Friday, October 26, 2018

राहुल गांधी आगे बढो

On Friday afternoon, Rahul Gandhi and other Congress leaders were at the Lodhi Colony police station for almost an hour after they courted arrest while protesting at the CBI headquarters in New Delhi. “PM Modi can run, flee, but cannot hide from the truth. The truth will come out. Removing the CBI chief will not make a difference...the Prime Minister acted against the CBI director as a result of panic, as a result of fear,” Gandhi said.  (Sanjeev Verma / HT Photo)


मंगळवार बुधवारच्या मध्यरात्री केव्हातरी सीबीआयच्या दोन्ही वरीष्ठ अधिकार्‍यांना सक्तीने सुट्टीवर पाठवण्यात आले. त्यावरून बुधवार दिवसभर गदारोळ चालू होता. त्याचा संदर्भ घेऊन गुरूवारी राहुल गांधी यांनी एका निवडणूक प्रचारसभेत आपली राफ़ायल टेप पुन्हा वाजवली. सीबीआय राफ़ायल घोटाळ्याची चौकशी सुरू करणारच होती, इतक्याच अपरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सीबीआयच्या प्रमुखालाच सुट्टीवर पाठवून दिले. असा आरोप राहुल इतक्या आत्मविश्वासाने करीत होते, की मला त्यांचा तो आवेश खुप आवडला. अगदी असाच आवेश आणि उत्साह त्यांनी पाच वर्षापुर्वी सातत्याने दाखवला होता आणि परिणाम आपण बघितलेलेच आहेत. त्याची सुरूवात छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान व दिल्लीच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर झालेली होती. त्या चारही विधानसभांमध्ये कॉग्रेसने सपाटून मार खाल्लेला होता आणि दिल्लीत तर पंधरा वर्षे हाती असलेली सत्ता कॉग्रेसने तिसर्‍या क्रमांकावर जात गमावलेली होती. भाजपाचे दिल्लीत बहूमत हुकलेले होते. तर आम आदमी पक्ष नावाच्या नवख्या पक्षाने दुसरा क्रमांक पटाकवताना पंधरा वर्षाच्या कॉग्रेस मुख्यमंत्री शीला दिक्षीतांनाही आपल्या मतदारसंघात प्रचंड बहूमताने पराभूत केलेले होते. जेव्हा असे काही व्हायचे, तेव्हा बिळात तोंड लपवून बसणार्‍यांना कॉग्रेसश्रेष्ठी म्हणायची आपली राजकीय संस्कृती आहे. त्याचा खुप गवगवा झाला आणि पराभवाची जबाबदारी घ्यायला राहुल व सोनियांना माध्यमांच्या कॅमेरासमोर यावे लागले. तेव्हाही राहुलनी आजच्या सारखाच आवेश अविर्भाव दाखवला होता. त्यानंतर त्यांनी कधी क्षणभर विश्रांती घेतलेली नाही. त्यावेळी ज्या आत्मविश्वासाने राहुल बोलले होते, तोच आत्मविश्वास आजच्या त्यांच्या राफ़ायल मोहिमेत पुरेपुर दिसून येतो. राहुल त्यावेळी काय बोलले होते, त्याचे आज अनेकांना स्मरण नाही, म्हणून आठवण करून देणे योग्य ठरेल.

