Sunday, October 14, 2018

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

metoo के लिए इमेज परिणाम


‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अभिनेत्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आणि बघता बघता एकेक प्रतिष्ठीत क्षेत्रातली लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली जाऊ लागली. त्याला प्रसिद्धी व पाठींबा मिळतो आहे असे दिसल्यावर अनेकजणी उत्साहाने आपल्यावरील अशा अन्यायाच्या कथा सांगायला पुढे सरसावलेल्या आहेत. वर्षभरापुर्वी अमेरिकेत अशाच रितीने तिथल्या चित्रसृष्टी हॉलिवूडमध्ये होणार्‍या लैंगिक शोषणाच्या कथांची मोहिम रंगलेली होती. आता त्याचेच पेव भारतात फ़ुटलेले आहे. आपण नुसते बोट दाखवले, तरी ज्याचे नाव घेऊ त्याचे धाबे दणाणून जाऊ शकते, अशी खात्री असल्यानेच अनेकजणींना धीर आलेला असावा, यात शंका नाही. अर्थात तनुश्रीमुळे आपल्याला हिंमत आली, असेही अनेकजणींनी सांगितले आहे. पण त्यात खरोखर किती तथ्य आहे, तेही तपासून बघावे लागेल. कारण अशा विकृतीचा गौप्यस्फ़ोट होण्याची ही पहिलीच वेळ नाही. प्रसिद्धीही आताच मिळाली, असेही म्हणायचे कारण नाही. पाच वर्षापुर्वी असाच प्रसंग आला होता आणि त्यात एक निनावी मुलगी गुंतलेली होती. ती आजच्या नामांकित महिलांच्या इतकी प्रसिद्ध व्यक्ती नव्हती. पण गुंतलेला पुरूष नामवंत होता. तेव्हा कोणाला हिंमत कशाला झाली नाही? फ़ार कशाला, त्या निनावी मुलीच्या समर्थनाला यापैकी कोणीच का पुढे आले नाही? असाही प्रश्न विचारला गेला पाहिजे. की आज कोणीतरी ठरवून योजनाबद्ध रितीने ही मोहिम चलावलेली आहे? अशा महिलांचे आरोप वा त्यातील गैरप्रकारांना पाठीशी घालण्याची गरज नसली तरी ही मोहिम असेल, तर त्यातला हेतू नुसत्या गदारोळानेच पराभूत होऊन जाणारा आहे. म्हणूनच यामागची प्रेरणा व घटनाक्रम तपासून बघितला पाहिजे.

आधी तनुश्रीने आरोप केला तेव्हा इतक्या वर्षांनी तिका अक्कल आली काय, असेही प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यातून तशा पिडीतांना भयभीत वा गप्प करण्याचा प्रयत्न असतो, यात शंका नाही. अन्याय कधीही झालेला असो, दाद मागायचा अधिकार चुकीचा मानता येणार नाही. कोणाकडे दाद मागावी आणि कधी मागावी, यालाही अर्थ नाही. अन्याय करून निसटलेला माणूस एकूण समाजालाच धोका असल्याने, तो धोका निकालात निघण्याला महत्व असते. जिच्यावर अन्याय अत्याचार झालेला असतो, तिची कुठलीही भरपाई अशा खटले वा कायदेशीर कारवाईतून होणार नसते. म्हणूनच दहा वर्षे तनुश्री झोपा काढत होती काय, हा प्रश्न गैरलागू आहे. परंतु तिने सुरूवात केल्यावर जितक्या संख्येने महिला पुढे सरसावलेल्या आहेत, त्यांचे आजवरचे मौन वा सहनशीलता थक्क करणारी आहे. कारण यातल्या अनेकजणी माध्यमात पत्रकार म्हणून वावरणार्‍या आहेत. अन्यायाला वाचा फ़ोडण्याची भाषा त्यांनी यापुर्वी अनेकदा आवेशात वापरलेली आहे. मग स्वत:वरील अन्याय निमूट सहन करताना त्यांनी इतरांच्या अन्यायाला फ़ोडलेली वाचा कितपत खरी होती? असा प्रश्न नक्कीच विचारला गेला पाहिजे. आपल्याला मिळणारा पगार, प्रतिष्ठा, अधिकारपद यासाठी त्यांनी हे सर्व सहन केलेले असेल, तर त्यांनाही दोषीच मानले पाहिजे. कारण त्यांचे आदर्श समजून वा अनुकरण करून अनेकजणी अशा श्वापदांच्या पुढल्या शिकारी झालेल्या आहेत वा असणार. नाव किंवा प्रतिष्ठा मिळवण्यासाठी इतकी किंमत मोजावीच लागते, ही मानसिकता त्यातूनच जन्माला येत असते आणि जोपासली जात असते. शिवाय अशा माध्यमातल्या महिला अन्याय सहन करून आवेशपुर्ण लिहीतात, तेव्हा अन्यायच प्रतिष्ठीत होऊन जात असतो. म्हणूनच उलटे प्रश्न विचारणे भाग आहे. प्रामुख्याने ‘टहलका’ वा तरूण तेजपालच्या वेळी अशा महिला कशाला गप्प होत्या, त्याचे उत्तर द्यावेच लागेल.

