गुरूवारी संध्याकाळी डॉक्टरांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाची घोषणा केली. मागल्या काही दिवसांपासून अटलजी रुग्णशय्येला खिळलेले होते. आणि त्याच्याही आ्धी दिर्घकाळ ते विस्मृतीच्या विकाराने ग्रासलेले होते. म्हणजे त्यांचेच निकटवर्तिय जवळ आले असूनही त्यांना ओळखणे शक्य राहिलेले नव्हते. अटलजीच नव्हेतर त्यांचे समकालीन व सहकारी माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फ़र्नांडीसही त्याच व्याधीने ग्रासले आहेत. यापेक्षा नियतीने केलेला अन्याय कुठला असू शकतो? ज्यांच्याकडे स्वातंत्र्योत्तर काळातले इतिहास पुरूष म्हणून आजच्या पिढीने बघावे, त्यांनाच विस्कृतीच्या व्याधीने ग्रासावे, हा खरोखरच क्रुर खेळ होता. पण ती वस्तुस्थिती आहे. कुठल्याही भावनाशील मनाला पटत नसले, म्हणून वास्तव बदलत नसते. जाणिवा व भावनांनी असहकार पुकारलेले आयुष्य, हा अटलजींसारख्या कविमनाच्या व्यक्तीसाठी क्रुर खेळच होता. पण जगण्यातले सगळेच निर्णय कुठे माणसाच्या हाती असतात? भारतीय राजकारणात आरंभीची सहा दशके सक्रीय सहभागी असलेले अटलजी, हे पंडित नेहरूंच्या नंतरच्या पिढीतले. इंदिरा युगातले दिग्गज विरोधी नेते म्हणून अटलजींची खास ओळख देता येईल. कारण स्वातंत्र्योत्तर काळात जे राजकारण सुरू झाले, त्यात कॉग्रेसी मतप्रवाहाशी जुळतामिळता नसलेला नवा प्रवाह सुरू झाला. त्याचा आरंभापासूनचा चेहरा म्हणून वाजपेयींची ओळख राहिली. म्हणूनच इंदिरायुगाचे वा नेहरू नंतरचे दिग्गज नेते म्हणून त्यांच्याकडे बघावे लागते. किंबहूना नेहरू युगाचा अखेरचा उदारमतवादी नेता म्हणूनही त्यांच्याकडे बघावे लागेल. मात्र जगाचा निरोप घेताना त्यांनाच आपली ओळख नसावी, हे त्यांच्याइतकेच भारतीय समाजाचे दुर्दैव आहे. ज्याने अणूस्फ़ोटाचा धाडसी निर्णय घेतला, त्याच्या आयुष्याचा निर्णय आज त्याच्याच हाती नव्हता ना?
स्वातंत्र्य चळवळीने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि आजचा जगातला एक महान देश नव्याने जन्माला आला. त्या चळवळीशी कुठलीही नाळ नसलेला जनसंघ नावाचा नवा पक्ष उदयास आला. तसे अनेक राजकीय पक्ष स्थापन झाले व इतिहासजमाही झाले. पण जनसंघाला भारतीय जनता पक्ष म्हणून नव्याने पुनर्जिवीत करण्यात आले. त्याचे नेतृत्व अटजींकडे होते. हा वेगळा राजकीय मतप्रवाह होता. त्याला सोडूनही अनेक बिगरकॉग्रेसी राजकीय पक्ष भारतात होते आणि आहेत. पण त्या प्रत्येक पक्षाची भूमिका मुळातच कॉग्रेसचा दुरचा नातलग किंवा वारस अशीच होती. जनसंघ त्याला अपवाद होता. स्वातंत्र्यपुर्व काळातील हिंदु महासभेशी त्याची नाळ थोडीफ़ार जोडता येईल. पण कॉग्रेसला समांतर जाणारा स्वातंत्र्योत्तर काळातील जनसंघ, भाजपा हा एकमेव वेगळा राजकीय मतप्रवाह होता आणि वाजपेयी त्यात आरंभापासून सहभागी झालेले होते. त्या विचारधारेला भारतीय जनमानसात भक्कम पाय रोवून देणारी मशागत आयुष्यभर केलेला नेता, ही त्यांची खरी ओळख आहे. म्हणूनच त्यांच्या आयुष्याला वाजपेयी युग म्हणावे लागेल. इंदिराजी वा अन्य अनेक नेते त्यांचे समकालीन आहेत. पण नेहरू युगानंतर नेहरूंचा वारसा चालवणारे अशी त्यांची ओळख राहिल. वाजपेयींची त्यांच्यापेक्षा वेगळी ओळख म्हणजे, ते नेहरूंच्या विचारधारेचे नसूनही नेहरूकालीन राजकीय शैलीचे वारस राहिले. नेहरू विचारांचे विरोधक म्हणून राजकारणात प्रस्थापित झालेले वाजपेयी, व्यवहारात नेहरू शैलीचे वारस होते. आजच्या कुठल्याही कॉग्रेस नेत्यापेक्षाही वाजपेयी नेहरूंच्या उदारवादाचे अधिक समर्थक होते व अनुयायीही होते. म्हणूनच वेगळ्या विचारधारेचे असूनही कुठल्याही पक्षाच्या नेत्यांना वाजपेयींचे मोठेपण कायम मान्य करावे लागले. आजही नव्या भाजपा पंतप्रधानांची तुलना म्हणूनच वाजपेयींची केली जात असते.
