Saturday, October 6, 2018

बंगालचे गौडबंगाल

मतचाचणी विश्लेषण (२)

Image result for mamta cartoon

कर्नाटकातल्या जेडीएस कॉग्रेस युतीमध्ये अनेकांना महागठबंधन दिसले होते, त्याचे काय झाले ते आपण बघत आहोत. पण त्यातून काढला गेलेला एक निष्कर्ष असा होता, की सगळे विरोधक एक आले तर भाजपाला सत्ता मिळणे सोडा, शंभर जागाही मिंळणे अशक्य होईल. कागदावर अशा गोष्टी सहज निकाली लावता येतात. पण व्यवहार तितका सोपा नसतो. तेव्हाच मी एक गोष्ट सांगितली होती, की बंगलोरला हात गुंफ़ून उंचावणार्‍यांपैकी अखिलेश मायावती सोडले, तर बाकीच्यांच्या उड्या मारण्याने काहीही साध्य होणार नाही. ताज्या रिपब्लिक सी-व्होटर चाचणीने त्याची साक्ष दिली आहे. फ़क्त सपा-बसपा एकत्र लढले तरी भाजपाला उत्तरप्रदेशात मोठे आव्हान उभे राहू शकते आणि किमान २५-३० जागा घटू शकतात. दुसरी थिअरी अशी, की उत्तरप्रदेश, बिहार व महाराष्ट्रात मिळून १६८ जागा आहेत आणि तिथे भाजपाच्या जागा कमी केल्या, की त्याची भरपाई करायला भाजपाला अन्य सुपिक जमिन नाही. इथेच सगळा घोळ होतो. मोदींनी लोकसभा एकहाती जिंकून चार वर्षे उलटल्यावर विरोधातील नेते व त्यांचे बुद्धीमंत यांना आज हा साक्षात्कार होतो आहे. पण जे जिंकले त्यांना यशाच्या नशेतही तो धोका ओळखता आला होता. उतरप्रदेशामध्ये लागली ती लॉटरी आहे आणि पुढल्या खेपेस ८० पैकी ७१ जागा जिंकणे शक्य नसेल. म्हणूनच जिथे सर्वाधिक जागा जिंकल्यात त्यात होणारी घट भरून काढायला इतर प्रदेश धुंडले पाहिजेत, हे विजेत्या पक्षाच्या अध्यक्षाने तात्काळ ठरवले आणि तो कामाला लागला होता. त्याने जे नवे प्रदेश आपल्यासाठी सुपिक बनवले, त्यामध्ये बंगाल नावाचे राज्य समाविष्ट होते. ताज्या मतचाचणीने त्याची ग्वाही दिलेली आहे. जिथे २०११ पर्यंत भाजपाला एक आमदार विधानसभेत निवडून आणणे शक्य नव्हते, तिथे चक्क १६ खासदार लोकसभेत येण्याचा अंदाज या चाचणीने दिला आहे.

