Monday, August 20, 2018

खलिस्तानचे भूत

khalistan के लिए इमेज परिणाम

हा लेख लिहीत असताना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी रुग्णशय्येवर अखेरच्या घटका मोजत होते आणि योगायोग असा, की आजच्या पिढीला जितके पुसट वाजपेयी आठवतात, त्यापेक्षाही इंदिराजी वा त्यांच्या कालखंडातील राजकीय घडामोडी कमीच माहिती असू शकतात. इंदिराजी व वाजपेयी ही भारतीय स्वातंत्र्याच्या कालखंडातील नेतृत्वाची दुसरी पिढी आहे. आज तिसर्‍या पिढीच्या नेतृत्वाची राजकीय साठमारी इतकी धमासान चालू आहे, की त्या गदारोळात दोनतीन दशकापुर्वीचा इतिहासही अनेकांना आठवेनासा झाला आहे. मग त्यांना इंदिराहत्या वा त्यानंतर वाजपेयींसारख्या नेत्याचा कोवळ्या राजीव गांधींच्या कॉग्रेससमोर झालेला दणदणित पराभव, कशाला माहिती असू शकेल? दोन खासदारांचा पक्ष बहूमतापर्यंत आला म्हणून भाजपाविषयी बोलले जाते. पण अवघे दोन खासदार लोकसभेत निवडून आले तेव्हा देशामध्ये काय घडत होते; त्याचा तपशील कधी सांगितला जात नाही. मग खलीस्तान म्हणजे नेमके काय, ते कसे माहिती असणार ना? पण योगायोग असा, की त्याच खलिस्तानी संदर्भाने भारतीय राजकारणात वा राजकीय इतिहासात मोठी उलथापालथ घडवून आणली होती. त्याच कालखंडाचा साक्षिदार असलेले वाजपेयी अखेरच्या घटका मोजत असताना, दूर ब्रिटनमध्ये खलीस्तानी प्रवृत्तीचा नवा हुंकार झाला आहे. आज धगधगणारा काश्मिर शांत होता, तेव्हा पंजाब धगधगत होता आणि त्याला वेगळ्या शीख खलिस्तानी राष्ट्राची मागणी कारणीभूत झालेली होती. काही मुठभर शीख फ़ुटीर धार्मिक व राजकीय नेत्यांना फ़ुस लावून पाकिस्तानी हेरखात्याने भारतात हिंसाचाराचे थैमान घातलेले होते. आजही पाश्चात्य देशात आश्रय घेतलेल्या खलीस्तानी अतिरेक्यांनी जो हुंकार काढला आहे, त्याचाही बोलविता धनी पाकची तीच हेरसंस्था आहे. मात्र त्यांना अपेक्षित असलेला प्रतिसाद भारतातील पंजाबातून मिळू शकलेला नाही.

