Monday, October 1, 2018

ब्राह्मण ब्युरोक्रासी

अर्थात सनातनी पुरोगामीत्व
संबंधित इमेज

पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या शतकातल्या ग्रंथात सापडला होता. कुठलीही राजव्यवस्था वा प्रस्थापित साम्राज्य कसे खिळखिळे होत जाते, त्याचा खालदूनने एक सिद्धांत मांडलेला आहे. त्यानुसारच कॉग्रेसचा र्‍हास झालेला आहे. मात्र अशा खिळखिळ्या झालेल्या व्यवस्थेला कोणी बाहेरचा आव्हान देणारा उभा रहातो आणि धक्का देतो, तोपर्यंत तीच सडलेली व्यवस्था चालू रहाते, असे खालदून म्हणतो. तेच इथेही झाले. कॉग्रेस वा तथाकथित पुरोगामी युपीएला अडवाणी वा भाजपाचे तात्कालीन वरीष्ठ नेतृत्व धक्का देऊ शकत नव्हते. कारण तेही त्याच प्रस्थापित व्यवस्थेचा भागच होते. सत्ता कुणाही व्यक्तीची वा पक्षाची येवो, व्यवस्था तीच तशीच कायम होती. नोकरशाही तीच होती आणि तिच्यावर हुकूमत गाजवणारी बौद्धिक सत्ताही तशीच्या तशी होती. तिला जनता सरकार आल्याने वा वाजपेयी सरकार आल्याने कुठला धक्का लागलेला नव्हता. लागण्याची शक्यताही नव्हती. पण मोदी मैदानात आल्यावर एक एक करून हे पडद्यामागून हुकूमत चालवणार्‍या अदृष्य शक्ती उजागर होऊ लागल्या. शाहू महाराजांनी त्याला ‘ब्राह्मण ब्युरोक्रासी’ आसे नाव दिले आहे, त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. इंटेलेक्चुअल क्लास वा सिव्हील सोसायटी असे जे चमत्कारीक शब्द आपण ऐकत असतो, त्यालाच शाहू महाराज ‘ब्राह्मण ब्युरोक्रासी’ म्ह्णतात. त्याचा अर्थ ब्राह्मण जातीचे वर्चस्व असा अजिबात नाही. त्याचा अर्थ आपणच बुद्धीमान आहोत आणि जगातले वा व्यवस्थेतील काय चांगले वा वाईट आहे, ते ठरवण्याचा परस्पर अधिकार हाती घेऊन बसलेले स्वयंघोषित विचारवंत, म्हणजे ब्राह्मण ब्युरोक्रासी असते. त्यात जन्माने ब्राह्मण असलेल्याचा शाहू महाराजांच्या कालखंडात भरणा होता. आज त्यात विविध जातींचा व त्यात जन्म घेऊन तिथपर्यंत पोहोचलेल्यांचा भरणा आहे.

