते उद्या मोदी खरच तस म्हनले तर लोकच मत देनार नाहीत त्यांना कारन सरकारच ते कामच नव्हे हे मतदाराला कळत.धन्यते पुरोगामी विचारक(?)

    ReplyDelete
  3. २००४ साली पन असच झाल होत तेव्हा काही सोनियांनी वाजपेयींना हरवल नव्हत तर आंध्रप्रदेशातील रेड्डींनी एकतर्फी ३३ जागांचे दान काॅंगरेस च्या पारड्यात टाकल होत जस युपीने भाजपच्या पारड्यात टाकल २०१४ मधे.त्यामुल जागा वाढुन डाव्याच्या टेकुवर सरकार झाल.पन सोनियांनी त्या जागा जिंकुन न आणल्यामुळ रेड्डींची काही किंमत नव्हती त्यांना म्हनुनच रेड्डीनाच मोडीत काढल त्यांनी पन मोदीनी युपी जिंकुन देनार्या शहांच्या थेट अध्यपदाच बक्षिस दिल,कारण ती मेहनत त्यानी बरोबरीने केली होती त्यामुळ त्क्षांना महत्व कळत उलट सोनियांना वाटल टीवीवरच्या भाटांनीच सत्ता दिली.तस असत तर गुजरात नसता का जिंकता आला २००२ नंतर.सोनियांच्या चमच्यांनी काय बाकी ठेवल होत मोदींना जगात बदनाम करण्यासाठी.

    ReplyDelete
  4. 2009 chya election madhe Raj thakrey he hi vote cutter hote. mhanun city madhe UPA la laga milalya

    ReplyDelete
  5. भाऊ काका आपण अगदी योग्य विश्लेषण केले आहे.1999 मध्ये भाजप सेनेने सात आठ महिने आधीच विधानसभा विसर्जित केली आणि राज्यातून युतीचे सरकार गेले 2004 मध्ये काहीच कारण नसताना अशीच सात आठ महिने अलीकडे लोकसभा विसर्जित केली गेली आणि वाजपेयी सरकारचा पराभव झाला.तसे पाहिले तर मोदी राजवटीत जनता फारशी समाधानी नसली तरी फारशी त्रस्त देखील नाही मोदी हा माणूस एकही दिवस सुट्टी न घेता देशासाठी राबतो आहे हे जनता बघते आहे हा माणूस अजिबात भ्रष्टाचारी नाही अशी सामान्य लोकांची धारणा असल्याने लोकांनी नोटबंदी आणि GST चा त्रास फारशी कुरकुर न करता सहन केला पेट्रोलच्या दरवाढीच्या संदर्भात मोदींच्या हातात फारसे काही नाही हेही लोक जाणतात तसेच गेल्या साडेचार वर्षात दहशतवादी बॉम्बस्फोट पूर्णपणे बंद झाले आहेत upa च्या काळात गावोगावी बॉम्बस्फोट होत होते ते आता थांबले आहेत त्यामुळे आहे ती स्थिर व्यवस्था बदलून जनता गठबन्धनाचे अराजकता असलेले सरकार सत्तेवर आणेल असे आज तरी वाटत नाही त्यामुळे भाऊ आपण म्हणता तसे मोदींना स्वतःचे पूर्ण बहुमत आणि nda ला 350 च्या आसपास जागा असे 2019 चित्र असेल

    ReplyDelete
  6. Major factor of 2009 congress win in mumbai was votes divided by MNS else congress was wiped out then

    ReplyDelete
  7. शेवटचे वाक्य एकदम खरे आहे, तुम्ही समजता तेवढा विचार सर्वसामान्य माणूस करत असेल हे पटत नाही

    ReplyDelete
  8. मुंबईकरांनी उघड्या डोळ्यांनी अवश्य वाचावी अशी ही पोस्ट खरं तर सर्वांसाठीच उपयुक्त आहे.

    ReplyDelete
  9. अतिशय मार्मिक विश्लेषण केले आहे भाऊ तुम्ही !! ज्या पक्षाला आणि त्यांच्या नेतृत्वाला ‘सामान्य मतदाराचा’ कल समजला तोच जिंकतो हे सत्य आहे. पण हा सामान्य मतदार गेल्या काही वर्षात एवढा तल्लख झाला आहे की तो शेवटपर्यंत आपला कल कोणत्या बाजुने आहे ह्याचा थांगपत्ता लागू देत नाही !

    ReplyDelete
  10. Central election is depend on last 3 or 6 months. Short term effect will work. And I am confident...that Modiji will do something different which will turn all situation....

    ReplyDelete