कधीकाळी म्हणजे १९७० च्या दशकात शिरोमणी अकाली दल या शीख राजकीय पक्षाने आनंदपूर साहिब या धर्मस्थानी भरवलेल्या मेळाव्यात एक प्रदीर्घ प्रस्ताव संमत केलेला होता. त्यातल्या अनेक मागण्या किरकोळ स्वरूपाच्या होत्या आणि वादग्रस्त ठरण्याचे काही कारण नव्हते. हरयाणा वा अन्य शेजारी राज्यांना पंजाबच्या नद्यांचे जाणारे पाणी कमी करून अधिकाधिक पाणी पंजाबला मिळावे; हीच त्यातली एक वादग्रस्त मागणी होती. पण त्याची हाताळणी केंद्रातून योग्य झाली नाही आणि त्यातली धुसफ़ुस पुढे राजकीय रौद्ररूप धारण करत गेली. १९७७ सालात आणिबाणी उठवून निवडणूका घेण्यात आल्या, त्यात कॉग्रेसचा दारूण पराभव झाला. त्यामुळे सत्ताभ्रष्ट झालेल्या कॉग्रेसच्या काही नेत्यांनी सत्तारूढ जनता पक्षाला व त्याच्या मित्रपक्षांना हैराण करण्यासाठी त्याच जुन्या आनंदपूर साहिब प्रस्तावाची ढाल पुढे केली होती. त्यातून खलिस्तानचे भूत निर्माण झाले. पंजाबात व केंद्रात सत्तेमध्ये सहभागी असलेल्या अकाली पक्षाला सतावण्यासाठी तात्कालीन कॉग्रेस नेते ग्यानी झैलसिंग यांनी भिंद्रनवाले या माथेफ़िरू धर्मगुरू संताला हाताशी धरले. त्या प्रस्तावाच्या पुर्ततेसाठी आंदोलनाच्या मैदानात आणले. पण ते आंदोलन उभे रहाण्यापुर्वीच जनता सरकार कोसळले आणि पुन्हा कॉग्रेस व इंदिराही सत्तेत आलेल्या होत्या. त्यांच्याच प्रेरणेने भिंद्रनवाले हे भूत उभे राहिले असले, तरी सत्ता मिळाल्यावर इंदिराजी व कॉग्रेस त्या भस्मासुराच्य मुसक्या बांधू शकले नाहीत. दरम्यान त्यात भारतामध्ये आग लावण्याची संधी शोधून पाकच्या हेरखात्याने त्याच खलिस्तानी राजकारणी आगीत तेल ओतायचे काम सुरू केले. खलीस्तान नावाचा भस्मासूर पंजाबला जाळत सुटला. त्याचेच दहन करायला पुढाकार घेतला म्हणून त्याने इंदिराजींचाही एके दिवशी बळी घेतला होता. त्यामुळेच जी सहानुभूतीची लाट निर्माण झाली, तिने तेव्हाच्या लोकसभा मतदानात सगळ्याच विरोधी पक्षांचा पालापाचोळा करून टाकला.

त्या प्रचंड यशाने राजीव गांधींचे युग सुरू झाले आणि त्यातच वाजपेयींच्या भाजपाची धुळधाण उडालेली होती. पण त्याच अफ़ाट मतांच्या दणक्याने पंजाबचा आगडोंब शांत झाला होता. ती आग इतकी भयंकर होती, की संपुर्ण पंजाब लष्कराच्या हाती सोपवावा लागला होता. पण जनतेचा पाठींबा नसलेले ते खलीस्तानच्या मागणीचे आंदोलन लौकरच विझून गेले आणि त्याच काळात पाकिस्तानात वा पाश्चात्य देशात आश्रय घेतलेले अनेक खलीस्तानी अतिरेकी मायदेशी कधी येऊ शकले नाहीत. त्यांच्यापेक्षा वेगळे असे अनेक शीख धर्मीय आधीपासूनच पाश्चात्य देशात वसलेले होते आणि त्यांचाही खलीस्तानी फ़ुटीरतेला पाठींबा होता. ते मेलेल्या सापाचे वळवळ करणारे शेपूट पुन्हा कधी प्रभावी झाले नाही, पण मेलेही नाही. आता त्याचीच वळवळ नव्याने सुरू झाली आहे आणि गेल्याच आठवड्यात अशा काही किरकोळ शीखांनी ब्रिटन वा अन्य पाश्चात्य देशात वेगळ्या खलीस्तानसाठी २०२० सालात उठाव करण्याच्य डरकाळ्या फ़ोडलेल्या आहेत. त्यामागची प्रेरणा अर्थातच पाकिस्तानी असणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मुळातच खलीस्तानचा आगडोंब पेटवून भारताला जखमी व रक्तबंबाळ करण्याचा पाकचा तेव्हाचा डाव फ़सला आणि देशातली सर्वसामान्य जनता एकवटली. तेव्हा पाकला तो उद्योग सोडावा लागला होता. पण विध्वंसक प्रवृत्ती मायावी राक्षसासारखीच असते. तिची अनेक डोकी असतात. तिचे एक डोके ठेचले तर दुसरे डोके फ़णा काढून उभे रहाते. पाकिस्तानच्या राजकीय लष्करी नेतृत्वाचे तसेच आहे. सरळ भारताशी रणमैदानात दोन हात करून विजय मिळवण्याची मर्दुमकी नसलेल्या पाकिस्तानला केवळ घातपाताने व दगलबाजींनेच भारताशी सामना करावा लागत असतो. त्यामुळे खलीस्तानचा डाव १९९० च्या दरम्यान निष्फ़ळ ठरल्यावर पाकने काश्मिरची होळी करण्याचे कारस्थान यशस्वी केले. खलीस्तानची चुल विझलेली राहू दिली. ति्थेच आता पुन्हा धगधग का होऊ लागली आहे?

