Friday, October 5, 2018

राजिनाम्याची ताकद

मतचाचणी विश्लेषण (१)


 national approval rating c voter के लिए इमेज परिणाम


महाराष्ट्रातल्या शिवसेना मंत्र्यांचे राजिनामे हा विनोदाचा विषय बनला आहे, किंवा सेनेच्या काही तोंडाळ लोकांनीच तो तसा बनवून टाकला. पण म्हणून राजिनाम्याची ताकद नगण्य मानायचे कारण नाही. अनेकदा राजिनाम्यांनी राजकारणात मोठ्या उलथापालथी घडवून आणलेल्या आहेत. १९८८ सालात विश्वनाथ प्रताप सिंग यांनी बोफ़ोर्स गाजू लागल्यावर आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजिनामा दिला होता. त्याच्याही आधी राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळातील उत्साही मुस्लिम नेते आरीफ़ महंमद खान यांनी शहाबानु प्रकरणावर राजिनामा दिला होता. त्या दोन राजिनाम्यांनी ‘मिस्टर क्लिन’ ही राजीव गांधींची प्रतिमा डागाळत गेली आणि कॉग्रेस पक्षाची घसरगुंडी सुरू झाली. त्यातून तो पक्ष आजपर्यंत सावरू शकलेला नाही. कारण पुढे शहाबानु व बोफ़ोर्सने इतके रौद्ररूप धारण केले, की त्याला चुड लावण्यासाठी सहा महिने शिल्लक असताना विरोधी पक्षाच्या जवळपास सर्वच प्रमुख खासदारांनी लोकसभेचे राजिनामे दिले होते. म्हणूनच राजिनाम्यांची हेटाळणी करण्यात अर्थ नाही. मात्र राजिनामे कोणाचे, कुठल्या कारणास्तव दिले आणि त्याचे परिणाम काय संभवतात, त्याचा योग्यवेळी विचार करणे अगत्याचे असते. अन्यथा राजिनामे दिले जातात आणि त्याची तेव्हा कोणी दखल घेत नाही. मात्र परिणाम समोर आले, मग तेच राजिनामे अनेकांना आठवू लागतात. गेल्या एप्रिल महिन्यात तेलगू देसम पक्षाचे नेते व आंध्राचे मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडू एनडीए आघाडीतून बाहेर पडल्याचा गाजावाजा खुप झाला. पण त्याची पार्श्वभूमी अशाच राजिनाम्याची होती, त्याकडे कोणाचे फ़ारसे लक्ष गेले नाही. ते राजिनामे होते, त्याच्याच राज्यातील वायएसआर कॉग्रेस पक्षाच्या खासदारांचे. त्याच राजिनाम्यामुळे चंद्राबाबूंनी एनडीए सोडली आणि त्याची किंमत चंद्राबाबूंना मोजावी लागेल, असे मी तेव्हाच म्हटले होते. काल सी व्होटरच्या मतचाचणीत त्याची ग्वाही देण्यात आलेली आहे.

गुरूवारी रिपब्लिक टिव्ही आणि एबीपी या वाहिन्यांनी सी व्होटर संस्थेच्या पहाणीचा अहवाल सादर केला. त्यात राज्यवार लोकसभा मतदान कसे होईल आणि कुठल्या पक्षाला यश मिळेल वा किती जागा मते मिळू शकतील, त्याचे आडाखे मांडलेले आहेत. त्यात जे मोठे फ़ेरबदल सांगितले आहेत, त्याचा पहिला व मोठा बळी चंद्राबाबू व त्यांचा तेलगू देसम पक्ष असणार आहे. मला आठवते, की जेव्हा चंद्राबाबूंनी एनडीए सोडली, तेव्हाच मी त्याला आत्महत्या असे म्हटलेले होते. कारण तो विरोधातल्या जगनमोहन म्हणजे वायएसआर कॉग्रेसच्या नेत्याने लावलेला सापळा होता. मागल्या वेळीच त्याच्या पक्षाने आंध्रामध्ये बाजी मारली असती. पण खच्ची झालेल्या नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाने भाजपाशी हातमिळवणी करून काठावर अधिक जागा जिंकलेल्या होत्या. भाजपाची साथ चंद्राबाबूंना मिळाली नसती, तर जगनमोहनने तेव्हाच मुख्यमंत्रीपद मिळवले असते. आताही तीच अडचण होती. म्हणूनच त्याने तेलगू देसम व भाजपात फ़ुट पडावी, म्हणून चंद्राबाबूंच्या अहंकारी भूमिकेला खतपाणी घातले आणि नव्या राजधानी व विशेष राज्याचा दर्जा, या विषयावर ओरडा करणार्‍या चंद्राबाबूंना कोंडीत पकडले. नायडू नुसतेच हातपाय आपटत बसलेले होते. त्यांचा तोच बोटचेपेपणा उघड करण्यासाठी जगनमोहनने आपल्या सर्व लोकसभा सदस्यांना थेट राजिनामे द्यायला भाग पडले. मग चंद्राबाबूंना मर्दुमकी दाखवण्याखेरीज अन्य काही पर्याय ठेवला नाही. सहाजिकच तितके धाडस करता येत नसेल तर चंद्राबाबूंना आपल्या दोन केंद्रीय मंत्र्यांचे राजिनामे देत एनडीएतून बाहेर पडणे भागच पडले. मात्र त्यांनीच बनवलेला विशेष राज्याचा विषय, खरोखर आंध्रातला तितका ज्वलंत प्रश्न नाही आणि म्हणूनच सत्ता सोडण्याचा तो डाव उलटलेला आहे. कारण आता ताज्या चाचणीत लोकसभेसह विधानसभा चंद्राबाबूंच्या हातून पुर्ण निसटत असल्याचा निर्वाळा मिळालेला आहे.