तरूण तेजपाल हा राजकारणातील बड्या बड्या लोकांचा पर्दाफ़ाश करण्यासाठी प्रसिद्ध झालेला होता. त्याने शक्यतो तेव्हा सत्तेत असलेल्या भाजपाच्या नेत्यांना उघडे पाडण्याची मोहिम चालविली, हे आपल्याला ठाऊकच आहे. त्यातून हा सामान्य पत्रकार एक मालकीचा माध्यम समूह सुरू करू शकला. त्याला राजकारणातील व उद्योग क्षेत्रातील अनेकांनी कोट्यवधी रुपयांच्या देणग्या दिल्या व गुंतवणूकही दिलेली होती. त्याची ती राजकीय मोहिम होती आणि त्यानेच आपल्या संस्थेतील मुलीचे लैंगिक शोषण केलेले होते. पण त्या मुलीला त्याचवेळी तक्रार करता आली नव्हती. पण जेव्हा तिथून सुटका झाली, तेव्हा तिने रितसर संस्थेच्या म्होरक्यांकडे दाद मागितली होती. त्याचे पुढे काही झाले नाही, तेव्हाच माध्यमातल्या अन्य मित्रांकरवी आवाज उठवला होता. त्यावेळी तेजपालच्या विरोधात भक्कम पुरावेही जमा झाले होते. पण दिल्लीतील कुठलाही मान्यवर पत्रकार संपादक त्या पिडीतेच्या बाजूने उभा ठाकला नव्हता, की तेजपाल विरोधात आवाज उठवायला कोणी राजी नव्हता. जेसिका वा आरुषी या मुलींच्या हत्येविषयी आवाज उठवणार्‍या नामवंत महिला पत्रकारही गप्प होत्या. सवाल इतकाच आहे, की यापैकी कोणी तेजपालच्या अत्याचार विरोधात पुढे का आलेले नव्हते? त्यांचे आक्षेप तेजपालच्या विरोधात नसतील. पण आपापल्या जागी त्याही पिडीताच होत्या ना? त्याला आता पाच वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे. इतका काळ ही शांतता कशाला होती? तनुश्रीची घटना दहा वर्षे जुनी आहे. तेजपाल प्रकरण अगदी ताजे होते आणि माध्यमातले व महिला पत्रकाराचेच होते ना? पण ती निनावी मुलगी होती आणि सर्वकाही चालून गेलेले होते. त्यात तेजपालच्या ईमेल व मोबाईल मेसेज बघितले तर हा प्रकार एकूण माध्यमात किती सरसकट होता वा आहे त्याचीच साक्ष मिळते. मग सर्वत्र शांतता कशाला होती?