मोदी सरकार चार वर्षापुर्वी सत्तेत आल्यानंतर आणि तिकडून नवाज शरीफ़ यांनी संघर्षाची कास सोडून भारताशी सहकार्य सुरू केल्याने, काश्मिरातील धगधग कमी होऊ लागली. कितीही अतिरेकी पाठवून व कितीही हिंसाचार करूनही काश्मिरात यश मिळत नसल्याने पाकने आता खलीस्तानची चुल पुन्हा पेटवायचे मनसुबे रचले आहेत. दोन वर्षापुर्वी लालकिल्ला येथून स्वातंत्र्यदिनाचे भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभर परागंदा झालेल्या पाकिस्तानातील बलुची निर्वासितांना मदतीचे वचन दिल्यापासून पाकिस्तानी लष्करी नेतृत्व बेचैन होते. काश्मिरी हिंसाचाराला काटशह देण्यासाठी भारतीय गुप्तचर विभागाने पाकिस्तानातही आगी लावू शकणार्‍या विविध गटांना मदत देणे सुरू केले होते. त्यालाच उत्तर देण्यासाठी पाकिस्तानने खलीस्तानची आग पुन्हा पेटवण्याचा घात घातला आहे. गेल्या रविवारी लंडन येथे खलीस्तानी मागणीचा जो उदघोष करण्यात आला, त्याची ही अशी पार्श्वभूमी आहे. त्यात सहभागी झालेले शीख व भारतीय नगण्य आहेत. त्यांनी जी निदर्शने योजली होती, त्यात शीख वा भारतीयांपेक्षाही पाकिस्तानी व परदेशी लोकांचा समावेश अधिक होता. इतके असूनही त्यांच्या विरोधासाठी तिथेच योजलेल्या भारतनिष्ठांच्या प्रदर्शनाला जास्त गर्दी लोटलेली होती. लंडनच्या ट्राफ़ाल्गार चौकात ही दोन्ही निदर्शने झाली. त्यात संख्याबळाने भारतनिष्ठ अधिक होतेच. पण भारतमातेचा जयजयकार करणार्‍यांच्या त्या गर्दीने वाजवलेल्या ढोलताशांच्या गदारोळात, तथाकथित खलीस्तानी भाषणे व घोषणांचा आवाज विरघळून गेला होता. म्हणून त्याकडे काणाडोळा करता येत नाही दुर्लक्षित ठिणगीही मोठा आगडोंब पेटवून देऊ शकते. म्हणून या खलीस्तानी ठिणगीविषयी भारतीयांना खुप जागरूक रहावे लागणार आहे. भारत सरकारच नव्हेतर तिथे वसलेल्या भारतीयांनी आपापल्या कृतीतून त्याचीच साक्ष दिलेली आहे.

भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्या निदर्शनांबद्दल ब्रिटीश सरकारकडे तक्रार केली आहेच. पण भारतीयांनी त्याच जागी हजेरी लावून फ़ुटीरवृत्तीचा निषेधही लगेच नोंदवला आहे. ही त्यांची जबबदारी असेल. पण इथे भारतभूमीत बसलेले अनेकजण भारतीयांच्या मनात गोंधळ माजवून खलीस्तानी जिहादी वा नक्षली कारवायांसाठी सहानुभूती निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतात. अशा दगाबाज पंचमस्तंभियांच्या भामटेगिरीला रोखण्यासाठी आजच्या पिढीला खलीस्तानच्या रोगट मागणीविषयी जागरुक करणेही तितकेच अगत्याचे आहे. हे खलीस्तानचे भूत नवे नाही. किंबहूना पाकिस्तानने जोपासलेले असले तरी त्यांनी निर्माण केलेले नाही, ब्रिटीशांची राजवट भारतात असतानाच त्याची पहिली लक्षणे दिसलेली होती. १७१० साली म्हणजे तब्बल ३०८ वर्षापुर्वी प्रथमच शीखांनी मुगल साम्राज्यातील सरहिंद नावाचे प्रशासकीय शहर काबीज केले आणि तिथे पहिली शीख राजवट स्थापन केली होती. तिथून मग शीख धर्मसत्तेची कल्पना रुजू लागली. ब्रिटीशांनी भारतातील सर्व राजे बादशहा खालसा करून एकहाती सत्ता आपल्याकडे घेतली, त्यात शीखांचे हे धर्माचे राज्यही संपून गेले होते. पण ती मनिषा वा आकांक्षा संपलेली नव्हती. म्हणूनच स्वातंत्र्याच्या चळवळीला शह देण्यासाठी ब्रिटीशांनीही मुस्लिम लीगपुर्वी शीखांना हाताशी धरण्याचा प्रयत्न केलेला होता. पण तितका प्रतिसाद त्या शीख समाज व धर्मगुरूंचा मिळाला नाही. तेव्हाच ब्रिटीशांनी पाकिस्तानच्या फ़ुटीर मागणीला खतपाणी घालून चालना दिलेली होती. पण त्यातून निसटलेली त्या शीख फ़ुटीरतेची विषवल्ली, काही प्रमाणात भारतामध्ये व परदेशात टिकून राहिली होती. १९८० च्या दरम्यान पाकिस्तानने त्या ठिणगीला ज्वलनशील पदार्थ पुरवला आणि आता त्याचीच पुनरावृत्ती चालली आहे. ‘चौधरी साब’ त्याच कामगिरीवर पाकिस्तानने धाडलेले आहेत. हे चौधरी साब कोण?

चौधरी साब हा पाकिस्तानी लष्करातील लेफ़्टनंट कर्नल पदावरचा गुप्तहेर असून, त्याने अनेक वर्षे आय एस आय ह्या पाक गुप्तहेर खात्यामध्ये काम केलेले आहे. तो अनेक धाडसी कामगिरी बजावलेला अधिकारी असून, अलिकडल्या काही महिन्यात त्याला पाकने पुन्हा खलीस्तानचा आगडोंब पेटवण्याचे आव्हान सोपवलेले आहे. ह्या ताज्या घडामोडीचा बोलविता धनी चौधरी साब असल्याचे सांगितले जाते. अर्थातच पाक हेरखात्याने हीच मोहिम नव्याने हाती घेतलेली नसून, बांगलादेशातील आपले हस्तकही आसाम बंगालमध्ये क्रियाशील केलेले आहेत. काश्मिरातील हिंसाचाराला पायबंद घालण्यात भारत सरकार व लष्कराला यश मिळू लागल्याने पाकिस्तान जास्त विचलीत झाला आहे. त्यांनी विविध नव्या आघाड्या उघडण्याचे काम आरंभले आहे. त्यापैकी खलीस्तान सार्वमताची मागणी व वेगळ्या शीख राष्ट्राची मागणी आहे. म्हणून तर ट्राफ़ाल्गार चौकातील निदर्शनाच्या प्रसंगी मुठभर शीख व अधिक संख्येने पाकिस्तानी तिथे हजर होते. आणखी एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे. या मागणीला अजूनतरी ब्रिटीश राजकारणात यशस्वी मानल्या गेलेल्या कुणा शीख नेत्याचा पाठींबा मिळू शकलेला नाही. पण तिथल्या विविध पाकिस्तानी आणि काश्मिरी फ़ुटीरवादी राजकारण्यांनी पुढे येऊन पाठींबा दिलेला आहे. हे सगळे गट पाकिस्तानी हेरसंस्थेच्या आश्रयाने व पैशानेच चाललात, हे उघड गुपीत आहे. परंतु जितका झटपट भडका आसाम बंगालमधील निर्वासित घुसखोर बांगलादेशींमध्ये उडवता येईल, तितका खलीस्तानची आग लावता येणार नाही, हे पाकलाही पक्के ठाउक आहे. म्हणूनच त्यांनी खलीस्तानसाठी २०२० सालचे उद्दीष्ट ठेवले आहे. पण आसामच्या नागरीक नोंदणीचा विषय तातडीने ऐरणीवर आणला आहे. त्यासाठी डावे पक्ष व ममता उत्साहात पुढे मदतीला धावलेले आहेत आणि त्याचीच प्रतिकृती आपल्याला ब्रिटनमध्येही बघायला मिळते आहे.