हे लोक ग्रीक समाजात वा अगदी अलिकडल्या काळात सोवियत वा पाश्चात्य समाजातही दिसतील. उदाहरणार्थ युरोपियन युनियन वा राष्ट्रसंघ म्हणून जगावर आपल्या इच्छा लादणारे नोकरशहा म्हणजे ब्युरोक्रासी असते. आपल्या सोयीनुसार हे लोक व्याख्या वा नियम बदलत असतात व लादतही असतात. अशांना शरण जाणार नाहीत, त्यांना शत्रू वा पापी घोषित करण्याचे अमोघ अस्त्र त्यांनी हाती धारण केलेले असते. ते त्यांना जनतेने दिलेले नसते वा कोणी अधिकृत केलेले नसते. तुमच्या मनातील हळवेपणा वा चांगुलपणाचे भांडवल करून अशी मंडळी कुठल्याही प्रस्थापित व्यवस्थेवर आपली हुकूमत निर्माण करीत असतात. राजे रजवाडे वा सुलतान बादशहांच्या जमान्यातही तुम्हाला त्यांची असली हुकूमत दिसून येईल. जेव्हा प्रस्थापित राजकीय सत्ता त्यांना झुगारून लावते तेव्हा आपले अस्तीत्व, महत्व टिकवायला हेच लोक कुठल्याही नियमाला वाकवून अर्थ व आशय बदलूनही टाकतात. बाबासाहेब आंबेडकर हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. आज प्रत्येक क्षणी कॉग्रेसवाले उठसुट बाबासाहेबांची घटना वा विचारांचे हवाले देताना दिसतील. पण बाबासाहेब हयात असताना त्यांना लोकसभेत निवडून येण्यात सर्वाधिक अडथळे त्यांनीच आणलेले आहेत. मुंबई महापालिकेतर्फ़े बाबासाहेबांचा सत्कार करण्यात हेच मांजर आडवे गेलेले आहे आणि त्यांच्याच स्मारकासाठीचे तात्कालीन प्रस्ताव मुंबई महापालिकेत फ़ेटाळण्याचे पाप कॉग्रेसनेच केलेले आहे. मात्र आज सत्तेसाठी व आपली थोरवी टिकवण्यासाठी तेच कॉग्रेस विचारवंत वा भाट अगत्याने उठसुट बाबसाहेबांच्या वक्तव्ये व विचारांचे हवाले देताना दिसतील. त्यालाच शाहू महाराज ‘ब्राह्मण ब्युरोक्रासी’ म्हणतात. आजच्या जमान्यात तीच सिव्हील सोसायटी असते. जोपर्यंत अशी ब्युरोक्रासी पाठीशी असते, तोवर जनमानसावर हुकूमत राखायला सत्तेला मदत होत असते आणि त्याच ब्युरोक्रासीला संपवल्याशिवाय खरेखुरे परिवर्तन होऊ शकत नसते.

महाराष्ट्रात पेशवाई संपुष्टात आली किंवा बंगालमध्ये त्या काळात सिराज उद दौलाची सत्ता निकालात निघाली, तेव्हाही असा वर्ग सर्वात प्रथम नव्या सत्तेला शरणागत झालेला आढळून येईल. मात्र जोवर त्यांना जुनी सत्ता टिकण्याची आशा असते, तोपर्यंत हे त्या कालबाह्य सत्तेला टिकवण्य़साठी आपली बुद्धी पणाला लावत असतात. आता मोदी विरोधात उठणारी वादळे, पुरस्कार वापसी इत्यादी घटना त्याचीच उदाहरणे आहेत. नुसते पुरोगामी पक्ष वा त्यांची विचारसरणी कालबाह्य झालेली नाही, तर सामान्य जनमानसावर असलेली त्यांची हुकूमतही संपुष्टात आलेली आहे. लोक मागल्या मतदानात मोदींच्या मागे गेले, ते नुसती आश्वासने आवडली म्हणून नाही. तर लोकांना कॉग्रेस व तिला मान्यता देणार्‍या या ब्युरोक्रासीला संपवायचे होते. ते काम अल्पावधीत शक्य नाही. काही प्रमाणात मोदींनी त्याला हात घातलेला आहे. पण पुन्हा मोदी निवडून आले, तर मात्र ही ब्युरोक्रासी संपणार आहे. यापैकी अनेकजण नव्या व्यवस्थेत आपले स्थान पक्के करण्यासाठी वेगवेगळी कारणे व मिमांसा शोधू लागतील. आजही त्यातले बहुतेक कॉग्रेसला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी झगडत आहेत. त्याचे कारण पुरोगामी विचारसरणी असे काहीही नसून, त्यांना आपले प्रस्थापित स्थान टिकवून ठेवायचे आहे. पण त्याचा उपयोग होणार नाही. २०१९ सालात पुन्हा मोदी सत्ता संपादन करतील, त्यानंतर हळुहळू या प्रस्थापिताला शेवटचे हादरे बसू लागतील. ती नामशेष होत जाईल आणि त्यातले अनेकजण मोदी अर्थशास्त्र, मोदी राज्यशास्त्र वा मोदी विचारधारा यांची नव्याने मांडणी सुरू करतील. सहाजिकच ती नव्या युगाची नवी ब्युरोक्रासी असेल. कुठलीही जुनी व्यवस्था मोडकळीस येऊन संपते, तेव्हा त्याच्याजागी येणारी नवी व्यवस्था प्रस्थापित होत असताना, नवे दुर्गुण घेऊनच येत असते आणि आपोआप प्रतिगामीच होत असते. आज ज्याला पुरोगामी म्हणतात तेच मुळात प्रतिगामी झालेले आहे.