महाभारताचा महानायक भीष्माचार्य होता आणि युद्धात जिव्हारी घात झालेला भीष्माचार्य इच्छामरणी असल्याने इहलोकाचा निरोप घेऊ शकत नव्हता. तर रणांगणात त्याच्यासाठी शरशय्या निर्माण करून तो मृत्यूची प्रतिक्षा करीत राहिला. २००४ सालात देशाचा पंतप्रधान म्हणून बाजूला झालेल्या अटलजींनी पुन्हा कधी व्यावसायिक राजकारणात लुडबुड केली नाही. त्यांची प्रकृती धडधाकट असतानाही त्यांनी कृतीशील राजकारणाकडे पाठ फ़िरवली होती. लोकसभेत ते निवडून आलेले असले तरीही त्यांनी कामकाजात भाग घेतला नाही, की राजकीय निर्णयात पक्षासाठी कुठली ढवळाढवळ केली नाही. अल्पावधीतच त्यांना विस्मृतीच्या आजाराने ग्रासले आणि नंतर एकविसाव्या शतकातील भारताला, आधुनिक राजकीय महाभारतातला भीष्माचार्य अनुभवण्याची पाळी आली. दोनच महिन्यापुर्वी कॉग्रेसचे विद्यमान अध्यक्ष राहुल गांधी अचानक एम्स या इस्पितळात पोहोचले आणि एक मोठा राजकीय तमाशा झालेला होता. रुग्णावस्थेत अनेक वर्षे असलेल्या वाजपेयींना अधूनमधून भाजपाचे विविध नेते जाऊन भेटून येत होते आणि भारतरत्न हा पुरस्कारही त्यांना मोदी सरकारनेच दिला. पण तेव्हाही त्याचा अर्थ उमजण्याच्या स्थितीत अटलजी नव्हते. रुग्णावस्था त्यांचे जीवनशैली झालेली होती आणि अधूनमधून नित्यनेमाने त्यांची डॉक्टरी तपासणी होत असे. दोन महिन्यापुर्वी तसेच त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आणि अचानक राहुल गांधी तिथे प्रकृतीची चौकशी करायला तिथे पोहोचले. जिथे रुग्णाला डॉक्टर्स भेटू देत नाहीत, तिथे अकारण हजेरी लावून राहुलनी आपल्यालाच अटलजी व त्यांच्या प्रकृतीची अधिक आस्था असल्याचा देखावा निर्माण केला. मग भाजपा नेत्यांची पळापळ झालेली होती. राहुलनी तिथे पोहोचण्याचे काही अकरण नव्हते, की त्यामुळे बिथरून जाऊन भाजपा नेत्यांनी तिकडे धाव घेण्याची गरज नव्हती. पण तो एक तमाशा झालाच.