ब्रिटनच्या ग्रीन पार्टी या डाव्या चळवळीला राजकारणात फ़ारसे स्थान नाही. पण त्यांच्या एकुलत्या संसद सदस्याने खलीस्तानच्या मागणीला पाठींबा दिलेला आहे. इथेही भारतात सगळे डावे पक्ष वा पुरोगामी नेमके काश्मिरी फ़ुटीरांच्या समर्थनाला उभे रहाताना दिसतात, त्याचे हेच कारण आहे. प्रस्थापित राजकीय व्यवस्थाच खिळखिळी करून टाकणे, हे आता जगभरच्या पुरोगामी व डाव्यांचे एकमेव उद्दीष्ट झालेले आहे. ते विचारधारा वा भूमिकांना तिलांजली देऊन अशा कुठल्याही धर्मांध वा फ़ुटीरतेचे समर्थन करताना दिसू लागले आहेत. खलीस्तान हा भारतासाठी डोकेदुखीचा विषय आहे. कारण बहुतांश शीख लोकसंख्या भारतात असून, त्यांची दाटीवाटी पंजाब प्रांतात आहे. सहाजिकच खलीस्तान म्हणजे शीख धर्मीय राष्ट्राची मागणी म्हणजे भारताचा पंजाब प्रांत देशापासून फ़ोडण्याचे कारस्थान आहे, त्यात शीख लोकसंख्येला आपले स्वतंत्र राष्ट्र ही आकर्षित करणारी कल्पना असली, तरी असे राष्ट्र पाकिस्तानही टिकू देणार नाही. कारण पाकिस्तान हे मुस्लिम धर्माचे राष्ट्र असून त्याला अन्यधर्मीय राष्ट्र नकोच आहे. म्हणून तर आजही पाकिस्तानातून परागंदा होऊन येणार्‍या शीखांची मोठी संख्या असून, त्यांना भारताच आश्रयाला यावे लागत असते. पण राष्ट्रीय संकल्पनेशी वावडे असलेल्या डाव्यांना वा मुठभर शीख धर्मिय नेत्यांना त्याचे भान राहिलेले नाही. मजेशीर बाब डाव्यांच्या खुळेपणाची आहे, पाकिस्तान वा इराणमध्ये इस्लामी राजवटीने उदारमतवाद व डाव्यांचे पुरती कत्तल केलेली असूनही ते अशा फ़ुटीरवादाला खतपाणी घालण्यात धन्यता मानत असतात. खलीस्तान १९८० च्या दशकाइतका पेटवणे पाकिस्तानला आज अजिबात शक्य नाही. पण ठिणगी कितीही सौम्य वाटली तरी स्फ़ोटक परिस्थितीचा भडका उडवून देण्यासाठी पुरेशी असते, हे विसरता कामा नये. म्हणूनच भारत सरकारने तात्काळ अशा प्रवृत्तीची दखल घेऊन पावले उचलेली आहेत. आपण सामान्य भारतीय नागरिकांनीही ब्रिटनच्या ट्राफ़ाल्गार चौकात उत्स्फ़ुर्तपणे जमलेल्या जागरूक भारतीय बांधवांप्रमाणे ह्या प्रवृत्तीला व त्यांच्या पाठीराख्यांना आपापल्या प्रदेशात व क्षेत्रात नामोहरम करणे अगत्याचे आहे.