कुठल्याही व्यवस्थेत तिची प्रबळ बाजू निरूपयोगी ठरू लागली, मग ती बोजा होत असते. त्याचा आधार घेऊन ती व्यवस्था टिकू शकत नसते, तर त्याच बोजामुळे ती व्यवस्था दबून चिरडून जाण्याची स्थिती निर्माण होत असते. आज नेहरूंचे नाव पुसले जाते आहे आणि त्यांच्या कर्तबगारीच्या खाणाखुणा नष्ट केल्या जात आहेत, असा ओरडा सातत्याने ऐकू येत असतो. त्या खाणाखुणा मुळातच कशाला हव्यात, याचा खुलासा कोणी देऊ शकत नाही. कधीकाळी राजेशाही थाट असलेले राजवाडे वा किल्लेही आज अवशेष होऊन राहिले आहेत. त्यांची तशी दुर्दशा कोणी केली? जुन्या पराक्रमाच्या खुणा खरेच इतक्या महत्वाच्या असतील, तर नेहरूपर्वाच्या आधीच्याही इतिहासाची तितकीच जपणूक व्हायला नको काय? पण तशी ओरड करणारी त्या त्या काळातील ब्युरोक्रासी आज शिल्लक नाही. जी ब्युरोक्रासी कशीबशी टिकून आहे, तिला नेहरू युगापेक्षाही आपल्या अस्तित्वाच्या चिंतेने भेडसावून टाकलेले आहे. मोदी हे कॉग्रेस समोरचे स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात मोठे आव्हान आहे, असे तेव्हा़च कॉग्रेसनेते जयराम रमेश यांनी म्हटलेले होते आणि पाच वर्षापुर्वी मी तशी स्पष्ट कल्पना माझ्या पुस्तकातून मांडलेली होती. मोदी यांचे राष्ट्रीय राजकारणातील पदार्पण किंवा मिळणारे यश, हे नुसते सत्तांतर नसेल, ती नेहरू युगाच्या शेवटाची सुरूवात असेल, असेही मी तेव्हा़च नमूद करून ठेवलेले होते. पण ज्याला नेहरूवादी ब्युरोक्रासी असे मी म्हणतो, त्यांना आपल्या मस्तीतून जाग यायलाही चार वर्षे खर्ची पडलेली आहेत. मोदींना मिळालेले बहूमत हा त्यांना अपवाद, किवा इतिहासातील गफ़लत वाटलेली होती. त्यांच्याच आहारी गेलेल्या कॉग्रेस वा अन्य पुरोगाम्यांनाही म्हणूनच समोरून अंगावर येणारे संकट बघता आले नाही, की समजून घेता आलेले नव्हते. आज दिसत आहेत, ते त्याचे परिणाम आहेत.

17 comments:

  1. अप्रतिम आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण!सलाम आपल्या मांडणीला!राज्यशास्त्राचे अभ्यासासाठी खूपच महत्वपूर्ण!!!!

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर चिंतनीय लेख

    ReplyDelete
  3. अफलातून विश्लेषण . तुम्हाला सलाम.