आणखी आठ महिन्यांनी लोकसभेचे मतदान आवरलेले असेल आणि मतमोजणीची प्रतिक्षा चालू असेल. त्याच्या बरोबर दहा वर्षापुर्वी म्हणजे २००९ साली लोकसभेच्या निवडणूका झाल्या होत्या आणि त्यात डाव्या आघाडीला शह देण्यासाठी ममता बानर्जी ‘महाजोत’ म्हणजे आजच्या भाषेत महागठबंधन त्या बंगालपुरते बनवायला मेहनत घेत होत्या. भाजपाची साथ सोडून त्या कॉग्रेसच्या वळचणीला गेल्या होत्या, कारण भाजपाच्या बाजूला तेव्हा नाव घेण्यासारखीही मते नव्हती. दहा वर्षापुर्वी बंगालमध्ये भाजपाला सर्व मिळून सहा टक्के कशीबशी मिळायची. त्यापेक्षा कॉग्रेसला मिळणारी पंधरावीस टक्के मते ममतांसाठी उपयुक्त होती. तिथून आज कुठवर बदल घडून आला आहे? नुकत्याच संपलेल्या स्थानिक निवडणूकात मार्क्सवादी डावी आघाडी व कॉग्रेसला मागे टाकून भाजपा बंगालमध्ये दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष बनुन गेला आहे. ह्याचे श्रेय जितके अमित शहा आणि त्यांच्या संघटना कौशल्याला आहे, त्यापेक्षाही अधिक पुरोगामी मुर्खपणाला आहे. त्यात सगळे आले. ममतासह डावे व कॉग्रेसचाही त्याला हातभार लागलेला आहे. परिणाम असा, की ताज्या चाचणीत भाजपाला मिळणार्‍या मतांमध्ये २००९ च्या तुलनेत सहापटीने व २०१४ च्या तुलनेत दुपटीने वाढ झालेली आहे. भाजपाच्या नेतृत्वाचे कष्ट आहेतच. पण त्याला जनतेपेक्षाही पुरोगामी प्रतिसाद अप्रतीम मिळू शकला, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कारण नसताना ममता इत्यादिकांनी भाजपा व संघ म्हणजेच समस्त हिंदू समाजाला आपला शत्रू करून टाकल्याचा परिणाम आहे. त्याचा अर्थ हिंदू समाज धर्मवादी झाला किंवा हिंदूत्व बहरले, असाही होत नाही. किंबहूना त्याच खुळेपणाने भाजपाला आपला पाया बंगालमध्ये विस्तारता आला आहे. ज्या राज्यात वा देशात हिंदू बहुसंख्य आहेत, त्यांनाच सतत देशाचे दुष्मन ठरवले जाण्यावरची ती प्रतिक्रीया आहे.

बंगालमध्ये दुर्गापूजा हा सर्वात मोठ सण असतो आणि सर्व गटातटातले घटकातले लोक त्यात उत्साहाने सहभागी होतात. ही शेकडो वर्षाची परंपरा असून त्याचा भाजपा वा संघाच्या हिंदूत्वाशी काडीमात्र संबंध नाही. पण मुस्लिम मतांचे लांगुलचालन करण्यासाठी आधी डाव्यांनी व अलिकडे ममतांनी हिंदूंना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून टाकले. मागल्या दोन वर्षात ममतांनी त्याच दुर्गापुजा समारंभ व त्याच्या विसर्जनाच्या मिरवणूकीवर निर्बंध लादण्यापर्यंत मजल मारली. लहानसहान बाबतीत संघ वा भाजपा विरोध करताना हिंदूंना आपल्या धार्मिक श्रद्धा बाळगणे जणू गुन्हा ठरवण्यापर्यंत त्यांची मजल गेली. त्याच दुखर्‍या भावलेला जोजावत भाजपाने इथवर मजल मारलेली आहे. त्या दिशेने वळालेल्या हिंदूंना संघाच्या हिंदूत्वाधी कसलेही कर्तव्य नाही. पण आपण जन्माने हिंदू आहोत, हाही त्यांना गुन्हा वाटत नाही. तसे कोणी ठरवू लागला तर त्याचा संताप येणे स्वाभाविक आहे. मग त्या भावनेवर फ़ुंकर घालणारा जवळचा वाटू लागतो. त्यासाठी आपल्या पाठीशी उभा रहाणारा पक्ष आपला वाटू लागतो. तेच भाजपाचे आज बंगालमध्ये व देशाच्या अनेक भागातले स्वरूप आहे. दिर्घकाळ बंगाल, ओडीशा वा अन्य काही प्रांतामध्ये तशी स्थिती नव्हती आणि तिथे भाजपाची डाळ शिजत नव्हती. त्यासाठी आवश्यक असलेला अग्नी ममतांनी चेतवला आणि आज भाजपा दुसर्‍या क्रमांकाचा वा ममतांनाच आव्हान देणारा पक्ष होऊन गेला आहे. ताज्या चाचणीत बंगालमध्ये भाजपा १६ जागा एकहाती स्वबळावर मिळताना दिसतो आहे. त्याची ही अशी पार्श्वभूमी आहे. पण त्यापेक्षाही महत्वाची बाब म्हणजे आपल्याला तिथे विस्तारण्यास वाव असल्याचे ओळखून, अमित शहा मागली चार वर्षे धडपडत होते आणि उत्तरप्रदेश बिहारमध्ये घटणार्‍या जागा भरून काढण्यासाठी अशा जागा शोधतही होते. मोठा विजय मिळाल्यावरही ते सावध होते आणि विरोधक आजही गाफ़ील आहेत.