एका मराठी वाहिनीच्या आरंभ काळात महत्वाच्या पदावरील महिलेने संपादकाला थप्पड हाणून नोकरी सोडल्याच्या वार्ता आठ वर्षापुर्वी कुजबुजल्या जात होत्या. एका महिलेने अलिकडेच अशाच एका ज्येष्ठ संपादकावर ‘प्रकाशझोत’ टाकलाय. अर्थात त्यात नवे काहीच नाही. दिर्घकाळ सर्व उद्योग क्षेत्रामध्ये हेच राजरोस चाललेले असते,. जिथे सत्तेची मस्ती चढते आणि अधिकाराचा माज येतो, तिथे दुबळ्यांना तुडवण्यात मर्दुमकी शोधली जात असते. त्यात महिला ही भावना व लाजलज्जेसाठी अधिक दुबळी असते. त्यामुळे तिचे शोषण अधिक होत असते. पण ते करणार्‍यात समाजातील प्रतिष्ठीतांचा असलेला पुढाकार नेहमी लपवला जातो. झाकला जातो. आज पत्रकारितेतून मंत्रीपदापर्यंत पोहोचलेला एक माजी संपादक, अकबर कचाट्यात सापडलेला आहे. बाकीच्या क्षेत्रातल्या प्रत्येकाचे चरित्र तपासणार्‍यांना आपल्या क्षेत्रात माजलेले अराजक व चाललेले अत्याचार कधीच दिसले नसतील? ज्या गतीने डझनभर महिलांनी अकबर यांच्यावर आरोप केलेत, ते घडत असताना आसपास बसलेले वावरणारे पुरूष पत्रकार मुर्दाड होते काय? त्यांनी आपल्याच हातांनी आपल्या ‘अविष्कार’ स्वातंत्र्याला नख लावलेले होते काय? सरकारने वा कोणा राजकारण्यांनी धककाबुक्की केली तर ज्यांचे नाजुक अविष्कार स्वातंत्र चकनाचुर होऊन जाते, ते अकबरसारखा संपादक आजुबाजूला सहकारी महिलांचे शोषण करीत असताना कुठल्या गुंगीत झोपा काढत पडलेले होते? हा नुसता महिला अत्याचाराचा विषय नाही, तर तो अविष्कार स्वातंत्र्याचाही विषय तितकाच आहे. ज्यांना आपल्या जगण्यातले गुन्हे दोष मांडण्य़ाची हिंमत होत नाही, ते रोजच्यारोज इतरांच्या नाक पुसण्यावरही टिकाटिप्पणी करीत असतात. यातले पुरूष तितकेच महिला पत्रकार गुन्हेगार आहेत. त्यांना न्यायावर बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार शिल्लक उरतो काय?

