दलित पॅन्थर अशी १९७४ च्या सुमारास दुभंगली. त्यातल्या नामदेव ढसाळला कम्युनिस्टांनी आपल्या जाळ्यात ओढले होते. राजा-नामदेव यांच्यातली दरी अधिकाधिक रुंद होण्यासाठी प्रयासही व्यवस्थित झाले. नामदेव क्रांतीकारक कवि होता. पण कविता आणि व्यवहार यात मोठा फ़रक असतो. राजकारण अतिशय निष्ठूर व्यवहार असतो. तिथे नामदेवची गफ़लत झाली आणि त्याचा गट दुबळा होत गेला. त्या आरंभीच्या काळात बांद्रा येथे नामदेवने कम्युन पद्धतीने कम्युनिस्ट विचारांचे धडे घेण्यासाठी चालविलेल्या शिबीरात मी एकदा गेलेलाही होतो. पण त्याचा फ़ार उपयोग झाला नाही. नामदेव त्यात एकाकी पडत गेला आणि जितक्या संख्येने त्याच्याकडे अनुयायी ओढले जातील अशी अपेक्षा होती, ती सफ़ल झाली नाही. मग कम्युनिस्टांनीही नामदेवकडे पाठ फ़िरवली. मात्र दरम्यान सुनील दिघे नावाचा कम्युनिस्ट विचारवंत तिथे हजर झाला होता. त्याचे नाव अगत्याने इतक्यासाठी सांगायचे, की महाराष्ट्रात ज्यांना सर्वप्रथम नक्षलवादी म्हणून शिक्का मारला गेला, त्या दोन नावातले एक नाव सुनील दिघेचे होते. नामदेव लालक्रांतीच्या कल्पनेने तेव्हा इतका भारावलेला होता, की त्याने आपल्या गटाचे उपाध्यक्षपद सुनीलाला दिलेले होते. त्या काळामध्ये विदर्भ नागपूरला कुठेतरी मग या पॅन्थर नेत्यांवर हल्ले झाले होते आणि त्यात पायाचे हाड मोडलेला सुनील दिघे दिर्घकाळ प्लास्टरमध्ये होता. आज दलित आंबेडकरी चळवळीत नक्षलवाद्यांचा प्रवेश असल्या बातम्या वाचल्या, मग प्लास्टरमधल्या सुनीलची आठवण येते आणि तो हल्लाही आठवतो. आंबेडकरी व नक्षली या दोन समांतर चळवळीतला तो पहिलावहिला संपर्क असावा. पण संयुक्त महाराष्ट्र समिती फ़ुटल्यापासून आंबेडकरी चळवळीला गिळंकृत करण्याचे जे अनेक प्रयास झाले, त्यातला तो एक प्रयास होता आणि आजही ती प्रक्रीया थांबलेली नाही. शक्य होईल ते राजकीय वैचारिक गट बाबासाहेबांच्या अनुयायांना आपल्या गोटात ओढायला धडपडतच असतात.
निवडणूकांचे राजकारण स्विकारलेल्या मुळच्या कम्युनिस्ट पक्ष व संघटनांनी संसदीय लोकशाहीला मान्यता दिल्यावर अपेक्षित बदल तितक्या वेगाने झाले नाहीत. त्यामुळे देशातल्या काही कड्व्या कम्युनिस्टांनी १९६७ नंतर वेगळी चुल मांडली. कारण बंगालमध्ये मार्क्सवादी पक्षाचे ज्योती बसू उपमुख्यमंत्री झाले तरी वर्गशत्रुंना नेस्तनाबुत करण्याचा मनसुबा यशस्वी होऊ शकलेला नव्हता. अशा वैफ़ल्तग्रस्तांनी भूमीगत होऊन सशस्त्र उठावाचे माओतत्व अंगिकारले आणि त्यातला पहिला उठाव नक्षलबाडी या बंगालच्या गावात झाला, तिथून या माओवादी हिंसक उठावाला नक्षलवादी असे नाव पडले. हे लोक कडवे पोथीनिष्ठ असतात आणि त्यांना संविधान, संसद कायदा वगैरे मंजूर नाही. पण आरंभीच्या त्या उठावाला इंदिराजींनी अक्षरश: चिरडून काढले. मानवाधिकाराचा तेवहा लवलेश नसल्याने त्यात त्या यशस्वी झाल्या. त्यातून असे लोक एक धडा