कॉग्रेसने आपल्या हयातीतला निचांक गाठला तरी त्यांची सत्तेची नशा अजून उतरलेली नाही. ते राहुल सारख्या पोरकट नेत्याकडून अपाल्या पक्षाच्या उद्धाराची स्वप्ने रंगवित बसले आहेत. डाव्यांना आपल्या चुका सुधारून गमावलेली भूमी परत मिळवण्यासाठी चुका शोधण्याची गरज भासलेली नाही आणि ममतांना यशाची नशा इतकी भयंकर चढली, की त्या बंगालला आपली जागिर समजून मतदार व कार्यकर्त्यालाही गुलाम समजू लागल्या. त्याचा एकत्रित लाभ बंगालमध्ये भाजपाला मिळताना दिसतो आहे. दोनच महिन्यापुर्वी भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी बंगालमध्ये २२ जागा जिंकण्याचा मनसुबा व्यक्त केला होता. तेव्हा त्यांची अनेक अभ्यासकांनी टवाळी केली होती. यातून विश्लेषकांची जनता व प्रचलीत राजकारणाशी असलेली नाळ कशी तुटली आहे, त्याची साक्ष मिळते. मात्र मतचाचणी घेणार्‍यांना सत्याकडे पाठ फ़िरवून चालत नाही. कारण चाचणीत मतांची टक्केवारी काढली जात असते आणि त्यावरून जागा निश्चीत करताना गफ़लत होऊ शकते. त्या जागांची संख्या चुकू शकते. पण मतांची टक्केवारी कधी धोका देत नाही. बंगालमध्ये भाजपाला ३१ टक्के मते मिळताना चाचणी दाखवत असेल, तर त्रिपुरात काय घडले त्याची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. त्रिपुरात आधीच्या विधानसभेत एकही आमदार भाजपाचा नव्हता आणि निवडणूका येण्यापुर्वी तिथला तॄणमूल पक्षच भाजपात विलीन होऊन गेला. ममता बानर्जींच्या उनाडपणाने त्यांच्याच पक्षातल्या तळागाळाच्या कार्यकर्ते व दुय्यम स्थानिक नेत्यांची बेचैनी अधुनमधून बातम्यातून झळकत असते. त्याचेच प्रतिबिंब या मतचाचणीत पडलेले आहे. त्यामुळे सावध होऊन ममता सर्व विरोधकांना एकत्र घेण्याची भाषा करू लागल्या आहेत. कारण त्यांना नुसती भाजपाची वाढलेली टक्केवारी भयभीत करीत नसून, बंगालचा त्रिपुरा होण्याच्या भितीने पछाडलेले आहे.

ममतांचे पुरोगामीत्व दुधारी ठरले आहे. आजवर त्यांनी भाजपा संघाला डिवचण्यासाठी मुस्लिमांचे अतिरेकी लांगुलचालन केलेले होते. त्याची संतप्त प्रतिक्रिया उमटली तेव्हा त्यांनाही हिंदू दिसण्य़ाचे वेध लागलेले असून, यावर्षी दुर्गापुजेला अनुदान देण्यापर्यंत ममतांची घसरगुंडी झालेली आहे. पण तेवढ्यावरच न थांबता त्यांनी नव्याने विरोधकांची महाजोत उभी करण्यासाठी कंबर कसली आहे. ज्या दिवशी ही मतचाचणी प्रक्षेपित झाली, त्याच्या आदल्या दिवशीच मायावतींनी मध्यप्रदेश राजस्थानात कॉग्रेस सोबत महागठबंधन मोडीत काढलेले होते. चाचणीच्या दुसर्‍या दिवशीच ममतांनी तो वसा घेतला आणि सर्व विरोधकांची संयुक्त जाहिरसभा योजण्याची घोषणा करून टाकलेली आहे. त्याचा अर्थ ममतांना पंतप्रधान व्हायचे वेध लागलेत, असा अजिबात नाही. त्यांना बंगालमध्ये आपल्या हातून निसटणारे बहूमत टिकवायची चिंता लागलेली आहे. कारण आता त्यांच्या ताज्या हिंदूप्रेम व दुर्गापुजा अनुदानाने मुस्लिमांना विचलीत केले आहे. या अनुदानाच्या विरोधात मौलवींच्या एका संघटनेने मोर्चा काढून ममतांचा निषेधही केलेला आहे. थोडक्यात भाजपाच्या हिंदूत्वाने मुस्लिम जितके विचलीत नाहीत, त्यापेक्षा अधिक मुस्लिम असल्या पुरोगामी पोरकटपणाने बिथरले आहेत. हिंदू आधीच अस्वस्थ आहेत. एकूण या चाचणीतला निष्कर्ष कोणता? तर उत्तरप्रदेश व अन्य राज्यात मागल्यावेळी मिळालेल्यापैकी ज्या जागा घटतील, त्या भरून काढायला बंगाल हे एक राज्य भाजपाने आपल्या प्रभावक्षेत्रात आणलेले आहे. चाचणी ही चाहुल आहे. खरोखरच डावे ममता व कॉग्रेस एकजुटीने उभे ठाकले नाहीत, तर बंगाल हा पुढल्या लोकसभा मतदानातील मोठा धक्कादायक चमत्कार असेल. कारण अजून मतदानाला आठ महिने असून, त्यात ममतांच्या गुंड कार्यकर्त्यांना उच्छाद मांडण्याची मुभा नाही आणि ७० टक्के बंगाल हिंदू लोकसंख्या आहे.