त्या दारूण पराभवानंतर त्रयस्थपणे माध्यमांना सामोरे जाणारे राहुल गांधी यांना काडीमात्र दु:ख झालेले नव्हते. यातूनही पक्ष कसा ठामपणे उभा राहिल, याची पत्रकार मंडळींना ग्वाही देताना राहुल म्हणाले होते, आमचा पराभव झाला हे खरे आहे. पण त्यातल्या चुका आम्ही समजून घेतल्या आहेत. कॉग्रेसची संघटना इतकी मोठी व मजबुत आहे, की यातून आम्ही सावरून पुन्हा उभे राहू. इतर कुठल्याही पक्षाकडे नाही इतकी आमची शक्ती व कुवत अधिक आहे. त्यानंतर सहा महिन्यात लोकसभेच्या निवडणूका झाल्या आणि इतिहासात कॉग्रेसची त्यापेक्षा मोठी वाताहत कधी झालेली नव्हती. पण सगळा कॉग्रेस पक्ष खचून व ढासळून पडला असतानाही राहुल गांधींचा तो आत्मविश्वास कायम होता आणि आजही आहे. नंतरच्या चार वर्षात एकामागून एक राज्ये वा अनेक राज्यातली सत्ता गमावतानाही राहुल गांधींच्या त्या आत्मविश्वासाला तसूभर धक्का लागलेला नाही. ते तितक्याच ठामपणे आपल्या ‘कुवती’वर विसंबून आहेत. हिमाचल उत्तरप्रदेशात त्यांनी युवकांना स्थानिक पातळीवर उत्पादन झालेले मोबाईल चीनमध्ये खरेदी व्हायला हवे, असे स्वप्न दाखवले होते. आता ते राफ़ायलच्या विमानात स्वार होऊन उडत आहेत. हा आत्मविश्वास भारतात सहसा कुठल्याही राजकीय नेत्यापाशी आढळून येत नाही. त्याचीच खातरजमा सीबीआय घोटाळ्यानंतरही राहुलच्या भाषणातून दिसून येते. सहाजिकच हा आत्मविश्वास कॉग्रेसला कुठे घेऊन जाणार आहे, त्याचे वेगळे विवरण देण्याची गरज नाही. पण अलिकडल्या काळात राहुलमध्ये तेव्हाच्या केजरीवाल यांचीही झाक थोडीफ़ार दिसू लागलेली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर लाथ मारून मग केजरीवालांनी देशव्यापी मोहिम छेडली होती. त्यांची गर्जना होती, मोदीजी को हराना है. त्यासाठी अरविंद केजरीवाल वाराणशीला जाऊन उभे राहिले होते. राहुल तेही करणार काय इतकाच प्रश्न आहे.

राहुलना शंभर वर्षाहून अधिक काळ बांधलेली संघटना मिळालेली आहे आणि केजरीवालांनी दिल्लीच्या यशानंतर शंभर दिवसात देशव्यापी संघटना उभी करून मोदींना पराभूत करण्याचा चंग बांधला होता. दिल्लीतले आपले सहासात हजार सवंगडी घेऊन कुठल्याही शहरात महानगरात जायचे आणि धमाल उडवून द्यायची; हा केजरीवाल यांचा एककलमी कार्यक्रम होता. त्यातून माध्यमात रोजच्या रोज झळकले की मोदी हरलेच म्हणून समजा, याविषयी त्यांच्या मनात तीळमात्र शंका नव्हती. त्यांच्या अशा आत्मविश्वासाने अनेकांना भुरळ घातली होती. इन्फ़ोसिस सारख्या जगात कौतुक होणार्‍या कंपनीचे माजी मुख्याधिकारी, एक हवाई वाहतुक कंपनी उभी करून दाखवणारा धाडसी उद्योगपती वा स्वयंसेवी क्षेत्रात आपली प्रतिष्ठा निर्माण करणार्‍या मेधाताई पाटकर; असे एकाहून एक दिग्गज केजरीवालांच्या त्या गर्जनांनी भारावून गेलेले होते. त्यांनी आपली प्रतिष्ठा आम आदमी पक्षाच्या झोळीत भिरकावून दिली. काही वाहिन्यांचे संपादक व पत्रकारही त्यात ओढले गेले. या सर्वांना क्षणात मातीमोल करून टाकणारा केजरीवालांचा आत्मविश्वास, आपण आज राहुल गांधींमध्ये बघू शकतो. त्यांची देहबोली व कर्कश बोलण्याने मोदी आधीच पराभूत झाले आहेत. आता फ़क्त मतदान व्हायचे बाकी असल्याची आपली खात्री पटायला वेळ लागणार नाही. मुद्दा इतकाच असतो, की अशी मते यंत्रात नोंदवली जात नाहीत, की मोजणीच्या दिवशी मोजली जात नाहीत. त्यावर निवडणूका जिंकल्या हरल्या जात नाहीत. अन्यथा आज मोदींना हरवण्याची वेळच राहुलवर आली नसती. त्याऐवजी त्यांना केजरीवाल को हराना है असली भाषा बोलावी लागली असती. कारण आज राहुल जे करत आहेत तेच केजरीवाल पाच वर्षापुर्वी करून मोकळे झालेत. म्हणूनच नंतर अन्य राज्यातल्या विधानसभा निवडणुका लढवण्याचा विषयही त्यांनी कधी चर्चिला नाही.