शिकले. जो कायदा व संविधान झुगारायचे आहे, तितकी ताकद येण्यापर्यंत त्याच कायदा व हक्कांचा आधार घेऊन चळवळ पुढे रेटायची. त्यासाठी दोन पातळीवर काम करायचे. एका गटाने भूमीगतव राहून सशस्त्र लढा द्यायचा आणि दुसर्याने उजळमाथ्याने समाजात राहून कायदेशीर मार्गाचा आडोसा घेत भूमीगतांना साहित्य व रसद पुरवायची. सहाजिकच १९८० नंतरच्या काळात त्यांनी आपला चेहरा बदलून विचारवंत, प्राध्यापक, लेखक मानवाधिकार कार्यकर्ते अशा विविध मुखवटे व बुरखे पांघरून समाजात प्रतिष्ठीत होत नक्षली हिंसाचाराचे उदात्तीकरण आरंभले. आज त्याला शहरी नक्षलवाद असे नाव दिले गेले आहे. कधीकाळी आंबेडकरी चळवळीला गिळंकृत करू बघणार्यांनी आता उदारमतवादी मुर्खांना सहजगत्या खाऊन पचवलेही आहे. कालपरवा भीमा कोरेगाव चौकशीनंतर अशा उजळमाथ्याने वावरत असलेल्यांची धरपकड झाल्यानंतरचे बौद्धिक युक्तीवाद त्याच पचनानंतरचे ढेकर आहेत.
विद्यापीठे, वर्तमानपत्रे व माध्यमे, साहित्यिक कलाक्षेत्र अशा क्षेत्रात आता त्यांनी यशस्वी घुसखोरी केलेली असून, समाजातल्या कुठल्याही वैफ़ल्यग्रस्तांना हाताशी घेऊन आपला अजेंडा पुढे रेटण्याचे कौशल्य प्राप्त केलेले आहे. त्यात एका बाजूला आंबेडकरवादी वा दलित आदिवासी नैराश्याचा लाभ उठवला जात असतोच. पण दुसरीकडे राजकीय नैराश्यालाही हाताशी धरले जात असते. आपल्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत माओवाद आणि शहरी नक्षलवाद हा देशाला सर्वात मोठा धोका असल्याचा ओरडा करणारे चिदंबरम व मनमोहन सिंग; आज कुठल्या बाजूला उभे आहेत? भाजपा सगळ्या निवडणूका जिकतो, म्हणून वैफ़ल्यग्रस्त झालेले कॉग्रेसवाले व पुरोगामी पक्ष तात्काळ नक्षली समर्थनाला उगाच उभे राहिलेले नाहीत. आता जंगल भागात भूमीगत राहुन काम अशक्य असल्याने व तिथून लढवय्ये व संघटनात्मक पाठबळ मिळत नसल्याने मागल्या काही वर्षात नक्षली नेतृत्वाने राजकीय क्षेत्रातील वैफ़ल्याचा लाभ उठवण्याचे यशस्वी काम केलेले आहे. तिथेच हे लोक थांबलेले नाहीत. मुस्लिम समाजातील नैराश्याचा व त्यातून जिहादी घातपाताच्या आहारी गेलेल्यांशीही सुसुत्र होण्याचा मार्ग चोखाळण्यात आला आहे. त्यासाठी लागणारा पैसा ख्रिश्चन मिशनरी वा परकीय जिहादींकडूनही घ्यायला नक्षलींनी मागेपुढे बघितलेले नाही. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या व त्यांचे हितसंबंध संभाळण्यातून सशस्त्र युद्धाला लागणारा पैसाही जमवला जात असतो. पण नुसता पैसा व शस्त्रे पुरेशी नसतात. लढणारे सैनिक वा शहीद व्हायला जोशात येणारेही लोक आवश्यक असतात. ते नागरी पांढरपेशातून मिळत नाहीत वा येत नाहीत. त्यासाठी गरीब मागास पिडीत वंचितातून येणार्यांची गरज भासते. ते आंबेडकरी चळवळीतून सहज उपलब्ध होतात. म्हणून अलिकडल्या कालखंडात आंबेडकरी संघटना, संस्था, गटतट यांना प्रयत्नपुर्वक लक्ष्य करण्यात आलेले आहे.