4 comments:

  1. बंगालमधील मतदार ममतांना इतका घाबरुन आहे की एका चॅनलचिया सर्वेत तिथल्या मतदार कॅमेरा समोर बोलायला पन तयार नव्हता पत्रकाराला सरळ सांगीतले की आम्ही काही बोललो तरी ममतांचे गुंड त्रास देतील एक मुस्लिम युवक पन अक्षरषः रडत होता तो रस्तावर छत्री टाकुन नाष्टा विकत होता कारन त्याच घरावर ममतांच्या गुडांनी कब्जा केला हेता मतदान करनार नाही म्हनत होता कारन तो भाजपचा मतदार पन नाही बैकीचे हिंदु गप्प असले तरी मतदानावेळी बरोबर धडा शिकवतील. असा घाबरलेला मतदार प्रथमच टीवीवर पाहिला बंगालमधे सहसा कोन जात नाही टिवीवाले. युपी बिहारमधे समस्या आहेत पन तिथला मतदार पुढे येुन बोलतो अगदी मत कुनाला देनार हेही

    ReplyDelete
  2. ममतांना ३४ व जयललीतांना ३७ जागा मिळुन पन २०१४ साली कुचकामी ठरल्या त्यांनी स्वताःची राज्ये clean sweep केली असली तरी केंद्रात bargening power शुन्य तसेच आता सप बसप ला काही जागा मिळाल्या तरी बंगालओडिशा,मधुन भाजपला जास्त जागा व बहुमत मिलुन त्यापन कुचकामी ठरतील

    ReplyDelete
  3. भाऊ सदरच्या मतचाचणीत महाराष्ट्रात भाजप सेना एकत्र लढले तर दोघांनाही फायदा होईल मात्र वेगवेगळे लढले तर भाजपचे नुकसान होईलच मात्र सेना पूर्णपणे भुईसपाट होईल असा कौल आला आहे आता निर्णय सेना पक्ष प्रमुखांना घ्यायचा आहे.संजय राऊत यांच्या सल्ल्याने चालले तर मात्र सेना कायमची संदर्भ हीन होऊन जाईल कारण भाजपच्या मागे संघासारखी संघटना आहे युती झाली तर त्याचा फायदा भाजपच्या मित्रपक्षांना होतो युती तुटली तर मात्र सेनेला त्याचे नुकसान सोसावे लागेल.

    ReplyDelete
  4. ममता जेव्हां पहिल्यांदा निवडून आल्या त्या निवडणुकीच्या वेळेस मी योगायोगाने बंगालमध्ये होतो. केंद्र सरकारने अत्यंत कडक सुरक्षा लावली होती, कम्युनिस्टांच्या नाड्या आवळल्या होत्या. त्यांना नेहमिप्रमाणे बूथ management करता आली नाही. मोदी सरकारला तृणमूल बाबतीत हेच करावे लागेल.

    ReplyDelete