Wednesday, October 3, 2018

कुछ बात है कि हस्ती, मिटती नहीं हमारी।

संबंधित इमेज

सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्ताँ हमारा।
हम बुलबुलें हैं इसकी, यह गुलिसताँ हमारा।।

यूनान-ओ-मिस्र-ओ-रूमा, सब मिट गए जहाँ से।
अब तक मगर है बाक़ी, नाम-ओ-निशाँ हमारा।। 

कुछ बात है कि हस्ती, मिटती नहीं हमारी।
सदियों रहा है दुश्मन, दौर-ए-ज़माँ हमारा।। 

देशात लाखो करोडो प्रसंगी गायले गेलेले हे गीत पाकिस्तानला निघून गेलेल्या कवि इक्बालचे आहे. त्यातल्या या अखेरच्या ओळी हिंदूराष्ट्र वा हिंदूत्व म्हणजे काय, त्याची नेमकी ओळख करून देणार्‍या आहेत. अर्थात समजून घेतल्या तर. नाहीतर पुरोगामीत्व मिरवायला त्यांचा खुप वापर होतच असतो, इक्बाल काय सांगु इच्छितो त्यातून?

‘भारत तेरे टुकडे होंगे’, अशा घोषणा भारत सरकारच्या अनुदानातून चालणार्‍या विद्यापीठात दिल्या जातात आणि त्यांची पाठराखण करायला देशातल्या बहुतांश विरोधी पक्षांचे नेते धाव घेतात, तेव्हा राष्ट्रवाद किंवा देशप्रेम म्हणजे नेमके काय असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. गेल्या साडेचार वर्षात आपल्या देशामध्ये सत्तांतर झाल्यापासून हा प्रकार सातत्याने बोकाळत गेलेला आहे. राष्ट्र, राष्ट्रीय अस्मिता, देश वा त्याच्या सुरक्षेच्या कल्पना, यांना मिळेल तिथून सुरूंग लावण्याचा आटापीटा लपून राहिलेला नाही. त्यात भाग घेणारे व पुढाकार घेणारे लोक पाहिले, तर सुबुद्ध कोणाला म्हणावे असाही प्रश्न पडतो. सामान्य माणसाच्या मनाचा मग गोंधळ उडून जातो. नामवंत, मान्यवर किंवा सुशिक्षित प्रतिष्ठीत म्हणून ज्यांच्याकडे आजवर बघितले गेले, तीच माणसे असे काही बोलत वागत असतील, तर एकूणच शब्दकोष नव्याने तपासण्याची वेळ येत असते. पण तिकडे वळण्यापुर्वी अस्मिता म्हणजे काय ते आधी समजून घेतले पाहिजे. अस्मिता व्यक्तीची, समाजाची वा राष्ट्राची असेही असू शकते. एकाच व्यक्तीच्या मनात अनेक अस्मिता असू शकतात आणि त्या एकमेकांना छेद देणार्‍या नसतात व एकत्रही नांदू शकत असतात. कारण अस्मिता हाच कुठल्याही मानवसमुह किंवा समाजाचा एकत्र येण्याचा व टिकण्याचा आधार असतो. त्या अस्मिता कधीकधी लादलेल्या असतात, तर कधीकधी उपजतच रुजलेल्या असू शकतात. पण अस्मिताच नसेल, तर कुठला प्राणीसमुह एकत्र येऊ शकत नाही वा सामाजिक जीवनही जगू शकत नाही. त्यासाठीच मग वेगवेगळ्या युगात व जगात अस्मिता उदयास आल्या व त्यातल्या धुरीणांनी त्या जन्माला घातल्या, जपल्या व जोपासल्या. त्याच्याखेरीज मोठमोठ्या संस्कृती घडल्या नसत्या, की उध्वस्त होऊन नव्या संस्कृती उदयास आल्या नसत्या. राष्ट्र वगैरे संकल्पनेच्या पायात म्हणूनच अस्मिता अपरिहार्य असते.