9 comments:

  1. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी इंग्लंडमध्ये स्थायीक झालेल्या शिख समुदायाला वाटले की आपले स्वतंत्र शिखीस्तान होऊ शकते.त्या दृष्टीने त्यांनी चळवळ आणि निधी उभारायला सुरुवात केली. माझा एक मित्र १९७५ च्या सुमारास इंग्लंडमध्ये शिकायला गेला होता. तेव्हा त्याने हा प्रकार पाहिला. त्यावेळी आपल्या देशात अशा चळवळीचा मागमुसही नव्ह्ता. इंग्लंडमध्ये बराच निधी यांच्याकडे आहे.

    ReplyDelete
  2. केजरीवालन हे भुत 2017 निवडनुकीत आणले होते व अजुनही आपचे आमदार खलिस्तान समर्थक आहेत.अकाली सत्तेवर येनार नव्हतेच पन अराजकी केजरीवाल पंजाबमधे बसुन केंद्र सरकारला डोकेदुखी झाला असता म्हनुन भाजपने अमरींदरना छुपी मदत केली आणि कांगरेसची भावी इंदिरा प्रिंयांकाला भंमक सिद्धुला मुख्यमंत्री करायच होत अमरींदरनी इंगा दाखवला म्हनुनराहील पन नंतर ते रीटायर होनार आहेत तेव्हा बाजवा गळाभेटीने जीवन पावन झालेल्या नवजोतला सत्ता द्ययची का हे पंजाबला ठरवाव लागेल

    ReplyDelete
  3. भाउ पाकने हे धंदे परत सुरु करायला काश्मीरच अपयश जस कारन आहे तस बलोचीस्तान मधील लढाइ पन आहे मधे चीनने बलोच नेेत्यांशी डायरेक्ट बोलनी केली त्याच कारन बलोचीस्थानचा काही भाग पाक सरकार सेना यांच्या ताब्यात नाहीये तिथे डोंगरात घनघोर लढाइ चालुय पाक सैनिंकाचे मृतदेह खुप दिवस तिथे पडुन असतात बाहेर काढता येत नाहीत पन तिथले लोक त्याचे विडिओ बाहेरील देशात पाठवतात मगच माहीती मिळते विदेशी चॅनल दाखवतात तिथे मतदान झाल नाही आणि ते लोक ११ आॅगस्टला स्वातंत्रदिन मानतात

    ReplyDelete
  4. या लेखात एक वाक्य आहे:

    "त्या प्रचंड यशाने राजीव गांधींचे युग सुरू झाले आणि त्यातच वाजपेयींच्या भाजपाची धुळधाण उडालेली होती. पण त्याच अफ़ाट मतांच्या दणक्याने पंजाबचा आगडोंब शांत झाला होता."

    राजीव गांधींचा झंझावात डिसेंबर १९८४ मधला तर पंजाबातील दहशतवाद पूर्ण थांबला १९९२ च्या शेवटी. तेव्हा राजीव गांधींना मिळालेल्या अफाट मतांच्या दणक्याने पंजाबचा आगडोंब शांत झाला असे म्हणता येईल का याविषयी साशंकता वाटते.