तेव्हा आंध्रातील जागांची विभागणी १६ तेलगू देसम आणि ९ जगनमोहन अशी झालेली होती. आता तिथे मतदान झाल्यास तेलगू देसम अवघ्या ४ जागा मिळवू शकेल आणि जगनला तब्बल २५ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्याचा भाजपाला कुठलाही फ़ायदा नसला, तरी जगन कॉग्रेस सोबत जाणारा नाही व चंद्राबाबू आधीच कॉग्रेस गोटात जाऊन बसलेले आहेत. अर्थात कुठल्याही निवडणूकीत ते कॉग्रेससोबत जाण्याचा मुर्खपणा करणार नाहीत. पण अलिकडल्या सहा महिन्यात त्यांनी आपण दिल्लीच्या राजकारणात कॉग्रेस सोबत रहाणार असल्याचे स्पष्ट करून टाकलेले आहे. मात्र जगनने कुठल्याही स्थितीत कॉग्रेसकडे पाठ फ़िरवलेली आहे. आंध्राचे विभाजन केल्याचा मोठा राग मागल्या मतदानात मतदाराने दाखवलेला आहे. तिथली कॉग्रेस पुरती नामशेष होऊन गेली आणि तिच्या मतदार वर्गाने जगनची कास धरलेली आहे. तो मतदार माघारी फ़िरण्याची कुठलीही शक्यता नव्हती आणि चाचणीत त्याचेच प्रतिबिंब पडलेले आहे. पण त्याच्याही पलिकडली गोष्ट म्हणजे चंद्राबाबूंच्या कॉग्रेस सलगीने, त्यांचीच काही प्रमाणातली मते सरकून जगनकडे गेलेली आहेत. थोडक्यात कॉग्रेस सलगीने असलेली मते चंद्राबाबूंनी गमावली आहेत आणि मित्रपक्ष म्हणून भाजपाच्या सोबतीने मिळणारी मते पिटाळून लावली आहेत. परिणामी जगनची मते ४२ टक्के आणि चंद्राबाबूंची मते ३१ टक्के झाली आहेत. भाजपाला १२ टक्के मते आहेत आणि ती तेलगू देसमच्या सोबत असती, तर चंद्राबाबूंना बाजी पुन्हा मारता आली असती. पण त्यांनी आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहे. अर्थात तो स्वेच्छेने वा आपल्या बुद्धीने केलेला आत्मघात नाही. त्याच्या मागची प्रेरणा जगनच्या खासदारांचे राजिनाने आहेत. म्हणून राजिनामे हा हास्यास्पद विषय नाही. कुशलतेने व चतुराईने वापरले तर ते भेदक हत्यार आहे, नाहीतर आपल्याच गळ्याला लागणारा फ़ास आहे.

माध्यमातले शहाणे वा राजकीय अभ्यासकांच्या पटावरचे प्यादे होणार्‍या राजकारण्यांना पटावरच यश मिळत असते आणि बाजीही मारता येत असते. पण लोकशाहीत राजकारणाचा आखाडा निवडणूका असतात आणि तिथे मतदाराची मर्जी चालते. म्हणूनच लोकमत कुठल्या बाजूने झुकते आहे वा झुकू शकेल, याचा अंदाज घेऊन आपला खेळ करणार्‍याला इथे बाजी मारता येत असते. त्याचे भान असल्यामुळेच तेलंगणा समिती, जगनमोहन वा नविन पतनाईक यांनी अविश्वास प्रस्तावाकडे पाठ फ़िरवली होती. उलट चंद्राबाबूंनी आक्रमक पवित्रा घेऊन स्वत:च मोदी सरकार विरोधातला अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यासाठी कॉग्रेसच्या गळ्यात गळे घातलेले होते. बंगलोरला जाऊन महागठबंधनाचे समूहगीत गायले होते. आता त्यातल्या कोणाशी जागावाटप करता येत नाही, की मते मिळवून द्यायला त्यापैकी कोणाचा वापर करता येत नाही. पण यापासून पुर्णपणे अलिप्त राहुन जगनमोहन याने आपले बस्तान पक्के केले आहे. चंद्राबाबू एनडीएतून बाहेर पडणे, म्हणजेच जगनमोहनचा सत्तेचा मार्ग प्रशस्त करून देणे होते. जगनने त्यासाठीच राजिनाम्याचा डाव खेळला होता. त्या सापळ्यात चंद्राबाबू आगावूपणा करून व माध्यमांच्या भुलभुलैयाला फ़सून अडकत गेले. हा अंदाज मी तेव्हाच व्यक्त केला होता. आता सहा महिन्यांनी सी-व्होटरच्या मतचाचणीने व टक्केवारी आणि त्यावरून जागांच्या केलेल्या भाकिताने माझा राजकीय अंदाज खरा ठरवला आहे. अर्थात मतदान व्हायचे आहे आणि निकाल लागायचे आहेत. जागा दुय्यम असतात आणि मतांची चाचणीत मिळणारी आकडेवारी मार्गदर्शक असते. ती आकडेवारीच सांगते आहे, की एनडीएतून बाहेर पडत भाजपाशी तोडलेली दोस्ती म्हणजे चंद्राबाबूंची आत्महत्या होती. मतचाचण्या किंवा त्यावरची भाकिते आपल्या जागी असतात. राजकीय अभ्यासात त्याचे तपशील घेऊन व्यवहारी राजकीय संदर्भ जोडून आपल्यालाही काही अंदाज बांधता येत असतात. गुरूवारच्या चाचणीने मला दाखवलेला हा एक पैलू आहे.