समाजाला किंवा मानव समुहाला एकत्र जोडणारी काही प्रतिके असतात आणि ती वारशात मिळतात किंवा निर्माण करावी लागतात. त्या प्रतिकांच्या भोवताली अस्मिता नावाचे अदृष्य़ बंध गुंतलेले असतात. ते साध्या डोळ्यांना दिसणारे नसतात. पण अतिशय घट्ट असतात. एकदा अशा प्रतिकांच्या गुंत्यामध्ये लोकसंख्येला गुरफ़टून टाकले, मग त्या समाजाला अधिकाधिक एकजिनसी व एकजीव करणे सोपे जात असते. मागल्या लोकसभा निवडणूकीच्या काळात व प्रचारात भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, यांचे एक दृष्य़ सातत्याने लाखो वेळा वाहिन्यांवर प्रदर्शित करण्यात आलेले होते. एका सोहळ्यात व्यासपीठावर एक मौलवी येतो आणि मोदींना तो विणलेली पांढरी टोपी देऊ करतो. मोदी त्याला तसेच रोखतात आणि आपल्या डोक्यावर ती टोपी चढवू देत नाहीत. त्याच्या बदल्यात त्या मौलवीला खांद्यावरची शाल देण्याची विनंती करतात. तोही ती आपली शाल मोदींच्या खांद्यावर टाकून निरोप घेतो. यात काय मोठे घडलेले होते? कशाला लाखो प्रसंगी त्याचे प्रक्षेपण करण्यात आले? त्यावर कोट्यवधी शब्द कशाला बोलले व लिहीले गेले? तर ती विणलेली टोपी एक प्रतिक आहे. कुठलाही मुस्लिम नमाज पढण्यापुर्वी अशी टोपी परिधान करतो आणि बोडक्या डोक्याने नमाज पढला जाऊ शकत नाही. पण त्याहीपलिकडे असा एक परिपाठ आहे. की टोपी मौलवी किंवा मुस्लिम अन्य कोणाही बिगर मुस्लिमाला बहाल करत असतो, तेव्हा तो त्या व्यक्तीला इस्लाममध्ये येण्याचे आमंत्रण देत असतो. ही गोष्ट ठाऊक असल्यानेच मोदींनी तितक्याच अगत्याने ती टोपी नाकारलेली होती. त्याचा अर्थ आपल्याला इस्लामचे आमंत्रण देऊ नये आणि त्यातून त्या धर्माची अवहेलना करू नये, याकडे मोदींचा कटाक्ष होता, पण त्याच घटनेचा किती बागुलबुवा करण्यात आला? मोदींनी मौलवी वा एका मुस्लिमाचीच नव्हेतर इस्लामची अवहेलना केल्याचा डंका सतत पिटला जात होता.

वास्तवात मोहरम वा अन्य इफ़्तार पार्ट्यांमध्ये जे कोणी बिगर मुस्लिम सहभागी होऊन असल्या टोप्या घालतात, ती इस्लामची सर्वात मोठी अवहेलना असते. कारण ते इस्लाम स्विकारल्याचे दाखवून प्रत्यक्षात ते आवाहन झिडकारत असतात. त्या टोपीसह त्या आमंत्रणाची अवहेलना करीत असतात. पण हे किती लोकांना ठाऊक असते? ते दृष्य सातत्याने वाहिन्यांवर झळकवणार्‍या पत्रकार संपादकांना आणि राजकीय पक्ष व नेत्यांना मोदी मुस्लिम विरोधी असल्याचा प्रचार करायचा होता. म्हणूनच त्या दृष्याचा प्रतिकात्मक वापर झाला होता. त्यातून मुस्लिम मतदारांना मोदींपासून परावृत्त करण्याचा मुळ मनसुबा होता. पण प्रत्यक्षात तो डाव खेळणार्‍यांवरच उलटला. जे प्रतिक दाखवून हे लोक मुस्लिमांच्या मतांचे धृवीकरण करू बघत होते, त्यातून उलट्या बाजूला हिंदू समाजाचे मात्र धृवीकरण होत गेले. जितक्या वेळी ते चित्रण दाखवले गेले, त्यातून बघणार्‍या हिंदूंच्या मनात मोदींची एक वेगळी प्रतिमा आकार घेत गेली. देशातले सगळे पक्ष व त्यांचे नेते मागल्या सात दशकात मुस्लिम मते मिळवण्यासाठी लांगुलचालन करतात, ही एक धारणा तयार झालेली आहे. त्यात पुन्हा सतत हिंदूंना व त्यांच्या धर्माला शिव्याशाप दिल्याने पुरोगामी ठरण्याची स्पर्धाच लागलेली असते. हिंदू मनातून कमालीचा अस्वस्थ होता व आहे. अशा पार्श्वभूमीवर ते वारंवार दाखवले गेलेले चित्रण मोदींच्या पथ्यावर पडले. देशात एक तरी नेता असा आहे, की मतांसाठी असल्या लांगुलचालनाचा बळी होत नाही. मुस्लिमांच्या मतांचा लाचार नसलेला एक नेता आहे आणि आपल्या मताने त्याचे हात बळकट करावेत, अशी धारणा साकारत गेली. प्रतिक एकच होते आणि प्रतिक्रीया दोन वेगवेगळ्या होत्या. जशी त्यात मुस्लिमांधी धार्मिक अस्मिता सामावलेली होती, तितकीच त्यामध्ये हळव्या हिंदूंची धार्मिक अस्मिताही गुंतलेली होती.

धर्माच्या नावाने वेगळा पाकिस्तान तोडून दिला आणि तरीही इथे हिंदूना उरलेल्या भारतात किंमत नाही. प्रतिष्ठा नाही अशी समजूत लोकांच्या मनात घर करून राहिली आहे. तिला मोदींनी खतपाणी घातले नाही, तर त्यांना गोत्यात आणण्यासाठी खेळल्या गेलेल्या डावाने हे धृवीकरण घडवून आणले. पण मुद्दा अस्मितेचा आहे. एक साधी विणलेली टोपी कोणी दिली वा कोणी नाकारली, त्याचे इतके भांडवल कशाला झाले? तर त्यातून तो प्रतिकात्मक बंध आपल्याला दिसू शकतो. मुस्लिमांना अशा अस्मितेतून चिथावणी दिली, मग ते बाकीचे सर्व प्रश्न समस्या विसरून आपल्याला मते देतात, हा पुरोगामी समज त्याला कारणीभूत होता. मोदी विरोधात डंका पिटणार्‍या कुणालाही मुस्लिमांविषयी आस्था नाही की इस्लामविषयी आपुलकी नाही. पण त्यांना हिंदू धर्मियांना वा हिंदूत्ववादी समाजाला खिजवायचे होते आणि त्याच्या बदल्यात मुस्लिमांच्या मतांचे धृवीकरण करायचे होते. त्यासाठी असे प्रतिक किती सहजगत्या वापरता येते, हे लक्षात घेतले तर अस्मिता व त्याचे प्रतिकत्मक स्वरूप लक्षात येऊ शकेल. आपले जिव्हाळ्याचे प्रश्न समस्या विसरून मोठी लोकसंख्या प्रतिकांच्या मागे धावत असते आणि त्यासाठी आपल्या हितासह स्वार्थावरही निखारे ठेवायला निर्धास्तपणे पुढे सरसावते. त्याला अस्मिता म्हणतात. म्हणूनच पाकिस्तानातून आत्मघात करून घ्यायला अजमल कसाब मुंबईपर्यंत येऊन धडक मारतो वा त्याला रोखण्यासाठी नि:शस्त्र तुकाराम ओंबाळे आपले बलिदान द्यायला पुढे सरसावत असतो. यातला कसाबचा हिंसाचारी हेतू बाजूला ठेवा. त्याला कोणीतरी त्यामध्ये उदात्तता दाखवली आणि ती भावल्याने तो आत्मसमर्पण करायला इथवर आला. इस्लामच्या नावाखाली त्याने आपला जीव धोक्यात घातला होता आणि ओंबाळे यांनी देशाच्या सुरक्षेलाच आपल्या आयुष्याचे उद्दीष्ट समजून जीव ओवाळून टाकला होता.