राहुल गांधी देखावा निर्माण करण्यासाठीच अवेळी तिथे पोहोचले होते आणि त्यांचा देखावा उघडा पाडण्यासाठी मग मोदी-शहांपासून अन्य भाजपानेहेही तिथे पोहोचले. पण यात कुठेही वाजपेयींविषयी आस्था असण्यापेक्षा राजकारण अधिक होते. अशी नेत्यांची झुंबड त्या व्यक्तीविषयी आदर व्यक्त करण्यापेक्षाही आपापले राजकीय डाव साध्य करण्यासाठी असते. म्हणून तर तेव्हापासून अटलजींची प्रकृती खालावलेली असतानाही, त्याविषयी नंतरच्या दोन महिन्यात कुठलीही बातमी वाहिन्यांवर आलेली नव्हती, की कुठे चर्चाही झाली नाही. दिल्लीतल्या बातम्या सतत मिळणार्या पत्रकार बातमीदारांना गेला आठवडाभर अटलजींची प्रकृती अखेरच्या घटकेला पोहोचल्याची कुणकुण लागलेली होती. मात्र सरकारी वा भाजपा गोटातून त्याबद्दल कुठे कुणाला सुगावा लागू देण्यात आलेला नव्हता. स्वातंत्र्यदिनाचा सोहळा संपण्यापर्यंत माध्यमे वा वाहिन्यांवर त्याची कुठली खबरबात नव्हती. पण बुधवारी हा सोहळा संपला आणि हळुहळू ती बातमी पाझरू लागली. अटलजींना तांत्रिक साधनांनी श्वसनात मदत केली जात आहे. ते लाईफ़ सपोर्ट यंत्रणेवर असल्याच्या बातम्या संध्याकाळी येऊ लागल्या. रात्रीपासूनच एम्स रुग्णालयात नेत्यांची व मंत्र्यांची वर्दळ सुरू झाली. मगच जगाला खरी माहिती समजू लागली. त्याचेही कारण आधीच घडून गेलेल्या तमाशाचे असावे. स्वातंत्र्यदिन सोहळा वा प्रत्यक्षात डॉक्टर वर्गाच्या कामात व निर्णयामध्ये असल्या गलिच्छ राजकारणाने व्यत्यय आणला जाऊ नये, म्हणून ही दक्षता घेतली गेली असावी. आता प्रार्थना करणेच आपल्या हाती असल्याच्या विविध मंत्र्यांच्या प्रतिक्रीया, सत्याची ग्वाही देणार्या होत्या. अटलजींची प्रकृती सुधारण्याच्या पलिकडे गेल्याची त्यातून माहिती मिळत होती. पण आजच्या जमान्यात रुग्णशय्येवर पडलेल्या भीष्माचार्यालाही आपलेच निर्णय घेता येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
सवाल अटलजी पुन्हा पुर्ववत होण्याचा कधीच नव्हता. पण असा भीष्माचार्य हयात आहे, इतकाही दिलासा अनुयायी व पाठीराख्यांना पुरेसा असतो. म्हणून त्यांच्या हयात असण्यासाठी आटापिटा झाला असेल तर नवल नाही. त्यांनी जगाचा निरोप घेतला ही घोषणा डॉक्टरांनी करायची होती आणि डॉक्टर आपले कौशल्य पणाला लावून मृत्यूला पराभुत करायला पराकाष्टा करीतच असतात. म्हणूनच अटलजींनी आपली यात्रा संपवली ह्याची घोषणा करणे औपचारिक होते. पण अशा व्यक्तीच्या बाबतीत हे काम इतके सोपे नसते. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील दिग्गज नेता व राजकीय घडामोडीतला भीष्माचार्य, असेच अटलजींचे स्थान आहे. सहा दशकांच्या प्रदिर्घ राजकारणाचा साक्षिदारच नव्हेतर त्यातला एक सहभागी राजकारणी व सुत्रधार, असे त्यांचे स्थान आहे. म्हणूनच अटलजी आपल्यात राहिले नाहीत, अशी घोषणा करणे डॉक्टरांसाठीही सोपे काम नव्हते. बातमीदार वा माध्यमांसाठी ती एक बातमी असते. पण जेव्हा अशा कुणा व्यक्तीमध्ये कोट्यवधी लोकांच्या भावना गुंतलेल्या असतात, तेव्हा अंतिम स्थितीचा निर्वाळा देणे, निष्णात डॉक्टरांसाठीही अवघड काम होऊन जाते. अनेक कारणासाठी हा आधुनिक भीष्माचार्य भारतीयांना, त्यांच्या चहात्यांना किंवा अनुयायांना हवाहवासा वाटत असतो. तसा त्याचा व्यवहारी सहभाग राष्ट्रीय जीवनात भले उरलेला नसेल. पण त्याचे अस्तित्वही प्रेरणादायी असते. म्हणूनच त्याबद्दल कुठलीही घोषणा परिणामांच्या मापदंडाने मोजून करावी लागते. अटलजी हयात असले किंवा नसले, तरी त्यांनी भारतीय राजकारणाला दिलेली वेगळी दिशा, त्यांना इथल्या इतिहासातले व्यापक स्थान देऊन गेलेली आहे. अनेक नेते इतिहासजमा होतात. पण मोजकेच इतिहासपुरूष असतात. कारण ते इतिहासाची जडणघडण करायला मदतनीस झालेले असतात. भारतीय इतिहासात अटलजींचे तेच स्थान आहे. कारण नेहरूयुग संपल्यानंतरच्या कालखंडातला व नेहरूंच्या विचारधारेला शह देणार्या राजकारणातला, नेहरू शैलीचा तो अखेरचा दुवा होता.