6 comments:

  1. एकदम बरोबर म्हणजे bjp ला दुसरा पर्याय तयार झाला . नायडूनी स्वतः तो तयार करून दिला .

    ReplyDelete
  2. भाउ आणखी एक पोल आहे indiatoday axix myindiaचा त्यातपन असच दाखवलय इतर राज्यात जे मुख्यमंत्री आहेत तेच सर्वात लोकप्रिय आहेत पन आंध्रात उलट आहे जगन नायडुंपेक्षा लोकप्रिय दाखवलाय अविश्वासठरावावेळी इथल्या खुळ्या पुरोगाम्यांना राहुल क्षेपनास्त्राने लढन्याचा भास वाटायला लावनारे नायडुच होते नाहीतर ४ वर्षात राहुलला कोनी संधी दिली नाही काॅंगरेसने पन नाही.नायडुंनी दिली त्याचीचकिंमत

    ReplyDelete
  3. भाउ अविश्वासठरावा नंतर तुम्ही चंद्राबाबंची आत्महत्यालेख लिहिला होता तेच खर होतय त्यावेळी मोदीपण नायडुंना म्हनालै होते की तुमही जगनच्या सापळ्यात फसताय त्याचे खासदाार मोदींसमोर उभे राहुन बोलुपण देत नव्हते एक प्रकारचा हिस्टेरीयाच झाला होता राजकारनात ते खुप घातक असते त्यापेक्षा मायावती डोक शांत ठेउन डाव खेळतायत राहुलच्या काॅंग्रेसकडे जाण्याची सजा भोगायची नाही

    ReplyDelete
  4. Bhau tumchya andajamadhye v etarancbya andajamadhye hach farak ahe

    ReplyDelete
  5. भाऊ 2004 मध्ये चंद्राबाबू यांनी सहा महिने आधी विधानसभा विसर्जित केली आणि त्यांच्या सोबत प्रमोद महाजन यांनी सुध्दा अटलजींना लोकसभा मुदतपूर्व विसर्जित करायला लावून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली यावेळी मात्र मोदी आणि शहा यांनी चंद्राबाबूंचा दबाव पूर्णपणे धुडकावून लावला आणि तिथेच चंद्राबाबू नायडू फसले. आततायीपणा करून ते मोदी यांच्या सरकार मधून बाहेर पडले यावेळी देखील त्यांची स्थिती 2004 प्रमाणेच होइल ते पुरते भुईसपाट होतील अशी ही मतचाचणी दाखवते आहे. दुसरे म्हणजे त्रिपुराच्या निवडणुका संपल्यावर अमित शहा यांनी सुनील देवधर यांना आंध्र आणि तेलंगणा या दोन राज्यात प्रभारी म्हणून पाठवले म्हणजेच 2019 ची निवडणूक अमित शहा यांनी किती गंभीरपणे घेतली आहे याचा अंदाज करता येतो म्हणूनच उत्तर प्रदेशातील संभाव्य नुकसान गृहीत धरून सुध्दा या मतचाचणीत भाजपच्या स्वतःच्या 250 च्या आसपास जागा दाखवल्या आहेत. त्याच प्रमाणे अखिलेश आणि मायावती यांचे संभाव्य गठबधन होईलच असे मायावती यांचा लहरी स्वभाव पाहता शक्य होईलच असेही नाही.त्यामुळे ज्यांना कुणाला भाजपचा पराभव करायचा आहे त्यांना अमित शहा यांच्या कार्यपद्धतीचा अतिशय गंभीरपणे अभ्यास करणे भाग आहे.नुसतेच हात उंचावून किंव्हा मोदी आणि संघाला शिव्या घालून मोदी शहा यांचा पराभव करणे शक्य नाही.

    ReplyDelete