खेड्यातल्या कुठल्या महिलेचे वा बकाल वस्तीतल्या गरजू महिलेचे शोषण रंगवून सांगणार्‍यांना, आसपासचे शोषण टोचतही नसेल? कठुआ किंवा उन्नावच्या बालिकांवर बलात्कार झाल्यानंतर टाहो फ़ोडणार्‍यांमध्ये यातल्या किती महिला होत्या? त्या मुलींना वाचवू शकेल असा कोणी सभ्य सत्प्रवृत्त माणूस जवळ नव्हता. कदाचित असे बलात्कार होतात, तिथे शस्त्रधारी हल्लेखोर गुन्हेगार असतात. जीवाच्या भयाने त्या बाहूबलींसमोर कोणाची हिंमत होत नसेल. पण तशी स्थिती सार्वजनिक जीवनात वा चित्रसृष्टी वा माध्यमाच्या क्षेत्रात नसते ना? अकबर वा अन्य कुठला संपादक मालक एखादया पत्रकार महिलेचे शोषण करताना हातात पिस्तुल घेऊन उभा नसतो किंवा त्याच्यापासून कुणाला जीवाचा धोका नसतो. पण हाती पडणारे पैसे, पगार वा बढती-वाढ यांची लालूच नक्की असते. तिला शरण जाणे किंवा त्याचीच दहशत मान्य करून अशा शोषणाकडे काणाडोळा करणे, हे प्रतिष्ठीत झालेले आहे. म्हणून पाच वर्षापुर्वी तेजपाल प्रकरणानंतर कुठल्याही महिला पत्रकाराने तोंड उघडले नाही. अन्य पुरूष पत्रकारांनी आपल्या आसपासच्या नरकातही नाकाला रुमाल लावून टेंभा मिरवला. उन्नाव कठुआचे बलात्कारी निदान सामान्य दर्जाचे गुन्हेगार होते. इथे एकाहून एक प्रतिष्ठीतांची लक्तरे समोर आलेली आहेत. त्यातही संतापाची गोष्ट म्हणजे, हे सगळे दिवसरात्र पावित्र्य चारित्र्याचा टेंभा मिरवणारे आहेत. आज आठवते, कुणाला? याच पत्रकार व महिलांनी कोब्रा पोस्ट वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या ध्वनीमुद्रीत संभाषणाचा आधार घेऊन नरेंद्र मोदी व अमित शहांवर महिलांवर पाळत ठेवण्याविषयी गलिच्छ आरोप झाल्यावर खुलासे मागण्यासाठी अखंड तपस्या केलेली होती. पण त्यापैकी एकालाही आपल्याच घरात व्यवसायात चाललेले लैंगिक शोषण बघूनही आवाज उठवण्याची हिंमत झालेली नव्हती. जेव्हा अशी माणसे सुसंस्कृत मानली जातात तेव्हा संस्कृती रसातळाला जायला पर्याय उरत नाही.

सगळ्या संस्कृती ह्या आजही लिंग आणि योनीच्या भोवतीच घुटमळत राहिल्या आहेत. माणसाने अंगावर कपडे घातले तरी तो सामान्य पशूसारखा आतमधून पुरता नंगा आहे. आपला हिडीस पाशवी चेहरा खराखुरा असला तरी तो लपवण्यासाठी त्याला कपडे परिधान करावे लागतात. झाकलेले लिंग ही आपली संस्कृती झाली आहे. तेच खरे पाप आहे. अन्य कुठल्या पशू वा जनावरला आपले लिंग वा योनी लपवावी लागत नाही. कारण त्यांना संस्कृतीच नसते ना? नागडेपणा लपवणे हा आपले पशूरुप झाकण्याचा मुखवटा होऊन गेलेला आहे. त्याच्याआड अस्सल पशू कायम दबा धरून बसलेला असतो. कधी तो शब्दातून, हावभावातून डोकावत असतो आणि तितक्याच आवेशात संस्कृतीच्या गप्पाही ठोकत असतो. संस्कृती इतरांसाठी असते. इतरांनी पाळायची असते आणि आपल्यातला पशू झाकून शिकारीसाठी सावजाचा शोध कायम चालू असतो. श्वापद जितके मोठ्या अधिकारपदावर तितकी सावजे अधिक आणि शिकारीची क्षमताही अधिक असते. मग त्यातून सावजे सहजगत्या हाती यावे म्हणून विविध युक्ती योजल्या जात असतात. पावित्र्याचा चारित्र्याचा डंका पिटून अदृष्य साखळदंडांनी सावजांना बंदिस्त केले जात असते, तर कधी आमिष दाखवुन सापळ्यात ओढले जात असते. जंगलातल्या त्या झेब्रा वा रानरेड्याची शिकार झाल्यावर चाललेली लांडगेतोड बाकीचे रेडे झेब्रे निरभ्र मनाने बघतात, तसे आपण सभ्य लोक शिकारीचे लचके तोडणे बघत बसतो. बळी गेलेल्याविषयीची कणव शून्य असते आणि आपण बळी नाही, याचा आनंद मोठा असतो. निसटण्यातले स्वातंत्र्य आपण मनसोक्त उपभोगत असतो. किंवा आपल्यापाशी तितकी शिकारीची संधी नाही म्हणून मनातल्या मनात चरफ़डतही असतो. कायदे नियमातली सुरक्षा पुरेशी म्हणून सुखातही असतो. ही संस्कृती व कायद्याचे राज्य अधिक घातक होऊन गेलेले आहे ना?