    खलिस्तानी दहशतवाद्यांनी १९८४ नंतर मोठ्या प्रमाणावर दहशतवादी कारवाया केल्या होत्या. १० मे १९८५ रोजी इंदिरा गांधींच्या हत्येचा खटला दिल्लीत सुरू झाला त्यावेळी दहशतवाद्यांनी 'रेडिओ बॉम्ब' वापरून जवळपास ५० निरपराधांना ठार मारले होते. या प्रकाराला एक महिना होतो न होतो तोच कॅनडाहून भारतात येणारे एअर इंडियाचे कनिष्क हे विमान आयर्लंडच्या किनाऱ्याजवळ खलिस्तानी दहशतवाद्यांनी उडविले. १९८६ मध्ये पुण्यात येऊन माजी लष्करप्रमुख अरूणकुमार वैद्यांची हत्या केली होती. जुलै १९८७ मध्ये पंजाब सीमेजवळ हरियाणात लालरू या ठिकाणी हरियाणा एस.टी च्या दोन बस थांबवून त्यातून शिख प्रवाशांना वेगळे करून हिंदू प्रवाशांना ठार मारले होते. ऑक्टोबर १९८७ मध्ये ऐन दिवाळीच्या दिवशी दिल्लीमध्ये रॅन्डम गोळीबार करून १०-१२ निरपराधांना ठार मारले होते. त्याचबरोबर दिल्लीमध्ये आय.एस.बी.टी या आंतरराज्यीय बस स्थानकावर बॉम्बस्फोट, अबोहरमध्ये बाजारात बॉम्बस्फोट, पतियाळातील थापर कॉलेजमध्ये कॉलेजचे गॅदरींग बघायला आलेल्या पंजाबबाहेरील विद्यार्थ्यांना ठार मारणे हे प्रकारही दहशतवाद्यांनी १९८८-८९ मध्ये केले होते. १९९० मध्ये थेट कर्नाटकात बिदरमध्ये एका थेटरात खलिस्तानी दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. १९९१ मध्ये लोकसभा निवडणुकांच्या दोन टप्प्यांचे मतदान आणि मतमोजणी राजीव गांधींच्या हत्येमुळे पुढे ढकलण्यात आली. मतमोजणी सुरू झाली १६ जून १९९१ रोजी तर पंजाबात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार होते २२ जून रोजी. त्याच्या आदल्या दिवशी रात्री खलिस्तान दहशतवाद्यांनी लुधियानाजवळ लांबी येथे दोन रेल्वेगाड्या थांबवून त्यात बेछूट गोळीबार करून १०० पेक्षा जास्त प्रवाशांना ठार मारले.कनिष्क प्रकरणानंतरचा सर्वाधिक बळी घेणारा हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा हल्ला होता. २० जून रोजी संध्याकाळी राष्ट्रपती वेंकटरामन यांनी नरसिंहरावांना सरकार बनवायला पाचारण केले. त्यानंतर मावळते पंतप्रधान चंद्रशेखर, त्यांच्या सरकारमधील कायदामंत्री सुब्रमण्यम स्वामी आणि दुसऱ्या दिवशी पंतप्रधानपदाची सुत्रे हाती घेणार असलेले नरसिंहराव यांच्याशी सल्लामसलत करून मावळत्या चंद्रशेखर सरकारच्या शिफारशीने राष्ट्रपतींनी पंजाबमधील मतदान पुढे ढकलले. ते नंतर फेब्रुवारी १९९२ मध्ये झाले. चंद्रशेखर सरकारचा हा शेवटचा निर्णय ठरला. हा निर्णय घेतला गेला त्यामागे लुधियानाजवळील रेल्वेहल्ला हे कारण होते. पंजाबात पोलिस महानिरीक्षक जुलियो रिबेरो यांनी दहशतवाद्यांविरूध्द् कडक भूमिका घेतली होती. ते सप्टेंबर १९९१ मध्ये भारताचे रूमेनियातील राजदूत होते. त्यांच्यावर बुखारेस्टमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांनी प्राणघातक हल्ला केला. सुदैवाने ते त्यातून बचावले. त्यानंतर काही दिवसातच खलिस्तानी दहशतवाद्यांनी रूमेनियाचे भारतातील राजदूत लिव्हियू राडू यांचे अपहरण केले होते. काही दिवसांनी त्यांना सोडून दिले. ते का सोडून दिले हे मला माहित नाही पण त्यांना एका रात्री पंजाबमध्ये दिल्लीकडे येणाऱ्या ट्रेनमध्ये बसवून दिले होते. नोव्हेंबर १९९१ मध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईजवळ कल्याणला लोकल गाडीत बॉम्बस्फोट घडवून आणला. त्यातही १०-१२ निरपराधांचा बळी पडला होता. डिसेंबर १९९१ मध्ये दहशतवाद्यांनी चौकी मान आणि सोहियान या दोन स्टेशनादरम्यान रेल्वेगाडी थांबवून जूनमध्ये केला होता तोच प्रकार केला आणि परत ५० पेक्षा जास्त बळी घेतले. फेब्रुवारी १९९२ मध्ये पंजाबात बियंतसिंग मुख्यमंत्री झाले. त्यांनी पोलिस महानिरीक्षक के.पी.एस गिलना दहशतवाद्यांना संपवायची पूर्ण मोकळीक दिली. त्यानंतर कोणतीही दयामाया न दाखवता खऱ्या किंवा खोट्या चकमकीत पंजाब पोलिसांनी अनेक दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. त्यानंतर पंजाबात दहशतवाद थंडावला. नाही म्हणायला ऑगस्ट १९९२ मध्ये दहशतवाद्यांनी कोणत्यातरी कारखान्यात कामाला असलेल्या पंजाब बाहेरील १०-१२ मजूरांना ठार मारले होते. मला वाटते तो दहशतवाद्यांचा शेवटचा मोठा हल्ला होता.