छातीवर गोळ्या झेलून मरायला किंवा पोलिसांच्या लाथाबुक्के खायला अशी सामान्य घरातली मुले लागतात. त्यांच्या डोक्यात उदात्ततेच्या कल्पना रुजवल्या की आईबापांनी कष्टाने शिकवून हातातोंडाशी आणलेली मुले सहज शहीद व्हायला पुढे सरसावतात. त्यांना घराची वा आप्तस्वकीयांची फ़िकीर नसते. आपण समाजासाठी बलिदान करीत आहोत, याची नशा इतकी प्रखर असते, की आपली बळीचे बकरे म्हणून निवड झालीय हे त्यांच्या सुबुद्ध मेंद्त शिरतही नाही. त्यापेक्षा त्यांना आपल्या दाराशी आलेले वा आपल्यासोबत माती चिखलात येऊन बसणारे उच्चभ्रू उच्चशिक्षित नेत्यांचे आकर्षण अधिक असते. अशापैकी कोणी नुसती पाठीवर थाप मारली वा गुणगान केले, तरी ते जीवावर उदार होऊन पुढे सरसावतात. एखाद्या फ़डतुस कविता वा चटकदार लेख भाषणाचे कौतुक त्यांना भारावून टाकणारे असते. बाकी तिथे ‘सणासुदीला’ आलेले शहरी उच्चभ्रू मंडळी माघारी आपल्या सुखवस्तु जीवनात परत जातात आणि शब्दांचे फ़ुलोरे निर्माण करून अशा हौतात्म्याची भजने गातात. त्यामुळे अशा तळागाळातल्या वर्गातून अधिकच संख्येने तरूण त्यांच्याकडे आकर्षित होत असतात. अनेक पिढ्या अपमानित राहिलेले, सत्तेच्या पायदळी तुडवले गेलेले जे समाज आहेत, ते चतकोर प्रतिष्ठा व कौतुकाचे अधिक भुकेलेले असतात. ते अशा लोकांच्या लौकर गळाला लागतात. मग ते आपल्याच वर्ग घटकातून पोलिस भरती झालेल्यांचे मुडदे हसतखेळत पाडायला क्षणभर मागेपुढे बघत नाहीत. त्यातून मोठ्या संख्येने आदिवासी बाहेर पडत गेल्याने आता नव्याने भरती करायची आहे. ती शहरी बकाल वस्त्या व खेड्यापाड्यात वसलेल्या दलित वस्त्यातूनच होऊ शकते. त्यासाठी ही शहरी भरती केंद्रे उभारण्यात आलेली आहेत. त्याला शहरी नक्षलवाद म्हणून संबोधन मिळालेले आहे. त्यांच्या भावनांच्या भुकेवर आधुनिक नक्षलींची पोळी भाजली जात असते.
भीमा कोरेगाव परिषद वा एक्गार परिषद त्यातलाच प्रकार होता. कित्येक वर्षापासून भीमा कोरेगाव स्मारकाचा सोहळा चालत आलेला आहे. पण तिकडे ही मंडळी कधी फ़िरकली नव्हती. पण यावर्षी त्यांनी नेमका दिवस निवडून आदल्या दिवशी पुण्यात भव्य सोहळा योजला आणि स्मारकदिनाच्या गर्दीत घुसून आपल्या योजनेला कार्यान्वित केले. त्यातून दंगल करायची आणि समाजातील सवर्ण व दलित असा संघर्ष पेटवून, मग हळुहळू विस्कळीत झालेल्या आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना आपल्याशी जोडून घ्यायचे असा बेत होता. पण पोलिसांनी त्याचा बारकाईने शोध घेऊन यातल्या सुत्रधारांपर्यंत मुसंडी मारल्याने सगळा बेत उधळला गेला. थेट दिल्लीत बसून सुत्रे हलवणार्या म्होरक्यांनाच बेड्या ठोकण्याची कारवाई सुरू झाल्यावर अवसान गळालेले आहे. त्या अटकेची कारवाई होण्यापुर्वीच त्यांचे बोलविते धनी बिळातून बाहेर पडले आणि थेट सुप्रिम कोर्टाला साकडे घालण्यात आले. दोन वर्षापुर्वी शीतल साठे व तिचा जोडीदार अशाच आरोपाखाली तुरूंगात खितपत पडलेले होते, त्यांच्यासाठी यापैकी एकानेही धावपळ केलेली नव्हती. हायकोर्टात वा अन्य कुठल्या कोर्टात जाऊन मानवाधिकाराच्या खंडनाचा दावा मांडलेला नव्हता. आज जितके पुरावे भिंगातून बघितले जात आहेत, त्याच्या तुलनेत शीतल साठेच्या विरोधात काय पुरावे होते? पण गर्भार अवस्थेत तिला गजाआड पडावे लागलेले होते. मात्र सुधा भारद्वाज किंवा वरवरा राव इत्यादींसाठी किती आटापिटा झाला ना? कारण ते सरंजामदार आहेत आणि शीतल साठे रयत असते. तिच्यासारखे लाख मेले तरी बेहत्तर, पण सुधा भारद्वाजला धक्का लागता कामा नये. हा शहरी नक्षलवाद आहे, ल्युटीयन्स दिल्ली वा बंगलोर मुंबईच्या उच्चभ्रू नामवंताच्या अलिशान प्रशस्त घरातला ‘शोभेचा कॅक्टस’ यापेक्षा त्यांना जास्त मोल नसते. दलित, आदिवासी, तळागाळातले वंचित हे अशा शहरी नक्षली राजकारणात चव स्वाद येण्यासाठी फ़ोडणीत बिनतक्रार होरपळणारी कडीपत्त्याची पाने असतात. प्रत्यक्ष पंगत बसते, तेव्हा त्यांना ताटातही स्थान नसते. बाकीच्या पक्वान्नांचे गुणगान होते आणि कडीपत्ता अनाथ ताटाबाहेर पडलेला असतो. (संपुर्ण)
दिवाळी अंक‘ पारंबी’ २०१८ मधून
पोटतिडीकेने लिहिलयत भाऊ.
ReplyDeleteखरं आहे.
Great bhau,you told all history and current situation with facts and in simple language.
ReplyDeleteआपको पढ़ना सदा यूँ लगता है जैसे महाराष्ट्र की राजनीति का विश्वकोष सामने से गुजर रहा है. दीर्घ जीवन की अनंत कोटि शुभकामनाएँ.
ReplyDeleteशेवटची काही वाक्ये खूपच चटका देणारी ...
ReplyDeleteव्वा!! खूप छान
ReplyDeleteAbsolutely apt description & correct analysis of the situation.
ReplyDeleteJust Great!
शेवटचा मुद्दा डोळ्यात अंजन घालणारा आहे भाऊ, अत्युत्तम विश्लेषण
ReplyDeleteमर्मभेदी��
ReplyDeleteBhau khup chan lihale aahe.......
ReplyDeleteभाऊ हे विदारक सत्य आहे पण आंबेडकरवादी चळवळीतील अनेक नेते या कम्युनिस्टांना इतके बळी पडलेले आहेत की परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे आणि हे कार्यकर्ते आपलाच इतिहास कसा खरा हे लोकांवर लादायला आणि भडका वयाला लागलेले आहेत.
ReplyDeleteKhoopach chhan bhau
ReplyDeleteअतिशय सुंदर आणि उच्च दर्जाचे विष्लेशण भाऊ.. ग्रेट..!!
ReplyDeleteविद्यापीठे, वर्तमानपत्रे व माध्यमे, साहित्यिक कलाक्षेत्र अशा क्षेत्रात आता त्यांनी यशस्वी घुसखोरी केलेली असून...यामध्ये न्यायालये राहून गेले..
न्यायालयाना तरी कुठे सोडलय.तिथं सुद्धा या व्रत्तीचा शिरकाव झालेला अाहे.वर्षांच्या सुरूवातीचे न्यायाधीशांचे बंड विसरलात काय?
Deleteभाऊ , सर्व सुखसोयी उपभोगत असूनही आणि कुठलाही प्रकारचा सामाजिक अन्याय होत नसूनही अजूनही दलित असे का वागतात यावर एखादा लेख लिहावा भाऊ. तू असून निदान काही दलित तरुणांनी आत्मचिंतन करावे आणि मूळ प्रवाहात सामील व्हावे असे सामर्थ्य आपल्या लेखनात आहे
ReplyDeleteभाऊ अप्रतिम लेख. जय एल्गार आणि जय श्रीराम दोन्ही ठिकाणी सामान्य पोरालाच बळी जावं लागतं.