असा नेट होणे नाहि 🙏🙏🙏
ReplyDeleteकालाय तस्मै नमः
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धांजली, खुप महान होते अटलजी
ReplyDeleteमोठी पोकळी निर्माण झालीय.
ReplyDeleteकरुणानिधि
काॅ. सोमनाथ चॅटर्जी
आणि अटलजी
या केवळ व्यक्ती नव्हत्या, एक विचारसरणी, एक ईतिहास होत्या.
त्यांच्या जाण्याने जणू एक अध्याय संपला.
������
Pandit Nehru ani Rahul yanchyavar ha lekh aahe ki Atalji?
ReplyDeleteभाउ तुमच्या सारख्या पत्रकारालाच असे घटनांचे अर्थ कळतात.तुमच खरय राहुलन मुद्दाम तमाशा केल्यावर AIMS मधील सुरक्षा कडक करण्यात आली असेल कारण काल सांगत होते की २ महिन्यात मोदी ८ वेळा भेटुन आले पन खबर बाहेर आली नाही आणि एक आज जे पुरोगामी कांगरेसी वाजपेयींची secular म्हनुन तारीफ करतायत त्यांनी १० वर्षात भारतरत्न का दिल नाही त्यांना? कहर म्हनजे वाजपेयी नशीबवान म्हनायचे की आज मोदी सरकार आहे काॅंगरेसने पुरी व्यवस्थाच केली होती वाजपेयींना स्मृती स्थळी जागा मिळु नये तसा कायदाच केला.कारण सहज आहे कांगरेस मधेतर कोनी नेता नाहीय तिथे स्मारक कराव असा तो कायदा वाजपेयींसाठीच केला होता की यमुनाकाठी आता कोनाच स्मारक होनार नाही काल सांगत होते अटलसाठी अध्यादेश काढावा लागेल पन मोदींपुढे कोनी ब्र काढायची हिंमत करत नाही कांगरेसला वाटत होत की टिम राहुलच सरकार येइल २०१४त तेव्हा सुषमा अडवानी त्यांच्या कांगरेसी मित्रांकडुन वाजपेयींना तेवढा मान तरी देउ शकले असते का ?
ReplyDeleteजितने लोग आज अटल जी के निधन पर दुःखी और उदास दिख रहे है, काश इन्ही लोगों ने अटल जी को बस एक और मौका दिया होता तो देश के हालात ही कुछ और होते लेकिन हम ना तो तब आलु, प्याज, पेट्रोल से ऊपर उठ पाए थे और न अब। हमने तो अटल जी जैसी प्रतिभा को बहुत पहले अपने ही हाथों खो दिया था। आज तो उन्होंने बस देह त्यागी है।
ReplyDeleteसादर नमन 💐
बहोत अच्छे
Deleteभाऊ ग्रेट
ReplyDeleteमौत खड़ी थी सर पर
ReplyDeleteइसी इंतजार में थी
ना झूकेगा ध्वज मेरा
15 अगस्त के मौके पर
तू ठहर इंतजार कर
लहराने दे बुलंद इसे
मैं एक दिन और लड़ूंगा
मौत तेरे से
मंजूर नही है कभी मुझे
झुके तिंरगा स्वतंत्रता के मौके पे ����
�� *कोटि कोटि नमन* ��