दोघांच्या हेतूतले पावित्र्य वा पापपुण्य वेगळे विषय आहेत. त्यातली आस्था श्रद्धा लक्षात घेण्यासारखी आहे. ते प्रतिकासाठीच लढले ना? बदल्यात त्यांना काय मिळाले, याचे उत्तर नकारार्थी आहे. व्यवहारात दोघांचेही जीव गेलेले आहेत. आपल्या मृत्यूनंतर काय झाले, त्याचा दोघांनाही कधी पत्ता लागू शकत नाही. पण प्रतिक्रीया कशा होत्या? आपल्यासाठी कसाब घातपाती व ओंबाळे शहीद हुतात्मा असतो. कसाब धर्माच्या अस्मितेसाठी जीवावर उदार झाला आणि ओंबाळे आपल्या राष्ट्रीय अस्मितेसाठी जीव ओवाळून टाकतो. जे इथे झाले तेच कालपरवा मराठा सकल मोर्चा म्हणून निघालेल्या मोर्चामध्ये औरंगाबादला एका मराठा तरूणाने केलेले होते. कालव्याच्या पात्रात उडी घेऊन त्याने आत्मसमर्पण केले. त्याच्या तशा समर्पणाने तात्काळ मराठा आरक्षण मिळू शकणार नाही, हे त्याला कळत नसेल काय? कळते, पण अस्मिता कुठल्याही टोकाला घेऊन जात असते. कुठल्याही धाडसाला प्रवृत्त करीत असते. हा त्यातला अतिरेक वाटला तरी दुसरीकडे अशा प्रतिकात्मक उदाहरणांनी लोकसंख्येतील अस्मिता जागवल्या व जोपासल्या जात असतात. त्यातला खुळेपणा बुद्धीवादी सांगू शकतील. पण त्यातली उर्जा कुठल्याही बुद्धीवाद वा तर्कवादाने उभी राहू शकत नाही. त्यासाठी प्रतिके लागतात आणि त्या प्रतिकांनी निर्माण केलेल्या अख्यायिका, उदाहरणे व कथातून अशा अस्मितांचे जतन होत असते. मानवसमुह एकजुट होऊ शकत असतो. म्हणून शोधून काढून अशा प्रतिकांचे अवडंबरही माजवले जात असते. घराणे, खानदान, जातीसमुह, वंशवाद यापासून राष्ट्रवादापर्यंत अस्मितेची शिडी चढतच जात असते. पण तिच्याशिवाय कुठलाही समाज उभा रहात नाही, की राष्ट्र वा संस्कृती आकाराला येऊ शकत नाही. बुद्धीमंत वा बुद्धीवादाने कुठलीही संस्कृती उभी केली नाही. मात्र मोठ्यमोठ्या संस्कृती बुद्धीवादाने रसातळाला नेलेल्या आहेत.

3 comments:

  1. उत्तम भाउ तुमचे लेख म्हनजे विचारांना दिशा देनारे गोंधळ दुर करनारे सहज आकलनीय

    ReplyDelete
  2. घराणे, खानदान, जातीसमुह, वंशवाद यापासून राष्ट्रवादापर्यंत अस्मितेची शिडी चढतच जात असते. पण तिच्याशिवाय कुठलाही समाज उभा रहात नाही, की राष्ट्र वा संस्कृती आकाराला येऊ शकत नाही. बुद्धीमंत वा बुद्धीवादाने कुठलीही संस्कृती उभी केली नाही. मात्र मोठ्यमोठ्या संस्कृती बुद्धीवादाने रसातळाला नेलेल्या आहेत.

    - काही शिल्लकच ठेवलं नाही बोलायला.

    ReplyDelete
  3. अप्रतिम लेख

    ReplyDelete