    ReplyDelete
  4. भाऊ आपले मोदीच का हे पुस्तक मी अनेक वेळा वाचले आहे. आणि त्यातील प्रत्येक शब्द आज खरा ठरत आहे. आपण अजूनही पुरोगाम्यांना शहाणे करण्याचा पदोपदी प्रयत्न करीत आहात परंतु शहामृगी वृत्ती ने वाळूत डोके खुपसून बसलेल्यांना कोण जागे करणार

    ReplyDelete
  5. भक्कम अभ्यासाचा पाया असलेले स्पष्ट आणि परखड लेखन. विषय आणि त्याची मांडणी अत्यंत मौलिक आणि बहुमोल आहे. ह्या लेखाचा पुढे कित्येक ठिकाणी संदर्भ म्हणून उपयोग केला जाईल.

    ReplyDelete
  6. व्वा भाऊ!आपल्या लेखणीला मी त्रिवार कुर्नीसात करतो!
    हा विचार टीकावा,तो वाढावा यासाठी या देशातील ख-या देशप्रेमी प्रत्येक नागरीकांनी रात्रीचा दिवस करुन प्रयत्न करायला हवे!
    यासाठी भाजप पक्ष,त्या पक्षाचे कार्यकर्तेे व नेते यांचेवर केवळ अवलंबुन राहता कामा नये!
    आपल्या प्रत्येकाने ह्या नव्या विचाराचा झेंडा बिनदिक्कत पणे,निडरपणे हाती घ्यावा ही कळकळीची विनंती!
    हा असा झेंडा हाती घेतलेल्या आपल्यावर हे "मोदी भक्त" हे "मोदी प्रचारक"असा शिक्का मारण्याचा प्रयत्न ही ब्राम्हणी ब्युरोक्रशी मोठ्या प्रमाणावर करतील,त्यालाही न घाबरता हे "सतीचे वाण" हाती घ्या मित्रांनो!
    वेळ कमी आहे,आव्हान मोठे आहे!
    "अंधार"फार झाला "अंधार"फार झाला! नरेन्द्र रुपी ,देवेन्द्र रुपी "पणती "जपुन ठेवा,"पणती" जपुन ठेवा"
    अरविंद नळकांडे 9890970628

    ReplyDelete
  7. फार अचूक. मोदी आणि भाजप पुढच्या निवडणुकीत सत्तेवर आल्यानंतरच त्यांना आपल्या पद्धतीने काम करता येईल. त्यांची ती कारकीर्द पाहून त्यांचा कारभार चांगला किंवा वाईट, याचा निष्कर्ष मतदार काढतील. महाराष्ट्रातही हेच चित्र आहे. सध्याचे सत्ताधारी अपघाताने निवडून आले आहेत आणि पुढच्या वेळी त्यांना ते यश मिळेलच असे नाही, या पूर्वानुभवातूनच नोकरशाही निब्बरपणे वागत आहे.

    ReplyDelete
  8. अचूक मांडणी. आज कॉंग्रेसचे जे काय चालूं आहे ती फक्त शेवटची घरघर आहे, आजचे वर्ध्यातील आंदोलन हे त्याचा परिपाक आहे,असेच वाटते.

    ReplyDelete
  9. भाऊ, खरच भारी. पिंजून पिंजून शेवटचा धागा सुद्धा सुटा करावा अशी तुमची मांडणी असते. सलाम!
    श्याम मराठे

    ReplyDelete
  10. सलाम भाऊ तुमच्या अभ्यासाला !

    ReplyDelete
  11. ब्लॉगखाली मोबाईल नंबर द्या. काही गोष्टी लिहीता येत नाहीत त्या फोन वर बरेच लोक तुमच्यशी मोकळेपणी बोलतील

    ReplyDelete
  12. खुपच छान...भाऊ कमाल आहे तुमची

    ReplyDelete