बाकी मतदार काय करतील, ते नंतर दिसेलच. पण राहुल गांधींच्या या आत्मविश्वासाने बहुतांश कॉग्रेस नेत्यांना खुप धीर येऊ लागला आहे. राहुलच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस पुन्हा एकहाती सत्ता मिळवू शकत नाही, की स्वबळावर निवडणुकाही लढवू शकत नाही, याविषयी आता अनेक ज्येष्ठ कॉग्रेस नेते खुलेपणाने बोलायचे धाडस करू लागले आहेत. राहुलना पक्षाने पंतप्रधान पदाचे उमेदवार केलेले नाही, असे चिदंबरम या ज्येष्ठाने परवाच सांगून टाकलेले आहे. दुसरे ज्येष्ठ कॉग्रेस नेते व माजी मंत्री सलमान खुर्शीद यांनी कॉग्रेसला मित्रपक्षांचा कुबड्या घेतल्याशिवाय लढता येणार नसल्याचे प्रामाणिकपणे सांगून टाकलेले आहे. ही राहुलच्या नेतॄत्वाची प्रचितीच नाही काय? भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष निर्विवादपणे बहूमत मिळवायच्या गप्पा करतो आहे आणि त्याचे अनेक सहकारी त्याला दुजोरा देत आहेत. त्याच्या उलट कॉग्रेसमधले राहुल गांधींचे विविध मोठे सहकारी स्वबळावर लढणे अशक्य असल्याचे सांगतात. राहुलची उमेदवारी मित्र पक्षांना रुचणारी नाही, अशी ग्वाही देऊ लागले आहेत. ह्याचे कौतुक कोणी करीत नाही. राहुलचे सहकारीही असे दांडगे आहेत, की आपल्यामुळे किती व कोणती मते पक्ष गमावणार; त्याचाही आत्मविश्वास त्यांच्यात ठासुन भरलेला दिसतो. दहा वर्षे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवलेले दिग्विजय सिंग आपल्या बोलण्याने पक्षाची मते कमी होतात, असे सांगत आहेत. ह्या सगळ्या राहुलच्या आत्मविश्वासाच्या खाणाखुणाच नाहीत काय? जो आत्मविश्वास जयपूरच्या पक्ष अधिवेशनात त्यांनी दाखवला होता. त्याचे इतके परिणाम समोर असताना भाजपाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी भयभीत होऊन जाण्याला पर्याय उरतो काय? तशी भाजपाची घाबरगुंडी उडाली नसती, तर त्यांनी सहासात महिने आधीच लोकसभेच्या तयारीला लागण्याची काय गरज होती? राहुलच्या त्या आवेशाला घाबरूनच मोद-शहा आतापासून एप्रिल मे महिन्यातल्या लोकसभा मतदानाच्या कामाला लागलेले आहेत ना?

9 comments:

  1. सगळ्यात अवघड बिहारचे जागावाटप होते भाजपसाठी लोकसभा निवडनुकीत ते कालच पक्क झाल,घोषणा झाली.हे सर्व महागठबंधन कडुन अपेक्षित होत कारण त्यांना प्रतेक राज्यात करायच आहे

    ReplyDelete
  2. CBI Raffel ची चौकशी सुरू करणारच होती? आजही CBI Congress Highcommand ला रिपोर्ट करूनच कुठलीही कारवाई करते असे राहुलना सुचवायचे आहे काय ?

    ReplyDelete
  3. Hahahaha hahaha Bhau tumhi Rahul babala harbaryachya zhadawar chadawla ahe, and toe hi Anandani chadla ahe. Aplya sarvanchi karmanuk hot ahe. Apratim vishlelshan. Dhanyawad