दोन आठवड्यापुर्वी अमिताभ बच्चनच्या करोडपती कार्यक्रमात प्रकाश आमटे सहभागी झाले होते. तिथल्या गप्पा करताना त्यांनी अगत्याने अमिताभला एक मोठी गोष्ट सांगितली. दोनतीन दशके त्यांचा वावर चंद्रपूर गडचिरोलीच्या जंगलात आहे. तिथे त्यांनी वाट चुकलेली जनावरे श्वापदे प्राणी संभाळलेले आहेत. ते एकमेकांशी अत्यंत गुण्यागोविंदाने नांदतात. त्यावरच्या गोष्टी सांगून ऐकून झाल्यावर अमिताभ प्रश्नाकडे वळणार असताना, प्रकाश आमाटे यांनी आणखी एक गोष्ट मुद्दाम सांगायला हवी म्हणून कथन केली. ते म्हणाले, इतक्या वर्षात त्या आदिवासी वस्त्यांमध्ये कुठल्या घरात चोरी दरोडा पडल्याचे ऐकायला मिळाले नाही आणि बलात्काराची एकही घटना घडलेली नाही. हा किस्सा इथे इतक्या अगत्याने सांगण्याचे कारणही तसेच आहे. मध्यंतरी त्याच डॉ. आमटे पतीपत्नीवरचा मराठी जीवनपट निर्माण करण्यात आलेला होता आणि त्यातली प्रकाशजींची भूमिका नाना पाटेकरने साकार केलेली होती. मी तो चित्रपट बघितलेला नाही. पण आता एक प्रश्न पडतो, की पटकथा लेखकाला वा आपली भूमिका करणार्‍याला डॉ. प्रकाश यांनी ती मोठी अग्रगण्य वस्तुस्थिती चित्रपट निर्मितीपुर्वी सांगितली नव्हती का? असेल तर त्याचा इवला परिणाम त्या कथानकावर झाला असता ना? ज्यांना मागास पिछडे म्हणतो, ते किती सभ्य आहेत आणि जे सभ्य सुसंस्कृत म्हणून सदोदित मिरवत असतात, ते किती सैतान असतात ना? मग पुराणातल्या भाकडकथेतला मायावी राक्षस आठवतो. तो आकर्षक मोहात टाकणारे रुप घेऊन यायचा म्हणे. मग आज अनेक जे राक्षस म्हणून समोर येत आहेत, त्याही भाकडकथा आहेत की सभ्य समाजातल्या पुराणकथा आहेत? हे नियम ज्यांनी बनवलेले आहेत आणि तेच मोडणारेही सभ्य लोक आहेत. आदिवासी मागासांची संस्कृती इतकी रोगट वा विषारी व माणूसच जिवंतपणी मारून टाकणारी नसते. कारण माणूस म्हणजे मन असते आणि सभ्य समाजात मन मारून जगणे आता जीवन होऊन गेलेले आहे. सभ्यता, संस्कृती, प्रतिष्ठा हा हिडीस चेहर्‍यावरचा मुखवटा होऊन गेलेला आहे.


6 comments:

  1. ज्यांना शीलरक्षणापेक्षा पगाराचा पैसा महत्वमह वाटतो, अशांविषयी सहानभसहा र्निमाण होते अवघड आहे. उपरोल्लेखित घटनांमध्ये जबरदस्ती किंवा बलात्कार झाला नव्हता.