    तेव्हा सांगायचा मुद्दा हा की १९८४ नंतर पंजाबातील दहशतवाद थंडावला हे म्हणता येईल का याविषयी साशंकता वाटते. दहशतवाद्यांनी अनेक मोठे हल्ले १९८४ नंतर केले होते.







    ReplyDelete
  5. श्री भाऊ सर्वात महत्वाचा फरक काश्मीर आणि पंजाब मध्ये हा आहे की सर्व सामान्य पंजाबी जनता ही तेव्हा आणि आता सुद्धा खलिस्तानी विचारानी प्रभावित होणार नाही, त्याउलट काश्मिरी जनताभारत हा आपला देश आहे हे मानायला तयार नाही, पण ईशान्य कडे तास नाहीये तिथली लोक पुन्हा भारतीय विचारांची आहेत.-आधी वाजपेयी आणि आता मोदी त्या भागाकडे पुर्ण लक्ष देत आहेत आणि त्याचे चांगले परिणाम येणाऱ्या काळात दिसतील, काश्मीर च काही खर नाही अजून खुप लांबचा पल्ला गाठायचा आहे

    ReplyDelete
  6. Chaudry sahib =Lt Col Shahid Mehmood Malhi
    Pakistani army=service number PA 35043
    now posted in london
    (timing of opening Gurdwara Kartarpur Sahib )

    ReplyDelete
  7. भाऊ कदाचित त्यांना विरोध करण्यासाठी लंडन मध्ये जे भारतीयं जमले असतील त्याच्या मागे डोवल असू शकतात.

    आतापर्यंत झालेल्या गोष्टी हेच सांगतात कि डोवल यांचं चौफेर लक्ष असतं.

    ReplyDelete
    Replies
    1. खलीस्तान चळवळ आणि डोवोल यात नेहमी डोवोल जिंकत आलेले आहेत. या चळवळीला तोंड देण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलावीत, हा सल्ला अधिकारवाणीने देण्यासाठी डोवोल यांच्यापेक्षा दुसरे कोण कोण असू शकणार आहे?

      Delete
  8. अतिशय सुरेख आणि माहितीपूर्ण लेख.

    ReplyDelete