    ReplyDelete
  4. जेव्हा जेव्हा नेहरु गांधी परिवार सोडून अन्य कोणी सरकार बनवले तेव्हा तेव्हा ते अस्थिर करण्याकरता परकीय शक्तींनी हस्तक्षेप केला लाल बहादूर शास्त्री यांचा रशियात संशयास्पद म्रुत्यु झाला 1979 मध्ये संघाच्या दुहेरी सहभागावरून जनता सरकार पाडण्यात 1999 मध्ये वाजपेयी सरकार बनले तेव्हा तहालका कांड झाले आणि गुजरातच्या 2002 मधल्या दंग्यांनंतर सगळ्या जगभर गदारोळ झाला आता देखील 2014 नंतर मोदी यांच्या विरोधात ख्रिश्चन चर्चने उघड उघड युद्ध पुकारले आहे मात्र आधीच्या वेळी आणि या वेळी एक गुणात्मक फरक आहे आधीच्या सर्व वेळी काँग्रेस या डीप अससेट्सनी केलेल्या मदतीचा फायदा घेण्याइतपत बऱ्यापैकी सक्षम होती स्वातंत्र्य चळवळीत तळागाळात पोहोचलेल्या काँगेसला उखडणे एवढे सोपे नव्हते मात्र 2004 आणि 2009 च्या यशाचा काँगेसने चुकीचा अर्थ लावला त्यांचा असा समज झाला की त्यांचे यश हे मीडिया चॅनेल्स राजदीप शेखर गुप्ता कुमार केतकर असे पत्रकार जगभरात भारताची बदनामी करणारे मानवी हक्क संघटनांचे अहवाल यांच्या मदतीने मिळाले आहे त्या नादात पक्षाचे संघटन हा विषय मोडीत काढला गेला त्यामुळे 2014 मध्ये जेव्हा मोदींच्या रूपाने तगडा प्रतिस्पर्धी समोर आला तेव्हा काँग्रेस पत्याच्या बंगल्यासारखी उध्वस्त झाली आता ज्या शक्तींनी भाजपचा पराभव करण्यासाठी stake लावला आहे त्यांचा पुढे प्रश्न हाच आहे काँगेसचे नेता राहुल गांधी आहेत आणि ही व्यक्ती पक्षाला जिंकून देऊ शकत नाही त्यामुळे गेल्या वर्षी काँगेसच्या बाजूने प्रशांत किशोरसारखा रणनीतीकार असूनही उत्तर प्रदेशात काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आले

    ReplyDelete
  5. आपण केलेले विश्लेषण अतिशय मार्मिक आणि अभ्यासपूर्ण आहे

    ReplyDelete
  6. भाऊ घराणेशाहीचा वारस आणि कर्तृत्ववान कार्यकर्ता यांची तुलना करायची झाली तर राहुल गांधी आणि अमित शहा यांच्यातील फरकाचा अभ्यास नक्कीच केला पाहिजे.2014 मध्ये मोदींचा माणूस म्हणून ओळखले जाणारे शहा पक्षाध्यक्ष म्हणून दिल्लीत आले आणि महाराष्ट्र हरियाणा झारखंड अशा राज्यात त्यांनी पक्षाची सत्ता आणली बिहार आणि दिल्लीचा पराभव पचवून आसाम मणिपूर उत्तर प्रदेश उत्तराखंड त्रिपुरा गुजरात हिमाचल या ठिकाणी भाजपने विजय मिळवला या सर्व ठिकाणी योगी आदित्यनाथ देवेंद्र फडणवीस सर्वानंद सोनोवल रघुवर दास अशा कर्तृत्ववान कार्यकर्त्यांचे नेतृत्व उभे केले म्हणजेच अमित शहा यांनी जिथे आधीपासूनच पक्ष अस्तित्वात होता तिथे पक्षाचा पाया बळकट करत असतानाच जिथे पक्षाचे अस्तित्व नाही अशा बंगाल ओरिसा तेलंगणा केरळ अशा ठिकाणी पाय रोवायचे प्रयत्न सुरू केले आज दुपारी केरळमध्ये पिंराई विजयन यांच्या कन्नूर मध्ये शहा यांची सभा झाली त्यामध्ये त्यांनी शबरीमलाच्या विषयाला हात घालत केरळच्या हिंदू समाजाच्या मागे ते ठामपणे उभे राहिले या सभेत अमित शहा यांच्या वाक्या वाक्याला टाळ्या पडत होत्या म्हणजेच 2014 मधील मोदींचा माणूस ही ओळख पुसून टाकत कच्छ पासून कामरूप पर्यंत आणि काश्मीरपासून त्रिवेंद्रम पर्यंत पक्षाची संघटना बांधणारा यशस्वी अध्यक्ष अशी स्वतःची ओळख अमित शहा यांनी निर्माण केली आहे

    ReplyDelete
  7. What a perfect analysis, Bhau! Pappubhai Lage Raho!!!

    ReplyDelete
  8. http://m.lokmat.com/national/verma-blames-modi-cbi/

    ReplyDelete
  9. Enter your comment...जबरदस्त विश्लेषण

    ReplyDelete