    ReplyDelete
  2. आदिम आदिवासी जमातीमध्ये बलात्कार लैंगिक शोषणाच्या घटना अगदीच नगण्य असतात.स्त्रीपुरुषांनी कितीही अवयव झाकून ही विकृती संपणारी नाही.झाकलेल्या अवयवांचे कुतूहल निर्माण होते आणी त्या कुतुहलातूनच विकृती जन्माला येत असते.जुन्या प्राचीन मंदिरांवरही स्त्रीपुरुषांच्या लैंगिकतेचे शिल्प बघायला भेटतात.

    ReplyDelete
  3. Bhau, Sundar vishleshan.Aacharan changale, shuddha asel tar samaj gunya govindane rahu shakel.

    ReplyDelete
  4. एकच नंबर सर
    माणूस माणूसकी हा धर्म आणि आपली संस्कृती जपण्याच्या ऐवजी माणसातील विकृती आवेगाने वाढत चालली आहे.(जनावरे एकवेळ परवडली)

    ReplyDelete
  5. भाऊ, एक मला वाटत ते लिहितो.

    अमेरिकेमध्ये हार्वी वाईस्टीन चा जो प्रकार झाला त्यामध्ये सगळ्या पिडीत स्त्रिया खूप वर्षांनी पुढे आल्या याचं कारण तो हार्वी हॉलीवूड मध्ये राजा होता आणि कोणाचही करियर बरबाद करू शकत होता (आता यामध्ये जे लोकं "म्हणजे बायकांना अब्रू पेक्षा पैसा महत्वाचा होता" वगैरे प्रश्न विचारतात ते चूक आहे).

    आता आपण जरा तनुश्री दत्ता कडे बघूया. (हार्वी आणि त्याच्या पिडीत स्त्रिया यांच्या मधल्या फरकाला अनुसरून).

    १. तनुश्री जेव्हा हे प्रकरण झालं असा दावा करत आहे (२००८) तेव्हा ती आतापेक्षा सुद्धा जास्ती प्रसिद्धं होती.
    २. या प्रसिद्धी मुळे पत्रकार त्याचवेळी या प्रकरणाला हवा देऊ शकले असते (इथे मी असं गृहीत धरतोय कि पत्रकार आणि पोलिस सामान्य माणसाला किंमत देत नाहीत)
    ३. तनुश्री ज्यांच्यावर आरोप करत होती ते लोकही २००८ साली अगदी च किंमत नसलेले होते आणि आता खूप प्रसिद्ध आहेत असं नाहीये. त्यामुळे तनुश्री नि त्यांच्याविरुद्ध आवाज उठवला असता तर त्यावेळी सुद्धा असाच गोंधळ उडाला असता.
    ४. तिने ज्या व्यक्तींवर आरोप केले आहेत ते चित्रपट सृष्टीत मोठे असले तरी हार्वी सारखे राजे नाहीयेत कि ठरवून कोणाचं करियर बरबाद करू शकतील.

    माझा दुसरा मुद्दा असा आहे कि एखादी स्त्री १०-२०-३० वर्षांनी आरोप करत असेल तर तिला हा प्रश्न कोणीही विचारू शकत नाही कि तू इतके वर्षं झोपली होतीस का? पण मग भाऊ इतक्या वर्षांनी पुरावे दोन्ही बाजू कश्या सदर करणार?

    आणि गुन्हा सिद्ध न होताच अश्या लोकांना गुन्हेगार कसं ठरवणार. आताच तनुश्री ने आरोपींची नार्को आणि ब्रेन मापिंग करा असं म्हटलं आहे. मग त्याच न्यायनी तिच्या सुद्धा या चाचण्या का करू नयेत. ज्या प्रकारे आरोपी अजून दोषी सिद्ध झाले नाहीत त्या प्रमाणे तनुश्री चे हे आरोप खरे आहेत हे तरी कुठे सिद्धं झालं आहे?

    ReplyDelete