ReplyDeleteशहरी नक्षलवादाचे एक सौम्य स्वरूप ज्याला म्हणता येईल, किंवा आपली डावी विचारसरणी हळूहळू पण पद्धतशीरपणे समाजात पसरविण्याचे काम साम्यवादी, समाजवादी आणखी एका प्रकारे कसे करत आहेत याचे एक उदाहरण म्हणजे, या डाव्या विचारसरणीच्या लोकांनी स्वतः उभारलेल्या विज्ञान प्रसारक संघटना किंवा पूर्वापार चालत आलेल्या विज्ञान प्रसारक संघटनांवर या लोकांनी मिळविलेला ताबा हे होय.
ReplyDeleteस्वातंत्र्यानंतर शैक्षणिक, साहित्यिक, कला ई. क्षेत्रांबरोबरच प्रसारमाध्यमांवर पद्धतशीरपणे कबजा मिळवून, ईतर अन्य मुद्यांबरोबरच, डाव्या विचारसरणीत वैज्ञानिक विचार अनुस्यूत आहे, असा (गैर)समज पसरविण्यात हे लोक यशस्वी झाले. पारंपारिक प्राचीन भारतीय ज्ञान व विज्ञान ही पुराणातील वांगी असून, विज्ञान, तंत्रज्ञान व गणित याचा उगम केवळ पाश्चात्य जगतातच आहे, हा समज मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने शिकून तयार झालेल्या व पाश्चात्य विचारसरणीने भारावलेल्या पुढील सर्व शिक्षित पिढ्यांमध्ये व एकूणच समाजात त्यामुळे पसरत गेला.
मार्क्सवादात निदान कागदावर तरी असलेल्या समतेच्या आवाहनामुळे, मुख्य धारेतील साम्यवादी, समाजवादी विचारसरणीला ज्याप्रमाणे वंचित, वैफल्यग्रस्त तरुण कार्यकर्त्यांचा तुटवडा पडला नाही त्याचप्रमाणे या डाव्या विचारसरणीच्या लोकांनी स्वतः उभारलेल्या विज्ञान संघटना किंवा त्यांनी कबजा केलेल्या विज्ञान प्रसारक संघटनांसाठी सामान्य घरांमधील अर्धशिक्षित, शाळा महाविद्यालयात विज्ञान न झेपलेल्या कार्यकर्त्यांचा तुटवडा पडत नाही. अशा कार्यकर्त्यांची, आपण विज्ञान क्षेत्रात काहीतरी करू शकतो ही डावलली गेलेली सुप्त ईच्छा या माध्यमातून पूर्ण होते.
या विज्ञान प्रसारक संघटनांची कार्यपद्धती खास डाव्या विचारसरणीस शोभेल अशी असते. ‘लोकांसाठी विज्ञान’ अशा गोंडस नावाखाली हातावर पोट असणाऱ्या मजूर वर्गात वैज्ञानिक शिबिरे घेणे (ज्यांना दोन वेळची भाकर मिळण्याची भ्रांत, त्यांना विज्ञान विषयक भाषणाचा काय उपयोग ?), पथनाट्ये करणे, सरकारच्या वैज्ञानिक धोरणाविरुद्ध चुकीचा प्रचार करून मोर्चे काढणे व अधूनमधून विज्ञानातील नामवंतांची व्याख्याने तोंडी लावण्यापुरती आयोजित करणे असे कार्यक्रम करत असताना आपली ही वैज्ञानिक संघटना जास्त वाढणार नाही व त्यात तर्कशुद्ध विचार करणारे अन्य विचारसरणीचे लोक येणार नाहीत अशी खबरदारी घेत विज्ञानाच्या नावाखाली डावी विचारसरणी समाजात रुजविण्याचे काम या संघटना करत असतात.
महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधल्याबद्दल अभिनंदन.
Deleteसुंदर आणि निष्पक्ष लेख,
ReplyDeleteश्री भाऊ भयानक सत्य सांगितलंत,ह्या वर वेळीच काही उपाय कारण आवश्यक आहे, नाहीतर काही खरं नाही, एकतर आपली अति लोकसंख्या, त्यामुळे आलेली गरिबी, मागासलेपण हयात आपण आधीच पिचून गेलो आहोत
ReplyDeleteHats off to you Bhau....!!!
ReplyDeleteअतिशय सुंदर लेख उच्च दर्जाचे लिखाण भाऊ..
ReplyDeleteभाऊ आपले लेख अभ्यासपूर्ण व अप्रतिम असतात. पण एक विनंती आहे, सर्वसामान्य च्या गरजेशी निगडित एस टी हंगामी भाडेवाढीची उलट तपासणी करावी हि विनंती...
ReplyDelete